जुन्या पाकिस्तानचा जुना गडी!

    दिनांक : 15-Apr-2022
Total Views |
शाहबाज शरीफ यांच्यासारख्या तुलनात्मकरित्या कमी गंभीर व्यक्तीसाठी, नवाझ शरीफांचे नियंत्रण नसताना परिस्थितीचा कौशल्याने सामना करणे सोपे ठरणार नाही. महत्त्वाचे म्हणजे, तेथील राजकीय आघाडीचे मुख्य काम इमरान खानपासून सुटका करून घेण्याचे होते आणि ते आता पूर्ण झालेले आहे, अशा स्थितीत आघाडी अधिक काळपर्यंत टिकून राहणे शक्य नाही आणि या सरकारचे स्थैर्यही संशयास्पद आहे.
 
 

sharif 
 
 
पाकिस्तानमध्ये दीर्घ काळापासून चाललेल्या राजकीय नाटकात नवे नवे अंक जोडले जाताहेत. सुरुवातीला सत्ताधारी आघाडीतील काही सदस्यांच्या समर्थनासह संयुक्त विरोधकांनी ‘नॅशनल असेम्ब्ली’मध्ये आणलेला अविश्वास ठराव पाकिस्तानविरोधी शक्तींची हातमिळवणी असल्याचे ठरवत इमरान खान यांनी पाडला, तर दुसरीकडे राष्ट्रपती आरीफ अल्वींकडे ‘नॅशनल असेम्ब्ली’ विसर्जित करण्याची शिफारसही केली आणि राष्ट्रपतींनीही स्वामीनिष्ठेचा परिचय देत ‘नॅशनल असेम्ब्ली’ विसर्जित केली. परिणामी विरोधी पक्ष पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आणि सर्वोच्च न्यायालयाने सभापतींचा निर्णय बेकायदेशीर असल्याचे सांगत अविश्वास प्रस्तावावर मतविभाजनाची परवानगी दिली. तथापि, इमरान खान तमाम प्रयत्न करूनही अविश्वास ठराव थांबवू शकले नाही आणि अखेर त्यांचे सरकार विश्वासमत मिळवण्यात अपयशी ठरले व इमरान खान यांची गच्छंती झाली.
 
पुढे पाकिस्तानच्या विरोधी पक्षांनी पंतप्रधानपदासाठी एकजुटीचे दर्शन घडवत ‘पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ’ गटाचे नेते शाहबाज शरीफ यांना आपला उमेदवार घोषित केले आणि या पदावर त्यांच्या नियुक्तीचा मार्ग प्रशस्त झाला. त्यानुसार मियां शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला.
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी येण्याआधी काश्मीर मुद्द्यावर भारताला डोळे वटारणारे शाहबाज शरीफ (जन्म दि. २३ सप्टेंबर,१९५१) शरीफ कुटुंबाशी संबंधित असून ते लाहोरमधील एका पंजाबी भाषिक काश्मिरी परिवारातील आहेत. त्यांचे वडील मुहम्मद शरीफ मुळचे काश्मिरी असून ते व्यापारासाठी काश्मीरच्या अनंतनागमधून २०व्या शतकाच्या सुरुवातीला पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातील जती उमरा गावात स्थायिक झाले. त्यांच्या आईच्या कुटुंबाचा संबंध पुलवामाशी होता. नंतर हे कुटुंब १९४७ मध्ये भारताची फाळणी आणि त्यातून तयार होणार्‍या इस्लामी राज्य पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लाहोरमध्ये स्थलांतरित झाले. पुढे मुहम्मद शरीफ यांनी पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगांची स्थापना केली आणि आज पाकिस्तानच्या शरीफ समूह आणि इत्तेफाक समूहाची मालकी याच शरीफ कुटुंबाकडे आहे.
 
