दिनविशेष...ग्राहक म्हणजे बाजारपेठेचा राजा

    दिनांक : 15-Mar-2022
Total Views |
जागतिक ग्राहक दिन  : आजच्या जागतिकीकरणाच्या स्पर्धात्मक युगात ग्राहक राजा महत्त्वाचा घटक झाला आहे. ग्राहक हा बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल आणि खरेदी-विक्रीचा केंद्रबिंदू आहे.
 

grahakdin 
 
 
पण ह्या ग्राहकाची फसवणूक केली जाते. एक वस्तू खरेदी करा आणि दुसरी वस्तू मोफत मिळवा. अमुक खरेदीवर सोने चांदीचे नाणे मिळवा. चेहरा ओळखा आणि लाखांची बक्षीशे मिळवा. भाग्यवान विजेत्यांना कार मिळेल. अश्या प्रकाराची जाहिराती दाखवून ग्राहकांची फसवणूक केली जाते. म्हणूनच ग्राहकांच्या हिताचे रक्षण व्हावे, त्यांना संरक्षण मिळावे यासाठी ग्राहक कायदा बनविण्यात आला आहे. या कायद्याच्या मदतीने ग्राहक आपल्या हक्कांचे संरक्षण तसेच अनुचित व्यापाऱ्याकडून होत असलेल्या फसवणुकीबाबत तक्रार देखील करून शकतो.
 
आज 15 मार्च हा दिवस संपूर्ण जगात 'जागतिक ग्राहक दिन' World Consumer Day म्हणून साजरा होत असतो. ग्राहकांना सेवा पुरवताना होणार्‍या हलगर्जीपणामुळे 1960 मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ग्राहकांच्या प्रश्नाचे निचरा करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात आले आणि त्यासाठीचे जागतिक स्तरांवर पाठपुरावेही करण्यात आले. त्याला यूनेस्कोनेही मान्यता दिली. त्यानुसार दरवर्षी 15 मार्च हा दिवस 'जागतिक ग्राहक हक्क दिन' म्हणून साजरा केला जातो. अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये 15 मार्च 1962 साली तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी ग्राहकांच्या हक्काविषयी भाष्य केले होते. ग्राहकांच्या हितासाठी बोलणारे ते पहिले नेते ठरले होते. ग्राहक हक्कासाठी चळवळ चालविणाऱ्या लोकांनी 1983 मध्ये पहिल्यांदा 'जागतिक ग्राहक दिन' World Consumer Day साजरा केला. तेव्हा पासून 'जागतिक ग्राहक दिन' हा आंतराष्ट्रीय पातळीवर 15 मार्च रोजी साजरा केला जातो.
 
सुरक्षेचा हक्क
 
सुरक्षित वस्तू खरेदी हा ग्राहकाचा हक्क आहे. आपण जेव्हा एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा त्या वस्तूंच्या सुरक्षिततेची सर्व जबाबदारी ही उत्पादकाची असते. विक्रेत्याने नेहमी उच्च गुणवत्ता असलेल्या वस्तूंची विक्री करावी. काही तक्रार जाणवत असल्यास कंपनीकडे तक्रार करावी. ग्राहकांनी देखील गुणवत्ता पूर्ण वस्तूंची खरेदी करावी. यात ISI मार्क चिन्ह असलेली आणि ISO प्रमाणित असलेल्या वस्तू वापराव्यात. वस्तूंची गुणवत्ता आणि त्यासोबत मिळणाऱ्या सेवांबाबत माहिती मिळविण्याचा अधिकार ग्राहकांना आहे.
 
निवड करण्याचा हक्क
 
ग्राहकाला कोणत्याही कंपनीच्या उत्पादनाची निवड कारण्याचा हक्क आहे. बाजरात गेल्यानंतर जर विक्रेता तुम्हाला एकाच ब्रँडची वस्तू घेण्याचा आग्रह करत असेल तर तुम्ही त्याच्या विरोधात तक्रार करू शकता.
 
