व्यवस्थापकांसाठी आत्मपरीक्षणाची हीच ती वेळ

    दिनांक : 05-Mar-2022
Total Views |

इतस्ततः

- दत्तात्रय आंबुलकर

 

मार्चमध्ये नवीन आर्थिक वर्ष सुरु होण्यापूर्वी सर्वच क्षेत्रातील अगदी लहान संस्थांपासून ते मोठ्या कँपन्यांपर्यंत अप्रेझल्स अर्थात कर्मचार्यांच्या पगारवाढीविषयी निर्णय घेतले जातात.

 

MANAGER 
 

त्या पार्श्वभूमीवर व्यवस्थापकांनीही गेल्या वर्षभरातील आपल्या कामगिरीचे मूल्यांकन करुन आत्मपरिक्षण करणेही तितकेच गरजेचे ठरावे.

 

कुठल्याही संस्थेत व्यवस्थापकांची सकारात्मक भूमिका आणि कार्यशैली, कार्यप्रणाली ही महत्त्वपूर्ण आणि परिणामकारक ठरते. व्यवस्थापक स्वत: व कर्मचार्यांच्या माध्यमातून उद्योग-व्यवसायाला अपेक्षित व्यावहारिक वळण देण्याचे महत्त्वपूर्ण काम सातत्याने करत असतात. व्यवस्थापकांना व्यवस्थापनाचे प्रतिनिधी नव्हे, तर प्रतीक म्हटले जाते ते उगाच नव्हे! अर्थात, हे सारे वेळेत, अपेक्षित स्वरुपात व त्याचवेळी परिणामकारक होते अथवा नाही, याचा पडताळा होणे व्यवस्थापक व व्यवस्थापन या उभयतांसाठी फायदेशीर ठरते. स्वयंपुढाकाराने व आत्मपरिक्षणाद्वारे व्यवस्थापक हे नक्की करू शकतात.

 

तसे पाहता आपापल्या कामात व कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदारीसह वरचे पद व त्यानुसार येणारे अधिकार मिळावेत, असे कुणाला वाटत नाही? प्रत्येक जण त्यासाठी प्रयत्नशील असतो. काहींचे हे प्रयत्न यशस्वी होतात, तर अनेकांचे प्रयत्न फळाला जात नाहीत. व्यवस्थापनात कामाचा दर्जा, संस्थेची आर्थिक प्रगती, अधिकार-प्रतिष्ठेसह कामकाजावर येणारी जबाबदारी ही व्यवस्थापकांवर कायम असतेच. ही जबाबदारी सक्षमतेसह यशस्वीपणे पार पाडण्यासाठी व्यवस्थापकांनी देखील काही बाबींमध्ये तारतम्य पाळणे आवश्यक असते. असे करण्यावरच त्यांचे कामकाज आणि कार्यकर्तृत्वाचे यश अवलंबून असते.

 

व्यवस्थापकाचे काम व त्यांची भूमिका ही मुख्यतः दुहेरी अपेक्षांवर आधारित असतात. एक म्हणजे कँपनी व्यवस्थापनाच्या आशा-अपेक्षा व दुसरीकडे सहकारी-कर्मचारी यांच्या आशा-आकांक्षा याची यशस्वी सांगड घालणे. हे कठीण असले तरी अशक्य मात्र नसते. यासाठी व्यवस्थापनाचे व्यावसायिक धोरण व कर्मचार्यांच्या प्रयत्नांसह असणारा प्रतिसाद या दोन्ही प्राधान्य मुद्द्यांना जो व्यवस्थापक उचित न्याय देतो, त्याला यश तुलनेने सहजसाध्य होते.

 

प्रत्येक संस्थेत कामाचे ठिकाण व स्वरुप वेगळे असले, तरी कँपनी व कर्मचार्यांना त्यांचे व्यावसायिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ठरावीक कालावधीत, विशिष्ट पद्धत, सामग'ीद्वारे मार्गदर्शन करणे ही प्रत्येक व्यवस्थापकाची महत्त्वपूर्ण जबाबदारी असते. ही उद्दिष्टे कर्मचार्यांनी परस्पर सहकार्य-समन्वयासह पार पाडण्याची प्रेरणा संबंधित व्यवस्थापकाने दिली, तर प्रसंगी अशक्यही शक्य होऊ शकते, हे व्यवस्थापन क्षेत्रातील निर्विवाद सत्य लक्षात घेतले पाहिजे.

