यशस्वी व्यवस्थापकांच्या यशाचा त्रिकोण

    दिनांक : 23-Apr-2022
Total Views |


व्यवस्थापन क्षेत्रात काम करणार्‍या व्यवस्थापकांना खर्‍या अर्थाने यशस्वी व्हायचे झाल्यास त्यांनी आपण स्वत: आपले सहकारी-कर्मचारी व व्यवस्थापन कंपनी या सार्‍यांच्या संदर्भात भूतकाळ-वर्तमानकाळ व भविष्यकाळ या त्रिकालबाधित मुद्द्यांसह असणारा व्यावहारिक त्रिकोण साधणे नेहमीच गरजेचे ठरते.
 
 
 
 

MANAGER 
 
 
 
सद्यःस्थितीतील व्यवस्थापन व्यवस्थेत व्यवस्थापकांना खर्‍या अर्थाने यशस्वी होण्यासाठी त्यांच्याजवळ परिणामकारक नेतृत्वक्षमता व कर्तबगारी असणे आवश्यक ठरते. यासाठी आवश्यक असते ती व्यवस्थापकाला भविष्यकालीन योजनांना यशस्वी करण्याच्याद़ृष्टीने मागोवा घेण्याची वृत्ती. तसेच सद्यःस्थितीची पुरती जाण व मजबूत पकड आणि भूतकाळाचे केलेल्या कामांचे विश्लेषण करण्याची वृत्तीही तितकीच महत्त्वाची. ही त्रिसुत्री जर व्यवस्थापकांकडे नसेल, तर त्याला त्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळणे दुरापास्त ठरते व त्यामुळेच भविष्य, वर्तमान आणि भूतकाळाचा समर्पक व साधक त्रिकोण त्यांच्यासाठी आवश्यक ठरतो.
 
या प्राथमिक विवेचनावरून व्यवस्थापन आणि व्यवस्थापकांसाठी त्यांचे काम आणि जबाबदारी कुठल्याही क्षेत्रातील असली तरी त्यांच्या कार्य-कर्तृत्व-नेतृत्व यांच्याशी संबंधित यशाच्या त्रिकोणाचे व त्याच्या अंमलबजावणीचे महत्त्व सहजपणे लक्षात येते. या महत्त्वाचे महात्म्य तर येथवर आहे की, जर या त्रिकोणाची जपणूक अंमलबजावणी पुरतेपणी न करणार्‍या व्यवस्थापकांना यश व यशस्वी कारकीर्द जवळ जवळ दुर्मीळच होते.
 
या यशाच्या यशस्वी त्रिकोणाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य आवश्यकता असते ती मानसिकता वा मनाच्या धारणेची. थोडक्यात म्हणजे, प्रत्येकच व्यवस्थापकामध्ये त्यांच्या कार्यक्षेत्रानुसार शिक्षण-प्रशिक्षण अनुभव तर असतोच. मात्र, त्यांच्या जोडीला जर व्यवस्थापकांमध्ये स्वत:साठी पूरक व इतरांसाठी प्रेरक अशी मानसिकता असेल, तर ही मंडळी आपल्या सहकार्‍यांकरवी अशक्य-अतर्क्य कामेसुद्धा करू शकतात, हे अनुभवसिद्ध आहे.
 
व्यवस्थापकांच्या मानसिकतेबरोबरच प्रत्येक व्यवस्थापकाने आपापल्या कार्यक्षेत्रातील काम आणि कार्यसंस्कृती, काम करण्याच्या पद्धती, ध्येय-धोरणे, संवाद प्रक्रिया इ.ची जोड दिली, तर त्यांच्या संधीचे सोने सहजगत्या होऊ शकते. अशा प्रकारे कंपनी-कामकाज आणि कर्मचारी या सार्‍यांचा ताळमेळ वा समन्वय साधून सफलता साधण्याचे आव्हानपर व प्रसंगी कठीण पण प्रयत्नांती शक्य असणारे कामच तर व्यवस्थापकांकडून अपेक्षित असते.
 
