समर्पित संघाची सत्यान्नव वर्षे!

    दिनांक : 02-Apr-2022
Total Views |
आज चैत्र शुद्ध प्रतिपदा. भारत वर्षाचा नूतन संवत्सर. आजच्याच दिवशी ही सश्यशालिनी वसुंधरा निर्माण झाल्याचं सांगितल्या जातं. आजच ह्या वसुंधरेला नवी पालवी फुटते आणि नवा बहर येण्यास सुरूवात होते. रा. स्व. संघाविषयी आजचं महत्व म्हणजे आजच सत्यान्नव वर्षापूर्वी डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या प्रवाही संघटनेची स्थापना केली. ह्या देशाला जे योग्य आहे, ह्या भारतीच्या वैभवाला जे - जे म्हणून काही शोभणार आहे, ते - ते ह्या प्रवाही विचारसाधनेतून मांडण्याचा प्रयत्न संघ करत असतो. सुरुवातीला प्रचंड उपेक्षा सहन कराव्या लागणार्‍या संघाला आता अपेक्षित लोकभावना मिळत आहे. त्याचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सामान्यातल्या सामान्य ते मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीला आता परिचित झाला आहे.
 
Dr-Hedgewar
 
 
१९२५ पासून आजपर्यंत संघ राष्ट्रासाठी सदैव कार्यतत्पर राहिला आहे. १९४८ ला पाकिस्तानने कबालीच्या ररूपात भारतावर प्रथम आक्रमण केले होते तेव्हा संघाचे अनेक संस्कार, व्यक्तित्व ह्या ठिकाणी सज्ज होते. १९६२ ला चीन युद्धाच्यावेळी देखील संघाची सर्वात मोठी मदत राष्ट्राला झाली. महाराष्ट्रातल्या किल्लारी भूकंपात सर्वात प्रथम स्वयंसेवकच मदतीला धावले. आजही राष्ट्र, समाज जेव्हा संकटात येते, तेव्हा सर्वात प्रथम संघच मदतीला येतो. ह्या संघाच्या समर्पित भावनेला लवकरच शंभर वर्षे पूर्ण होतील.
 
डॉ. हेडगेवारांनी संघाचा ढाचा अतिशय प्रमाणशीर व अतिशय शिस्तीचा बसवला. आजही संघ-संस्कार आणि शिस्त हे संपूर्ण विश्वाला पडलेलं कोडं आहे. संघातील कुणीही व्यक्ती स्वार्थ गृहित धरुन चालत नाही. संघाचा सामान्यातला सामान्य स्वयंसेवक हा समर्पित असतो. ’मागे जे झाले त्याचे चिंतन आणि भविष्यावर मंथन’ हा विचार संघ जोपासतो. म्हणून २०२५ ला शतकपूर्ती साजरी करतांना संघ राष्ट्र अधिक कसे मजबूत होईल ह्याचेच चिंतन करील.
 

rss-rashtriya-swam-sevak 
 
’हिंदुत्व’ हा भारतीय समाजाचा आत्मा आहे. हिंदुत्व दूर करुन भारतीय समाज एकसंध राहणार नाही ह्याची पूर्व व पूर्ण कल्पना संघाच्या प्रवर्तकांना होती. संघाचे हिंदुत्व हे यज्ञ करतो म्हणून हिंदू, पूजापाठ करतो म्हणून हिंदू, देव मानतो म्हणून हिंदू, एखाद्या विशिष्ट जातीचा आहे म्हणून हिंदू असे संघाचे हिंदुत्व नाही. ह्या भारत भूमीवर प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. मग तो कोणत्याही जातीचा असो - बौद्ध, जैन, शिख ह्या देखील हिंदूंच्याच शाखा आहेत असे संघ मानतो. हिंदूमधील दोष हे हिंदूंनीच दूर करायचे असा मानस संघाचा आहे. म्हणूनच एक स्मशान, नि एक पाणवठा अशी धारणा संघाची आहे. संघासाठी कुणी उच्च नाही, कुणी नीच नाही... ह्या भारतीचे आपण सर्व पुत्र आहोत असे संघ मानतो. हिंदूंच्या सर्वच ज्ञातींना संघाने मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले.
 