 

यासाठी संवादाची गरज फार मोठी व महत्त्वाची ठरते. व्यवस्थापक आणि त्यांचे सहकारी-कर्मचारी यांच्यातील परस्पर संवाद काम आणि कामकाजाला अधिक पूरक बनवितात. याला कामाच्या संदर्भात चांगले परस्पर संबंध असले म्हणजे त्याचा फायदा वैयक्तिक स्वरुपात सर्वांनाच नव्हे, तर व्यवस्थापक आणि व्यवस्थापनापर्यंत सार्यांनाच होतो.

 

संवादाच्या संदर्भात अन्य महत्त्वाची बाब म्हणजे, कामाच्या जबाबदारी संदर्भातील संवाद हा उभयबाजूने असायला हवा. एकतर्फी संवादामुळे अपेक्षित यश वा उद्दिष्ट साध्य होऊ शकत नाही. वरिष्ठ तसेच व्यवस्थापकांनी आपल्या संवादाला जबाबदारीसह सहकार्याची जोड दिली, तर अपेक्षित यश नक्कीच साध्य होते. मुख्य म्हणजे, अशा संवादप्रकि'येमुळे कामाच्या ठिकाणचे परस्पर संबंध व वातावरणात अर्थातच सकारात्मक परिणाम अवश्य दिसतात. प्रसंगी एकमेकांसह सहकार्य, समन्वय, संवाद साध्य होतात. कामाच्या ठिकाणी अशी वातावरण निर्मिती साधणे व राखणे ही व्यवस्थापकांची महत्त्वाची जबाबदारी असते व ही जबाबदारी ते कशी आणि कशाप्रकारे पार पाडतात, यावरच त्यांचे वैयक्तिक व्यावसायिक यश अवलंबून असते.

 

व्यवस्थापकांनी आपले सहकारी व कनिष्ठ यांना संबंधित विषयात वेळेवर व गरजेनुरुप विश्वासात घेणे फायद्याचे ठरते. नव्हे, हे अपेक्षितही असते. असे केल्याने परस्पर विश्वास व कार्यक्षमता तर वाढतेच, पण कामाच्या ठिकाणी चांगली वातावरणनिर्मिती निश्चितपणे होते. जे व्यवस्थापक ही प्रकि'या पार पाडतात, ते नक्कीच यशस्वी होतात.

 

अर्थात, व्यवस्थापकांनी आपले सहकारी, कर्मचारी यांना प्रेरित करून विविध प्रकारचे काम आणि जबाबदार्यांमध्ये कसे सामावून घ्यावे, यासाठी टप्प्या-टप्प्याने प्रयत्न होणे गरजेचे असते. धिसाडघाई यासाठी उपयोगी नसते. त्याचे प्रसंगी विपरित परिणाम होऊ शकतात. हे टाळणे व आवश्यक ते घडवून आणण्यासाठी काळजी घेण्याची जबाबदारी व्यवस्थापकांनी व्यवस्थितपणे पार पाडली, तर त्याचा परिणाम त्यांच्या सहकार्यांचा क्षमता विकास होऊन, त्यातूनच अधिक सक्षम सहकारी उभे करण्याचे मोठे काम व्यवस्थापक करू शकतात. उद्योग-व्यवसायातील बहुसंख्य कामे ही अनेकांनी, पण सर्वांनी मिळून करायची असतात. एकटी व्यक्ती प्रसंगी मर्यादित स्वरुपाचे काम करु शकते. पण, व्यापक व मोठे काम सातत्याने आणि यशस्वीपणे करण्यासाठी वैयक्तिक ज्ञान, प्रयत्न व क्षमतेला मर्यादा असतात. या व्यावहारिक मर्यादांवर मात करण्यासाठी व्यवस्थापकांनी आपल्यासह काम करणार्या सर्वांना प्रवृत्त करण्याच्या जोडीलाच जे कर्मचारी अपेक्षितच नव्हे, तर उत्तम प्रकारे काम करतात, त्यांना ओळखून, प्रवृत्त करुन, असे काम सातत्याने करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची व्यवस्थापकीय जबाबदारी व्यवस्थापकांची असते.

