शिवसैनिकांचा जिहाद

    दिनांक : 25-Apr-2022
Total Views |
एक तर आमचे मुकाट्याने समर्थन करा, आम्ही जे करू त्याला पाठिंबा द्या, अन्यथा जीवघेणे हल्ले, दगडफेकीला तयार राहा, अशीच शिवसेना-शिवसैनिकांची भूमिका. अफगाणिस्तानातील तालिबान वा सीरीया वगैरेतील ‘इसिस’ याहून निराळे काय करते? त्यांचा विचार एकसाचीच असतो, तसाच झापडबंद जिहादी विचार शिवसेना व शिवसैनिकही करताहेत, ते उद्धव ठाकरेंच्या प्रोत्साहनानेच.
 
 
shiv1
 
 
एकच अल्लाह, पैगंबर आणि कुराणाला मानत असल्याचे सांगत जगभरात इस्लामी कट्टरपंथिय जिहाद्यांनी पुरता उच्छाद मांडल्याचे दिसते. तीच गत सध्या शिवसेना आणि शिवसैनिकांची झालेली आहे. धर्मांध मुस्लीम जिहाद्यांप्रमाणे ‘आम्ही म्हणू ते आणि तितकेच, त्यापलीकडे कोणी विचार, कृती केल्यास त्याला जीवे मारण्यासाठी रस्त्यावर उतरुन हाणामारी, राडा आणि दगडफेक,’ असा प्रकार शिवसेना आणि शिवसैनिकांकडून केला जात आहे. त्याची अगदी अलीकडील उदाहरणे म्हणजे, भाजप नेते मोहित भारतीय यांच्यावरील हल्ला, रवी राणा आणि नवनीत राणा दाम्पत्यावरील हल्ला आणि भाजप नेते किरीट सोमय्यांवरील पुणे आणि मुंबईतील हल्ले. शुक्रवारी मोहित भारतीय आपल्या वाहनाने जात असताना ‘मातोश्री’समोर गाडी थांबवल्याच्या रागातून शिवसैनिकांनी त्यांच्यावर झुंडीने हल्ला केला. त्यांचा उद्देश मोहित भारतीय यांना संपवण्याचाच होता.
 
मशिदीसमोर हिंदूंनी येऊ नये वा धार्मिक मिरवणुका काढू नये म्हणत इस्लामी कट्टरपंथियांनी देशभरात ठिकठिकाणी धिंगाणा घातला होता. तसाच प्रकार शिवसैनिकांकडूनही सुरू असल्याचे मोहित भारतीय यांच्यावरील हल्ल्यातून स्पष्ट होते. त्यांचा गुन्हा काय, तर ‘मातोश्री’समोर वाहन थांबवणे. पण देशात लोकशाही असून भारतीय राज्यघटनेने सर्व नागरिकांना संचार स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. तसेच, ‘मातोश्री’समोरील रस्ता किंवा परिसर शिवसेना वा शिवसैनिकांच्या आणि ठाकरे कुटुंबीयांच्या मालकीचाही नाही. तरी त्यांनी त्या ठिकाणी गाडी थांबवल्याच्या कारणावरून मोहित भारतीय यांच्यावर हल्ला केला, यातून शिवसेना आणि शिवसैनिकांची जिहादी मानसिकताच दिसून येते. त्याला अर्थातच शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचाही पाठिंबा असणारच. कारण, कोण्या शिवसैनिकाने हिंसाचार, मारहाण केली तर त्याचा ‘मातोश्री’वर बोलावून घेऊन सत्कार करण्यात उद्धव ठाकरेंना नेहमीच अभिमान वाटत आलेला आहे.दरम्यान, मोहित भारतीय यांच्यावरील हल्ल्याच्या दुसर्‍याच दिवशी शिवसेनेने ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसा पठणाची इच्छा व्यक्त करणार्‍या रवी राणा व नवनीत राणा यांच्याविरोधात गोंधळाला सुरुवात केली. खरे म्हणजे, हनुमान चालीसा पठणाने उद्धव ठाकरे वा शिवसेनेवर आभाळ कोसळणार नव्हते. तसेच, तो कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्न नव्हता.
 
शिवसेनापक्षप्रमुखांच्या निवासस्थानासमोर दोघा व्यक्तींना हनुमान चालीसा म्हणता येईल, इतकी जागा निश्चितच असेल. पण, एकेकाळी पक्षविस्तार आणि त्यातून सत्तेसाठी पांघरलेली हिंदुत्वाची शाल फेकून दिल्याने उद्धव ठाकरे व शिवसेनेला राणा दाम्पत्याचे हनुमान चालीसा पठणही असह्य झाले. इतकेच नव्हे, तर राणा दाम्पत्य जणू काही ‘मातोश्री’वर चाल करून येणार आणि आम्ही त्यांना पराभूत करणार अशा आविर्भावातल्या शिवसैनिकांनाही त्या परिसरात व राणा दाम्पत्याच्या मुंबईतील घराबाहेर गोळा करण्यात आले होते. ते कशाला याचा दाखला त्यांनी दिलेल्या घोषणा आणि फेकून मारलेल्या बाटल्यांवरून, केलेल्या दगडफेकीतून तसेच संजय राऊतांच्या २० फूट जमिनीखाली गाडून टाकूच्या धमकीतूनही स्पष्ट झाले. जिहादी मानसिकता अशीच असते. त्यांना आपल्या अल्लाह, पैगंबर वा कुराणाविषयी अन्य कोणी काही बोललेले आवडत नाही, इथेही तसेच झाले.
 