अशा प्रकारे व्यवस्थापनपद्धती आणि शैलीतील पहिला कोन ठरतो तो वर्तमान वा सद्यःस्थिती. व्यवस्थापकांनी सामायिक स्वरूपात कंपनी म्हणून व व्यक्तिगत स्वरूपात आपण स्वत: व आपले सहकारी-कर्मचारी कुठे आहोत, याचा वेळेत व वेळोवेळी कानोसा घेणे प्रत्येकाच्या हिताचे असते. यातूनच कर्मचार्‍यांपासून कंपनीपर्यंत प्रत्येकाच्या कामाचे मोजमाप होते व हे मोजमाप व्यावसायिक प्रगतीचा पाया ठरतो.
 
त्यानंतर क्रम येतो तो भूतकाळात आपण केलेल्या कार्यकर्तृत्वाचे आकलन करण्याचा - त्याचा अभ्यास करण्याचा. म्हणतात ना ‘पूर्व दिव्य थोर, त्यांना रम्य भविकाळ!’ हे वचन व्यवस्थापनशास्त्रात तंतोतंत लागू पडते. प्रत्येक यशस्वी नेत्याप्रमाणे यशस्वी व्यवस्थापकानेसुद्धा आपण व आपल्या सहकार्‍यांनी विशिष्ट स्थितीत यापूर्वी म्हणजेच भूतकाळात काय केले, काय भूमिका घेतली, त्याचा पडताळा अवश्य घेतो. हा पडताळा घेत असतानाच जर विशिष्ट परिस्थितीत वा संदर्भात काही त्रुटी झाल्या असतील,तर त्या त्रुटींचे निराकरण करून भविष्यकालीन योजना आखणे, त्यांची यशस्वी अंमलबजावणी करणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे ठरते.
 
व्यक्तिगत स्वरूपाशिवाय संस्थागत स्तरावर सुद्धा भविष्याचा विचार करून, कार्यवाहीची आखणी-अंमलबजावणी केल्यानेच खर्‍या अर्थाने यशप्राप्ती होते. याठिकाणी ही बाब पण लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, व्यक्तिगत यशस्वी प्रयत्नांतूनच सामायिक-सामूहिक यश साध्य होते. व्यवसाय व्यवस्थापनाच्या संदर्भात सांगायचे झाल्यास, कंपनीच्या व्यावसायिक ध्येय वा उद्दिष्टांनुरूप कर्मचार्‍यांनी आपापल्या कामापोटी आपली उद्दिष्टपूर्ती केल्यास कंपनीस्तरावर ध्येयपूर्ती होऊन त्याचा फायदा सर्वच संबंधितांना होतो. हे साध्य करण्यासाठी व्यवस्थापकाने भविष्याचा साधक-बाधक स्वरूपात करणे अत्यावश्यक ठरते.
 
आता या त्रिकोणीय मुद्द्यांचा विचार केल्यास संस्था वा व्यवस्थापन स्तरावर व कंपनीच्या स्वरूपात मुळातून व तपशीलवारपणे विचार करणे आवश्यक व मार्गदर्शक ठरते. यापैकी भूतकाळ ही बाब व्यावसायिकसंदर्भात इतिहास ठरतो.
 
त्यामुळे यासंदर्भात केलेल्या कामगिरीची फेररचना करणे जवळजवळ अशक्यच ठरते. मात्र, भूतकाळातील आपण केलेल्या चुका वा कामगिरीतून आपण नेहमीच शिकू शकतो. ही शिकवणूक मुख्यतःअनुभव वा स्वानुभवातून मिळते. अनुभवातून मिळणारे शिक्षण इतरांना पण लाभदायी ठरते. म्हणूनच कामाच्या संदर्भातील भूतकाळातून मिळणारे धडे हे ‘सामूहिक शिक्षण’ स्वरूपात मोडतात व त्याचा लाभ पिढ्यान्पिढ्या होत असतो व ही परंपरा वर्षानुवर्षे व प्रसंगी अखंडितपणे सुरू असलेली आपल्या सभोवताली दिसून येते. आता कामकाजाच्या ठिकाणच्या भूतकाळाची पुढील कारवाई उद्दिष्टपूर्तीशी समर्पक आणि सफलपणे सांगड घालण्यासाठी व्यवस्थापकांच्या प्रयत्नांची तुलना वाहनचालकाच्या दुहेरी व दूरदृष्टीशी सहजपणे करता येते.
 
