योगी काळात धर्मांध चिडीचूप

    दिनांक : 20-Apr-2022
Total Views |

नवरात्र, श्रीराम नवमी, हनुमान जयंती व रमजान काळात देशातील कितीतरी राज्यांत धर्मांध मुस्लिमांनी धुडगूस घातला, हिंदूंविरोधात हिंसाचार माजवला, पण उत्तर प्रदेशमध्ये इस्लामी कट्टरपंथीय चिडीचूपच राहिले. योगी आदित्यनाथ सरकारच्या गुन्हेगार व दंगलखोरांविरोधातील कठोर धोरणामुळे यापुढेही उत्तर प्रदेशात अराजकाऐवजी शांतता आणि विकासच कायम राहील, हे नक्की!
 
 
 
yogiji1

 
उत्तर प्रदेशच्या जनतेने सलग दुसर्‍यांदा योगी आदित्यनाथ यांनाच मुख्यमंत्रिपदासाठी कौल का दिला, या प्रश्नाचे उत्तर शांततामय वातावरणातील चैत्र नवरात्र, श्रीराम नवमी, हनुमान जयंती आणि रमजानने दिले. दिल्ली, महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, झारखंड, उत्तराखंड, गुजरात, मध्य प्रदेशसह देशातील वेगवेगळ्या ठिकाणी हिंदू-मुस्लीम धर्मीयांच्या सणोत्सवात इस्लामी कट्टरपंथीयांमुळे वातावरण तापलेले असताना उत्तर प्रदेशमध्ये मात्र शांतता अनुभवायला मिळाली. एकेकाळी देशात कुठेही धार्मिक तणाव पसरला की त्याची सुरुवात उत्तर प्रदेशातून व धर्मांध मुस्लिमांच्या देशविरोधी प्रवृत्तीतून झालेली असे. गाडीचा अपघात झाला की दंगल, पतंग कटला की दंगल, बसमध्ये जागा दिली नाही की दंगल आणि कोणत्याही छोट्या-मोठ्या वैयक्तिक, सामाजिक वा धार्मिक कारणावरून इस्लामी कट्टरपंथीयांमुळे उसळलेली दंगल, हेच उत्तर प्रदेशचे दुर्दैवी प्राक्तन होते. दंगलीदेखील एक दिवस वा दोन दिवस वा तीन दिवस नव्हे तर दोन, तीन, चार महिने चालायच्या आणि तितका काळ संचारबंदीचा त्रासही जनतेला सोसावा लागायचा. पण, आज मात्र हिंदू आणि मुस्लिमांचे सणोत्सव एकत्र साजरे होताहेत, तेही दंगल वा संघर्षच नव्हे तर कोणत्याही बाचाबाचीशिवाय! विशेष म्हणजे, उत्तर प्रदेश देशातील सर्वाधिक २५ कोटी लोकसंख्येचे राज्य असून मुस्लीमांचे प्रमाणही २२ टक्क्यांवर आहे. तरी इथे वादावादीचासुद्धा प्रसंग उद्भवला नाही. या यशाचे श्रेय योगी आदित्यनाथ सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेलाच द्यावे लागेल.
 
नवरात्रोत्सव साजरा होत असतानाच यंदा उत्तर प्रदेशात जवळपास ८०० पेक्षा अधिक ठिकाणी श्रीराम नवमीच्या व हनुमान जयंतीच्याही अनेकानेक शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते, सोबतच मुस्लिमांच्या रमजानमधील ‘इफ्तार पार्ट्या’ही जोरात सुरू होत्या. पण, कुठेही काहीही झाले नाही. अर्थात, फक्त याच वर्षी नाही तर गेली पाच वर्षे योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदी आल्यापासून राज्यात एकही मोठी दंगल झाली नाही. ‘दंगलमुक्त राज्य’ प्रत्यक्षात आणण्यात योगी आदित्यनाथ सरकारला कमालीचे यश मिळाले. उल्लेखनीय म्हणजे, योगी आदित्यनाथ सत्तेवर आल्यापासूनच त्यांच्यापुढे एकामागोमाग एक आव्हानांना सुरुवात झाली. अयोध्येतील बाबरी ढाँचा प्रकरणात श्रीराम जन्मभूमीच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यानंतर आलेल्या ‘एनआरसी’ आणि ‘सीएए’विरोधात धर्मांध मुस्लिमांनी देशात ठिकठिकाणी हिंसाचाराला सुरुवात केली. राजधानी दिल्लीही इस्लामी कट्टरपंथियांनी केलेल्या दंगलीच्या भीषण आगीत होरपळली व त्यात कित्येकांचा बळीही गेला. इस्लामी कट्टरपंथीय रस्त्यावर उतरुन हिंदू धर्मीय, भारताची एकता-अखंडता आणि केंद्र सरकारविरोधात कायदा हातात घेत होते. पण, उत्तर प्रदेशात मात्र धर्मांध मुस्लिमांची डोके वर करण्याचीही हिंमत झाली नाही. कायद्याचे राज्य ज्याला म्हणतात ते उत्तर प्रदेशात प्रत्यक्षात अवतरल्याचे पाहायला मिळाले. ते योगी आदित्यनाथ यांच्या हिंसाचारी, दंगलखोर प्रवृत्तींविरोधातील ‘झिरो टॉलरन्स’ धोरणामुळेच.
 
