पत्रकारितेतील आदर्श दीपस्तंभ : द्वारकामास्तर

    दिनांक : 10-Apr-2022
Total Views |

स्व. द्वारकामास्तर म्हणजे पत्रकारितेतील आदर्श दीपस्तंभ, रा. स्व. संघाचे कर्मठ स्वयंसेवक, मौनी समाजसेवी, चोपड्यातील आद्य पत्रकार आणि‘सेवा, निष्ठा व त्याग’ या त्रिसूत्रीचे पाईक, अशा कितीतरी गुणांनी नटलेली ही विभूती दि. १० एप्रिल २००४ रोजी म्हणजेच, १८ वर्षांपूर्वी आपल्यातून निघून गेली. अशा विभूतीस आज, १० एप्रिल २०२२ रोजी त्यांच्या पुण्यस्मृती दिनानिमित्त त्यांना वाहिलेली शब्दांजली.


Dwarkamastar

 आजच्या बेगडी दुनियेत आदर्श कुणाचा घ्यावा? हा प्रश्न पडतो..... तेव्हा इतिहासात डोकावले तर स्व. द्वारकादास मास्तरांसारख्या अनेक मार्गदर्शक व्यक्ती डोळ्यासमोर तरारून उभ्या ठाकतात. मास्तरांना सर्वच जण ‘ बाबूजी ’ म्हणायचे. द्वारकादास पोपटसा पालीवाल हे लौकिक नाव धारण केलेल्या व्यक्तिमत्वाने जीवनभर ‘ त्याग ’ केला. बालपणापासून देशसेवेची आवड....वयाची पर्वा न करता स्वातंत्र्य आंदोलनात उडी घेतली. वडील कै. पोपटदादा हे कट्टर कॉंग्रेसी, राष्ट्रभक्त भाऊ व सर्व परिवार अध्त्यात्मवादी व शेतकरी कुटुंब त्यात वाण्याचा व्यवसाय असं जरी असलं तरी आपल्या हटके स्वभावामुळे, आपल्या स्वाभिमानी स्वभावापुढे ‘मोडेन पण वाकणार नाही’ ही भूमिका ठेवत आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं. द्वारकामास्तरांनी भूमिगत कार्य करीत स्वातंत्र्याच्या विचारजागृतीसाठी घरोघरी जाऊन बीजारोपण केले. १९४२-४३ ला रा. स्व. संघाच्या संपर्काद्वारे राष्ट्रनिष्ठेची नाड अधिकच मजबूत झाली. फैजपुरच्या कॉंग्रेसच्या देशातील पहिल्या ग्रामीण अधिवेशनात वडिलांसोबत हजेरी लावली. तेथे हजार स्व. परदेशींच्या हस्ते ध्वजारोहणातील अडथळा दूर करतानांची साक्ष देणारे बाबूजी पुढे प्राथमिक शिक्षक म्हणूनही नावलौकिकास पात्र ठरले.

चोपडा तालुक्यातील दुर्गम गारखेडा, लासूर याठिकाणी प्राथमिक शिक्षकाची नोकरी करीत असताना देशसेवेची तीव्र इच्छा त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यातच स्वातंत्र्य चळवळ, चले जाव चळवळ, असहकार आंदोलन जोमाने सुरु होते, सोबत संघकार्य सुरूच होते. विद्यार्थांना घरोघरी जाऊन शिकवणे, राष्ट्रप्रेमाची ज्योत जागवणे हे कार्यही तेव्हा बाबुजींनी केल्याने एक दिवस प्राथमिक शिक्षकाच्या नोकरीवर ‘तुळशीपत्र’ ठेवत राजीनामा दिला. घरची परिस्थिती जेमतेम होती. त्यातच ‘स्वातंत्र्य’ मिळाले होते. बाबुजींनी उत्साह द्विगुणीत करीत किराणा व्यवसाय सुरू केला, सोबत शिवणकामही! पत्रकारिता सुरूच होती. १९४२ च्या आंदोलनानंतर पत्रकारितेत ‘वार्ताहरी’ करीत बाबुजींनी दै. भारत, दै. मराठा, दै. त्रिकाळ, दै. गांवकरी, दै. मातृभूमी, दै. तरुण भारत, दै. स्वतंत्र भारत, सा. विवेक, सा. सुदर्शन, सा. झुंजार यासोबतच ‘हिंदुस्थान समाचार’ या वृत्तसंस्थेचे वार्ताहर म्हणून आपला कार्यकाळ अनेक बातम्यांनी गाजविला.