संघाला प्रवाही संघटन म्हटल्या जाते कारण समाजाला काय अपेक्षित आहे म्हणून संघ बदल करीत नाही , तर जे सत्य आहे ते समाजापर्यंत पोहचवतो आणि सप्रमाण समाजाला ते पटलं की, समाज ते सत्य स्वीकारतो आणि मग संघाला अपेक्षित असलेला आणि ह्या भारतमातेला उच्च परंपरेला शोभणारा विषय देऊन मोकळा होतो. संघाने शिक्षण, अर्थ, जलक्रांती, ग्रामविकास, शेती विकास, महिला विकास, उद्योग विकास, जनजाती कल्याण विकास,भटके विमुक्तांच्या विकासासाठी प्रयत्न, पालशाळेच्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चालवलेल्या शाळा, अशा सर्व आयामातून आपले कार्य कायम पुढे चालवले आहे.
 
संघ ही व्यक्तीनिष्ठ संघटना नसून विचारविश्व भक्कम करणारी ही प्रवाही संघटना आहे. डॉ.हेडगेवार हे सामान्यच व्यक्तिमत्व. पण त्यांच्या कार्यकौशल्याने, आज जगात कितीही अदबीने व सन्मानाने नाव घेतल्या जात असेल तरी देखील संघ हा कधी हेडगेवार निष्ठ झाला नाही. तो व्यक्तीनिष्ठ होणार देखील नाही. आज संघकार्यात सहा सरसंघचालकांचे योगदान लाभले आहे. डॉ.हेडगेवार, श्रीगुरुजी, प्रो.रज्जूभैय्या, बाळासाहेब देवरस, के.सुदर्शन आणि विद्यमान डॉ. मोहनजी भागवत. ह्या सर्वांनी देशाला परम वैभवशाली बनवण्यासाठी काम केले आहे. पण ह्यात कधीही संघ व्यक्तीनिष्ठ झाला नाही. संघ व्यापक स्वरुपात व दीर्घ योजनेतून ह्या राष्ट्राच्या व राष्ट्रातील अतिशय सामान्य मानवी जीवनात कसा बदल होईल असा विचार करतो. संघ स्थापन करताना हेच स्वप्न डॉ. हेडगेवार यांनी पाहिले होते.
 
दरवर्षी राष्ट्रीय आव्हाने लक्षात घेऊन संघ आपल्या प्रतिनिधी सभेत त्यावर चिंतन करतो आणि पुढील वर्षभर त्याची अंमलबजावणी करीत असतो. यंदाच्या नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत शिक्षण, ग्रामविकास, स्व-रोजगार, जल व्यवस्थापन, आत्मनिर्भरता आदी विषयांवर अधिक ताकदीने काम करण्याचे संघाने ठरवले आहे. अनेक लहान - मोठ्या संकटांना तोंड देणारा संघ निरपेक्ष भावनेने ह्या देशातल्या सर्व स्तरातील बांधवांचं कल्याण होईल अशाच संकल्पनेतून आपले समर्पण करीत असतो.
 
मागील सत्यान्नव वर्षापासून संघ समाजातल्या प्रत्येक स्तरासाठी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी समर्पित आहे. जे जे राष्ट्रासाठी योग्य आहे ते ते संघ आपल्या शाखेतून समाजापर्यंत पोहचवत राहतो. हे ईश्वरी कार्य असल्याची भावना ह्या स्वयंसेवकात असल्याने त्यात कटुता देखील येत नाही आणि हे कार्य यावश्चंद्रदिवाकरौ असेच चालणार आहे.
 
गुढीपाडवा - अर्थात वर्षप्रतिपदा हा संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्मदिवस. सृष्टी ज्या दिवशी निर्माण झाली, त्या शुभ दिनी जन्म झालेल्या राष्ट्रभक्त डॉ. हेडगेवार यांनी या सृष्टीवर चिरंतन चैतन्य राहावे यासाठी संघाची स्थापना केली असावी अशी कवी कल्पना करतात. ती अगदीच गैरलागू वाटत नाही. कारण, डॉ. हेडगेवार यांनीच संघाला प्रवाही ठेवण्यासाठी संस्कार केले आहेत. अशा महान राष्ट्रभक्तास जयंतीनिमित्त शत शत नमन.
 
- विशाल मुळे, हिंगोली
 
9923225258