अखंड भारत कसा आणि केव्हा?

    दिनांक : 16-Apr-2022
Total Views |
डॉ. मोहनजी भागवत जेव्हा म्हणतात की, पुढील १५-२० वर्षांत अखंड भारत निर्माण होईल. तेव्हा त्यांना असे म्हणायचे नाही की, भारतीय सेना सर्व देशात जातील आणि तो प्रदेश जिंकून घेतील. हा मार्ग रशियाचा आहे. युक्रेनला रशियात सामील करून घेण्यासाठी रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. हा रशियामार्ग आपल्या उपयोगाचा नाही. आपण प्रेमाने जग जिंकणारे लोक आहोत. विदेशनीतीच्या संदर्भात याला ‘सॉफ्ट पॉवर’ असे म्हणतात. नरेंद्र मोदी यांच्या विदेशनीतीचा तो कणा आहे. याच शक्तीच्या आधारे सर्वांना जिंकायचे आहे.
 
 
 
mohanji1
 
 
 
राजकीय नेता निवडणूक ते निवडणूक असा विचार करीत असतो आणि द्रष्टा नेता पुढील २५-५० वर्षांचा विचार करीत असतो. संघाचे सरसंघचालकपद हे राजकीय नेत्याचे पद नाही. ते राष्ट्रनेतृत्त्वाचे पद आहे. सरसंघचालक केवळ आणि केवळ राष्ट्राचा आणि राष्ट्राचाच विचार करतात. राजकीय नेता राजकीय सत्तेचा विचार करतो. सत्तेच्या खेळातील त्याची गणिते असतात आणि त्याप्रमाणे तो राजकीय चाली खेळत असतो, तो फार दूरचे पाहू शकत नाही.
 
डॉ. मोहनजी भागवत यांच्या ‘अखंड भारत ’वक्तव्यावर असदुद्दीन ओवेसी यांनी लगेचच वक्तव्य केले. ते राजकीय नेत्याला एकदम शोभून दिसणारे आहे. त्यांच्या डोक्यावरील गोल टोपीतून डॉ. मोहनजी भागवत काय म्हणाले आणि त्याचे अर्थ काय होतात, हे उतरणे कठीणच आहे. तसे संजय राऊतही बोलले आहेत. परंतु, त्यांच्यावर काही भाष्य करणे आता आपल्याच वाचकांनाही आवडत नाही, म्हणून काही लिहित नाही. ओवेेसी म्हणतात, “अखंड भारत गेल्या आठ वर्षांत का निर्माण झाले नाही? १५ वर्षांत अखंड भारत होईल, हे मोहन भागवत कोणत्या आधारावर म्हणतात? चीनने भारताचा प्रदेश हडप केला आहे, तो मुक्त करण्याविषयी ते का बोलत नाही.” वगैरे वगैरे.
 
आता डॉ. मोहनजी भागवत काय म्हणाले ते बघूया. बातमीनुसार, सनातन धर्मच हिंदू राष्ट्र आहे, असे प्रतिपादन करतानाच, पुढल्या २०-२५ वर्षांत अखंड भारत अस्तित्त्वात येईल आणि आपण जर प्रयत्नांना गती दिली, तर १०-१५ वर्षांतच हे स्वप्न पूर्ण होईल, असे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी म्हटले आहे. ते हरिद्वार येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
 
हरिद्वारचा कार्यक्रम धार्मिक मंडळींचा होता. श्रोते म्हणून बहुसंख्य साधू होते. मोहनजींचे भाषण त्यांच्यापुढे झाले. त्यांच्या भाषणातील पुढील अंश असा आहे, “ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलला होता, अगदी तसेच संतांच्या आशीर्वादाने भारत पुन्हा एकदा अखंड भारत बनेल. कुणीही हे थांबवू शकत नाही...आम्ही अहिंसेवरच कायम भर देणार, मात्र हातात दंडुकेही ठेवू. कारण, जगाला शक्तीची भाषा कळते. आमच्या मनात कुणाविषयी द्वेष नाही, शत्रुत्व नाही...हजार वर्षांच्या सनातन धर्माला संपविण्याचे सतत प्रयत्न झाले. मात्र, प्रयत्न करणारे नष्ट झाले. सनातन धर्म अजूनही कायम आहे. राष्ट्र साधनेने अनेक विघ्ने येत असतात. ती पार करीत सातत्याने पुढे जायचे असते.”
 
