हिंदूऐक्य काळाची गरज!

    दिनांक : 12-Apr-2022
Total Views |

देशातील काही राज्यांत रामनवमीच्या मिरवणुकांवर झालेल्या दगडफेकीच्या घटना या एका मोठ्या षडयंत्राचा भाग असाव्यात, अशी शंका आता येऊ लागली आहे.



hinsachar 

 

 
 
विशेष म्हणजे विधानसभा निवडणुका झालेल्या राज्यात अशा घटना घडल्या नाहीत, तर विधानसभा निवडणुका होणार असलेल्या राज्यात अशा घटना घडत आहेत, याला निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही. मर्यादापुरुषोत्तम भगवान रामचंद्रांच्या जन्मदिनी म्हणजे रामनवमीला मर्यादा सोडून करण्यात आलेल्या दगडफेकीच्या या घटना राजकीय फायद्यासाठी कोणीतरी हेतुपुरस्सर घडवून आणल्या, यात शंका नाही. या घटनांची सुरुवात राजस्थानपासून झाली आणि आता याचे लोण गुजरात आणि मध्यप्रदेशपर्यंत पोहोचले आहे. गुजरातच्या आणंद जिल्ह्यातील खंभात आणि साबरकंठा जिल्ह्यातील हिम्मतनगर येथे रामनवमीच्या मिरवणुकीवर एका समुदायाच्या लोकांनी दगडफेक केली.
 

दुकानांना आगी लावण्यात आल्या, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. हिम्मतनगरमध्येही अशीच घटना घडली. गेल्या काही दिवसांत देशात अशा घटना सातत्याने घडत आहेत, हा चिंतेचा विषय म्हटला पाहिजे. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे गृहराज्य आहे, या राज्यात भाजपाचे सरकार आहे, त्यामुळे तर अशा घटना तेथे घडवल्या जात नाहीत ना, अशी शंका येते. गुजरातमध्ये गेल्या दोनअडीच दशकांपासून भाजपाची सत्ता आहे, भाजपाचे शासन आल्यापासून गुजरातमध्ये जातीय दंगलीच्या घटना घडल्या नव्हत्या, मग आताच गुजरातमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न कोण आणि का करत आहे, हा अभ्यासाचा विषय होऊ शकतो. ज्या लोकांची आतापर्यंत राज्यात गडबड करण्याची हिम्मत झाली नाही, त्यांच्यात आताच उपद्रव करण्याची प्रेरणा कशी जागृत झाली, याचाही शोध घेतला पाहिजे.

 

संपूर्ण देशात गुजरात हे विकासाच्या मार्गावर अग्रेसर असलेले राज्य म्हणून ओळखले जाते. गुजरातमध्ये शांतता असल्यामुळेच त्याचा औद्योगिक विकास झाला, हे आपल्याला मान्य करावे लागणार आहे. २००२च्या गोध्रा कांडानंतर गुजरात पूर्णपणे शांत झाले होते, जातीय दंगली तर सोडा पण जातीय तणावाच्या घटनाही राज्यात कधी घडल्या नव्हत्या, मग आताच या घटना कशा सुरू झाल्या, कोणी सुरू केल्या हा पोलिसांच्या चौकशीचा भाग होऊ शकतो. पोलिस याची चौकशी करतीलच, जातीय तणाव निर्माण करणा-या लोकांचा आणि त्याच्या सूत्रधारांचा शोध घेतील, यात शंका नाही. राजस्थानमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी करौली येथेही दगडफेकीची घटना घडली होती, त्यानंतर तेथे हिंसाचारही उफाळून आला होता. करौली येथील घटना एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनी घडवली, हे नंतर उघडकीस आले, भाजपाच्या प्रतिनिधीमंडळाने उपद्रवग्रस्त गावाला भेट देत तेथील परिस्थितीची पाहणी केली होती.

 

करौली येथे एका विशिष्ट समुदायाचे लोक खुलेआम गुंडागर्दी करत असताना, दुकाने लुटत असताना तेथील पोलिस मात्र हातावर हात देऊन बसले होते. समाजकंटकांना रोखण्याचा कोणताही प्रयत्न तेथे उपस्थित पोलिसांनी केला नाही, मूकप्रेक्षक बनून अशोक गहलोत यांचे पोलिस हात बांधून आणि डोळे उघडे ठेवून हा सारा प्रकार पाहात होते. समाजकंटकांवर कारवाई करू नये, असा आदेश जणू पोलिसांना कोणी दिलो होता, असे वाटण्यासारखी तेथे स्थिती होती. करौली येथे एका विशिष्ट समुदायातील लोकांच्या घरावर दगडांचे ढिग आढळून आले, याचाच अर्थ मिरवणुकीवर दगडफेक करण्याची घटना ही पूर्वनियोजित म्हणावी लागेल. अतिशय अरुंद रस्त्यावरील घरांत दगडांचा ढिग गोळा केला जात असताना तेथील पोलिस झोपले होते का, पोलिसांची स्थानिक गुप्तचर यंत्रणा काय करत होती, असे प्रश्न सहजच उपस्थित होतात. मध्यप्रदेशातही रामनवमीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर दगडफेकीच्या घटना घडल्या. राजस्थान सोडले तर रामनवमी मिरवणुकीवर दगडफेकीच्या घटना झालेली गुजरात आणि मध्यप्रदेश ही दोन्ही भाजपाशासित राज्ये आहेत, हा योगायोग कसा समजता येईल?

