इम्रान खान यांच्या मँडेटरी ओव्हर्स

    दिनांक : 02-Apr-2022
Total Views |

अग्रलेख

 

पाकिस्तानमध्ये राजकीय उलथापालथी चांगल्या वेगात सुरू आहेत. पंतप्रधान इम्रान खान Imran Khan यांच्यावर अविश्वास प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. तो कालच आला असता; मात्र अधिवेशन थोडे लवकर संपवल्याने मांडता आला नाही.

 
imran khan

 

तो केव्हाही येऊ शकतो. अविश्वास प्रस्ताव आला तर त्यात इम्रानखान यांच्या सरकारचा पराभव होणार, अशी चिन्हे दिसत आहेत. भारताचे दोन शेजारी पाकिस्तान आणि बांगला देश येथील सत्तांतरे पाहिली की, भारताची लोकशाही जगात सर्वात मोठी लोकशाही, असे का मानली जाते, हे लक्षात आल्याशिवाय राहात नाही. भारतातील सत्तांतरे रक्ताचा थेंबही न सांडता जनतेचा कौल लक्षात घेऊन होतात. जनादेश हा सर्वोच्च मानला जातो. कितीही शक्तीसह सत्तेत असलेला पक्षही जनतेचा कौल मानतो आणि निमूटपणे बाजूला होतो. पाकिस्तान आणि बांगला देशात अनेकदा सत्तांतरे रक्त सांडून, सेनेने हस्तक्षेप करून झाली आहेत. जनहित, जनतेची इच्छा, जनतेचा कौल यांना तेथे फारसे स्थान नसते. आता पाकिस्तानात सत्तांतराचे नाट्य रंगू लागले आहे. नवाज शरीफ यांची कन्या मरियम शरीफ इम्रानखान Imran Khan यांच्यावर रोज नवे आरोप आणि टीका करू लागल्या आहेत.
 

इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ यामध्ये काही आलबेल नाही. इम्रान खान यांच्या सरकारवर अविश्वास ठराव येणार, अशी चर्चा चालू असताना इम्रान खान Imran Khan सरकारमधील तब्बल 50 मंत्री गायब झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. याचा अर्थ इम्रान खान सरकारला चांगलाच सुरुंग लागला असून उलट गिनती सुरू झालीच आहे. इम्रान खान यांनाही बहुधा याची कल्पना आलेली दिसते आहे. याची लक्षणे दिसू लागली आहेत. अविश्वास ठराव कालच दाखल होणार होता; मात्र तो दाखल करता येऊ नये यासाठी संसदेचे कामकाज लवकर संपविण्यात आले. इम्रान खान यांच्या तहरिक-ए- इन्साफ पक्षाने संसदेत बहुमत सिद्ध करण्यापेक्षा रस्त्यावरच्या प्रदर्शनात जास्त रस घेतला आहे. त्यांनी इस्लामाबादच्या परेड ग्राऊंडवर एक जाहीरसभा आयोजित केली आहे. प्रचंड गर्दी या सभेला जमा करण्याचा त्यांचा मानस आहे. सुमारे दहा लाख लोक या सभेत सहभागी होतील, असे सांगण्यात येत आहे. याचा अर्थ जनमताचा संसदेबाहेरचा दबाव निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. संसदेत बहुमत गमावल्यावरच संसदेबाहेर गर्दी जमा करण्याची इच्छा होत असते.

 

आपली पकड ढिली झाली आहे किंवा आपल्या पक्षातूनच आपल्याला विरोध आहे हे जेव्हा मान्य नसते तेव्हाच समर्थनासाठी गर्दी जमा करण्याची इच्छा राजकारणात होत असते. मात्र, संसदीय लोकशाहीत सभेत गर्दी किती जमा होते; यापेक्षा संसदेत बहुमत कोणाला आहे, यालाच जास्त महत्त्व असते. हे बहुमत पाहूनच सरकारबाबतचे निर्णय होत असतात. मात्र, पाकिस्तानसार'या देशात सत्ता केंद्र केवळ संसद नसते. संसदेतील बहुमताशिवाय अन्यही घटक जास्त आक्रमकपणे निर्णय घेत संसदेचा कचरा करतात. पाकिस्तानात असे निर्णय करण्यात लष्कर आणि लष्करी अधिकारी आघाडीवर आहेत. लष्करप्रमुख, आयएसआय या गुप्तचर खात्याचे प्रमुख हे लोक सत्ताधार्‍यांपेक्षाही अनेकदा वरचढ असल्यासारखे निर्णय घेतात. याशिवाय धार्मिक नेते, दहशतवादी संघटनांचे प्रमुख यांचाही सरकारबाबतच्या निर्णयात हस्तक्षेप असतो. आता पाकिस्तानात लष्कराची जी मेहेरनजर इम्रान खान यांच्यावर होती ती कमी झाली आहे. लष्करप्रमुख बाजवा आणि इम्रान खान Imran Khan यांचे आता तितके जमेनासे झाले आहे.

