स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा जोतीराव फुले

    दिनांक : 11-Apr-2022
Total Views |
स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, समाजात स्वातंत्र्य, न्याय, समता व बंधुता प्रस्थापित करण्यासाठी आयुष्य वेचलेल्या महात्मा जोतीराव फुले यांची आज जयंती.

Mahatma-Fule-JTB 
 
शेती व फुलांचा व्यवसाय करणारे गोविंदराव व चिमनाबाई यांचे ज्योतिराव हे दुसरे अपत्य ज्योतिराव यांना मातृप्रेम मात्र फारसे लाभले नाही. बालवयातच चिमनाबाई यांचे निधन झाल्याने ज्योतिराव आईच्या मायेला पारखे झाले. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या ज्योतिराव यांना गोविंराव यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिलीच्या वर्गात टाकले. परंतू गोविंदराव यांच्याकडे कारकून असलेल्या एका सनातनी ब्राह्मणाला मात्र हे रुचले नाही.त्याने गोविंदरावांना ‘मुलगा शिकला तर शेती बुडेल, धर्म बुडेल’ अशी भीती दाखवली. परिणामी ज्योतीराव यांची शाळा बंद केली. त्यावेळच्या प्रथेनुसार , गोविंदराव यांनी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील खंडोजी नेवसे पाटील यांची ज्येष्ठ कन्या सावित्रीबाई यांच्याशी जोतीराव यांचा विवाह 1840 मध्ये लावून दिला आणि त्यांच्या वैवाहिक जीवनास प्रारंभ झाला.
 
जोतीरावांच्या शेजारी गफार बेग मुन्शी राहत. गफार बेग व खिश्चन लिजीट यांच्या अभ्यासपूर्ण चर्चा जोतीराव ऐकत आणि अधूनमधून चर्चेत सहभागी होत. शाळेत न जाणारा हा मुलगा प्रचंड बुद्धीमान आहे हे दोघांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गोविंदरावांची भेट घेतली आणि ज्योतिराव यांचे शिक्षण पुन्हा सुरू झाले.
 
त्यांनी शिक्षणात आपल्या बुद्धिमत्तेची छाप सोडली. मराठी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू, मोडी अशा अनेक भाषा त्यांनी अवगत केल्या. त्यांचे गुरू लहुजी साळवे यांनी शारीरिक व्यायाम, कुस्ती, दांडपट्टा अशा मैदानी खेळात पारंगत केले. फुले एक पट्टीचे पहेलवान होते. शिक्षण संपल्यावर व्यवसाय सुरू करून संसारात स्थिरस्थावर होण्याच्या विचारात असतांना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक घटना घडली. आपला ब्राह्मण मित्र सखाराम परांजपे याच्या लग्नाच्या वरातीतून त्यांना अपमानीत करून हाकलून दिले. या घटनेचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. माझी ही अवस्था आहे तर सर्वसामान्यांचे काय ?.... हा प्रश्न जोतिरावांना पडला. मग त्यांनी जाती व्यवस्थेविरुद्ध लढा देण्याचे ठरवले. आणि वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास सुरू केला.
 
विद्ये विना मती गेली ।
मतिविना निती गेली ॥
नितिविना गती गेली ।
गतिविना वित्त गेले ॥
वित्ताविना शूद्र खचले ।
एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले ॥
 
अवघा बहुजन समाज विशेषतः स्रियांना शिक्षण देण्याचा वसा त्यांनी घेतला. मुलींना शिकवायला स्त्री शिक्षिका नाही म्हणून त्यांनी निरक्षर सावित्रीबाईला शिक्षणाचे धडे दिले व भारतातील प्रथम मुख्याध्यापिका व शिक्षीका म्हणुन मुलींसमोर उभे केले. पुणे येथे भिडेच्या वाड्यात 1 जानेवारी, 1848 रोजी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.
 
फुलेंकडून बहुजन समाजाचा होत असलेला शैक्षणिक कायापालट कर्मठ सनातन्यांना मान्य नसल्याने त्यांची शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. मुली शिकल्या तर धर्म बुडेल असा अपप्रचार केला गेला. सावित्रीबाई मुलींना शिकवायला जात तेव्हा त्यांच्यावर दगड, शेण, चिखलाचा मारा व्हायचा. मात्र सावित्रीबाई ठाम होत्या. शिक्षणाचे अखंड कार्य त्यांनी सुरू ठेवले.
 
