गळू फुटले!

    दिनांक : 16-Apr-2022
Total Views |
गेल्या चार दशकांत महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय जीवनात ब्राह्मणविरोधी जातीयवादाचे जे विषारी गळू टरटरीत फुगले होते, ते परवा राज ठाकरेंच्या ठाण्याच्या सभेमुळे फुटले. गळू फुटल्यावर जशी घाण बाहेर येते, तसेच या गळवाचे कर्तेकरवितेही एक एक करून समोर येऊ लागले आहेत.
 
 
pawar
 
 
भल्या सकाळी अग्रलेखाचे असले घाणेरडे शीर्षक असावे का, असा प्रश्न खरंतर संपादक म्हणून आम्हालाही पडला होता. पण, मूळ विषयच इतका कलुषित, घाणेरडा आणि विषारी आहे की, त्यावर भाष्य करताना अशा शीर्षकाशिवाय पर्यायच नाही. गेल्या चार दशकांत महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय जीवनात ब्राह्मणविरोधी जातीयवादाचे जे विषारी गळू टरटरीत फुगले होते, ते परवा राज ठाकरेंच्या ठाण्याच्या सभेमुळे फुटले. गळू फुटल्यावर जशी घाण बाहेर येते, तसेच या गळवाचे कर्तेकरवितेही एक एक करून समोर येऊ लागले आहेत.
 
ठाण्याच्या सभेत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना कशा प्रकारे मन:स्ताप सहन करावा लागला, यावर राज ठाकरे यांनी परखड भाष्य केले. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बाबासाहेबांना ‘महाराष्ट्र भूषण’ देताना, ज्या प्रकारचे वातावरण निर्माण केले गेले होते, ते आठविताना शिवप्रेमींना आजही विषाद वाटतो. स्वत:ला ‘मराठा अस्मितेचे रक्षक’ म्हणविणार्‍या पवारांच्या बगलबच्च्यांनीच हे उद्योग केले होते. गडकिल्ल्यांवर मजारी बांधल्या गेल्या, अफझलखानाच्या थडग्यावर उरूस झाले, तरी या तथाकथित शिवप्रेंमींचे रक्त उसळत नाही. मात्र, असा काही विषय असला की हे लोक फुरफुरत पुढे येतात. पुरंदरेंना विरोध करणार्‍यांचे समर्थन करताना अशा लोकांचा आपल्याला अभिमान वाटतो, असे पवार म्हणाले. आपल्या संपूर्ण हयातीत अशा जातीयवादी लोकांच्या समर्थनार्थ पवार साहेब पहिल्यांच समोर आले आणि त्यांचा खरा चेहरा उघडा पडला.
 
जेम्स लेन प्रकारणात त्यावेळी जे घडले, ते संपूर्ण महाराष्ट्राला वेदना देणारेच होते. भांडारकरसारख्या ज्ञानगंगेचे जे काही नुकसान त्यावेळी झाले, ते कधीही भरून निघणारे नाही. बाबासाहेब पुरंदरेंनी पुस्तकाच्या वितरणावर बंदी घालण्यासाठी लिहिलेले पत्र मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रसारित केल्याबरोबर या ‘शॅडो मराठा’ संघटनांचे लोक समोर यायला लागले. जातीय कलह आणि त्यातून मिळविण्याचे जातीय फायदे याचे एक समीकरणच यातून उघड पडले. बासरीवाला आणि त्याच्या मागून उड्या मारत बाहेर येणार्‍या उंदरांची गोष्ट, तर सगळ्यांना माहीतच आहे. पण, एकाच सभेनंतर सगळेच नतद्रष्ट उघडे पडण्याचा प्रकार पहिल्यादांच घडत असावा. या सभेचे प्रताप असे की, कुणी इशरतवादी, कुणी जातीयवादी एक एक करून बाहेर पडत आहेत. या सगळ्यात उघडी पडलेली मोठी जमात म्हणजे काही झाले की, पवार साहेब कसे सुसंस्कृत आहेत याच्या झांजा वाजविणार्‍या भाट पत्रकार आणि साहित्यिकांची! जनमानसात आपली प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी पवारांनी यांना आजन्म उपकृत करून ठेवले.
 
