हिंदूंच्या जनमनातले प्रश्न...

    दिनांक : 13-Apr-2022
Total Views |
बाळासाहेब ठाकरेंनंतर आक्रमक हिंदुत्वाची ‘स्पेस’ रिकामी झाली आणि उद्धव व आदित्य ठाकरे या पिता-पुत्राने सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड केली आणि राज ठाकरेंची हिंदू जनमनातील प्रश्न उपस्थित करणारी आजची भूमिका बाळासाहेबांनंतरची हिंदुत्वाची रिकामी ‘स्पेस’ व्यापूनही उरल्याचे दिसते.
 
 


Raj 
 
 
राज ठाकरेंची भाषण शैली, मुद्द्यांची मांडणी व लोकांच्या मनाला हात घालणे लाजवाब आहे, यात काही शंका नाही आणि त्यावर त्यांनी कालच्या भाषणातून ताज चढवला. गेली अनेक दशके मराठी भाषिक हिंदूंच्या मनात रेंगाळत असलेल्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. “मशिदींवरील भोंग्यांचा अख्ख्या देशाला त्रास होतोय, यात धार्मिक विषय नाही. तुम्हाला जो नमाज पढायचा आहे, अजान द्यायची आहे ते घरात करा. शहरांचे रस्ते, फूटपाथ कशाला अडवताय? प्रार्थना तुमची आहे, आम्हाला का ऐकवताय? हे भोंगे उतरवा, आम्हाला त्रास देऊ नका, हे सांगून तुम्हाला समजत नसेल, तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार,” असा खणखणीत इशारा राज ठाकरेंनी मंगळवारच्या ठाण्यातील सभेतून दिला.
 
भारतीय संविधानाने प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिलेले आहेच, पण त्यात इतरांना त्रास न देता त्याचे पालन करावे, असेही सांगितलेले आहे. मात्र, मुस्लिमांच्या वर्षाचे ३६५ दिवस आणि दिवसातून पाच वेळा कर्णकर्कश आवाजात भोंग्यांवरून दिल्या जाणार्‍या अजानने सर्वच बिगरमुस्लिमांना सदैव जाचच होत असतो. पण, त्याविरोधात शब्दही काढण्याचे धाडस संविधानाच्या तथाकथित रक्षकांना होत नाही. त्याचवेळी हिंदूंनी आपापल्या मंदिरांत हनुमान चालीसा लावली वा गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात दहा दिवस मंडप घातले, भक्तिगीते, स्तोत्रे लावली, तर त्यांचे कान किटतात. ठाकरे सरकारही तेच करत आहे. गेल्या काही दिवसांत मशिदींवरील भोंग्यांविरोधात हिंदूंनी भोंग्यांवर हनुमान चालीसा लावली, तर ठाकरे सरकारने त्याविरोधात लगोलग कारवाई सुरू केली.
 
पण, ही तत्परता विविध न्यायालयांचे आदेश येऊनही मशिदींवरील भोंग्यांबाबत का दाखवली जात नाही? मुस्लिमांनाही भोंग्यांशिवाय अजान वा नमाजचा कार्यक्रम करता येत नाही का? दिवसभरातील कामांमुळे नमाजची वेळ लक्षात राहत नाही, म्हणून भोंग्यांवर अजान ऐकवली जाते, असा तर्क त्यासाठी दिला जातो. पण, मग या लोकांना कुठे रोजंदारीवर, नोकरीला किंवा बस, रेल्वे, विमानाने प्रवासाला जायचे असेल, तर त्याची वेळ कशी पाळतात? की तिथेही कोणी अजान देतो? तर नाहीच, मग कशाला हवीत नमाजासाठी भोंगे वाजवण्याची थेरं? ‘शांतीचा धर्म’ म्हणत स्वतःही अशांततेत राहायचे आणि दुसर्‍यांच्याही शांततेचा भंग करायचा, असा हा प्रकार. त्याविरोधातच राज ठाकरेंनी ठाम भूमिका घेतली हे उत्तम, आता ठाकरे सरकारने यावर वेळीच उपाय करावा!
 
राज ठाकरेंनी आपल्या भाषणात उपस्थित केलेला पुढा मुद्दा म्हणजे, मराठेशाहीच्या इतिहासाचे विकृतीकरण. गेल्या दीडशे वर्षांत मराठेशाहीच्या इतिहासावर वि. का. राजवाडे, रियासतकार सरदेसाई, गजानन भास्कर मेहेंदळे आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी रक्ताचे पाणी करून संशोधन केले, अस्सल कागदपत्रे मिळवली आणि छत्रपती शिवरायांचा, छत्रपती शंभुराजांचा इतिहास समोर आणला. पण, विचारांनी दरिद्री असलेल्या श्रीमंत कोकाटेंसारख्यांना त्यातही जात दिसली. इतिहासकार कोणत्या जातीचा, यावरून तो खरा की खोटा ठरवला जाऊ लागला. ‘संभाजी ब्रिगेड’सारख्या संघटनांच्या माध्यमातून खरोखरीच्या इतिहासकारांनी उजेडात आणलेला इतिहास नाकारून नव्याने इतिहास लिहिण्याची भाषा केली गेली. त्या माध्यमातून ‘वरील महनीय व्यक्तींनी लिहिलेला इतिहास चुकीचा आणि आम्ही लिहितो तो जातद्वेषाने बरबटलेला इतिहासच अस्सल,’ असे सांगण्याचे काम कोकाटेंनी केले.
 
