मुंबई लुटणार्‍यांची ‘पोलखोल’ होणारच!

    दिनांक : 21-Apr-2022
Total Views |
 
‘पोलखोल यात्रा’ केवळ सुरुवात आहे, यापुढील काळात फक्त यात्राच नव्हे, तर इतरही कितीतरी प्रकारे शिवसेनेचे काळे कारनामे बाहेर येतच राहतील आणि त्यांना थांबवणे शिवसेनेच्या ताकदीपलीकडचे असेल. तेव्हा राडेबाजीचा काहीही फायदा होणार नाही, उलट सर्वसामान्य मुंबईकरच मतदानाच्या माध्यमातून शिवसेनेविरोधात राडा करतील.
 
 

polkhol 
 
 
 
गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर ताबा मिळवलेल्या शिवसेनेने शहराच्या विकासासाठी कोणतेही भरीव कार्य केले नाही. उलट एखाद्या राज्याच्या अर्थसंकल्पाएवढा निधी असूनही मुंबईला भ्रष्टाचार करून लुटण्याचे, बकाल करण्याचे आणि मराठी माणसांना हुसकावून लावण्याचेच काम शिवसेनेने ‘करून दाखवले.’ ‘मुंबई आमचीच’ म्हणणार्‍या शिवसेनेने प्रत्यक्षात ‘मुंबई आमचीच-लुटण्यासाठी’ असाच कारभार केला. त्याचीच ‘पोलखोल’ करण्यासाठी आणि शिवसेनेने पांघरलेला मराठी अस्मितेचा, हिंदुत्वाचा बुरखा फाडून शिवसेनेचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी भाजपने ‘पोलखोल यात्रे’ची घोषणा केली.
पण, इतकी वर्षे भावनिक राजकारणाखाली दडवून ठेवलेली आपली असलियत जगजाहीर होण्याची भीती वाटताच शिवसेनेने भाजपची ‘पोलखोल यात्रा’ थांबवण्यासाठी दडपशाही सुरू केली. ‘पोलखोल यात्रे’च्या रथ आणि सभेसाठीच्या मंचाची तोडफोड त्यासाठीच केली गेली. मुंबई महापालिकेत आपली सत्ता असून मुख्यमंत्रिपदीही पक्षप्रमुखच असल्याने गुंडगिरी करून भाजपला सहज रोखता येईल, असा त्यांचा त्यामागचा उद्देश होता. पण, ‘पोलखोल यात्रा’ केवळ सुरुवात आहे, यापुढील काळात फक्त यात्राच नव्हे, तर इतरही कितीतरी प्रकारे शिवसेनेचे काळे कारनामे बाहेर येतच राहतील आणि त्यांना थांबवणे शिवसेनेच्या ताकदीपलीकडचे असेल. तेव्हा राडेबाजीचा काहीही फायदा होणार नाही, उलट सर्वसामान्य मुंबईकरच मतदानाच्या माध्यमातून शिवसेनेविरोधात राडा करतील.
 
गोष्टीतील राक्षसाचा जीव पोपटात अडकलेला असतो, तसा शिवसेनेचा जीव मुंबई महापालिकेत अडकलेला आहे. आपली धडधड सुरू ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेतल्या अर्थइंधनाचाच वापर शिवसेना करून घेत असते. तो वापर अर्थातच मुंबई महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागातल्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातूनच अव्याहत सुरू असतो. तसे नसते तर आज मुंबईचा खरोखरच जागतिक दर्जाच्या शहरांच्या रांगेत समावेश झाला असता. विविध आर्थिक संस्थांमुळे मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहेच, इथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामे होतातही. पण, त्यासाठी जे इथे येतात त्यांना आणि सर्वसामान्य मुंबईकरांनाही आपण जागतिक दर्जाच्या शहरात राहत असल्याचा अनुभव कधीच येत नाही.
तशा सोई-सुविधाही मिळत नाहीत. मुंबई महापालिकेतील स्वच्छता विभाग, मलनिस्सारण विभाग, आरोग्य विभाग, रस्तेबांधणी विभागापासून सारीकडे बोकाळलेला भ्रष्टाचार याला कारणीभूत असून त्याची जबाबदारी शिवसेनेचीच आहे. आपल्याकडे मुंबईसारख्या अतिमहत्त्वाच्या शहराची सत्ता आली, तर आपणही त्याला अनुरुप कारभार करावा, अशी इच्छा शिवसेनेने कधीही दाखवली नाही. उलट मुंबई महापालिकेचा जितका अधिकाधिक निधी शोषून घेता येईल आणि त्यातून बंगल्यावर बंगले बांधता येतील, यासाठीच शिवसेनेने तत्परता दाखवली. त्याची कैक उदाहरणे असून भाजप आपल्या ‘पोलखोल यात्रे’तून त्यांनाच चव्हाट्यावर आणणार आहे.
 
