विश्वास गमावलेल्या तिघांची पिपाणी

    दिनांक : 19-Apr-2022
Total Views |
 
कोरोना बळींचा आकडा नेमका किती यावरून आता जो काथ्याकुट सुरू आहे, त्यात संशोधनापेक्षा द्वेषाचाच भाग अधिक आहे. यात गंमत म्हणजे स्वत:ची विश्वासार्हता गमावलेल्या तीन मंडळींनी यात जो काही पुढाकार घेतला आहे, त्याची तुलना महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीशीच होऊ शकते. यात पहिली आहे ‘जागतिक आरोग्य संघटना’, दुसरे आहेत राहुल गांधी आणि तिसरे आहेत अग्रलेख लिहून तो परत घेऊन मोकळे झालेले मराठीतले एक विद्वान संपादक.
 
 
corona
 
 
 
युरोपातल्या बौद्धिक उष्टावळीवर जगणार्‍या विचारवंतांची एक जमात आपल्याकडे नांदते. रात्री झोपण्यापूर्वी इंटरनेटच्या माध्यमातून ‘न्यूयॉर्क टाईम्स’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने काय म्हटले ते पाहायचे आणि मग तिथले निकष लावून इथे मापं काढत बसायची, असा यांचा शिरस्ता. युरोपातला ज्ञानशाखांचा विकास आणि ‘रेनेसान्स’ हा कुठल्याही विचार करणार्‍या व्यक्तीला आकर्षित करणारा नक्कीच ठरू शकतो. पण, ‘रेनेसान्स’पूर्व युरोप आणि ‘रेनेसान्स’नंतरचा युरोप हे दोन्ही प्रवास विचार करायला लावणारे आहेत. बौद्धिक स्वांतत्र्यासाठी तिथल्या विचारवंतांनी, कलाकारांनी आणि तत्त्वज्ञांनी जो संघर्ष केला, तो विचारात घेतला पाहिजे. धर्माचे स्तोम माजवून मानवी जीवनांवर ताबा मिळवू पाहणारी विकृत चर्चेस, त्यांचे धर्मगुरू, एकाधिकारशाही राबवू पाहणार्‍या राजसत्ता या सगळ्यांशी संघर्ष करताना, ज्या यातना तिथल्या मंडळींनी भोगल्यात त्याच्या एक टक्का त्रासही आपल्या गावठी विद्वानांना झालेला नाही. संघर्षाविना मिळालेले स्वातंत्र्य जसे चंगळीचे माध्यम बनते, तसेच या मंडळींचे झाले आहे. मग वडाला पिंपळाची साल लावून भारतविरोधी किंवा मोदीविरोधी गरळ ओकता येते. कोरोना बळींचा आकडा नेमका किती यावरून आता जो काथ्याकुट सुरू आहे, त्यात संशोधनापेक्षा द्वेषाचाच भाग अधिक आहे. यात गंमत म्हणजे स्वत:ची विश्वासार्हता गमावलेल्या तीन मंडळींनी यात जो काही पुढाकार घेतला आहे, त्याची तुलना महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीशीच होऊ शकते. यात पहिली आहे ‘जागतिक आरोग्य संघटना’, दुसरे आहेत राहुल गांधी आणि तिसरे आहेत अग्रलेख लिहून तो परत घेऊन मोकळे झालेले मराठीतले एक विद्वान संपादक.
 
‘जागतिक आरोग्य संघटना’ ही गेल्या तीन वर्षांत सगळ्यात अपयशी ठरलेली संघटना. अनेक ठिकाणी तर ही संघटना चीनला विकली गेल्याचीच चर्चा अधिक झाली. ‘जागतिक आरोग्य संघटने’चे प्रमुखपद कोणाला मिळते याऐवजी कोणाच्या कोणाला मिळाले याचीच चर्चा रंगते. कोरोना आणि त्याचे निरनिराळे उपप्रकार याबाबात धोक्याची घंटा वाजविणे आणि त्यावर कुठल्याही प्रकारच्या ठोस उपायोजना न सुचविणे हे ‘जागतिक आरोग्य संघटने’चे कार्यकर्तृत्व. कोरोना कुठून आला आणि त्यावर ठोस उपाय काय यावर आजही ‘जागतिक आरोग्य संघटने’कडे उत्तर नाही. लसींच्या बाबतीतही ‘जागतिक आरोग्य संघटने’ने सर्वात प्रभावी लस निर्माण केली नाही. केली असेल, तर ती भारतसारख्या किंवा आशियासारख्या महाकाय लोकसंख्या असलेल्या देशांपर्यंत पोहोचविण्यात त्यांना कुठलाच रस नव्हता. याउलट भारताने पहिल्याच टप्प्यात आपल्या दोन लसी बनविल्या. युरोपात या लसींच्या वापरावर जे राजकारण झाले, त्यात ‘जागतिक आरोग्य संघटने’ने कुठलेही भाष्य केले नाही. भारतीय लस घेऊन परदेशात निघालेल्या प्रवाशांना जो मनस्ताप सहन करावा लागला तो जगजाहीर आहे. बरे, भारतीय बनावटीच्या लसींना तांत्रिक कारणांमुळे कुठे नाकारताही येत नव्हते.
 