त्याला अर्थातच अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांच्या माणसांचे प्रोत्साहन होतेच. म्हणूनच शरद पवारही ‘छत्रपती’, ‘पगडी’ वगैरे विधाने करू शकले. पण, दरिद्री कोकाटे वा त्यांच्यासारख्याच इतरांच्या खोटारड्या इतिहासाने आज महाराष्ट्रातील जाती-जातींत कमालीचा दुभंग निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. ग. भा. मेहेंदळे वा बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर जातीय विखारातून टीका करतानाच त्यांच्या जातीविरोधातही विष कालवले जाते. त्यातूनच ठिकठिकाणी एका समाजाविरुद्ध दुसरा समाज उभा करणार्‍या छोट्या छोट्या गटांचे पेव फुटल्याचे, समाजमाध्यमांवर त्यांचे समूह तयार झाल्याचे आणि त्यातून दिवसरात्र फक्त द्वेषाच्या गुळण्या टाकल्या जात असल्याचे दिसते. त्याचे कर्तेकरविते कोण, हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. राज ठाकरेंनी शरद पवारांवर व राष्ट्रवादी काँग्रेसवर केलेला जातीयवाद वाढवल्याचा आरोप यातूनच स्पष्ट होतो. तरी स्वतःला ‘हिंदुत्ववादी’ म्हणवणारी शिवसेना हिंदूंमध्ये फूट पाडणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांबरोबर जाते, तेव्हा राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने मांडणे साहजिकच!
 
राज ठाकरेंनी उपस्थित केलेला शरद पवारांनी जातीयवाद वाढवल्याचा मुद्दा बरोबरच आहे. १९९९ पर्यंत महाराष्ट्रात विविध जातीपाती होत्याच, त्यांना त्यांचा अभिमानही होता. पण, एक जात दुसर्‍या जातीची शत्रू आहे, ही भावना त्या त्या जातीच्या लोकांमध्ये भरवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसनेच केलेले आहे. जातद्वेषाचा हा पसारा फक्त राजकीय पक्ष वा संघटना, संस्थांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर महाविद्यालयांपर्यंतही तो पोहोचलेला आहे. जातीपातीवरून या तरुणांचे रक्त सतत भडकते राहील, यासाठी या लोकांकडून नेहमीच खाद्यही पुरवले जाते. ते सभा-संमेलनातून, भाषणांतून वा ‘एल्गार परिषदे’सारख्या प्रकारातूनही होते. राज ठाकरेंनी त्यावरच बोट ठेवले. यावर हिंदू समाजानेच रोखठोक भूमिका घेत जातीपातीपलीकडे जात-धर्म म्हणून एकजुटीचा विचार केला पाहिजे; अन्यथा शरद पवार वा राष्ट्रवादी काँग्रेस लोकांना जाती-जातीत लढवण्याचेच काम करत राहतील.
 
पण, प्रत्यक्षात मराठा वा ओबीसींना आरक्षण देण्याची वेळ येते, तेव्हा आताप्रमाणेच हात वर करत राहतील. म्हणजेच त्यांना जातीजातींना झुंजवण्यात मजा वाटते, त्यातून सत्ता मिळवावीशी वाटते. पण, त्यांच्या भल्यासाठी निर्णय घ्यावासा वाटत नाही, अशा परिस्थितीत राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे वा मराठेशाहीच्या इतिहासाच्या विकृतीकरणावरून वा घाणेरड्या जातीयवादी राजकारणाविरोधात हिंदूंच्या एकत्रिकरणाची हाक दिलेली असेल, तर ती योग्यच! महत्त्वाचे म्हणजे, बाळासाहेब ठाकरेंनंतर आक्रमक हिंदुत्वाची ‘स्पेस’ रिकामी झाली आणि उद्धव व आदित्य ठाकरे या पिता-पुत्राने सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड केली आणि राज ठाकरेंची हिंदू जनमनातील प्रश्न उपस्थित करणारी आजची भूमिका बाळासाहेबांनंतरची हिंदुत्वाची रिकामी ‘स्पेस’ व्यापूनही उरल्याचे दिसते.