 

पाकिस्तानात सरकार चालवताना आंतरराष्ट्रीय संबंध आणि त्याचे पाकिस्तानी जनतेसमोर जाणारे चित्र यालाही महत्त्व असते. पाकिस्तानने भारताचा द्वेष हा मु'य बिंदू समोर ठेवून जे जे डावपेच आखले ते सगळे त्यांच्यावरच उलटले आहेत. चीनकडून भरमसाट कर्ज घेऊन सर्व आलबेल असल्याचे एक खोटे चित्र उभे केले होते. चीनची कर्ज देण्याची मर्यादा संपली आणि चीनने उलट वसुली सुरू केली तेव्हा पाकिस्तानमधील अर्थव्यवस्था संकटात सापडली. पाकिस्तानात प्रचंड महागाई झाल्याने लोकांमध्ये प्रचंड असंतोष पसरलेला आहे. भारताने एकदा सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट येथील एअर स्ट्राईक करून पाकिस्तानात घुसून अतिरेकी मारले तेव्हा पाकिस्तानला काहीही करता आले नाही. उलट अभिनंदन या भारतीय वायुदलातील अधिकार्‍याला बिनशर्त सोडावे लागले. नरेंद्र मोदी यांनी जगात अधिकाधिक देशांना भेटी देत भारताची जी प्रतिमा तयार केली त्याचा फटका पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी आणि त्यानंतरही सतत बसतो आहे. इस्लामिक देशातूनसुद्धा पाकिस्तानला मदत करण्याला कोणी तयार नाही. अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कार्यक्रमात इम्रान खान Imran Khan यांची उपेक्षा झाल्याचे चित्र पाकिस्तानी मीडियाच हल्ली रंगवत असते.

 

पाकिस्तानात सत्तारूढ होणारे सत्ताधीश भविष्याची चिंता करतात आणि प्रसंग आलाच तर परदेशात जाता आले पाहिजे, याची व्यवस्था करू लागतात. त्यासाठी मिळेल त्या मार्गाने पैसा जमा करण्याच्या मागे लागतात. इम्रान खान यांच्यावर मरियम नवाज यांनी घोटाळा आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. नव्याने नियुक्ती आणि बदल्या या गोष्टीत सहा अब्ज रुपयांचा घोटाळा केल्याचा त्यांचा आरोप आहे. इम्रान खान Imran Khan यांनी परदेशातून पाकिस्तानला मदत म्हणून आणलेला पैसाही वैयक्तिक उपयोगासाठी वळवला असल्याचा त्यांचा आरोप आहे. पंतप्रधानांच्या 'बनीगाला' या निवासस्थानातून जादूटोण्याचे प्रकार चालतात, अशीही टिप्पणी मरियम यांनी केली आहे.

 

इम्रान खान यांना शेलक्या शिव्यांनी संबोधताना 'नालायक' असा शब्दही त्यांनी वापरला आहे. पाकिस्तानी संसदेत अविश्वास ठराव मांडला गेला तर तो मंजूर होण्याची भीती इम्रान खान यांना वाटत आहे. त्यामुळे परेड ग्राऊंडवरच्या सभेला दहा लाख लोकांची गर्दी जमा करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. एवढ्या प्रचंड गर्दीसमोर शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्याचा त्यांचा विचार आहे. या सभेतच भावनिक आवाहन करणारे भाषण करत ते राजीनामा देण्याची घोषणा करतील, असा कयास राजकीय विश्लेषक करीत आहेत. मात्र, इम्रान खान यांचा पक्ष वेगळीच तयारी करीत आहे. इस्लामाबादमधील अतिप्रचंड सभेच्या तयारीकरिता इम्रान खान समर्थकांनी 'सेल्फ डिफेन्स कारवां' नावाची लढाऊ कार्यकर्त्यांची एक फळी तयार केली असून ती आधीच इस्लामाबाद येथे तयार ठेवली आहे. त्यामुळे आता इस्लामाबादमध्ये इम्रान Imran Khan समर्थक आणि विरोधक यांच्यात जुंपली तर सत्तांतराच्या नाटकातील हा रस्त्यावरच्या संघर्षाचा आणखी एक अप्रिय अध्याय जोडला जाऊ शकतो.

 

आणखी एका गोष्टीमुळे इम्रान खान यांच्या सरकारचा शेवटचा काळ चालू आहे, असे समजण्यास वाव आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानी सैन्यावर आरोप केला आहे की, सेना नवाज शरीफ यांच्या इशार्‍यावर काम करीत आहे. असा आरोप करण्याचा दुसरा अर्थ सेना इम्रान खान यांच्या पाठीशी नाही, असा निघतो. शिवाय इम्रान खान यांनी दुसर्‍या एका विधानात भारतीय लष्कर कधीच राजकीय घडामोडीत भारतात हस्तक्षेप करत नाही, असे म्हणत भारतीय लष्कराची स्तुती केली आहे. पाकिस्तानी लष्कर नावडते झाले याचा अर्थ इम्रान खान यांची कारकीर्द संपत आली आहे असाच निघतो. क्रिकेट कसोटी सामन्यात शेवटची 20 षटके ही अनिवार्य षटके असतात. तसे पाकिस्तानातील ही सगळी लक्षणे पाहता इम्रान खान सरकारची मँडेटरी ओव्हर्स म्हणजे अनिवार्य षटके आता सुरू झाली आहेत. कोणत्याही क्षणी इम्रान खान सरकारची कारकीर्दीची इतिश्री होऊ शकते. अस्वस्थता, इतरांचे वाईट चिंतण्याची वृत्ती, अविश्वास या सर्वांचा शेवट तशाच गोष्टींमध्ये होत असतो. इम्रान खान Imran Khan यांना आता या सर्व गोष्टींचा अनुभव येत असेल.