पुढे मुंबई पोलिसांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांना पकडून खार पोलीस ठाण्यात नेले, तर तिथेही शिवसैनिकांची जिहादी पाती पोहोचली. रात्री उशिरा भाजप नेते किरीट सोमय्या राणा दाम्पत्याची भेट घेण्यासाठी खार पोलीस ठाण्याकडे निघाले, तर त्यालाही शिवसैनिकांनी विरोध केला. म्हणजेच, एक तर आमचे मुकाट्याने समर्थन करा, आम्ही जे करू त्याला पाठिंबा द्या, अन्यथा जीवघेणे हल्ले, दगडफेकीला तयार राहा, अशीच शिवसेना आणि शिवसैनिकांची भूमिका. अफगाणिस्तानातील तालिबान वा सीरीया वगैरेतील ‘इसिस’ याहून निराळे काय करते? त्यांचा विचार एकसाचीच असतो, तसाच झापडबंद विचार शिवसेना व शिवसैनिकही करताहेत, ते उद्धव ठाकरेंच्या प्रोत्साहनानेच. किरीट सोमय्या सातत्याने मुंबई महापालिका आणि महाविकास आघाडीतील शिवसेनेसह अन्य पक्षीय नेत्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणत आहेत. यशवंत जाधव, अनिल परब, संजय राऊत आणि इतरही अनेक शिवसेना नेते या भ्रष्टाचाराच्या आरोपांत सामील आहेत.
 
अर्थात, ते एकटेच त्यात सामील असतील असे नाही. कारण, गोष्टीत जसे अलीबाबा आणि चाळीस चोर असतात, तशीच या सगळ्या भ्रष्टाचार्‍यांच्या म्होरक्याचीही ‘पोलखोल’ होणारच आहे. पण, त्यानेच शिवसेना आणि शिवसैनिक बिथरलेले आहेत. नेत्यांचे भांडे फुटले, तर आपले काय होणार, आपले भलते-सलते उद्योग कसे चालणार, या भयाने त्यांना पछाडले आहे. धर्मांध मुस्लीम जिहादीदेखील असाच विचार करतात. त्यांच्या विचाराला वा प्रेरणेला धक्का लावण्याचा कोणी प्रयत्न केला की, रस्त्यावर उतरुन त्यांच्यावर दगडफेक करायला ते मागेपुढे पाहत नाहीत. इथे ज्यांना प्रेषित मानतो त्या आपल्या नेत्यांच्याच भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येऊ लागल्याने शिवसैनिकांनाही जोरदार धक्के बसू लागले आहेत. पण, हे तेवढ्यानेच थांबणार नाही, तर यापुढेही असेच होणार आणि तसे होऊ नये, म्हणूनच रस्त्यावर उतरुन, गाडीच्या काचा फोडून किरीट सोमय्यांची हत्या करण्याचा प्रयत्न शिवसैनिकांकडून केला गेला.अर्थात किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी प्रथमच हल्ला केला असे नव्हे.
 
कोरोनाच्या संकटकाळात मुंबई-पुण्यासह अवघा महाराष्ट्र जीवघेण्या संकटाशी झुंजत असताना आणि सर्वसामान्य नागरिक हतबल झालेला असतानाही शिवसेनेचा भ्रष्टाचाराचा उद्योग सुरुच होता. शिवसेना नेते संजय राऊत आणि ‘लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट’च्या सुजित पाटकर यांनी ‘जम्बो कोविड’ केंद्राच्या उभारणीत १०० कोटींचा भ्रष्टाचार केला व त्याची परिणती अनेक रुग्णांच्या मृत्युत झाली, याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या यंदाच्या फेब्रुवारीत पुण्यात गेले होते. पण, किरीट सोमय्या तिथे पोहोचताच आपल्या नेत्याचा भ्रष्टाचार उघडकीस आणत असल्याने संतापलेल्या शिवसैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. शिवसैनिकांच्या हल्ल्यामुळे किरीट सोमय्या पायर्‍यांवरून खाली कोसळले, त्यावरून शिवसैनिकांचा उद्देश चांगला नव्हता, त्यांना दगाफटकाच करायचा होता, हे सहज लक्षात येते. पण, ते तेव्हा साध्य झाले नाही, तर त्याच विचारांच्या शिवसैनिकांनी आता मुंबईतही किरीट सोमय्यांवर रक्त येईपर्यंत दगडफेक केली.
 
ती किरीट सोमय्या शिवसेना नेते व पक्षप्रमुखांचा बुरखा फाडतात व खरा चेहरा समोर आणतात म्हणूनच. मात्र, उद्धव ठाकरे वा शिवसैनिकांनी स्वतःची कातडी वाचवण्यासाठी इतरांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केल्यास तो त्यांच्याच अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. सत्ता आज आहे उद्या नाही. जोपर्यंत सत्ता असेल तोपर्यंत शिवसेनेवाले माजोर्डेपणा करून घेतील. भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधातही शिवसेनेने असाच प्रकार केला होता. त्यांना निराधार आणि निरर्थक गुन्ह्यात अडकवणे, त्यांच्या बंगल्याला अनधिकृत म्हणत त्याला पाडण्याचे इशारे देणे, असले प्रकार त्यांनी केले होते. पण, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आताही शिवसेना सत्तेच्या अहंकारात तेच करत आहे. पण, जनतेच्या दरबारात शिवसेना आणि शिवसैनिकांची मस्ती चालणार नाही. घोडा-मैदान जवळच आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत इथली जनताच जिहादी मानसिकतेच्या, हिंदूविरोधी शिवसेनेला तिची जागा दाखवून देईल.