मात्र, आता साहेबांच्या सुसंस्कृतपणाचा आव इतक्या अचानकपणे गळून पडला आहे की, कुणाला काय करायचे ते कळतच नाही. पवार इतके बेरकी की, त्यांनी आपल्या जातीतले लोक बेमालूमपणे वापरले. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना त्याचे खरे लाभार्थी कोण, हे न्यायालयाने लवासाबाबत ताशेरे ओढताना सांगितले होतेच. पवारांनी यांचा वापर केला, पण सत्तेच्या पदावर या मंडळींना बसविले नाही. तसे केले असते, तर त्यांचा सुसंस्कृतपणाचा मुखवटा केव्हाच गळून पडला असता. आर. आर. पाटलांसारखा चेहरा बाळगायचा आणि मागे हे असले उद्योग करत राहायचे, असे पवारांचे राजकारण होते. आता तर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती दाखवायलाही पक्षात कोणी सज्जन नाही, अशी अवस्था झाली आहे. जातीयता हा समाजाला लागलेला डाग. सगळ्याच जातीतल्या नतद्रष्टांनी अन्य जातीच्या महापुरुषांच्या चारित्र्यहननाचे गलिच्छ प्रकार केले आहेत. महापुरुष जातीत वाटून घेतले की, मग त्यांचे भांडवल करून राजकीय नफा तत्काळ मिळतो. जात म्हटले की अक्कल गहाण पडण्याचा शिरस्ता आजही कायम आहे. त्याचा शिक्षण, समाज याच्याशी काहीही संबंध नाही.
 
राजकारणी यांचा पुरेपूर वापर करतात. पवार असे का वागतात, असा काहींना प्रश्न पडतो, तर अनेकांना ते कोडे वाटते. या प्रश्नाचे उत्तर शोधायला आपल्याला अधिक खोलात जावे लागते. पवारांच्या राजकीय कादर्किदीचे मूल्यमापन करावे लागते. आजही सरकारमधील त्यांची आमदारांची संख्या कमी असली तरी शिवसेना आणि शासनावर वरचष्मा ठेवण्यात ते यशस्वी ठरले आहेत. आपणच सर्वशक्तीमान असल्याचा आभास त्यांनी बरोबर तयार केला आहे. सत्ता अशा लोकांनीच चालते. पवारांच्या पक्षाचे निरीक्षण केले, तर आपल्या लक्षात येईल की, त्याला स्वत:ची म्हणून काही विचारसरणीच नाही, अधिष्ठान नाही आणि ध्येय-धोरणेही नाहीत. भाजपसारखा पक्ष संघाच्या नीतिमूल्यांमुळे एका विशिष्ट चौकटीत विकसित होत जातो आणि वाढतो. व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेतून राजकीय पक्ष आकाराला येऊ शकत नाही आणि आलाच तर तो चालू शकत नाही. त्यात जनमानसाच्या आशाआकांक्षांचे प्रतिबिंब पडू शकत नाही. केवळ ध्येय असूनही चालत नाही. त्याला संघटनेचे बळ लागते. संघटनेसाठी जीवन वेचणार्‍या मंडळींची गरज लागते. आता हे सगळे निकष मानणारे लोक शरद पवारांकडे का जातील? मग शरद पवारांना वेगळी मोट बांधावी लागते. मग अल्पसंख्याकांसाठी नवाब मलिक लागतात, ओबीसींसाठी धनंजय मुंडे लागतात, मराठा म्हणून अजून कोणी लागतो. ही मंडळी आपापल्या जातीत साहेबांचा चेहरा आणि चिन्ह घुमवत राहतात आणि काही का होईना, सत्तेचे घास या पक्षाच्या ताटात पडत राहतात, तेवढ्या मुद्दलावर राष्ट्रीय राजकारणातही आपली छाप पाडण्यात पवार यशस्वी ठरतात.
 
राज ठाकरेंच्या सभेमुळे ही सगळी ‘ओपन सिक्रेट’ चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहेत आणि चेहरे व मोहरे सगळेच समोर येऊ लागले आहेत आणि जनमानसात यांची इभ्रत धुळीस मिळाली आहे. कारस्थानाने देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्रिपद हिसकाविण्याची अजून काय काय शिक्षा, या तिन्ही पक्षांना मिळते हे पाहायचे!