क्रमांक दोनची स्पर्धा आणि प्रशांत किशोर

    दिनांक : 28-Apr-2022
Total Views |

प्रशांत किशोर यांनी गांधी घराण्याच्या तालावर नाचावे, दुसर्‍या क्रमांकाचे नेतेपद सांभाळावे, अशी काँग्रेसची इच्छा होती. पण, मुळात प्रशांत किशोर स्वतः रणनीतिकार आहेत, त्यांना निवडणुका जिंकून देण्याचा चांगला अनुभव आहे, ते स्वतः संघटनेचा, संघटनेतील लोकांचा कुठे, कसा उपयोग करून घ्यावा, हे चांगलेच जाणतात. तेव्हा ते काँग्रेसमध्ये क्रमांक दोनच्या पदाची धुरा का हाती घेतील?
 
 
gandhi
 
 
 
आयन रँडची ‘अ‍ॅटलस श्रग्ड’ नावाची कादंबरी आहे. ‘मीडियॉक्रसी’ या संकल्पनांच्या भोवती ही कांदबरी फिरते. नेतृत्व, नेतृत्वक्षमतेचा विकास, व्यवस्था सत्तेच्या केंद्रस्थानी येऊ लागली किंवा सत्तेपासून दूर जाऊ लागली की, कर्तृत्ववान माणसांची जाणवणारी निकड अशा आशयाचे हे पुस्तक आहे. यात मध्यम कुवतीच्या माणसांनी घडवून आणलेल्या खेळांचेही उत्तम वर्णन केले आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह या गेल्या दशकभरात भारताचा राजकीय पट वेगळ्या रंगात आणणार्‍या दोन व्यक्तींनंतर राजकीय आराखड्यांसाठी सगळ्यात चर्चिले गेलेले नाव म्हणजे प्रशांत किशोर. आता प्रशांत किशोर पुन्हा चर्चेत आले आहेत ते काँग्रेसच्या त्यांनी नाकारलेल्या ऑफरमुळे. प्रशांत किशोरना काय हवे होते आणि काँग्रेसला काय हवे होते, याचे तपशीलवार विश्लेषण विविध माध्यमांत प्रकाशित झाले आहे. त्या तपशीलात फारसे जाण्याचे कारण नाही. मुळात तो त्यांचा खासगी मामला आहे. काँग्रेस आणि प्रशांत किशोर यांच्यात जे काही ठरेल ते सगळेच लोकांना सांगितले जाईल, असे भाबडेपणे मानण्याचेही कारण नाही. पण, काँग्रेसची स्पर्धा प्रशांत किशोर यांना पहिल्या नव्हे तर दुसर्‍या क्रमांकाच्या नेतृत्वपदी आणण्यासाठीच होती.
 
त्यामागचे कारण म्हणजे घराणेशाही. देशातील भाजप वगळता सर्वच पक्ष एकाच घराण्याच्या मालकीचे झालेले आहेत. काँग्रेस गांधी घराण्याचा, तृणमूल काँग्रेस बॅनर्जी घराण्याचा, समाजवादी पक्ष यादव घराण्याचा, शिवसेना ठाकरे घराण्याचा, राष्ट्रीय जनता दल यादव घराण्याचा, निधर्मी जनता दल, देवेगौडा घराण्याचा, असा हा प्रकार आहे. या सर्वच पक्षांत अनुक्रमे सोनियांनंतर राहुल-प्रियांका गांधी, ममतांनंतर अभिषेक बॅनर्जी, मुलायमसिहांनंतर अखिलेश यादव, बाळासाहेबांनंतर उद्धव-आदित्य ठाकरे, लालुप्रसादांनंतर तेजस्वी-तेजप्रताप यादव, देवेगौडानंतर कुमारस्वामी यांच्याच हाती क्रमांक एकचे पद आणि अधिकार आहेत, यापुढेही असणार आहेत. परिणामी, त्या त्या घराण्याव्यतिरिक्त कोणत्याही नेत्याला या पक्षातील सर्वोच्चपदाची अपेक्षा नाही, नसते. त्यांचे डोळे लागलेले असतात ते क्रमांक दोनच्या स्थानासाठी. पण प्रशांत किशोर यांचे तसे नाही.
 
प्रशांत किशोर यांनी आपल्या ‘पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट’च्या करिअरची सुरुवात भाजपपासून केली. २०१४ सालच्या निवडणुकीवेळी ते भाजपची निवडणूक रणनीति आखत होते. दरम्यान, नरेंद्र मोदी आणि अमित शाह निवडणुकीचा नव्हे, तर पक्ष आणि देश दोन्हीच्याही अनेक दशकांच्या भविष्याचा विचार करणारे लोक आहेत. त्यातूनच त्यांनी भारतीय राजकारणाची परिस्थिती पार पालटून टाकली आणि त्यांना आता प्रशांत किशोरांची आवश्यकताही भासत नाही. मोदी-शाह दीर्घकालीन रणनीति आखतात आणि तसे काम करण्यासाठी व्यावहारिक दृष्टिकोन नव्हे, तर वैचारिक अधिष्ठान असावे लागते. ते रा. स्व. संघ आणि भारतीय संस्कृतीतून नरेंद्र मोदी व अमित शाहंकडे आलेले आहे. पण, काँग्रेस अथवा वर उल्लेख केलेल्या अन्य पक्षांचे, त्यांच्या एकाच घराण्यातील सर्वोच्च नेतृत्वाचे तसे नाही. पक्षाचे कोणतेही वैचारिक अधिष्ठान नसल्याने ते फक्त निवडणुकांपुरता विचार करतात. पक्षाची दीर्घकालीन वाटचाल कशी असेल, कशी असायला हवी आणि त्यातून देशासाठी काय करता येईल, असे या घराण्याच्या वारसांना कधीही वाटत नाही. काँग्रेसही प्रशांत किशोर यांना पक्षप्रवेश देणार होती ती सर्वोच्च नेतृत्वासाठी नव्हे, तर गांधी घराण्याच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठीच.
 
सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे ‘मीडियॉकर’ अर्थात मध्यम वकुबाच्या माणसांचे असेच असते. पक्षाचे नेतृत्व घराणेशाहीच्या वारसदारानेच करावे, घराण्याच्या वलयाचा लाभ मिळवावा आणि इतरांनी पक्षनेतृत्वाच्या हुकूमाचे ताबेदार असावे, असेच या पक्षांना वाटते. त्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे काँग्रेस. काँग्रेसमध्ये अपवाद वगळता प्रत्येक वेळी गांधी घराण्यानेच पक्षाचे नेतृत्व केलेले आहे. २०१४ आणि २०१९ सालच्या लोकसभा निवडणुका, दरम्यानच्या काळातल्या विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका काँग्रेसने गांधी घराण्याच्याच नेतृत्वाखाली लढवल्या. त्यात त्या पक्षाला सपाटून मार खावा लागला. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी काँग्रेसला यश मिळवून देऊ शकत नाही, त्यांच्यात तशी क्षमता नाही, हेदेखील त्यातून उघड झाले. पण, तरीही काँग्रेसचे हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधींकडेच आहे आणि त्यांच्याऐवजी पूर्णवेळ अध्यक्ष निवडायचा असेल, तर तो राहुल आणि प्रियांकांपैकीच एक असेल. अशा स्थितीत प्रशांत किशोर पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वपदी येऊ शकत नाहीत.
 
काँग्रेसमध्ये आज कर्तृत्ववान लोकांची चांगलीच वाणवा निर्माण झालेली आहे. जे कर्तृत्ववान आहेत, असे वाटत होते, त्यातल्या अनेकांनी अन्य पक्षांची वाट धरलेली आहे किंवा त्यांना गांधी घराण्यानेच पक्षातून दूर केलेले आहे. प्रशांत किशोर या रणनीतिकाराच्या काँग्रेसप्रवेशाने पक्षातली कर्तृत्ववान व्यक्तींची गरज भागली जाईल, असे काँग्रेसला वाटले असेल. सभा वा प्रचारासाठी, नेत्यांच्या मागे गर्दी दाखवण्यासाठी कार्यकर्ते जसे भाड्याने आणले जातात, तसे नेतृत्वही भाड्याने आणण्यासारखेच हे. पण, काँग्रेस प्रशांत किशोर यांना सर्वोच्च नेतृत्व देण्याच्या मानसिकतेत कधीही नव्हती, ना पुढे असेल. प्रशांत किशोर यांनी गांधी घराण्याच्या तालावर नाचावे, दुसर्‍या क्रमांकाचे नेतेपद सांभाळावे, अशी काँग्रेसची इच्छा होती. पण, मुळात प्रशांत किशोर स्वतः रणनीतिकार आहेत, त्यांना निवडणुका जिंकून देण्याचा चांगला अनुभव आहे, ते स्वतः संघटनेचा, संघटनेतील नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा कुठे आणि कसा उपयोग करून घ्यावा, हे चांगलेच जाणतात. तेव्हा ते काँग्रेससारख्या पक्षात क्रमांक दोनच्या पदाची धुरा का हाती घेतील? म्हणूनच त्यांनी काँग्रेस पक्षप्रवेशाला नकार दिला. ‘अ‍ॅटलास श्रग्ड’मध्ये जी ‘मीडियॉक्रसी’ची मांडणी केलेली आहे, तशीच ही गत. पक्षात ‘मिडियॉकर’ लोक वाढल्यावर काय होते, हे समजून घेण्यासाठी प्रशांत किशोर प्रकरणाकडे पाहावे लागते. म्हणजे, पक्षात नेतृत्व उरत नाही, नेतृत्व करण्यासाठी बाहेरुन लोक आणावे लागतात, पण त्यांना आणायचे असते क्रमांक दोनच्या पदासाठी, तेव्हा प्रशांत किशोरसारखे लोक ती ऑफरच नाकारतात.
 
दरम्यान, वर उल्लेख केलेल्या प्रत्येक पक्षाचे नेतृत्व नाकर्ते आहे आणि त्यांनाच प्रशांत किशोरसारखे रणनीतिकार हवे असतात, पण सर्वोच्च नेतृत्व म्हणून नव्हे, तर दुसर्‍या क्रमांकाचे नेतृत्व म्हणून.म्हणजेच इथे पक्ष घराणेशाहीत अडकलेला तर राजकीय रणनीतिकाराकडेही नेतृत्व देण्याची तयारी नाही, अशी स्थिती तयार होते. काँग्रेस व प्रशांत किशोर प्रकरणही तसेच. पण, यातून पक्षाचा कधीही फायदा होऊ शकत नाही.