राजकारण बुद्धीचे, बडबडीचे काम नव्हे!

    दिनांक : 28-Apr-2022
Total Views |

पंचतंत्रकार सांगतात की, नीट शक्ती संतुलन केले, तर प्रचंड हत्तीलादेखील मारता येते. ‘पंचतंत्र’ हे राजनितीशास्त्रावरील अतिशय उत्तम पुस्तक आहे. ज्यांना हे समजले नाही, त्यांनी या पुस्तकाला लहान मुलांच्या गोष्टीचे पुस्तक करून ठेवलेले आहे. उपेक्षेने पुस्तके मारता येतात किंवा जाळून संपवून टाकता येतात. पण,लहान मुलांचे पुस्तक करूनही एखादे पुस्तक कसे संपविता येते, याचे ‘पंचतंत्र’ हे एक उदाहरण आहे.

 
 

hatti1
 
मुंबईहून प्रकाशित होणार्‍या मराठी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरील रोजच्या ठळक बातम्या कोणत्या असतात? ‘कौन बनेगा करोडपती’, यातील हा दहा लाखांचा प्रश्न नाही. म्हटला तर पहिलाच प्रश्न समजायला हरकत नाही, कारण त्याचे उत्तर सोपे असते. पहिल्या पानावरील बातमीचा विषय अमुकअमुक यांच्यावर तमुकतमुक यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला. इतके कोटी रुपये हडप केले गेले. इतके प्लॉट आणि बंगले आहेत. ‘ईडी’चे अमुकअमुक ठिकाणी छापे पडले. त्या छाप्यावर टीका करताना ज्येष्ठ नेते म्हणाले... याच बातम्या आपण रोज वाचत असतो.
 
वाचायच्या नसल्या तरी वाचाव्या लागतात. कारण, पैसे देऊन आपण वर्तमानपत्र विकत घेतो. पैसे देऊन विकत घेतलेली घाण जवळ बाळगण्याशिवाय दुसरा काही पर्याय राहत नाही. अशा बातम्या सतत वाचल्यानंतर मला माझ्या स्वभावाप्रमाणे कधी पंचतंत्रातील गोष्टी आठवतात, तर कधी इसापनितीतील गोष्टी आठवतात. पण यावेळी पंचतंत्रातील गोष्टी आठवल्या. गोष्टी वाचायला आणि ऐकायला सर्वांनाच आवडत असल्यामुळे त्या इथे देतो. त्यावर भाष्य करीत नाही. कोणत्याही राजकीय नेत्याचे नावही घेणार नाही. वाचकांनी त्यांचे अंदाज आणि अनुमान काढावेत.
 
पहिली कथा पोटात नाग असणार्‍या एका राजपुत्राची आहे. पोटातील नागाला मारण्याचे खूप प्रयत्न होतात, पण त्यात यश येत नाही. कंटाळून तो देशाटनाला जातो. एका मंदिरात विश्रांतीसाठी थांबतो. पहाटे राजाच्या मंत्र्याचे दूत येऊन त्याला घेऊन जातात आणि त्याचे लग्न राजकन्येशी लावून देतात. राजकन्येशी लग्न होण्याचे कारण असे की, ही राजकन्या राजाला नमस्कार करीत असताना नेहमी म्हणत असे की, ”महाराज, आपल्या कर्मातून उत्पन्न झालेले फळ तुम्ही भोगीत आहात.” दुसरी राजकन्या म्हणत असे, ”महाराजांच्यामुळे आम्ही सर्व सुखांना प्राप्त करणारे झालो आहोत.“ तेव्हा राजाने पहिल्या राजकन्येला धडा द्यायचे ठरविले आणि ‘भोग आपल्या कर्माची फळे’ म्हणून मंदिरातील राजपुत्राशी लग्न लावून दिले.
 
तिनेही त्याला आनंदाने स्वीकारले आणि ती त्याच्या बरोबर आपले, राजधानीचे शहर सोडून दुसर्‍या शहरात निघाली. वाटेत एक गाव लागले. विश्रांतीसाठी ते एका झाडाखाली थांबले. तिथे जवळच एक वारुळ होते. राजकन्या गावात गेली आणि तिने भोजनाची सामग्री विकत आणली. तोपर्यंत तो युवक वारुळावर डोक ठेवून झोपी गेला होता.
 