ज्याप्रमाणे वाहनचालक अपेक्षित वेगाने व सुरक्षितपणे वाहन चालविताना वाहनांमागून येणार्‍या वाहनांचा वेग, वर्दळ याचा मागोवा घेऊनच वाहन पुढे चालवितो, त्याचद़ृष्टीने व्यवस्थापकांनीही आपल्या वैयक्तिक व सामूहिक कारवाईचा कानोसा घेऊन त्याआधारे आपल्या कार्य-कर्तृत्वाची पुढची वाटचाल करणे, ही नेहमीच काळाची गरज ठरते. ही खुणगाठ प्रत्येक व्यवस्थापकाने बाळगणे गरजेचे असते.
 
प्रचलित स्थितीत ठरावीक व ‘जैसे थे’ पद्धतीने काम करणे पुरेसे ठरत नाही. कुणी कामाच्या ठिकाणी ठरावीक वा साचेबद्ध स्वरूपाचे काम करीत असले तरी त्याला सुधारणा वा प्रगती घडणे व घडवून आणणे पण आवश्यक असते. विशेषत: बदलते तंत्रज्ञान, कार्यपद्धती, व्यावसायिक स्थिती, कर्मचार्‍यांचा अनुभव, कौशल्य स्तर यामुळे तर चाकोरीबद्ध कार्यशैलीवर सदासमाधानी न राहता, बदल आणि बदलांची सकारात्मक स्वीकार्यता व या सकारात्मकतेला आपल्या सहकारी-कर्मचार्‍यांपर्यंत पोहोचविणे, ही दुहेरी जबाबदारी प्रत्येक व्यवस्थापकाला अपरिहार्यपणेपार पाडावीच लागते.
 
काल-आज-उद्या याचेच प्रतीक असणार्‍या कार्यकर्तृत्वाच्या भूतकाळ-वर्तमानकाळ-भविष्यकाळ या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा त्रिकोण साधताना साधारणत: सर्वच व्यवस्थापकांची कसोटी लागते. कामाच्या ठिकाणी प्रत्येकासाठी काळ-काम-वेग हा मंत्र महत्त्वपूर्ण असतो. या मंत्राची भूतकाळ-वर्तमानकाळ-भविष्यकाळाशी सांगड घालताना कर्मचारी आणि काळमानानुसार होणारे बदल आत्मसाद करणे व त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे आव्हान व्यवस्थापकांना पार पाडावे लागते. कुठल्याही रचना वा पद्धतीत बदल करणे म्हणजे त्याला विरोध हा आलाच.प्रसंगी हा विरोध ‘विरोधासाठी विरोध’ अशा स्वरूपात पण असतो. प्रस्तावित बदलांचा थेट व मुख्यत: संबंध जर कर्मचारी वा त्यांच्याशी निगडित मानवीय पैलूंशी असेल, तर या विरोधाची तीव्रता बहुविध स्वरूपात वाढते.
 
अशा वेळी कार्यशैलीविषयक बदलांची व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून, नियोजनपूर्ण पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित व्यवस्थापकाने ‘बदलाचे व्यवस्थापन’ शिकणे, अंगी बाळगणे व अंमलात आणणे हे महत्त्वाचे ठरते. बदलत्या परिस्थितीनुरूप व बदलांसह व्यवस्थापक म्हणून आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी व्यवस्थापकांनी आपल्या सहकार्‍यांच्या चमूसह काम करणे गरजेचे ठरते. एकांडा शिलेदार लढाई जिंकू शकेल, युद्ध नाही, हे तत्त्व इथे तंतोतंत लागू ठरते व म्हणूनच व्यवस्थापन क्षेत्रात काम करणार्‍या व्यवस्थापकांना खर्‍या अर्थाने यशस्वी व्हायचे झाल्यास त्यांनी आपण स्वत:, आपले सहकारी-कर्मचारी व व्यवस्थापन कंपनी या सार्‍यांच्या संदर्भात भूतकाळ-वर्तमानकाळ व भविष्यकाळ या त्रिकालबाधित मुद्द्यांसह असणारा व्यावहारिक त्रिकोण साधणे नेहमीच गरजेचे ठरते.
 
-दत्तात्रय आंबुलकर