पण, योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदी आल्या आल्या देशातील तथाकथित पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी आणि भाजपविरोधी पत्रकार, संपादक, माध्यमांनी मोठाच गहजब माजवला होता. भगव्या कपड्यातील योगी आदित्यनाथांकडे उत्तर प्रदेशसारख्या देशातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक लोकसंख्येच्या राज्याचा कारभार आल्याने तिथे अशांतता आणि हिंसाचारच नांदेल, अशी भाकिते ही मंडळी घसा फाडून करत होती. महाराष्ट्रातील शिवसेनेसारख्या एका प्रादेशिक पक्षाचे बोलघेवडे प्रवक्ते आणि राज्य सांभाळता न येणारे मुख्यमंत्री तसेच एका मराठी वृत्तपत्राचे संपादकही योगी आदित्यनाथ यांची निंदानालस्ती करण्यात आघाडीवर होते. योगी आदित्यनाथ यांच्या नावाची काविळ झाल्याने या सार्‍यांनाच उत्तर प्रदेशातील ना विकासाचा वेग दिसत होता ना राज्याची बसलेली कायदा-सुव्यवस्थेची घडी. त्यांचा फक्त योगीविरोधाचाच अजेंडा सुसाट चालला होता. देशाचा पहिला शिक्षणमंत्री मौलाना असला, तरी त्याचे नाव अदबीने घेणार्‍यांना योगी आदित्यनाथ मात्र त्यांच्या हिंदू ओळखीमुळे खूपत होते. यंदाही उत्तर प्रदेशात हिंदू-मुस्लिमांच्या सणोत्सवात भयंकर घटना घडतील आणि आपल्याला योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात काव-काव करण्याची संधी मिळेल, असेच या लोकांना वाटत होते. अर्थात, योगी आदित्यनाथ यांच्याकडे अशा भंपकांकडे लक्ष द्यायलाही वेळ नव्हता. कारण, त्यांचे लक्ष्य उत्तर प्रदेशला ‘उत्तम प्रदेश’ करण्यावर होते.
 
त्यांनी तेच केले आणि आपल्या कर्र्तृत्वातून रोजगारापासून ते कायदा-सुव्यवस्था राखण्याने योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना सणसणीत चपराक लगावली. पण, त्यांचे विरोधकही इतके कोडगे की एका चपराकीने त्यांचे समाधान होणार नाहीच, ते पुन्हा चपराकीवर चपराक खाण्यासाठी योगी आदित्यनाथ यांच्या नावाने बोंबाबोंब करतच राहतील.
दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या सरकारआधी उत्तर प्रदेशातील संघटित गुन्हेगारी टोळ्या, धर्मांध मुस्लीम बेछूट झालेले होते. कारण, तत्कालीन सत्ताधार्‍यांनी बाहुबली आणि इस्लामी कट्टरपंथीयांना मतपेटीसाठी मोकळे रानच दिले होते. आता मात्र योगी आदित्यनाथ सरकारच्या काळात सारेच धाराशयी पडल्याचे दिसते. आपल्या क्रूर कृत्यांनी सर्वसामान्य नागरिकांचे जीवन जगणे जिकिरीचे करणारे अनेक दुष्टात्मे योगी आदित्यनाथ सरकारच्या कार्यकाळात एकतर गजाआड गेले वा चकमकीत मारले गेले. ज्या माफिया आणि गुन्हेगारांना समाजवादी पक्ष वा बहुजन समाज पक्षाने संरक्षण दिले व त्यांना नायकाप्रमाणे सादर केले, ते सारेच आज तुरुंगात गेल्याचे दिसते. गुन्हेगार, गुंड, मवाली, दंगलखोर उत्तर प्रदेशबाहेर पलायनासाठी अगतिक झालेले दिसतात. तोडफोड आणि दंगलीची कट-कारस्थाने रचणार्‍या अराजकी घटकांविरोधात योगी आदित्यनाथ सरकारने इतकी कठोर कारवाई केली की, शांतता भंग करण्याचे त्यांचे धाडसच होत नाही. परिणामी, नवरात्र, श्रीराम नवमी, हनुमान जयंती व रमजान काळात देशातील कितीतरी राज्यांत धर्मांध मुस्लिमांनी धुडगूस घातला, हिंदूंविरोधात हिंसाचार माजवला, पण उत्तर प्रदेशमध्ये इस्लामी कट्टरपंथीय चिडीचूपच राहिले. योगी आदित्यनाथ सरकारच्या गुन्हेगार व दंगलखोरांविरोधातील कठोर धोरणामुळे यापुढेही उत्तर प्रदेशात अराजकाऐवजी शांतता आणि विकासच कायम राहील, हे नक्की!