पंडितहो, तुमच्यासाठी...

    दिनांक : 29-Mar-2022
Total Views |
अमेरिकास्थित ‘इंटरनॅशनल कमिशन फॉर ह्युमन राईट्स अ‍ॅण्ड रिलिजियस फ्रीडम’ अर्थात ‘आयसीएचआरआरएफ’ने नुकत्याच केलेल्या सुनावणीत १९८९-१९९१ दरम्यान झालेल्या काश्मिरींच्या नृशंस नरसंहाराची दखल घेत त्याला मान्यता दिली. त्यामुळे ‘काश्मीर’ विषयातील अंधारात राहिलेली पंडितांवरील अत्याचाराची ही दुसरी बाजूही आता जगाला मान्य करावीच लागेल.
 
kashimir
 
 
 
"चित्रपट हा एखाद्या आरशासारखा आहे, ज्यामध्ये जगाला बदलण्याचीही शक्ती आहे,” हे डियागो लुना या ख्यातनाम मॅक्सिकन सिनेनिर्माता-दिग्दर्शकाचे विचार जगभर गाजणार्‍या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या यशाचे गमकच म्हणावे लागेल. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटाने केवळ ८०-९०च्या दशकातील काश्मिरी पंडितांच्या मरणकळाच पडद्यावर मांडल्या नाहीत, तर तत्कालीन भारत सरकारने आणि जगानेही या नरसंहाराकडे जो कानाडोळा केला, त्याचेही वास्तव यानिमित्ताने समोर आले. तब्बल ३२ वर्षांनंतर काश्मिरी पंडितांच्या नि:शब्द करणार्‍या वेदनांना ‘द काश्मीर फाईल्स’ने बुलंद आवाज दिला. फक्त भारतातच नाही, तर जगभरात या चित्रपटाच्या निमित्ताने काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला. अमेरिकेतील ‘इंटरनॅशनल कमिशन फॉर ह्युमन राईट्स अ‍ॅण्ड रिलिजियस फ्रीडम’ अर्थात ‘आयसीएचआरआरएफ’ या एका महत्त्वाच्या मानवाधिकार संस्थेनेही याची दखल घेतली. पण, नुसती दखलच घेतली नाही, तर प्रत्यक्ष त्या नरकयातनांसह आजही आपले आयुष्य विस्थापित म्हणून व्यथित करणार्‍या काश्मिरी पंडितांशी या संस्थेने मोकळेपणे चर्चा केली. या घटनेमागील सत्यपरिस्थिती जाणूून घेतली. अंगावर काटा आणणारा तो एकूणच घटनाक्रम आणि इस्लामिक दहशतवाद्यांच्या जिहादी मनसुब्यांचाही यावेळी पर्दाफाश करण्यात आला. या नरसंहारातून जीव मुठीत घेऊन कसेबसे आपले प्राण वाचवलेल्यांनी, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्यावरील आपबिती पुराव्यांनिशी यावेळी सादर केली. काश्मिरी पंडितांचा तो अनन्वित आक्रोश, माता-भगिनींवर झालेले अमानवी अत्याचार, आपल्याच जन्मभूमीतून-मायभूमीतून नेसत्या कपड्यांनीशी पलायनाचा तो काळा कालखंड लक्षात घेता, ‘आयसीएचआरआरएफ’नेही ज्यूंच्या नाझी नरसंहाराप्रमाणे काश्मिरी पंडितांच्या हत्याकाडांलाही अखेर ‘नरसंहार’ म्हणून घोषित केले. म्हणूनच निर्विवाद याचे श्रेय ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाला द्यावेच लागेल!
 
१९८९ ते १९९१ हा कालखंड भारताच्या नंदनवनात काश्मिरी पंडितांसाठी मात्र दमनकाळ ठरला. खोर्‍यातील एरवी अझानचे स्वर घुमणार्‍या मशिदींच्या भोंग्यांतून काश्मिरी पंडितांच्या अंताच्या रक्तपिपासू धमक्या घुमू लागल्या. ‘काफिरांनो, तुम्ही काश्मीर सोडून जा, इस्लाम स्वीकारा किंवा मरण पत्करा!’ या हिरव्या फुत्कारांनी भयभीत झालेल्या काश्मिरी पंडितांनी जन्मभूमीचा जड अंत:करणाने निरोप घेतला. पण, यादरम्यानही रानटी मानसिकतेच्या जिहाद्यांनी पंडितांची घरे जाळण्यापासून, त्यांच्या घरात लुटमार करून मेहनतीने कमावलेली संपत्तीही अक्षरश: ओरबाडली. लेकीबाळींच्या अब्रूवर हात घातले. हिंदूंची मंदिरेही खुन्शी मुघलांच्या या वारसदार जिहाद्यांनी जमीनदोस्त केली. हिंसाचाराच्या त्या रक्तसड्याने काश्मिरी पंडितांच्या अस्तित्वावरच घाला घातला. परिणामी, चार लाखांहून अधिक पंडितांनी खोर्‍यातून त्यानंतर पलायन केले, तर हजारो पंडितांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यांचे मृतदेह ताब्यात देण्याचे सोडून त्या मृतदेहांचीही क्रूर विटंबना करण्यात आली.
 