 

रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेकीच्या घटना होत असताना राजधानी दिल्लीतील वादग्रस्त अशा जवाहरलाल नेहरू विद्यापीठातही याचदिवशी कशी गडबड होते? रामनवमी असताना या विद्यापीठाच्या वसतिगृहात मांसाहाराला कशी परवानगी दिली जाते, याला विरोध करणा-या विद्यार्थ्यांना मारहाण केली जाते. तुम्ही काय खावेप्यावे हा तुमचा व्यक्तिगत मुद्दा असला तरी रामनवमीसारख्या पवित्र दिवशी एकदिवस मांसाहार केला नसता तर काय आकाश कोसळणार होते? पण दुस-याच्या धर्माचा, श्रद्धांचा आदर न करणा-यांचा हेतू या देशात अशांतता निर्माण करणे आहे, हे आता लपून राहिले नाही. रामनवमीच्या मिरवणुकीवर झालेल्या दगडफेकीच्या घटना या आधी गुजरात, मध्यप्रदेश आणि त्यानंतर संपूर्ण देशात जातीय दंगली सुरू करण्याचे महाघातक कारस्थान म्हटले पाहिजे. नरेंद्र मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यापासून देशात कुठेही जातीय दंगल झाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती काही लोकांना खूपत होती. त्यामुळे आमच्याच नाही तर तुमच्याही शासनकाळात देशात जातीय दंगली घडत आहेत, हे सिद्ध करण्याचा हा प्रयत्न असावा, असे वाटते.

 

तुमच्यात आणि आमच्यात काहीच फरक नाही, आमचेच नाही, तर तुमचेही पाय मातीचेच आहेत, हे यातून दाखवले जाणार होते. मात्र या असामाजिक तत्त्वांचा हा प्रयत्न संयमी हिंदू समाजाने हाणून पाडला. जातीय दंगलीचा वणवा देशात पेटवण्याचे षडयंत्र हिंदू समाजाने यशस्वी होऊ दिले नाही. असामाजिक तत्त्वांच्या सापळ्यात हिंदू समाज अडकला नाही. मात्र हिंदू समाजाच्या सहनशक्तीची आता कोणी परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करू नये, असा प्रयत्न त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही. कारण सिंह हा निद्रिस्त अवस्थेत असला तरी तो सिंहच असतो, झोपेतून जागा झाल्यानंतरची त्याची डरकाळी भल्याभल्यांची पाचावर धारण बसवणारी असते, असे विसरू नये. हिंदू समाज आपणहून कुणाच्या वाटेला जात नाही, मात्र दुसरा कोणी त्याच्या वाटेला गेला तर सोडत नाही. २००२ मधील गोध्रा घटनेनंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीत याचा अनुभव एका समुदायाने घेतला होता. पण या समुदायाला अजूनही शहाणपण येत नाही, याचे आश्चर्य वाटते. एआयएमआयएमचे नेते असदुद्दिन ओवैसी यांनी मात्र नेहमीप्रमाणे उफराटी भूमिका घेत हिंदू समाजावरच दुगाण्या झाडण्याचा प्रयत्न केला याचे आश्चर्य वाटते. हिंदू समाजाने आपले रौद्ररूप धारण केले तर ओवैसी आणि त्यांच्या चेलाचपाट्यांना पळता भुई थोडी झाल्याशिवाय राहणार नाही. औवेसी यांची ही भूमिका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबांसारखी म्हणावी लागेल.

 

हिंदू बहुसंख्य असलेल्या या देशात हिंदूंना आता रामनवमीचा उत्सव साजरा करायलाही दुस-या धर्माच्या लोकांची परवानगी घ्यावी लागेल का? हिंदू लोक हा प्रकार आता फार काळ खपवून घेणार नाही. अयोध्येच्या रामजन्मभूमीला कुलुपे लावून रामललाला आतापर्यंत कैदेत ठेवले होते, समर्थ आणि संघटित हिंदू समाजाने हुंकार भरताच कुलुपे तुटली आणि रामललाच्या भव्यदिव्य मंदिराचा मार्ग प्रशस्त झाला. मात्र यामुळे काही लोकांच्या पोटात दुखल्यासारखे वाटते आहे. त्यामुळे रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेकीच्या घटना जाणीवपूर्वक घडवण्यात आल्या, असे म्हणायला वाव आहे. देशातील एखाद्या राज्यात आणि त्यातीलही एखाद्या ठिकाणी अशी घटना झाली असती, तर त्याकडे दुर्लक्ष करता आले असते. मात्र रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेकीच्या घटनांची मालिका सुरू झाली. त्यामुळे हा प्रयत्न आता देशातील हिंदू समाज खपवून घेणार नाही.

 

काँग्रेसच्या शासनाने आपल्या राजकीय फायद्यासाठी आतापर्यंत एका विशिष्ट समुदायाचे तुष्टीकरण केल्यामुळे या लोकांची हिम्मत वाढली आहे, आपले कोणीच काही बिघडवू शकणार नाही, असे त्यांना वाटू लागले आहे. मात्र आता देशात काँग्रेसचे नाही तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपाचे सरकार आहे, याचा कोणी विसर पडू देऊ नये. 'सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास' हा मोदी सरकारचा मूलमंत्र असला तरी देशात अशांतता, जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न या सरकारने आतापर्यंत खपवून घेतला नाही आणि भविष्यातही खपवून घेतला जाणार नाही. एका विशिष्ट समुदायाचे आहेत म्हणून हे सरकार जसा अन्याय करणार नाही, तसे फाजील लाडही करणार नाही. तुम्ही देशाचे जबाबदार नागरिक म्हणून वागणार असाल तर तुम्हाला त्रास होणार नाही, मात्र तुम्ही बेजबाबदारपणाने वागत असाल तर तुम्हाला तुमची जागा दाखवून द्यायला या सरकारला एक मिनिटही लागणार नाही, याचे भान दंगलखोरांनी ठेवले पाहिजे.