पवार खोटे का बोलत आहेत?

    दिनांक : 30-Apr-2022
Total Views |


सृजनाचे स्वातंत्र्य तर दिलेच पाहिजे, पण मग लोकांनी त्यासाठी पैसे द्यावे, अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे. माध्यमातले हे खेळ चालूच असले तरी वास्तव जगात मात्र अशा लोकांचे बुरखे टराटरा फाटतात आणि मग त्यांना खोटीनाटी विधाने करून तोंड लपवावे लागते. कोरेगाव-भीमा प्रकरणात शरद पवारांचे सध्या असेच झाले आहे.
 
 
 
sharad pawar
 
 
नव्वदच्या दशकात जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळ्या भाजून घेणारे राजकीय पुढारी दाखवून चित्रपटात खलनायक उभे केले जायचे. माध्यमांतल्या बिनडोकांनी ते भाजपचे आहेत, असे चित्ररंजन करायला सुरुवात केली. ‘नेटफिल्क्स’ भारतात सपशेल गंडले. कारण, त्यांच्या बहुसंख्य सीरिजमध्ये राजकीय खलनायक अशाच वळणाचे आहेत. सृजनाचे स्वातंत्र्य तर दिलेच पाहिजे, पण मग लोकांनी त्यासाठी पैसे द्यावे, अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे. माध्यमातले हे खेळ चालूच असले तरी वास्तव जगात मात्र अशा लोकांचे बुरखे टराटरा फाटतात आणि मग त्यांना खोटीनाटी विधाने करून तोंड लपवावे लागते. कोरेगाव-भीमा प्रकरणात शरद पवारांचे सध्या असेच झाले आहे.
 
‘एल्गार परिषदे’त जे काही गरळ ओकण्याचे काम झाले, त्यानंतर जातीय दंगली उसळल्या. यात हिंदुत्ववाद्यांना विनाकारण गोवण्याचे प्रकार झाले. मात्र, नंतर हे उद्योग सपशेल उघडे पडले. कोरेगाव-भीमा आयोगाचे साक्ष, पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असतानाच शरद पवारांनी आपली जुनी खेळी खेळली आणि आपल्याला यातले बरेच काही माहीत असल्याचा आव आणला. जोपर्यंत हे माध्यमांत आणि पवार साहेबांच्या लाडक्या पत्रकारांनी निर्माण केलेल्या गैरसमजांपर्यंत लागू होते, तोपर्यंत ठीक! मात्र, या सार्‍याची दखल आयोगाने घेतली आणि खुद्द पवारांनाच साक्षीसाठी बोलावले. शरद पवारांच्या आयुष्यातील ही कदाचित पहिलीच घटना असेल, ज्यात त्यांना अशा प्रकारे साक्षीला फेर्‍या माराव्या लागल्या. पवार आता फेर्‍या मारत आहेत आणि यापुढेही मारतील!
 
ते असे करणार याचे कारणदेखील नीट समजावून घेतले पाहिजे. निवडणूक हा मतांचा खेळ. जातीचे गठ्ठे बरहुकूम मिळाले की ही संख्येने अल्प असलेल्या राजकारण्यांना ते हवेच असतात. पवार आणि त्यांचे बगलबच्चे हेच करीत आले आहेत. त्यासाठी त्यांनी सगळ्या जाती-धर्माच्या लोकांना वापरले. कोरेगाव- भीम प्रकरणात अडकलेले लोक निर्दोष आहेत, असे ते माध्यमांत सांगतात. मात्र, आयोगासमोर आपल्याला कोणावरच आरोप करायचे नाहीत, असेही म्हणतात. त्यामुळे आता मुद्दा असा येतो की,ज्याच्या समर्थनावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे पद शाबूत आहे, गृहमंत्री ज्यांचा आहे ते पवार अशी विधाने का करीत आहेत? जे तुरुंगात गेले, ते सगळे माओवादी कारवायांसाठी कुख्यात आहेत. शहरी नक्षल्यांचा आता शहरे अस्वस्थ करण्याचा डाव यशस्वी करण्यासाठी ते काम करीत आहेत. याचे सबळ पुरावे, या मंडळींच्या डायर्‍या, परस्परांचे संवाद यात सापडलेही आहेत. काहींच्या डायर्‍यांत तर थेट देशाच्या पंतप्रधानांना ‘टारगेट’ करण्याचा डाव समोर आला आहे. पवारांना मोदी आणि त्यांच्या विचारधारेविषयी किती प्रेम आहे, हे तर अगदी जगजाहीर. मात्र, इथे राज्य आणि देशाचे व्यापक हितही पायदळी तुडविण्याचे उद्योग ते करीत आहेत.
 