 

यासाठी वरिष्ठ म्हणून व्यवस्थापकांनी काळजीपूर्वक तारतम्य बाळगणे महत्त्वाचे असते. कर्मचार्याला त्याच्या विशेष, उल्लेखनीय व उत्तम कामासाठी दाद दिली, त्याचे कौतुक केले, तर ते अनेकांसाठी व विविध प्रकारे प्रोत्साहित करणारे ठरते. एक प्रोत्साहित व्यक्ती इतर अनेकांना प्रेरित करू शकते, हे साधे व व्यावहारिक तत्व इथे लक्षात ठेवायला हवे. सरतेशेवटी कामाच्या संदर्भात कर्मचारी तर महत्त्वाचे असतात. पण, प्रेरणेसह काम करणारे कर्तबगार कर्मचारी सर्वात महत्त्वपूर्ण ठरतात, हे महत्त्वाचे!

 

कर्मचारी विकास व व्यावसायिक वाढ या बाबी नेहमीच परस्परपूरक असतात. यातील व्यवस्थापकाची भूमिका ही नेतृत्व व कर्तृत्व या दुहेरी संदर्भात असते. आपले कार्यक्षेत्र संस्था-कँपनी याचे नेतृत्व करून व्यावसायिक यशप्राप्ती करणे, ही व्यवस्थापक व व्यवस्थापन या उभयतांची मुख्य व मूलभूत जबाबबदारी असते. ही जबाबदारी अपेक्षित व यशस्वीपणे पार न पाडल्यास व्यवस्थापकांना त्यासाठी उत्तरदायी ठरविणे स्वाभाविक असते. ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी, जे व्यवस्थापक सामूहिक प्रयत्नांना सर्वांच्या कर्तृत्वाची यशस्वीपणे साथ देण्याचे आव्हानपर काम करू शकतात, ते व्यवस्थापक निश्चितपणे यशस्वी ठरतात.

 

वरील मुद्द्यांची पडताळणी वा पडताळा घेण्याचे फायदे व्यवस्थापकांनी जाणणे महत्त्वाचे असते. यामुळे त्यांच्या कामाला व्यावसायिक यशासह मानसिक समाधान मिळण्याचे दुहेरी लाभ होतात. हे करण्यासाठी एक साधे व सोपे तंत्र म्हणजे आत्मपरिक्षण. आपापल्या वैयक्तिक गरजा व व्यावहारिक गरजांनुसार आपले विषयज्ञान, उल्लेखखनीय कर्तृत्व, यशस्वी नेतृत्व, सहकार्यांशी समन्वय-सौहार्द राखणे, वेळेत मार्गदर्शन करणे, प्रसंगी त्यांची पाठराखण करणे, सहकार्यांच्या कौशल्य व कामगिरीविषयक प्रत्यक्ष सराव करविणे, संवाद-क्षमतेची सहकार्यांसह सांगड घालणे या वा यांसारख्या बाबी आपण कशाप्रकारे करतो वा करू शकतो, याचा मागोवा व्यवस्थापकांना सहजपणे घेणे शक्य आहे. यासाठी विशेष वा विशिष्ट पद्धतीच हवी असे नाही. परस्पर संवाद, कामाच्या संदर्भात समन्वय, सहकार्याची सकारात्मक भावना व मु'य म्हणजे स्वत:शी प्रामाणिक संवाद हे ध्यानात घेता, व्यवस्थापकांना आत्मपरिक्षण करता येईल व त्याचा फायदा त्यांना स्वत:ला व सहकार्यांनाच नव्हे, तर संस्था-संघटनेलासुद्धा निश्चितपणे होईल.

 

(लेखक एचआर व्यवस्थापक व सल्लागार आहेत.)