ढोंगी पुरोगाम्यांचा उरबडवेपणा...

    दिनांक : 22-Apr-2022
Total Views |
हिंदूंच्या शोभायात्रांवर देशातील विविध भागांत जीवघेणे हल्ले झाले, तरी पुरोगाम्यांच्या गोटात मात्र स्मशानशांतता. पण, दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये अनधिकृत कारवायांवर बुलडोझरची चाहुल लागताच न्यायालयाचे दरवाजे तातडीने उघडण्यासाठी याच पुरोगाम्यांनी आटापिटा केला. त्यामुळे ढोंगी पुरोगाम्यांच्या या उरबडवेपणातील फोलपणा पुनश्च देशासमोर आला आहे.
 

jahangir 
 
 
जय श्रीराम’च्या रामगर्जनेत श्रीराम नवमी आणि हनुमान जयंतीच्या यात्रांमध्ये रामभक्त तल्लीन होते. भगवेधारींच्या घोषणांनी आसमंतही राममय झाला होता. रस्त्याच्या दुतर्फा प्रभू श्रीरामांच्या प्रतिमापूजनासाठी तितकीच रामभक्तांची गर्दी फुललेली, तर कुठे पुष्पवृष्टीची लगबग. राममहिमेच्या जयघोषात ही शोभायात्रा एका विशिष्ट धर्मीयांच्या परिसरात प्रवेश करते. एकाएकी या यात्रेवर तुटून पडण्यासाठी दबा धरुन बसलेल्या धर्मांधांकडून तुफान दगडफेक सुरु होते. गल्लीत गोंधळ उडतो. चौफेर अफरातफरी माजते. दगडफेक्यांच्या टोळक्यांतूनच ‘अल्ला हूँ अकबर’चे नारे देत एक दाढीवाला बंदुकधारी रामभक्तांवर पिस्तुल रोखतो अन्... अशी ही शोभायात्रा क्षणार्धात मत्सरयात्रेचे स्वरुप धारण करते. देशाच्या कानाकोपर्‍यात निघालेल्या श्रीराम नवमी आणि हनुमान जयंतीच्या अशाच काही शोभायात्रांचा समारोप जाळपोळ आणि दंगलींनी झाला.
 
राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आसाम, गुजरात यांसारख्या राज्यांत धर्मांधांनी हिंदूंच्या केवळ यात्रांनाच लक्ष्य केले नाही, तर रामभक्तांचे रक्तही सांडले. पण, या सर्व घटनांची छायाचित्रे, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरही देशातील पुरोगाम्यांना ना त्याची खंत ना खेद! उलट धर्मांधांची माथी भडकाविणारे हिंदूच किती कट्टर, असहिष्णू अशा उथळ प्रतिक्रियांवरच पुरोगाम्यांची मदार! त्या शोभायात्रेत सहभागी रामभक्तांच्या सुरक्षेविषयी कुणालाही यत्किंचितही वैषम्य वाटू नये, यातच सगळे आले.
कारण, या पुरोगाम्यांना बंदूक डागणार्‍यांच्या मानवाधिकारांविषयी तर नेहमीचाच उमाळा आणि रामभक्तांच्या जीवाचे मोल ते त्यांच्यालेखी काय म्हणा! याचाचा प्रत्यय दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्येही आला. या दंगलीनंतर तेथील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर कारवाईची चाहूल लागताच, कपिल सिब्बल, वृंदा करातसारख्यांनी सर्वोच्च न्यायालयाची पायरी गाठली, अशा बुलडोझरप्रणीत कारवाया कशाप्रकारे मानवाधिकारांचे हनन करणार्‍या आणि एका विशिष्ट धर्माविरोधी आहेत वगैरेचे रडगाणे गात ही मंडळी कारवाईवर स्थगिती मिळविण्यात यशस्वीही ठरली. पण, यानिमित्ताने ‘अल्पसंख्याकांचेच मानवाधिकार आणि बहुसंख्य हिंदूंचा धिक्कार’ हीच पुरोगामी बुद्धिजंतांची दुटप्पी मानसिकता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.
 
या बुलडोझरविरोधी अभियानात अग्रस्थानी होते ते काँग्रेसचे काळ्या कोटातील संकटमोचक कपिल सिब्बल आणि ‘सीपीआय-एम’च्या वृंदा करात. त्यात सिब्बलांना तर जणू न्यायालय हवे तेव्हा, रात्रीअपरात्रीही कसे उघडावे, यात आता अगदी मास्टरीच लाभलेली. त्यात मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील दहशतवादी याकुब मेमनची फाशी रोखण्यासाठी रात्रीअपरात्री उघडलेले सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे असोत वा अफझल गुरुचीही फाशी माफ करा म्हणून न्यायालयाला केलेल्या विनवण्या असो, यावरून पुरोगाम्यांना देशद्रोह्यांचा किती कळवळा आहे, ते वेगळे सांगायला नकोच! यंदाही जहांगीरपुरीमधील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईवरून हेच पुरोगामी ‘जमियत-ए-उलेमा हिंद’ने ही कारवाई रोखण्यासाठी केलेल्या याचिकेच्या समर्थनार्थ धावून गेले.
 
