सचोटीच्या व्यवहाराला संस्कारांची जोड मिळाल्याने ठरलो यशस्वी!

    दिनांक : 15-Apr-2022
Total Views |
‘शाम डिस्ट्रीब्युटर्स’चे संचालक शामकांत वाणी उपाख्य ‘शामभाऊ’ यांचा स्वानुभव
 
जळगाव : व्यवहार- मग तो एक रुपयाचा असो की, एक लाखाचा - त्यात सचोटी ठेवत गेल्या 28 वर्षात तसाच वागत असल्याने अनेक ग्राहक आमच्याशी जुळले. शिवाय कुणाचेही मन दुखवायचे नाही या वडिलांनी दिलेल्या संस्काराची त्याला जोड मिळाल्याने आजवरच्या प्रवासात जीवनात आणि व्यवसायातही सतत यशस्वी ठरलो, अशी भावना प्रख्यात केमिस्ट, जळगाव जिल्हा केमिस्ट असो.चे कोषाध्यक्ष आणि ‘शाम डिस्ट्रीब्युटर्स’ या प्रसिद्ध फर्मचे संचालक शामकांत रमेश वाणी उपाख्य ‘शामभाऊ’ यांनी ‘तरुण भारत’शी बोलतांना व्यक्त केली.
 
 
Shambhau
 
धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील मूळ रहिवासी असलेल्या शामभाऊ यांचा जन्म 21 ऑगस्ट 1970 चा. त्यांचे वडील रमेश श्रीधर वाणी तर आई लीलाबाई. वडील जळगावला पोस्टात काम करायचे. त्यांचा पगार अत्यंत तुटपुंजा आणि परिस्थिती हलाखीची असली तरी त्यांची आपल्या मुलांबाबतची स्वप्नं मात्र खूप मोठी होती. त्याची जाण ठेवत शामकांत , संजय, नरेश आणि सुदाम या चारही मुलांनी आवश्यक शिक्षण घेत परिस्थिती सुधारली. परिवारात एक बहीणही आहे. शामभाऊंनी नूतन मराठा कॉलेजमधून बी.कॉम. केले. शिकत असतानाच कुटुंबाला हातभार लावण्यासाठी 1984 पासून ते सुराणा मेडिकलमध्ये कामही करीत असत. तेथे 8 वर्षे काम करून त्यांनी या व्यवसायाची कौशल्ये आत्मसात केली. कल्याणी ब्रेक्स मध्येही ऑपरेटर म्हणून त्यांनी अनुभव घेतलाय. त्यांचे बंधू संजय आणि नरेश हे सुद्धा ‘पलोड डिस्ट्रीब्युटर्स’ मध्ये काम करायचे. त्यामुळे नोकरीच्या मागे न लागता भविष्यात आपण याच व्यवसायात उतरायचे असा त्यांनी निश्चय केला आणि तो तडीसही नेला. त्यांच्या पाठीशी होते चारही भाऊ.
 
स्वत:चे दुकान प्रारंभ
 
आपल्या पहिल्या दुकानाबद्दल सांगतांना शामभाऊ त्या काळात रमले. 10 जानेवारी 1994 रोजी गोलाणी मार्केटमध्ये आम्ही दुकान सुरु केले, असे सांगून शामभाऊ म्हणाले की, मुंबईच्या व्यापार्यांनी उधारीवर माल देण्याची तयारी दर्शविली आणि ती निभावलीही. त्यामुळे अवघ्या 50 हजारांच्या भांडवलावर व्यवसाय सुरू केला आणि ‘शाम डिस्ट्रीब्युटर्स’ची वाटचाल सुरू झाली. या व्यापार्यांनी जशी साथ दिली तशीच हिंमत चारही भावांनी दाखवली... आणि काम सुरु केले. आम्ही सर्वजण सुरुवातीपासूनच एकत्र राहतोय... आज आम्ही 4 भाऊ, त्यांच्या पत्नी अनुक्रमे वंदना शामकांत,वैशाली संजय,प्रिया नरेश आणि रेखा सुदाम यांच्यासह माझ्या सौरभ व ऐश्वर्या या मुलांसह सर्व मिळून एकूण 5 मुली आणि 4 मुले असा 17 जणांचा आमचा एकत्रित परिवार आहे. ‘वन किचन आणि वन टेबल’ म्हणजे सर्वांचा स्वयंपाक एकाच जागी आणि भोजनही एकत्रच हे सूत्र आम्ही पाळतो. जी आमची सर्वात मोठी शक्ती आणि ऊर्जाही आहे, असे शामभाऊ अत्यंत अभिमानाने सांगतात... असाच अभिमान त्यांना आणखी एका व्यक्तीबद्दल आहे. ती व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध व्यवसायी मेजर नाना (नानासाहेब) वाणी... त्यांनी ‘गोलाणी’त अत्यंत माफक किंमतीत दुकान मिळवून दिले ते वडिलांशी असलेल्या त्यांच्या प्रेमामुळे. आमच्या दोन्ही परिवारांनी हे संबंध जपतांना एकमेकांच्या सुख-दु:खात साथ दिली आहे, असं शामभाऊ म्हणाले. सचोटी, वक्तशीरपणा आणि दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती यामुळे हळूहळू व्यवसाय वाढत गेला.. अनेक नावाजलेल्या कंपनी आमच्याशी जुळत होत्या... हळूहळू आम्ही प्रगतीच्या दिशेने एक-एक पाऊल टाकत होतो.... येथे आम्ही 6 वर्षे म्हणजे 2000 पर्यंत होतो.
 