जोतिरावांनी शिक्षणासोबत प्रबोधनाचे काम सुरू केले. मेळा, जलसे, नाटके, उभे करून समाजप्रबोधन केले. ‘तृतीय रत्न’ हे नाटक व ‘शेतकर्‍याचा आसूड’ हे पुस्तकही लिहिले.
 
त्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या. अनाथ बालकांसाठी बाल सुधारगृह चालवले. समाजातील अनिष्ट चालीरीती जसे सतीची चाल, भृणहत्त्या, केशवपनसारख्या वाईट प्रथा बंद केल्या. संकटात सापडलेल्या काशीबाई नामक महिलेला आत्महत्या करण्यापासून परावृत्त करून तिला आधार दिला. तिचे मुलही दत्तक घेतले, त्याचं नाव यशवंत. त्यास डॉक्टर बनविले.
 
त्यांनी 1869 मध्ये रायगडावर जाऊन अथक प्रयत्नांनी छत्रपती शिवरायांची समाधी शोधली. त्यावर फुले वाहून समाधीचे पुजन केले. पुण्यामध्ये 1870 ला आपल्या सहकार्‍यांसोबत प्रथम शिवजन्मोत्सव सुरू केला. ‘कुळवाडी भूषण’ हा शिवाजी महाराजांवरील प्रदीर्घ पोवाडा लिहुन प्रकाशित केला व शिवरायांचा इतिहास जगासमोर आणला.
 
जगातील पहिली शिवजयंती सुरू करण्याचा मान ज्योतीराव फुले यांनाच !...
 
छत्रपती शिवरायांनी 24 सप्टेंबर 1674 रोजी वैदिक व्यवस्था झुगारून ज्या अवैदिक पध्दतीने दुसरा राज्याभिषेक करून घेतला होता. या दिवसाचे औचित्य साधून जोतीरावांनी 24 सप्टेंबर, 1873 रोजी ‘सत्यशोधक समाजाची’ स्थापना केली. याच माध्यमातून सत्य धर्माची घोषणा केली. सत्य धर्मात असणार्‍या 33 कलमांद्वारे समाज प्रबोधन केले.
 
‘तृतीयरत्न’ हे 1855 च्या सुमारास जोतीरावांनी लिहिलेलं मराठी भाषेतील पहिले नाटक होय. जोतीराव त्यावेळचे श्रीमंत व्यक्ती होते, परंतू भौतिक सुखामागे न धावता त्यांनी आपला सर्व पैसा शिक्षणावर व समाजकार्यावर खर्च केला. सामाजिक कार्य करताना जोतिरावातील उद्योजकही शांत नव्हता. ते यशस्वी उद्योजक होते. आताचे मुंबईचे छत्रपती शिवाजी टर्मिनल्स रेल्वे स्टेशन व पुणे येथील खडकवासला धरणाला ज्योतिरावांच्या कंपनीनेच चुना पुरविला होता.
 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरही महात्मा फुलेंच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव होता. फुलेंच्या कार्याचा गौरव म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गंजपेठ, पुणे येथील घराचा क्रमांक 395 ध्यानात ठेवून संविधानात 395 कलमे घातली. स्त्री शिक्षण - न्याय - समता - बंधुता तसेच बहुजनांच्या उद्धारासाठी अवघे जीवन व्यतीत करणार्‍या जोतिरावांना लोकांनी ’ ‘महात्मा’ या उपाधीने गौरविले.
 
या थोर समाजसुधारकाची प्राणज्योत 28 नोव्हेंबर, 1890 रोजी मालवली. त्यांना जाऊन अनेक वर्ष झाली, आज ही त्यांच्या विचारावर चालून समाज निर्मिती करणे हेच खर्‍या अर्थाने त्यांना वंदन ठरेल.....
 
या सत्यशोधकाला, क्रांतिसूर्याला, राष्ट्रपित्याला कोटी - कोटी त्रिवार वंदन...
 
- पी.डी.पाटील
 
9403746752 
 
उपशिक्षक, महात्मा फुले, हायस्कूल, धरणगाव