ही कारवाई कशी दंगेखोरांना अद्दल घडविण्यासाठी केली जात असून, अनधिकृत बांधकामांचा बहाणा आहे, हे पोटतिडकीने सर्वोच्च न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न या महाभागांनी केला. न्यायालयानेही या प्रकरणाची सुनावणी दोन आठवड्यांनी पुढे ढकलून कारवाईवर तात्पुरती स्थगिती आणली. त्यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि आसामसारख्या भाजपशासित राज्यांनी दंगेखोरांविरोधात बुलडोझरचा चालवलेला रामबाण इलाज या पुरोगाम्यांच्याही तितकाच जिव्हारी लागला. पण, योगी आदित्यनाथांनी पाडलेल्या या पायंडामुळेच उत्तर प्रदेशात मात्र श्रीराम नवमी किंवा हनुमान जयंतीला अशा हिंसाचाराची एकही घटना निदर्शनास आली नाही. आणि जेव्हा योगींनी या दंगेखोरांच्या मालमत्ता यापूर्वीही जमीनदोस्त केल्या, तेव्हा त्याविरोधी न्यायालयात जाण्याची हिंमतही या मंडळींनी दाखवली नव्हती. ‘डर अच्छा हैं’ म्हणतात ते यासाठीच!
पण, आज ज्या वृंदा करात या धर्मांधांच्या अनधिकृत मालमत्तांच्या बचावार्थ इतक्या तळमळीने धावून आल्या, त्यांना कदाचित त्यांच्याच पक्षाच्या रक्तरंजित कारवायांच्या इतिहासाचे विस्मरण झाले असावे. कारण, ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये सत्तेत येण्यापूर्वी कम्युनिस्टांनी त्यांच्या विरोधकांचे अक्षरश: खून पाडले. ‘सीपीआय-एम’ची ‘हरमद वाहिनी’ या दुचाकींवरून फिरणार्‍या राजकीय गुंडांच्या टोळीकडे विरोधकांचे तोंड कायमचे बंद करण्याचेच काम होते. करात यांच्याच पक्षनेत्यांच्या आदेशाने २००० साली नन्नूरचे नृशंस कांड घडले. ११ भूमिहीन अल्पसंख्याकांची ते विरोधी पक्षाचे समर्थन करतात म्हणून कत्तल केली गेली. अख्ख्या देशाला हादरवून सोडणारे २००७चे नंदिग्राम हत्याकांडही कम्युनिस्टांच्या क्रौर्यकथेचीच कडी. शेतकर्‍यांची तब्बल दहा हजार एकर जमीन एका परदेशी कंपनीला देण्याचा घाट बंगालच्या भट्टाचार्य सरकारने घातला होता. पण, सरकारच्या या निर्णयाला विरोध करणार्‍या गरीब शेतकरी, कामगारांना आधी कम्युनिस्ट कार्यकर्त्यांकडून धमकावण्यात आले. नंतर पोलिसांकडून आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांवर बेछूटपणे गोळीबार करण्यात आला.
सरकारी आकडेवारीप्रमाणे एकूण १४ शेतकरी मृत्युमुखी पडले, तर ७० लोक जखमी झाले. पण, मृतांचा आकडा त्याहून अधिक असल्याचा संशय व्यक्त केला गेला. त्यामुळे शेतकरी आणि कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा देणार्‍या लालभाईंच्या पक्षाचा इतिहासच नव्हे, तर वर्तमानही तितकेच रक्तरंजित. कारण, आजही केरळमध्ये रा. स्व. संघाच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या निर्घृण हत्यांमागे तेथील कम्युनिस्ट सरकारच्याच विळा-हातोड्याचेच घाव आहेत. त्यामुळे बंगाल असेल, त्रिपुरा अथवा केरळ, कम्युनिस्टांनी अशा किती निष्पापांच्या आयुष्यावर कायमस्वरूपी बुलडोझर फिरविला, याची तर गणतीच नाही. पण, विरोधाभास बघा, याच पक्षाच्या करातबाई आजही मानवाधिकारांची ढफली वाजवत आकांडतांडव करत फिरताना दिसतात. त्यामुळे करातांसारखी सोयीची मानवाधिकार भूमिका मांडणार्‍या पुरोगाम्यांनी पांघरलेले हे ढोंग यानिमित्ताने का होईना पुन्हा एकदा उघडे पडले आहे.
 
पुरोगामित्वाचा पुळका आलेले असेच तथाकथित मानवतावादी गोध्राकांडावरही अल्पसंख्याकांच्या हक्कांचीच पोपटपंची करत होते. दि. २७ फेब्रुवारी, २००२ रोजी सकाळी अयोध्येहून गुजरातकडे ‘साबरमती एक्सप्रेस’ने प्रवास करणारे कारसेवक झोपेत असतानाच ते आक्रीत घडले. दोन हजारांच्या धर्मांध जमावाने ‘साबरमती एक्सप्रेस’च्या त्या बोगींना आगीच्या भक्ष्यस्थानी टाकले. ५९ कारसेवक होरपळून मृत्युमुखी पडले. त्यांचा दोष तो काय... पण, त्या मृत कारसेवकांप्रती ते हिंदू होते, प्रखर हिंदुत्ववादी विचारांचे होते, म्हणून या पुरोगाम्यांच्या संवेदना बोथट झाल्या. त्यानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलींसाठीही हिंदू समाजालाच आरोपींच्या पिंजर्‍यात उभे करण्याचे कुभांड या पुरोगामी आणि हिंदूद्वेष्ट्या राजकीय पक्षांनी रचले. मेलेल्या हिंदूंच्या नव्हे, तर त्यांना संपवणार्‍या धर्मांधांच्या मानवाधिकारांच्या नावाखाली पुरोगाम्यांनी असाच थयथयाट केला.
 
 आताच्या जहांगीरपुरीच्या घटनेमध्येही पुन्हा तोच कित्ता गिरवला गेला. तेव्हा, या नतद्रष्ट पुरोगाम्यांची ही अख्खी जमातच हिंदूद्वेषाच्या पायावर उभी आहे. म्हणून त्यांचा हा पाया उखडून फेकण्यासाठी हिंदुत्वाचे बुलडोझरच हवे!