मुंबई महापालिकेत कारभार करताना जिथून कुठून पैसे ओरबाडता येतील, त्या प्रत्येक ठिकाणातून शिवसेनेने फक्त खिसे भरण्याचेच काम केले. दरवर्षी मुंबईची तुंबई होते, ती याचमुळे. इतकी वर्षे सत्ता हाती असूनही मुंबईतली पाणी साचण्याची समस्या शिवसेनेला सोडवता आलेली नाही. त्यासाठी मर्जीतल्या लोकांना नालेसफाईची कोट्यवधींची कंत्राटे द्यायची आणि आपला स्वार्थ पाहायचा एवढेच काम शिवसेनेने केले. ठिकठिकाणी पाणी साचून अपघात घडले वा मुंबईकरांचा जीव गेला तरी शिवसेनेला त्यावर ठोस उपाययोजना करावी, असे वाटले नाही. नालेसफाईबरोबरच मुंबईतील मिठी आणि अन्य नद्यांच्या साफसफाई, खोलीकरण आदी कामांतही फक्त भ्रष्टाचारावरच भर देण्यात आला. म्हणूनच मुंबईतील सगळ्याच नाल्यांमध्ये भरमसाठ गाळ, कचरा, राडारोडा आणि नद्यांचे नाले झाल्याचे चित्र सतत दिसून येते.
 
त्यांच्या स्वच्छतेसाठी दिलेला निधी नेमका जातो कुठे, हा प्रश्नच आता ‘पोलखोल यात्रे’च्या माध्यमातून जनतेसमोर नेण्यात येणार आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे, शिवसेना स्वतःला ‘मराठीजनांची कैवारी’ म्हणवून घेते. पण, त्याच मराठी माणसांच्या घरांच्या थडग्यांच्या जोरावर जमीनजुमला खरेदी करण्याचे काम शिवसेनेच्याच लोकांनी गोरेगावातील पत्राचाळीतील घोटाळ्याने केले. मोक्याच्या ठिकाणच्या जागा, गृहबांधणी प्रकल्प, टीडीआर घोटाळ्यांपैकी पत्राचाळीतील भ्रष्टाचार एक उदाहरण, पण अशी शेकडो उदाहरणे मुंबईभर पाहायला मिळतात. मराठी माणसावर मुंबई सोडून पनवेल, अंबरनाथ-बदलापूर-कर्जत-खोपोली, कसारा, विरार-डहाणूपर्यंत राहण्याची आणि पोट भरण्यासाठी चार-चार तासांचा प्रवास करण्याची वेळ शिवसेनेच्या या कारभारामुळेच आली. त्याचीच ‘पोलखोल’ भाजपच्या यात्रेतून होणार म्हणताच शिवसेना बिथरली आणि त्यांच्या लोकांनी रथ, मंचावर हल्ला केला.
 
कोरोना काळातही अवघी जनता संकटात सापडलेली असताना शिवसेनेने मात्र मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचेच काम केले. कोरोना केंद्रांची कंत्राटे आपल्याच पोरासोरांना देण्यापासून ते कोरोना तपासणीसाठी प्रयोगशाळांना हाताशी धरुन सर्वसामान्यांना लुबाडण्यापर्यंतचे उद्योग महापालिकेतील सत्ताधार्‍यांनी केले. म्हणजे इतकी वर्षे मुंबईकरांच्या जीवावर सत्ता मिळवली, पण त्याच मुंबईकरांवर कोरोनाने हल्ला केला, तर त्यांना वाचवण्यासाठी काम करावे, असेही शिवसेनेला वाटले नाही. कारण, शिवसेनेचा मतलब मुंबईकरांचा जीव वाचवण्यात नव्हे, तर भ्रष्टाचार करण्यातच होता. शिवसेना किती भ्रष्टाचार करू शकते, याचा दाखलाही त्यानंतर लगेचच मिळाला. मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने धाड टाकली होती. तेव्हा ‘ईडी’ला त्यांच्या घरातून अनेक दस्तावेज आणि कोणाला काय काय गिफ्ट दिले, तसेच त्यांनी किती मालमत्ता जमा केल्या, याचीही माहिती समोर आली.
 
यशवंत जाधव यांनी हजारो कोटींचा घोटाळा केल्याची वृत्तेही प्रकाशित झाली. मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षाकडे इतकी माया असेल, तर ते ज्या पक्षात आहेत, त्या शिवसेनेच्या प्रमुखांकडे काय आणि किती असेल, याची कल्पना करणार्‍यांचे डोळे पांढरे व्हायचे. इतकी वर्षे हे सारे मराठी आणि हिंदुत्वाच्या आड लपलेले होते, तेच आता भाजपच्या ‘पोलखोल यात्रे’तून समोर येणार आहे. पण, तसे झाले तर आपली सत्ताही जायची आणि मत्ताही जायची या धास्तीने शिवसेनेत चलबिचल चाललेली आहे. भाजपच्या ‘पोलखोल यात्रे’वरील हल्ला त्यातूनच झाला. पण, शिवसेनेने कितीही हल्ले केले तरी भाजप आपली पहारेकर्‍याची आणि शिवसेनेचे खरे रुप समोर आणण्याची भूमिका कधीही सोडणार नाही. त्यामुळे शिवसेनेने आपल्यावरील आरोपांची उत्तरे द्यावीत, त्यांचा सामना करावा, तेच त्या पक्षाच्या हिताचे राहील.