आता भारतावर आरोप करणार्‍या उरलेल्या दोन देशी गावंढळांनी जे उद्योग इथे केले, त्याचीही जरा उलटतपासणी केली पाहिजे.एका बड्या युरोपीय लसनिर्मात्या कंपनीची लस भारतात पोहोचली नाही, तर भारतात कसा हाहाकार माजेल, हे सांगायला ही माध्यमे आणि संपादक मंडळी सरसावली होती. यांनी घाबरविणार्‍या बातम्या लिहिल्या, अग्रलेख खरडले. एकाच वेळी चार वर्तमानपत्रात हुबेहुब मजकूर छापून आला की, ती संपादकांच्या विद्वत्तेची बौद्धिक लाट नसून ‘पीआर एजन्सी’ची करामत असते हे न कळण्याइतके आम्ही भारतीय आता मागास राहिलेलो नाही. या बड्या कंपन्या या मोबदल्यात संपादक आणि त्यांचे मालक यांना काय देतात हेही आता दडून राहिलेले नाही. गेल्या ७५ वर्षांच्या प्रवासात या देशाच्या सर्वसामान्य नागरिकांतही एक सामूहिक शहाणपण आलेे आहे. त्यामुळे या माकडचेष्टांकडे आपले लोकही रंजकपणे पाहत राहातात.
 
यातला तिसरा इसम म्हणजे राहुल गांधी. या महाशयांचे कर्तृत्व, नेतृत्व आणि वकुब तिन्ही बाबी वर जाहीर केलेल्या दोघांइतक्याच जगजाहीर आहेत. मागे चीनच्या बाबतीत असेच बरळून ते अडचणीत आले होते. ‘कोविड’ काळातील मृतांचे राजकारण करण्यात त्यांना आता रस आहे. ज्या महाराष्ट्र राज्यात ते सध्या सत्तेचे वाटेकरी आहेत, तिथे काय घडले होते? ‘कोविड’च्या नावाखाली सत्ताधार्‍यांनी आपल्या पोराबाळांच्या नावावर ‘कोविड सेंटर’ची कंत्राटे बळकावली. ज्यांना त्यांनी पाठिंबा दिला आहे ते मुख्यमंत्री तर या काळात घराबाहेरही पडले नाहीत. परवा ते मंत्रालयात पोहोचल्यावर मुख्यमंत्री मंत्रालयात पोहोचल्याचीही बातमी झाली. त्यावर यांचे अजूनही एक सहकारी आणि मोळीची दोरी असलेल्या शरद पवारांनी कशी मिष्किल प्रतिक्रिया दिली त्याचे व्हिडिओे मुक्त माध्यमांवर गाजत आहेत. महाराष्ट्रातला कोरोनाबळींचा आकडा नियंत्रणात का येत नव्हता आणि या तिन्ही पक्षांच्या झिम्मा फुगडीत कोरोनाकाळात महाराष्ट्राची काय दैना उडाली यात राहुल गांधींना काहीच रस नाही. त्याची काही आकडेवारी मिळाली, तर ती त्यांना नकोच आहे. मुळात भारताने ‘कोविड’ काळातल्या आकडेवारीच्या निष्कर्षांवर कोणताही आक्षेप नोंदविलेला नाही. आक्षेप त्यासाठी अवलंबिलेल्या पद्धतीवर आहे.
 
युरोपियन निकषांवर काढलेले भारतीय निष्कर्ष ‘जागतिक आरोग्य संघटने’नेच्या यापूर्वीच्या कोरोनाबाबतच्या निष्कर्षांइतकेच गोलमाल असणार आहेत. त्यामुळे त्यांना घाबरून भारत आकडेवारी देत नाही हा कांगावाच मुळी बालिश आहे आणि तो राहुल गांधीसारखे लोकच करू शकतात. कोरोनाकाळात जे घडले आणि त्यात जे लोक मृत्यूमुखी पडले ते दुर्दैवीच म्हणावे लागले. या मृतांचा ‘डेटा’ म्हणूनच विचार करायचा झाला तरी तो तपासायचे प्रतिमान भारतावर कसे लादता येईल? संकटे अनेकांचे बेगड उघडे पाडतात. कोरोनानेही अनेकांचे बेगड उघडे पाडले. आता पुढचे संकट आर्थिक आहे. युरोपीय प्रतिमानांमुळे फसलेल्या अर्थ आणि आरोग्य व्यवस्था आपण पाहिल्या आहेत. भारताला भारतीय प्रतिमाने निश्चित करण्याशिवाय काहीच पर्याय नाही आणि त्यासाठी मूळ भारतीय प्रतिभा आणि बौद्धिक क्षमता विकसित कराव्या लागतील. युरोपियन बौद्धिक शिस्त त्यासाठी उपयुक्त आहे. पण, त्यातला मजकूर मात्र आपलाच असला पाहिजे.