कामगारांचे हित जपणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    दिनांक : 14-Apr-2022
Total Views |
महाराष्ट्रात गेल्या पाच महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी त्यांनी मांडलेल्या कामगार हिताच्या विचारांचे केलेले हे चिंतन...
 
संप हे एक अस्त्र असते
संपवायचे कधी त्याचे शास्त्र असते
सुरु झाले कधी अन् थांबावे कधी
याची आखावी लागते युद्धनीती
 
 

baba
 
 
वरील कवितेच्या ओळी आठवण्याचे कारण म्हणजे, गेली पाच महिने महाराष्ट्रात एसटी कर्मचार्‍यांचा चाललेला अभूतपूर्व संप, संपकरी कर्मचार्‍यांची, त्यांच्या कुटुंबीयांची झालेली वाताहत, झालेल्या आत्महत्या... हे विदारक चित्र डोळ्यांसमोर असताना ना सरकारला काळजी ना कामगार नेत्यांना या एसटी कर्मचार्‍यांच्या हिताचे सोयरसुतक. कारण, कोणतीही सन्माननीय तडजोड न होता, हिंसक वळणावर गेलेली कामगारांची मजल, याला जबाबदार कोण? या निमित्ताने आठवतो तो गिरणी कामगारांचा संप, त्यांचे उद्ध्वस्त झालेले संसार. हे महाराष्ट्राला अशोभनीय आहे. कामगारांचे मानसशास्त्र ओळखण्याचा कामगार नेत्यांचा, सरकारचा अभावच या सगळ्याला कारणीभूत म्हणावा लागेल.
 
या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार नेते म्हणून कामगारांसाठी केलेले काम आठवते. कामगार वर्गासाठी बाबासाहेबांनी प्रचंड काम केले. संपाचे हत्यार कामगारांनी आणि कामगार नेत्यांनी जपून वापरले पाहिजे, असे बाबासाहेबांचे मत होते. १९२४, १९२५, १९२८, १९२९, १९३४ साली जे कामगारांचे संप झाले, त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाठिंबा दिलेला नाही. नंतर मात्र १९३८ साली जो संप झाला, त्याला कामगारांच्या हितासाठी बाबासाहेबांनी सक्रिय पाठिंबा दिलेला दिसतो. समाजवादी, मार्क्सवादी मंडळी तर बाबासाहेबांना आपला शत्रू मानत. कारण, बाबासाहेबांच्या मते, संप हे कामगारांच्या मागण्या मान्य करून घेणारे प्रभावी माध्यम असले तरी त्याचा वापर तारतम्य राखूनच केला पाहिजे. कामगार चळवळीत समाजवादी व कम्युनिस्ट कार्यकर्ते हे कामगारांच्या सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असत. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समजल्या जाणार्‍या मागासवर्गीय कामगारांसाठी स्वतंत्र संघटना स्थापन करावी, या हेतूने १९३४ साली ‘म्युनिसिपल कामगार संघा’ची स्थापना केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वत: कामगार संंघाचे अध्यक्ष होते.
 
दिल्ली येथे झालेल्या कामगार शिबिरात भाषण देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “अल्पनीती म्हणजेच भारतीय कामगारांनी आपल्या शक्तीद्वारे शासनावर नियंत्रण ठेवावे आणि दीर्घनीतिद्वारे भारताचे शासन हातात घेण्याकरिता कामगार संघटनांनी प्रयास करावे.” डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या संदेशाचे पालन भारतीय कामगारांनी केले असते, तर कामगारांच्या कामाबरोबर देशाचेही भले झाले असते. कामगारांनी आमच्या सहभागशिवाय कारखाना चालविणे अवघड आहे, अशी जाणीव मालकांमध्ये निर्माण करून मालकांना कामगारांचा जीवनस्तर उंचावण्यास भाग पाडावे, अशी अपेक्षा भारतात होऊ शकली नाही. त्याचे कारण योग्य नेतृत्वाचा अभाव होय.
 
याचा विचार करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३६ साली मजूर पक्षाची स्थापना करून कामगार हिताला प्राधान्य देण्यासाठी आपल्या पक्षाचा राजकीय, सामाजिक व आर्थिक कार्यक्रम मांडणारा जाहीरनामा प्रसिद्ध केला. वंचित-पीडित वर्गाचे प्रश्न हाती घेऊन अन्यायाची शिकार झालेल्या वर्गाला सामाजिक न्याय प्राप्त करून देण्याची त्यांची व्यापक भूमिका होती. त्यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात राज्य कारभार, शिक्षण, करआकारणी पद्धती, ग्रामसंघटना असे अनेक विषय होते.
कामगारांच्या हिताचे रक्षण करणारे अनेक मुद्दे बाबासाहेबांनी आपल्या मजूर पक्षाच्या जाहीरमान्यात अंतर्भूत केले होते. ते
पुढीलप्रमाणे-
 
 
१) कामगारांना आपल्या क्षेत्रात प्रावीण्य संपादन करण्यासाठी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.आपली उत्पादनशक्ती वाढविण्याच्या द़ृष्टीने ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याचे बाबासाहेबांनी म्हटले आहे.
२) शेतकरी व कामगारवर्ग यांना सुधारलेल्या शहरीप्रमाणे राहता यावे, यासाठी जाहीरनाम्यात आग्रह होता.
३) आज एसटी कामगार जी मागणी करीत आहेत की, त्या एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाबाबतच्या मुद्द्यांना पुष्टी देणारे मुद्दे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यात मांडले आहेत. त्यापैकी एक मुद्दा आला होता की,लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक अशा प्रसंगी देशातील उद्योगधंद्यांची मालकी व व्यवस्था सरकारने आपल्याकडे घ्यावी, असे मजूर पक्षाचे मत होते.
४) कामगार वर्गाच्या हितासाठी कारखान्यातील नोकरी, पगारवाढ, कामाच्या तासांच्या मर्यादा, कामास योग्य वेतन, पगारी रजा, वृद्धपणात कर्मचार्‍यांना निवृत्त वेतन, बोनस, घरभाडे, कायदे मंडळात कायदे मंजूर करून घेण्याचे प्रमाण, असे व्यापक प्रयत्न मजूर पक्ष व कामगार नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी यशस्वीपणे केल्याचे दिसतात. स्वतंत्र मजूर पक्ष मजूर वर्गाच्या मागण्यांना प्राधान्य देत होता. पक्षाच्या नावामध्ये ‘मागासवर्गीय’ किंवा ‘अस्पृश्य’ असा शब्दप्रयोग न करता, ‘मजूर’ हा शब्द जाणीवपूर्वक वापरला होता.
 
१९४२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराज्यपालांच्या कार्यकारी मंडळात लेबर मिनिस्टर (कामगारमंत्री) म्हणून काम करू लागले होते.त्यांच्या मनात कामगारांविषयी कणव होतीच. त्यांच्या उत्थानासाठी, त्यांना आर्थिक, सामाजिक न्याय, मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न सदोदित स्मरणात राहणारे आहेत.
अशोक कांबळे