संघाच्या संपर्काच्या ओघानेच पुढे जनसंघाचे कामही बाबुजींनी खांद्यांवर घेत, कार्यालय मंत्री म्हणून नेहमीच यशस्वी कामगिरी बजावली. १९५७ च्या लोकसभा निवडणुकीत राज्याचे माजी खासदार स्व. नानासो. उत्तमराव पाटील यांच्या दणदणीत विजयाचे जे प्रमुख शिल्पकार होते, त्यात बाबुजींचा सिंहाचा वाट होता. बाबूजी नेहमी आपल्या कर्तृत्वाने पक्ष असो, संघ असो, संस्था असो प्रत्येक ठिकाणी आपली छाप उमटवीत. पुढे स्व. म. गो. फडणीस, यांच्या संपादकत्वाखाली प्रकाशित होणाऱ्या ‘सा. झुंजार’ची जबाबदारीही त्यांनी लिलया सांभाळली. परमस्नेही स्व. दि. घ. दातार, स्व. कौतिक चौधरी, स्व. अमरचंदशेठ अगरवाल, स्व. मधुकर माळी, स्व. परशुरामभाऊ सूर्यवंशी, माजी आ. माधवराव चौधरी, स्व. पद्मसीभाई शाह, स्व. रामभाऊ सोनार अशा अनेक मंडळीसोबत बाबुजींनी ‘संघ–जनसंघ–भाजप’ यांच्या विचारांच्या प्रचार प्रसाराचे कार्य मोठ्या निष्ठेने केले.

नुकताच वर्षापूर्वी मंजूर झालेल्या ‘मनमाड–इंदूर’ रेल्वेमार्गाचे मागणीचे काम सर्वप्रथम स्व. बाबुजींनीच केले होते. स्व. नानासो. उत्तमराव पाटील संसदेत असतांना सर्वप्रथम आवाज त्यांनी उठविला. तदनंतरच्या काळात स्व. माजी आमदार ग. द. माळी गुरुजी यांनी बाबूजींच्या या मागणीला उचलून धरले. या रेल्वे मार्गाचा मूळ मागणीच्या स्वरूपात हा रेल्वेमार्ग चोपड्यासारख्या आदिवासी पट्ट्यातून गेला पाहिजे, अशी बाबूजींची इच्छा होती, आणि तसा प्रस्तावही जनता राजवटीत स्व. मधूजी दंडवते रेल्वेमंत्री असतांना विचाराधीन होता. परंतु, नंतरच्या काळातील खानदेशातील तथाकथित लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे हा रेल्वेमार्ग ‘धुळे–नरडाणा–शिरपूर’मार्गे तो पुढे रेटण्यात आला. वास्तविक यामार्गे मुंबई-आग्रासारखा राष्ट्रीय महामार्ग असतांना रेल्वेमार्गाची सोयीची खरी गरज आदिवासी क्षेत्राच्या विकासासाठी स्व. बाबूजींच्या मागणीप्रमाणेच व्हायला हवी होती. परंतु, सत्ताधारी पुढारी व विरोधकांच्या अकार्यक्षमतेमुळे हा प्रश्न बाबूजींच्यासोबतच अनुत्तरित राहिला.