Shambhau 1 
विसनजीनगरात स्थलांतर
 
त्यानंतर सन 2000 मध्ये आम्ही विसनजीनगरमधील होमगार्ड ऑफिसजवळ दुकान घेतले असे सांगून शामभाऊ म्हणाले की, येथे आम्ही 2000 ते 2018 म्हणजे सुमारे 18 वर्षे होतो. या काळात व्यवसाय जसा वाढत होता तसेच ग्राहकही वाढत होते... त्याचबरोबर त्यांचा विश्वास आणि आमची जबाबदारी सुद्धा वाढत होती. आम्ही खूप सजगतेने आणि कुठल्याही ग्राहकांची तक्रार राहू नये यासाठी सावधपणे काम करीत होतो.
 
आता राधाकिसनवाडीत
 
आता व्यावसायिक आणि कौटुंबिक गरज म्हणूनही सुमारे 4 वर्षांपासून म्हणजे- 10 जानेवारी, 2018 पासून राधाकिसन वाडीतील नव्या प्रशस्त जागेत दुकान आणि निवासही अशी व्यवस्था करून आम्ही पुन्हा स्थलांतर केले, असे सांगून शामभाऊ म्हणाले की, या नव्या वास्तुच्या गृहप्रवेशप्रसंगी अनेक मान्यवरांचा सहवास, स्नेह आणि आशीर्वादही आम्हाला लाभला- जो आमचा आयुष्यभर मनाशी जपलेला सुखद क्षण आहे. त्यात विशेष उल्लेख करायचा झाल्यास आम्हा केमिस्ट बांधवांचे नेते, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आप्पासाहेब जगन्नाथजी शिंदे, जिल्ह्याचे नेते आणि माजीमंत्री सुरेशदादा जैन, त्यांचे आणि माझेही निकटचे स्नेही मेजर नानासाहेब वाणी यांच्या सोबतच अनेकांचा समावेश आहे - जे आमच्या या आनंद क्षणांचे साक्षीदार आहेत...
 
अडचणी आल्या, पण मित्रांनीच सोडवल्या
 
सर्व व्यवसायात येतात तशाच या व्यवसायातही अनेकदा अडचणी आल्या पण मित्रांनी त्या आमच्यापर्यंत येऊ न देता परस्पर सोडवल्या असे सांगून शामभाऊ म्हणाले की, आम्हा केमिस्ट बांधवांचे जिल्ह्याचे धडाडीचे नेते आणि केमिस्ट असो.चे अध्यक्ष सुनील भंगाळे तसेच रतीलाल राका, अनिल झंवर यांचे मार्गदर्शन आणि साथ कधीच विसरता येणार नाही. कुठलीही समस्या असो-त्याचे उत्तर यांच्याकडे मिळतेच. सन 2000 पासून मी केमिस्ट असो.शी संलग्न आहे. या 22 वर्षात सुरुवातीला 15 वर्षे जॉईंट सेक्रेटरी, त्यानंतर 3 वर्षे उपाध्यक्ष आणि आता 4 वर्षांपासून कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतो आहे, असेही त्यांनी सांगितले. माझे बंधू संजय हे शाम मेडिकल्स, बायो डिस्ट्रीब्युटर्स व शाम सेल्स कॉर्पोरेशनचेही काम पाहतात. त्यामुळे माझ्यावरील बराच भार हलका झाला आहे. आता आमची मुलेही याच व्यवसायात येत असल्याने ही ग्राहक सेवेची परंपरा पुढेही अशीच जपली जाईल यात शंका नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
ऑनलाईन व्यवसायाचे संकट मोठे
हल्ली अनेक वस्तूंप्रमाणेच काही औषधेही ऑनलाईन मिळू लागल्याने आमच्या व्यवसायापुढे हे एक मोठे आव्हान जसे आहे तसेच ते संकटही ठरू शकते. कारण औषधी दुकानातील औषधांबाबत संबंधितांवर एक जबाबदारी असते. कायद्याचेही बंधन असते. परंतु ऑनलाईन खरेदी केल्यास आणि त्यात संबंधितास काही अपाय झाल्यास तुम्ही कोणाला जबाबदार धरणार? असा प्रश्नही त्यांनी केला. या ऑनलाईन व्यवसायात अव्वाच्या सव्वा कमिशनच्या अमिषाला बळी पडून केलेली औषध खरेदी जीवघेणी ठरली तर? तुम्ही कुणाला जाब विचारणार, अशी याबाबत रोखठोक भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.
 
चित्रपटाचे शौकीन
 
शामभाऊ पूर्वी चित्रपटांचे खूप शौकीन होते.अगदी दिवसभर सिनेमा पाहण्याचाही विक्रम त्यांनी केला आहे.पण आता तसे शक्य होत नाही असे सांगून शामभाऊ म्हणाले की,आता टीव्हीवर चांगल्या आणि कौटुंबिक मालिका पाहतो.मात्र व्यवसायामुळे असा वेळ कमीच असतो. ज्यातून चांगले संस्कार होतील अशा गोष्टीसाठी सर्वांनीच वेळ द्यायला हवा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.