तिने पाहिले की, आपल्या पतीच्या मुखातून एक नाग हवा घेण्यासाठी बाहेर आलेला आहे आणि त्याचवेळी वारुळातून दुसरा नागही बाहेर आलेला आहे. वारुळातील नाग तरुणाच्या मुखातील नागाला म्हणतो, “अरे दुष्टा, या सुकुमार तरुणाच्या पोटात राहून तू त्याचा नाश करीत आहेस. लोकांना हे माहीत नाही की, जुन्या काळ्या मोहरीचा काढा करून जर या तरुणाला पाजला, तर तुझा मृत्यू अटळ आहे.” तरुणाच्या मुखातील नाग म्हणतो, “तू कोण मोठा धर्मात्मा लागून गेला आहेस. तूदेखील वारुळात सोन्याच्या हंड्यावर बसलेला आहेस. जर कुणी उकळते तेल वारुळात सोडले, तर तू त्यात मरशील.”राजकन्या हे सर्व ऐकते. दोन्ही उपाय करते आणि दोन्ही नागांना ठार करून टाकते. पंचतंत्रकार सांगतात की, भांडणामध्ये एकमेकांची गुपिते बाहेर काढू नयेत, ती काढली तर असा नाश होतो. 
 
जे गेलं त्याचा सतत शोक करीत बसू नये. पंचतंत्रकार सांगतात,
 
नष्टं मतृमतिक्रान्तं नानुशोचन्ति पण्डिताः।
पण्डितानात्र्च मूर्खाणां विशेषाऽयं स्मृतः॥
 
नष्ट, मृत झालेले आणि पळून गेलेल्या लोकांबद्दल शहाणी माणसे शोक करीत नाहीत. शहाणा आणि मूर्ख यातील हाच फरक आहे. पंचतंत्रकार सांगतात की, शोक करीत बसण्याऐवजी शोकाला कारणीभूत झालेला विषय कसा संपविता येईल याचा विचार बुद्धीमान माणसाने करावा लागतो आणि मग बुद्धीचा प्रभाव कसा असतो, हे पंचतंत्रकार एका कथेतून सांगतात.
 
या कथेत सुतार पक्षी, एक मधमाशी आणि एक बेडूक तिघेही मिळून हत्तीला कसे ठार करतात हे सांगितले आहे. हत्तीला मारण्याची शक्ती या तिघांमध्ये नाही, हे सगळे जग जाणते. पण, तिघे जेव्हा आपापल्या शक्तीने एकत्र येतात, तेव्हा या शक्तीचा प्रभाव कसा असतो, हे ही कथा फार सुंदररित्या सांगते.कथा सुरू होते, ती एका वृक्षावरील चिमणा आणि चिमणीच्या घरट्यावरून. चिमणीने अंडी घातलेली असतात आणि त्याचवेळी त्या झाडाखाली एक धिप्पाड हत्ती येतो. तो सोंडेने एक फांदी खेचून खाली पाडतो. त्या फांदीवरच चिमणा-चिमणीचे घरटे असते. अंडी फुटतात, म्हणून चिमणी रडू लागते. तिच्या समाचारासाठी सुतार पक्षी येतो. तो चिमणीला म्हणतो, “चिंता करू नकोस आपण सर्व मिळून या हत्तीला ठार करू.”
 
सुतार पक्षी मधमाशीकडे जातो. त्या दोघांची मैत्री असते. तो मधमाशीला चिमणा-चिमणीच्या घराची कथा सांगतो आणि मदतीची विनंती करतो. ती तयार होते. ते दोघे मिळून एका बेडकाकडे जातात. त्यालाही चिमणा-चिमणीची कथा सांगतात आणि हत्तीला संपविण्याची योजना सांगतात, तोही तयार होतो.योजना अशी असते की, मधमाशीने हत्तीच्या कानात शिरावे, त्याने हत्ती अस्वस्थ होईल. सुतार पक्ष्याने हत्तीच्या डोळ्यावर प्रहार करावे, त्यामुळे तो आंधळा होईल. वेदनेने कासावीस होईल, अशा वेळी एका मोठ्या दरीच्या किनारी बेडकाने आवाज करीत बसावे. हत्तीला वाटेल की, बेडूक ज्या दिशेने ओरडतो त्या दिशेला पाणी आहे. म्हणजे हत्ती त्या दिशेने जाईल आणि दरीत पडून मरेल. सगळेजण आपले काम ठरल्याप्रमाणे करतात आणि हत्ती दरीत पडून मरतो.
 