माहिती मिळण्याचा हक्क
 
ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकाला उत्पादनाशी निगडीत सर्व माहिती जसे की, उत्पादनाची गुणवत्ता, प्रमाण, किंमत, शुध्दता, एक्स्पायरी डेट या सर्वांबाबत माहिती मिळण्याचा हक्क आहे.
 
मत मांडण्याचा अधिकार
 
या कायद्यानुसार ग्राहकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. ग्राहकाने विकत घेतलेल्या वस्तूमध्ये काही बिघाड झाला असल्यास किंवा वस्तू खराब असल्यास त्याच्या विरोधात मत मांडण्याचा हक्क ग्राहकाला आहे. जर ग्राहकाला आपली फसवणूक झाली असे जाणवत असेल तर त्या व्यवसायिक किंवा कंपनीची तक्रार ग्राहक मंचात करता येते.
 
तक्रार आणि निवारण करण्याचा हक्क
 
फसवणूक झाल्यास उत्पादन असो, व्यवसायिक असो किंवा कंपनी विषयी तक्रार असो ग्राहक याबाबत कायद्यांतर्गत तक्रार करू शकतो. ग्राहक मंच किंवा ग्राहक तक्रार निवारण केंद्राला त्या तक्रारीचे निराकरण करावे लागते.
 
ग्राहक शिक्षणाचा हक्क
 
ग्राहकाला आपल्या हक्कांविषयी जागरूक करण्यासाठी सरकारद्वारा विविध उपक्रम राबविले जातात. यात जागो ग्राहक जागो, तसेच शिबीर आणि कार्यशाळा घेतल्या जातात. ग्राहकांची फसवणूक न होता त्यांना त्यांच्या हक्कांची माहिती व्हावी यासाठी हे उपक्रम राबविण्यात येतात. या अंतर्गत ग्राहक कायद्याचे शिक्षण घेण्याचा अधिकार ग्राहकाला आहे. ग्राहकांच्या हक्कांच्या सुरक्षितेतेसाठी देशात हेल्पलाईन सुविधा आहे. ग्राहकांची फसवणूक झाल्यास ग्राहक राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन 1800114000 या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदवू शकतात.
 
आज 15 मार्च जागतिक ग्राहक दिनानिमित्य World Consumer Day ग्राहक संरक्षण मंत्रालयाने
jaagograhakjago. gov.in
 
ही वेबसाइट सादर केली आहे. या वेबसाइटवर ग्राहकाशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी मिळू शकते. त्याशिवाय ग्राहकांचे अधिकार, तक्रार, सर्व माहिती मिळू शकेल. या वेबसाइटवर कुठल्याही कंपनीची तक्रार करणं सोपे आहे. ग्राहक टोल फ्री क्रमांक, मेसेज किंवा ऑनलाईन तक्रारही करू शकतात. त्याच बरोबर केलेल्या तक्रारीची स्थिती ग्राहक वेबसाइट द्वारे ट्रेक करू शकतात.
 
वस्तू खरेदी करताना काळजी घेण्यासारख्या काही गोष्टी
 
- फसव्या जाहिरातींना बळी पडू नका.
- वस्तू खरेदी करताना एम.आर.पी. पेक्षा जास्त किंमत देऊ नका.
- वस्तू खरेदी करताना बिल मागावे.
- सोने खरेदी करताना हॉलमार्ककडे लक्ष द्या.
- डबाबंद खाद्य पदार्थांची व्यवस्थित पाहणी करा.
- वस्तू खरेदी करताना एक्सपायरी डेट तपासून पहा.
- पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना शून्य तपासा नंतरच पेट्रोल भरा.
- ऑनलाईन खरेदी करताना सजग राहा.
- वस्तू खरेदी करताना त्याची पूर्ण माहिती जाणून घ्या.