‘सनातन धर्मच हिंदूराष्ट्र आहे’ हे मोहनजींचे वाक्य अतिशय बोलके आहे. उत्तरपारा येथील भाषणात योगी अरविंद म्हणाले की, “सनातन धर्म आणि राष्ट्रवाद एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.” हा सनातन धर्म अखंड भारतव्यापी आहे. अखंड भारताच्या भौगोलिक कक्षेत अफगाणिस्तान, ब्रह्मदेश आणि श्रीलंका येतात. १९४७ साली देशाचे विभाजन झाले. अनैसर्गिक आणि कृत्रिम पाकिस्तान निर्माण करण्यात आला. भूमीचे विभाजन करता येते, भूमीला बांधून ठेवणार्‍या सनातन धर्माचे विभाजन करता येत नाही. तो सनातन असल्यामुळे शाश्वत आहे आणि अमर्त्य आहे.
 
फाटाफूट झाल्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान, ब्रह्मदेश (म्यानमार), श्रीलंका आणि बांगलादेश यांची स्थिती कशी आहे? श्रीलंका आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. पाकिस्तानात उद्या काय घडेल, हे सांगणे अवघड आहे.
 
अफगाणिस्तान जगाच्या दृष्टीने अस्पृश्य देश झालेला आहे. ब्रह्मदेश सैनिकी राजवटीने पोखरत चाललेला आहे. या सर्वांच्या तुलनेत खंडित भारत प्रगतिपथावर आहे. आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आहे. अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. तांत्रिक प्रगतीच्या बाबातीत अग्रेसर देश आहे. संरक्षणसिद्धतेच्या बाबतीत बलशाली राष्ट्र आहे. राजकीय स्थैर्याच्या बाबतीत सनातन लोकशाही मूल्यांवर देश उभा आहे. सर्वसमावेशकता, सर्वमतांचा आदर, सर्वांचा सहभाग, ही भारताची सनातन संस्कृती आहे. तिचाच अविष्कार राज्यघटनेत झालेला आहे. त्यामुळे भारतात राजकीय स्थैर्य आहे.
 
एक शक्तिकेंद्र नेहमीच आकर्षण केंद्र असते. शक्तिकेंद्राकडे अन्य घटक आकर्षित होत असतात. अखंड भारतात येणार्‍या सर्व देशांना गांभीर्याने विचार करावा लागेल की, आमचे हित सर्वांनी मिळून एकत्र राहण्यात आहे की आपली चूल वेगळी मांडण्यात आहे? एकत्र येणे याचा अर्थ आपली ओळख पुसून टाकणे नव्हे. ओळख पुसून टाकून सर्वांना एक करण्याचा मार्ग हा रशिया आणि अमेरिकेचा आहे, तो आपला मार्ग नव्हे. आपापली ओळख कायम ठेवत, स्वायत्तता कायम ठेवत, आपापले उपासनेचे मार्ग कायम ठेवत, सर्वांना एकत्र येता येऊ शकते. कारण, हा सर्व भूखंड निसर्गानेच एक केलेला आहे.
 
या सर्वांची संस्कृती एक आहे, जीवनमूल्ये समान आहेत, थोड्याबहुत फरकाने पारिवारिक व्यवस्था समान आहेत. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन समान आहे. आपण सर्व अस्तित्त्ववादी आहोत. एकाच परमेश्वराची लेकरे आहोत, हीच सर्वत्र भावना असते. ही संस्कृती सर्वांना बांधून ठेवणारी आहे. युट्यूबवर अफगाणिस्तानातील खेड्यातील काही व्हिडिओ आहेत. ते बघितले असता, भारतातील खेड्यातील जीवन आणि अफगाणिस्तानातील खेड्यातील जीवन यातील फरक कसा करायचा, असा पाहणार्‍याला प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अफगाणिस्तान एकेकाळी बौद्धधर्मीय होता, आजही बौद्धधर्मीयांच्या असंख्य खाणाखुणा अफगाणिस्तानात सापडतात. राम आणि रावणामुळे श्रीलंकेशी आपले भावनिक नाते आहे व पाकिस्तान, बांगलादेशच्या सर्व प्रदेशात आपली पवित्र तीर्थक्षेत्रे आहेत.
 