सत्तेवर बसलेल्यांना हत्तीचे बळ प्राप्त होते आणि सत्ता गेलेले चिमणा-चिमणीप्रमाणे शोक करतात. पंचतंत्रकार सांगतात की, नीट शक्ती संतुलन केले, तर प्रचंड हत्तीलादेखील मारता येते.तसे ‘पंचतंत्र’ हे राजनितीशास्त्रावरील अतिशय उत्तम पुस्तक आहे. ज्यांना हे समजले नाही त्यांनी या पुस्तकाला लहान मुलांच्या गोष्टीचे पुस्तक करून ठेवलेले आहे. उपेक्षेने पुस्तके मारता येतात किंवा जाळून संपवून टाकता येतात. पण, लहान मुलांचे पुस्तक करूनही एखादे पुस्तक कसे संपविता येते, याचे ‘पंचतंत्र’ हे एक उदाहरण आहे.
पंचतंत्रकार म्हणतात,
 
उपायने जयो-यादृग् रिपोस्तादृग न हेतिभिः।
उपायज्ञोऽल्पकायोऽपि न शूरैः परिभूयते।
 
शत्रूचा नाश करण्यासाठी हत्यारच पाहिजे असे काही नाही, त्याचा नाश वेगवेगळ्या उपायांनीही करता येतो आणि ज्याला उपाय माहीत आहे, असा शक्तीने छोटा असलेला प्राणीदेखील शक्तीमान प्राण्यांना घाबरत नाही. पंचतंत्रकार गोष्ट सांगतात.
 
एका झाडावर एक कावळ्याचे जोडपे राहत होते आणि त्याच झाडाच्या ढोलीत एक काळा नाग राहत होता. कावळीने अंडी घातली की, तो नाग ती अंडी येऊन खात असे. कावळ्याच्या जोडप्याला याचे दुःख होते. या दुःखावर उपाय कोणता, त्यांना काही सुचत नाही.जवळच राहणार्‍या एका कोल्ह्याजवळ ते गेले. कोल्ह्याला त्यांनी आपली व्यथा सांगितली. कोल्हा म्हणाला, “त्या काळ्या नागाला ठार मारणे तुम्हाला शक्य नाही. तो तुमच्यापेक्षा बलवान आहे. त्याला मारण्याचा उपाय सांगतो,” असे म्हणून त्याने उपाय सांगितला.
 
तो उपाय अंमलात आणण्यासाठी कावळा आणि कावळी राजवाड्याच्या तलावाशेजारी गेले. राजस्त्रिया तिथे स्नान करीत होत्या. त्यांनी आपले मौल्यवान दागिने बाहेर काढून ठेवले. त्यातील एक रत्नहार कावळीने उचलला आणि ती उडून गेली. तिच्या मागे रक्षक धावले. कावळीने तो रत्नहार नागाच्या ढोलीत टाकून दिला. रक्षक तिथपर्यंत आले. ढोलीत रत्नहार त्यांना दिसला आणि काळा सर्पही दिसला. त्यांनी हातातील काठ्यांनी त्या सापाला ठार केले आणि रत्नहार घेेऊन गेले. ‘पाहुण्याच्या काठीने साप मारावा’ ही म्हण या कथेतून जन्माला आली असावी.
 
पंचतंत्रकारांना सांगायचे आहे की, शत्रू बलवान आहे. त्याच्याकडे विविध साधने आहेत. त्याला दोनहात करून संपविणे शक्य नाही. त्याला संपविण्यासाठी ज्याच्याकडे शक्ती आहे त्याला त्याचा शत्रू करता आले पाहिजे. हे काम बुद्धीने करण्याचे आहे. कथेतील कावळ्याचे जोडपे रक्षकांशी वाटाघाटी करायला गेले नाहीत, पण त्यांनी काम असे केले की, रक्षकांना सापाला संपविल्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. राजकारण हे बुद्धीचे काम आहे, बडबडीचे काम नव्हे, हेच पंचतंत्रकारांना सांगायचे आहे,असे वाटते.