साखर, पोलाद, कागदनिर्मितीसारख्या उद्योगांत या कुटुंबाने अफाट नफा कमावला. झुल्फीकार अली भुट्टोंच्या सत्ताग्रहणानंतर सुरू झालेल्या राष्ट्रीयीकरणाच्या काळात या परिवाराने भीषण आर्थिक नुकसान सहन केले. त्यातूनच धडा घेत मियां मुहम्मद शरीफ यांनी आपल्या आर्थिक साम्राज्याची सुरक्षा आणि वाढीसाठी राजकारणात थेट प्रवेशाला सर्वाधिक उपयुक्त रणनीति मानले आणि आपला सर्वात मोठा मुलगा तथा शाहबाज शरीफ यांचे मोठे भाऊ नवाझ शरीफना राजकारणात उतरण्यासाठी प्रेरित केले. तो जनरल झिया उल हक यांचा काळ होता आणि शरीफ कुटुंबाने त्यांच्या संरक्षणात फक्त आपले आर्थिक साम्राज्यच विस्तारले नाही, तर स्वतःलादेखील राजकारणात स्थापित केले. मोठा भाऊ नवाझ शरीफ यांचे अनुकरण करत शाहबाज शरीफ यांनीही राजकारणात पाऊल ठेवले आणि वेगाने त्यात प्रगती केली.
 
शाहबाज शरीफ यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात १९८८ साली पंजाब प्रांताच्या ‘असेम्ब्ली’ सदस्याच्या रुपात निर्वाचनातून झाली. १९९० मध्ये पाकिस्तानच्या ‘नॅशनल असेम्ब्ली’त त्यांची निवड झाली. मोठे बंधू नवाझ शरीफ त्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान झाले आणि नंतर त्यांना लष्कराने पद सोडण्यासाठी अगतिक केले. पाकिस्तान मुस्लीम लीगसाठी पाकिस्तानच्या सत्तेचा मार्ग पंजाबमधूनच जात होता. त्यामुळे पंजाबमधील पक्षाची स्थिती मजबूत करण्यासाठी शाहबाज शरीफ यांनी पुन्हा पंजाबकडे मोर्चा वळवला आणि १९९३ मध्ये त्यांची पुन्हा पंजाब ‘असेम्ब्ली’त निवड झाली आणि त्यांच्याकडे विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी आली. दि. २० फेब्रुवारी, १९९७ रोजी ते पहिल्यांदा पाकिस्तानमधील या सर्वाधिक लोकसंख्येसह आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक संपन्न तथा लष्करात सर्वाधिक वर्चस्व राखणार्‍या प्रांताचे मुख्यमंत्री झाले. नवाझ शरीफ यांच्या सावलीत शाहबाज शरीफ यांनी राजकारणात महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त करतानाच त्यांना नुकसानही सोसावे लागले. जनरल परवेज मुशर्रफ यांनी १९९९ साली लष्करी बळाने सत्तापालट केला आणि त्यानंतर शाहबाज शरीफ आपल्या कुटुंबीयांसह सौदी अरेबियात वर्षानुवर्षे राहिले व ते २००७ साली पाकिस्तानला परतू शकले. त्यावेळी जनरल परवेज मुशर्रफ यांची स्थिती दुबळी होत होती आणि लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी अंतर्गत तथा बाह्य दबाव वाढतच होता. २००८ सालच्या पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत बेनझीर भुट्टो यांच्या हत्येनंतरच्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होत ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ने नवाझ शरीफ यांचे पंतप्रधानकीचे स्वप्न भंग केले. पण, शाहबाज शरीफ यांच्या राजकारणपटुत्वाने ‘पीएमएल-एन’च्या पंजाबच्या किल्ल्याला वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पंजाबच्या प्रांतीय ‘असेम्ब्ली’मधील विजयानंतर शाहबाज शरीफ यांना दुसर्‍या कार्यकाळासाठी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्त केले गेले. विजयाचा हा सिलसिला सतत सुरू राहिला आणि ते २०१३ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत तिसर्‍यांदा पंजाबच्या मुख्यमंत्रिपदी निवडले गेले. २०१८ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीतील आपल्या पक्षाच्या पराभवापर्यंत त्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला.
 