या सर्वांना आपल्या सनातन धर्माची ओळख होणे गरजेचे आहे. हा सनातन धर्म एका विशिष्ट उपासना पद्धतीचा आग्रह धरीत नाही. मनुष्यावर प्रेम करणे आणि प्रत्येक माणूस हा चैतन्याचा अविष्कार आहे, हे सत्य स्वीकारून ‘मी तसा तू’ या भावनेने दुसर्‍याशी व्यवहार करणे याला सनातन धर्म म्हणायचे. तो वैश्विक आहे. त्याचे वैश्विक रुप प्रकट होण्यासाठी त्याच्या जन्मभूमीत त्याचा अविष्कार होणे आवश्यक आहे.
 
डॉ. मोहनजी भागवत जेव्हा म्हणतात की, पुढील १५-२० वर्षांत अखंड भारत निर्माण होईल. तेव्हा त्यांना असे म्हणायचे नाही की, भारतीय सेना सर्व देशात जातील आणि तो प्रदेश जिंकून घेतील. हा मार्ग रशियाचा आहे. युक्रेनला रशियात सामील करून घेण्यासाठी रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. हा रशियामार्ग आपल्या उपयोगाचा नाही. आपण प्रेमाने जग जिंकणारे लोक आहोत. विदेशनीतीच्या संदर्भात याला ‘सॉफ्ट पॉवर’ असे म्हणतात. नरेंद्र मोदी यांच्या विदेशनीतीचा तो कणा आहे. याच शक्तीच्या आधारे सर्वांना जिंकायचे आहे. तलवारीचे पाते न उगारताच सर्व चीन आपल्या पूर्वजांनी बौद्धमय केला. दक्षिण आशियात आपल्या सनातन धर्माची पताका नेली. तेच काम पुढच्या काळात होईल.
 
आंतरराष्ट्रीय परिस्थिती जेव्हा प्रतिकूल होती, तेव्हा हे सर्व देश सनातन धर्मापासून भरकटले गेले. आता आंतरराष्ट्रीय परिस्थिती फार झपाट्याने बदलत चालली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळे देश एकत्र येतात आणि आपल्या संघटना बांधतात, हे सतत चालू असते. युरोपातील देशांनी युरोपियन युनियन तयार केली. पूर्व युरोपातील देशांनी पूर्व युरोपातील देशांची युनियन तयार केली. प्रत्येकाच्या अस्मिता आणि ओळख कायम ठेवून समान हितसंबंधाचे विषय एकत्र करून त्यांनी हे संघ बांधले आहेत. हेच काम भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि ब्रह्मदेश यांनादेखील करावेच लागेल. ती अनुकूल परिस्थिती झपाट्याने निर्माण होत आहे.
 
भूतकाळात राजवटी वेगवेगळ्या असल्या तरी अखंड भारतातील नागरिक कालडीतून निघून काबूललादेखील जाऊ शकत होते. त्याला पासपोर्ट आणि ‘व्हिसा’ची गरज नव्हती. मगध देशाचा रहिवासी ब्रह्मदेशातही जाऊ शकत असे. सांस्कृतिक आदानप्रदान हजार वर्षे चालत राहिले. आपल्याला त्याची गरज आहे. ही सर्व भूमी आपली आहे आणि कुणालाही कुठेही केव्हाही जण्याचा मार्ग मोकळा असला पाहिजे. आपल्याला काहीही परके नाही, ही भावना पुन्हा एकदा निर्माण व्हावी लागेल. आपल्या सनातन धर्माच्या परिघात येणार्‍या देशांची परिस्थिती पाहता, त्या त्या देशांतच या प्रकारचे विचारप्रवाह येणार्‍या काळात प्रबळ होत जातील. मोहनजींच्या वक्तव्याचा मला समजलेला हा अर्थ आहे. कदाचित तो अनेकांना रुचेल अथवा न रुचेल. पण, सरसंघचालकांच्या वक्तव्याचा आपल्या बुद्धीप्रमाणे अर्थ करून घेण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक स्वयंसेवकाला असल्यामुळे या स्वातंत्र्याचा वापर मी करून घेतलेला आहे.
 
- रमेश पतंगे