बाबुजींनी त्या काळात या परिसरातील अनेक प्रश्नांना आपल्या पत्रकारितेतून वाचा फोडली. त्यांच्या लेखणीतून नेत्यांना नेहमीच रेशमी चिमटे घेत व लिखाणात पक्षीय अभिनिवेश न बाळगता त्यांचे लिखाण वाचकांना आवडत असे. त्यावेळी ‘टपाली’ पत्रकारिता होती, आतासारख्या जलद डिजिटल वृत्त प्रसारणाच्या कोणत्याही सुविधा त्याकाळी नव्हत्या. तरीही बाबूजी मोठ्या कुशलतेने आणि तत्परतेने आपला व्यवसाय, कुटुंब, पक्षकार्य सांभाळून आपल्या बातमीला न्याय देत असत. आताच्या पत्रकारांना लिहिण्याची सवय संपलेली दिसून येते. संगणकाचा काळ जरूर आला आहे. परंतु, ‘अक्षरसंपदा’ संपली याची खंत ते नेहमी बोलून दाखवत. बाबूजींचे अक्षर मोत्यांसारखे होते. त्यांनी आपल्या कुटुंबाला मोठ्या कुशलतेने सांभाळले. पाच भावंडांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे बाबूजी परिवारात ‘मास्तरदादा’ म्हणून परिचित होते. बाबूजींचे आयुष्य उणेपुरे ७६ वर्षांचे होते. परंतु नेहमी ते समाधानी असत. राज्यात पत्रकारांची पहिली तालुकास्तरीय संघटना सन १९७७ साली आपल्या घरी बैठकीत स्थापन केली. राज्यभर आज अनेक पत्रकार संघटना उदयास आल्या. मात्र, बाबुजींनी, कुठेही पत्रकार म्हणून कधी मिरवले नाही. उपद्रवमूल्य जोपासून अयोग्य लिखाण केले नाही. त्याकाळी पत्रकारांना मान होता, तो आजही आहे. अपरान्तु आमचे पत्रकार मित्र टिकवत नाहीत व मानही देत नाहीत, याबद्दल नेहमी खंत वाटते.

सध्या बाबूजींच्या परिवारात त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र अनिलकुमार पालीवाल हे त्यांचा पत्रकारितेचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत. बाबूजींच्या ज्येष्ठ कन्या सौ. निर्मला त्यांचं कुटुंब सांभाळत असून, द्वितीय सुपुत्र सुधीर हे सेवानिवत्तीनंतर एलव्हीएच कॉलेज, नाशिकला आपली सेवा निष्ठेने देत आहेत. तृतीय सुपुत्र चंद्रशेखर सरकारी सेवेत वजनमाप निरीक्षक या पदावर निष्कलंक सेवा बजावत आहेत. बाबूजींचे सर्वात मोठे नातू गोपाल सध्या महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्र समूहात परिवाराचा वारसा पुढे नेत आहेत. त्यांचे इतर नातवंडेही आपापल्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत आहेत. सध्या बाबूजींच्या कुटुंबात सुना, जावई, नातवंडे, पतवंडे अशा परिपूर्णतेत त्यांचा आशिर्वाद दिसून येतो, हे विशेष

परिवारात बाबूजी नेहमी प्रसन्न असायचे, पत्रकारिता करतांना इतिहास पाऊलखुणा पडताळत भविष्याची चाहूल ओळखता आली पाहिजे, असे बाबूजी नेहमी म्हणत. पालीवाल समाजाचे सचिव, व्यापारी संघाचे संचालक, लासूर वि. का. सोसायटीचे संचालक, गणेश सांस्कृतिक मंडळाचे सचिव, तालुका पत्रकार संघाचे संस्थापक असलेल्या बाबूजींची पंच्याहत्तरी २००२ मध्ये त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या स्वयंस्फूर्तीने साजरी केली. आज, (दि. १० एप्रिल) रोजी त्यांच्या पुण्यस्मृती दिनानिमित्त त्यांना वाहिलेली ही शब्दांजली. श्रद्धांजली वाहतांना चार शब्दांत.....‘अनेक झालेत....होतीलही बहु....परंतु, यासम हेच....’असे निस्वार्थ व्यक्तिमत्व म्हणजे कै. द्वारकामास्तर यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!

अप्पा चोपडेकर, ९४२३५६३८९२