जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्याची महाराष्ट्र बसव परिषदेची मागणी

    दिनांक : 27-Apr-2022
Total Views |

नंदुरबार : प्रतिवर्षी तिथीनुसार अक्षयतृतीयेला क्रांतीसुर्य, थोर समाज सुधारक ,जगतज्योती, महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती असते. अनेक वर्षापासून राज्यात सर्वत्र महात्मा बसवेश्वर जयंती साजरी होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये देखील महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त प्रतिमापूजन व्हावे अशी मागणी महाराष्ट्र बसव परिषदेचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी केली आहे.
 
 


mahatma basveshwar 2 
 
 
जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की थोर समाज सुधारक महात्मा बसवेश्वर यांची जयंती 3 मे रोजी अक्षयतृतीयेला आहे. या संदर्भात नंदुरबार जिल्हा प्रशासनाला सन 2009 मध्ये महाराष्ट्र बसव परिषद नंदुरबार जिल्हा शाखेतर्फे पत्र देण्यात आले होते. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी नंदुरबार जिल्हा प्रशासनाला आदेश दिले होते.
जिल्हाधिकारी कार्यालय वगळता इतर कुठल्याही शासकीय, निमशासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त प्रतिमापूजन होत नसल्याचे दिसून येत आहे. मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून साजरी करण्याचे अध्यादेश शासनाने नुकतेच काढले आहेत.
विभागीय आयुक्त ,जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील सर्वच कार्यालयात सदर कार्यक्रम आयोजित करण्याबाबत आवश्यक सूचना निर्गमित करून अंमलबजावणी बाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी सु. ज. तुमराम यांनी परिपत्रकाद्वारे काढले आहेत. लिंगायत धर्माचे संस्थापक , क्रांतीज्योती, थोर समाज सुधारक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये अक्षय तृतीयेला तिथीनुसार जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करण्याची मागणी महाराष्ट्र बसव परिषदेचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी केली आहे.