मुख्यमंत्रिपदावर असताना आपल्या कार्यकाळात शाहबाज शरीफ यांना एक अतिशय सक्षम आणि मेहनती प्रशासकाच्या रुपात प्रतिष्ठा मिळाली. त्यांनी पंजाबमध्ये महत्त्वाकांक्षी पायाभूत आराखडा प्रकल्पांची सुरुवात केली आणि आपल्या कुशल शासनासाठी प्रसिद्धी मिळवली. दुसरीकडे शरीफ बंधूंनी व्यापारातून अमाप संपत्तीच मिळवली नाही, तर त्यापुढे जात आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करत अवैधरित्या एक विशाल आर्थिक साम्राज्यही उभे केले. २०१८ सालच्या निवडणुकीत इमरान खान यांनी याच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली आणि शरीफ बंधूंना सत्तेतून बेदखल केले. तत्पूर्वी ‘पनामा पेपर्स’ प्रकरणात नाव आल्याने नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपदावरून अयोग्य घोषित केल्यानंतर शाहबाज शरीफ यांना ‘पाकिस्तान मुस्लीम लीग-एन’चे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते. नवाझ शरीफ यांच्याविरोधातील खटल्यांमुळे २०१८ सालच्या निवडणुकांनंतर शाहबाज शरीफ यांनाच विरोधी पक्षनेता म्हणून निवडले गेले.
 
शाहबाज शरीफ यांनी विरोधी पक्ष नेत्याची भूमिका कुशलतेने निभावली. इमरान खान सरकारला विविध मुद्द्यांवर घेरण्यापासून विरोधकांची आघाडी तयार करण्यापर्यंत शाहबाज शरीफ यांच्यातील कुशल राजनेताही समोर आला. विशेषज्ज्ञांच्या मते, शरीफ परिवाराला भारताशी सलोख्याचे संबंध हवे आहेत आणि त्याचा फायदा भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्याच्या रुपात मिळू शकतो. परंतु, पदग्रहणाआधीच शाहबाज शरीफ यांनी काश्मीर राग आळवून आपण स्वतः एक अपरिपक्व राजनेता असल्याचे दाखवून दिले आहे.
 
राजकारणाव्यतिरिक्त शाहबाज शरीफ यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही पाकिस्तानात सातत्याने चर्चा होत असते. पाच निकाह केलेल्या शाहबाज शरीफ यांना इमरान खान यांच्या तुलनेत अधिक स्वैराचारी मानले जाते. त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची किमान १४ प्रकरणे विचाराधीन आहेत. त्यांच्या कुटुंबाचा ‘तबलिगी’ जमातीशी निकटचा संबंध असून त्यांचे मोठे भाऊ अब्बास शरीफ ‘तबलिगी’ जमातीचे मुख्य कर्तेधर्ते होते. सोबतच झिया-उल-हक यांच्या काळापासूनच शरीफ बंधूंचा कट्टरपंथी इस्लामी संघटनांशी गहन संपर्क राहिलेला आहे.
 
दरम्यान, आता परस्पर विरोधी विचारांच्या विरोधी पक्षीय आघाडीने त्यांना पंतप्रधानपदासाठी पुढे केले. परंतु, आगामी वर्षांत या सर्वांनाच सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जायचे आहे. त्या परिस्थितीत आघाडीतील सहकारी पक्ष ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ कोणत्याही परिस्थितीत ‘पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ’शी आघाडी करून निवडणूक लढवू शकत नाही. अशा स्थितीत शाहबाज शरीफ यांच्यासारख्या तुलनात्मकरित्या कमी गंभीर व्यक्तीसाठी, नवाझ शरीफांचे नियंत्रण नसताना परिस्थितीचा कौशल्याने सामना करणे सोपे ठरणार नाही. महत्त्वाचे म्हणजे, आघाडीचे मुख्य काम इमरान खानपासून सुटका करून घेण्याचे होते आणि ते आता पूर्ण झालेले आहे, अशा स्थितीत आघाडी अधिक काळपर्यंत टिकून राहणे शक्य नाही आणि या सरकारचे स्थैर्यही संशयास्पद आहे. परिणामी, स्थैर्याच्या अभावाने पाकिस्तानच्या अंतर्गतच नव्हे, तर प्रादेशिक आणि जागतिक स्तरावरील धोरणांत सकारात्मक परिवर्तनाची अपेक्षा करणे बेईमानी ठरेल.
 
- एस. वर्मा
 
(अनुवाद : महेश पुराणिक)