पंडितांमध्ये आणखीन ‘खौफ’ निर्माण व्हावा आणि ‘काश्मीर केवळ मुसलमानांचेच’ या जिहादी भावनेमुळे काश्मीरचा स्वर्ग नरकापेक्षाही भयंकर भासू लागला. हे सगळे घडत असताना काश्मीरमधील राजकारणी, शेजारी, मित्र, स्थानिक पोलीस यांपैकी कुणीही या निष्पाप पंडितांच्या हाकेला धावून आले नाही. या धुमसत्या बर्फात जणू त्यांच्यातील मानवताही गोठली असावी. हे कमी की काय म्हणून, जणू काश्मीरमध्ये काही आक्रित घडलेच नाही, असे चित्र रंगवण्यात तत्कालीन सरकारही यशस्वी ठरले. पाकिस्तानने पोसलेल्या काश्मिरातील फुटीरतावाद्यांनी आणि ‘काश्मिरीयत’चा राग आलपणार्‍यांनीही ही नामी संधी पाहून पंडितांच्या चितेवर आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या. पण, अन्याय-अत्याचाराचे कधीही भरुन न निघणारे हे व्रण सोसूनही काश्मिरी पंडितांनी मात्र पलटवार केला नाही की, हिंसेचे उत्तर हिंसेने दिले नाही. कुणी काश्मीरबाहेर निर्वासितांच्या छावण्यांत, तर कुणी नातेवाईकांकडे आश्रय घेतला आणि शून्यातून पुन्हा आपल्या जीवनाचा प्रारंभ केला. अशा या काश्मिरी पंडितांच्या ज्ञात तरीही अज्ञात जीविताच्या संघर्षाची खपली ‘द काश्मीर फाईल्स’च्या निमित्ताने निघाली आणि हे व्रण जीवंत झाले.
 
खरंतर काश्मीरचा मुद्दा पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला, असे नाहीच. पण, ज्या काश्मीरची, ज्या काश्मीर प्रश्नावर गेल्या ७० वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय पातळीवर नुसते चर्वितचर्वण केले गेले, ते पाककेंद्री होते. भारत कशाप्रकारे काश्मिरींवर अन्याय-अत्याचार करतोय, हे ठासवण्यातच पाकिस्तानने आपली शक्ती वाया घालवली. पण, मोदी सरकारने ‘कलम-३७०’ हद्दपार करून काश्मीर प्रश्नाची कायमस्वरुपी उकलही करुन टाकली. त्यामुळे ‘काश्मीर प्रश्न’ म्हणजे ‘काश्मीरमधील मुसलमानांवर भारत सरकारचे अत्याचार’ ही कथित धारणा मागे पडत असून, काश्मीर हा हिंदूंचाही आहे, तिथे अल्पसंख्याक असलेल्या काश्मिरी पंडितांवर जिहाद्यांकडून अगणित अत्याचार झाले, यावर ‘आयसीएचआरआरएफ’ने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीरचे तुणतुणे वाजवणार्‍या पाकिस्तानलाही ही एकप्रकारे सणसणीत चपराकच म्हणावी लागेल. एकूणच ‘आयसीएचआरआरएफ’ने काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाला ‘नरसंहार’ म्हणून मान्यता दिल्याने हिंदूंची सुरक्षितता आणि इस्लामिक दहशतवादाविरोधाच्या भारताच्या भूमिकेलाही पाठबळ मिळाले आहे. काही दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्रांतही भारताने जागतिक पातळीवर‘इस्लामोफोबिया डे’ घोषित करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत, जगभरात हिंदू, बौद्ध, शीख, ख्रिश्चन समुदायही धार्मिक हिंसाचाराचा बळी ठरत असल्याची भूमिका मांडली होती. त्या भूमिकेलाही अमेरिकेतल्याच ‘आयसीएचआरआरएफ’च्या या निर्णयाने अप्रत्यक्ष मान्यता दिल्याने आता जिहाद्यांचा बुरखा फाटला आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मिरी हिंदूंवरील अन्याय-अत्याचाराची घेतलेली ही गंभीर दखल ‘द काश्मीर फाईल्स’ बरोबरच मोदी सरकारच्या जागतिक नेतृत्वाच्या प्रतिमेवरही मोहोर उमटवणारीच म्हणावी लागेल.
 
एकीकडे जग काश्मिरी पंडितांवरील अन्यायाला ‘नरसंहार’ म्हणून त्यांच्याप्रती सहानुभूती दाखवित असताना, देशातील राजकीय विरोधकांनी मात्र त्यांचे काळीज दगडाचेच असल्याचे पुन्हा सिद्ध केले. यामध्ये फारुख अब्दुल्ला, अरविंद केजरीवाल, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या गोटातून समोर आलेल्या प्रतिक्रिया पंडितांवरील अत्याचारापेक्षा अल्पसंख्याक मतपेढीचे लांगूलचालनच त्यांच्यादृष्टीने सर्वोपरी असल्याचे सिद्ध करणार्‍या ठरल्या. पण, मोदी सरकारने काश्मिरी पंडितांवरील नरसंहाराच्या या भूतकाळाचे कदापि विस्मरण न करता, पंडितांना त्याच सन्मानाने, मोठ्या अभिमानाने, संपूर्ण सुरक्षेची हमी देत, त्यांच्या मायभूमीत पुनर्स्थापित करण्यासाठी व्यापक पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे जीवभयापोटी काश्मिरी पंडितांची जी पावले काश्मीरमधून बाहेर पडली होती, तीच हळूहळू पुन्हा या खोर्‍याकडे वळतील आणि तेव्हाच या कश्यप ऋषींच्या, आद्य शंकाराचार्यांच्या पदकमलांनी पावन झालेली ही भूमी सर्वार्थाने पंडितांसाठी पुन्हा नंदनवन ठरेल!