देशात सातत्याने अराजक माजत राहावे, हा डाव्यांचा मनसुबा! दोन जातीत दंगली घडवून आणल्या की, यातला काही डाव साध्य होतो. कोरेगाव-भीमा घटनेनंतर नेमके तेच झाले. मागासवर्गीय समाजातील तरूणांची माथी भडकली आणि ते रस्त्यावर उतरले. त्यावेळी त्याच्यांशी संवाद साधला असता जे लक्षात आले ते गंभीर होते. माहिती-तंत्रज्ञानाच्या आणि गतीने माहिती पोहोचविण्याच्या आजच्या काळात या तरूणांना काही भलतेच सांगितले गेले होते. कोरेगाव-भीमाला मागासवर्गीयांच्या हत्या झाल्याचे सांगितले गेले. पेशवाईच्या विरोधातल्या घोषणा आणि नंतर या अफवा यांचा परस्पर संबंध काय? ते शोधून काढण्याचे काम खरे तर पटेल आयोग करीत आहे. मात्र, त्यांना त्यांचे काम करू न देता, माध्यमांतून या सगळ्या प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचे आणि दबाव आणण्याचे काम पवार करीत आहेत.

 
डावे नक्षल हे हिंदुत्ववाद्यांना प्रतिगामी मानणारे. त्यांच्या स्वप्नरंजनात सगळ्यांसाठी विकास असतो. पण, तो कोण करते आहे, हे त्यांच्या डोक्यात शिरत नाही. गडचिरोलीत रस्ते आले की मेधा पाटकरांसारखे लोक ते श्रीमंताच्या आलिशान गाड्यांसाठी बांधले गेल्याचा आरोप करतात. आता यावर हसावे की रडावे, तेच कळत नाही. चौकात उभे राहून डफलीवर थाप मारल्याने, एका सुरात ‘मुर्दाबाद’ची गाणी गायल्याने कोणाला रोजीरोटी मिळते? कोणाच्या शेताला पाणी मिळते? कुठे उद्योग उभे राहातात आणि रोजगार कोणाला मिळतो? जगभरात डाव्यांना या प्रश्नांची उत्तरे या मार्गाने शोधून काढता आलेली नाहीत. आता मुद्दा असा आहे की, मग हे सगळे कशासाठी चालते? हे सगळे चालते ते केवळ माध्यमांमध्ये निरनिराळ्या प्रकारची ‘नॅरेशन’ रचण्यासाठी! गरिबी, बेरोजगारी याबाबत सहानुभूती निर्माण करून मोठ्या राजकीय लढाया टाळता येतात. सत्ताधारी पक्षाविरोधात विखार निर्माण करता येतो आणि मग संधी मिळाली की, स्वत:साठी आणि स्वत:च्या पित्तूसाठी बचावाचे मार्गही शोधता येतो. अशा लोकांचे विचारांशी, विचाराच्या लढाईशी काहीच देणे घेणे नसते. सोईचे राजकारण करायचे, त्यातून सत्ता मिळवायची यात देश, समाज यांचे कितीही नुकसान होवो, त्यांना काहीच फरक पडत नाही. देश आणि समाज दुभंगला तरी चालेल, पण यांच्यावरचे सत्तेचे छत्र कायम राहिले पाहिजे!