बलसागर भारत होवो...

वेध

    दिनांक : 14-Mar-2022
Total Views |

 समर्थ रामदास स्वामींनी बलदंड शरीरासाठी सूर्यनमस्कार सांगितले आणि 12 मारुती मंदिरांची स्थापना केली. मातृहृदयी साने गुरुजी 'बलशाली भारत होवो, विश्वात शोभूनि राहो' असे म्हणाले.

 

balasagar 

 

या बलशाली शब्दाचा फक्त शरीरानेच शक्तिशाली असा अर्थ न घेता विश्वात शोभून दिसण्यासाठी जे जे काही असणे आवश्यक आहे ते ते करण्याची गरज आहे, असा लौकिक अर्थाने घ्यावा. गेल्या काही वर्षांत देश प्रत्येक क्षेत्रात आपली बाजू भक्कम करते आहे. अगदी शेवटच्या टोकावरील दुर्लक्षित बाबींकडे लक्ष देऊन त्याला मुख्य प्रवाहातच नव्हे, तर त्याच्याकडे बघण्याचा द़ृष्टिकोनही बदलण्यात येत असल्याने त्यालाही सन्मान मिळतो आहे आणि बलशाली होण्यासाठीच्या महत्प्रयासात त्याचाही अंतरभाव होतो आहे.
 

आपण क्रिकेटला एवढे काही डोक्यावर घेतले की, या देशात खेळले जाणारे खेळच नव्हते का किंवा नाही का, असा प्रश्न काही पडतो. आता मात्र ती परिस्थिती बदलत चाललेली आहे. राजकारण म्हणजेही एक खेळच आहे. त्या खेळाच्या भरोश्यावर भारत सध्या जगाचा केंद्रबिंदू झाल्याचे दिसून येत आहे. त्या राजकारणापल्याड जाऊन या देशाने अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. त्यात खेळालाही 'अच्छे दिन' आलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथे होत असलेल्या महाकुंभात भारतातील युवा खेळाडूंवर पूर्ण विश्वास असल्याचे केलेले भाष्य खेळाला अजून उंचीवर घेऊन जाण्यासाठीचे भाकीतच म्हणावे लागेल. भारतात क्रिकेटच्या मानाने इतर खेळांच्या बाबतीत पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणाच्या सोयी खूप कमी प्रमाणात उपलब्ध होतात. यासोबतच आर्थिक आणि लोकप्रियतेचं गणितंही आहेतच. सुविधा आणि प्रचार-प्रसाराच्या अभावामुळे अंगभूत गुणवत्ता असूनही ती सहजपणे लक्षात येत नाही. ग्रामीण आणि निमशहरी भागात तर खेळात भविष्य घडवता येतं, हेच माहिती नसतं. ज्यांना माहिती असतं त्यांना काय केलं पाहिजे, गुणवत्ता सिद्ध करण्याचं व्यासपीठ कोणतं, याबद्दल माहिती नसते. जोपर्यंत इतर खेळांचं महत्त्व, त्यातील संधी, त्यात असलेले भविष्य आणि त्याबद्दलचा दृष्टिकोन याबद्दल जागरूकता निर्माण होत नाही, तोपर्यंत विशालकाय लोकसंख्येच्या देशात क्रीडानैपुण्याचा दुष्काळ होता.

 

आता केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी अनुभवातून क्रीडा क्षेत्राची सर्व दारं खुली करून दिली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार क्रीडा महोत्सवाची संकल्पना अमलात आणण्याचे देशातील खासदारांना सांगितले आणि गावागावांतील खेळाडूंना आज खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध होऊ लागले. आज प्राथमिकरीत्या खेळत असलेल्या गावखेड्यातील खेळाडूला योग्य मार्गदर्शन मिळाल्यास तो ऑलिम्पिकसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये चमक दाखविल्याशिवाय राहणार नाही. आधी ऑलिम्पिकसारख्या स्पर्धा भारतासाठी फक्त सहल ठरत होत्या; आता तेथून काहीतरी पदक आणल्याशिवाय खेळाडू परत येत नाहीत. हेच या देशाला खेळातही बलशाली करण्यासाठीचे एक पाऊल समजावे लागेल. क्रिकेटमध्ये पैसा आहे म्हणून तिकडे जाणारे खूप आहेत. तसा पैसा, तसं ग्लॅमर कुस्ती, बॅटमिंटन, हॉकी आदी खेळही मिळवून देऊ शकतं, हे आपल्याला आता समजत आहे. भालाफेक खेळात भारताच्या नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. ऑलिम्पिकमध्ये भारताला 12 वर्षांनंतर सुवर्णपदक मिळालं तर अ‍ॅथ्लेटिक्स खेळात पहिल्यांदा भारताला सुवर्णपदक मिळालं. विशेष म्हणजे भारताने लंडन ऑलिम्पिकमध्ये सहा पदके जिंकण्याचे रेकॉर्ड तोडत सात ऑलिम्पिक पदकं जिंकली. हॉकी पुरुष संघाने 41 वर्षांनंतर ऑलिम्पिक पदक जिंकलं.

 

भारत-टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकं जिंकण्याच्या रेसमध्ये 48 व्या क्रमांकावर राहिला. टोकियोमध्ये भारताला मिळालेल्या सात पदकांत भालाफेक खेळात नीरज चोप्राला सुवर्णपदक, वेटलिफ्टर मीरा चानू आणि पहिलवान रवी दहिया याला रौप्य पदक मिळालं तर बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि पहिलवान बजरंग पूनियासह बॉक्सर लवलीना बोरगोहेनला कांस्य पदक मिळालं. याशिवाय सांघिक खेळात भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्य पदकावर नाव कोरलं. भारताला भविष्यात महाशक्ती व्हायचे असेल तर क्रीडा क्षेत्रालाही प्राधान्य द्यावे लागेल. आजपर्यंत महाशक्ती असलेल्या रशिया, अमेरिका आणि आता चीन या देशांनीच पदकं पटकावली आहेत. भारताने त्यात चंचुप्रवेश केला असून भविष्यात महाशक्तिशाली राष्ट्रांच्या पंगतीतील पदकं आपल्या खात्यात आणण्यासाठी क्रीडा धोरण अजून मजबूत होईल, असा विश्वास करूया...

 

- प्रफुल्ल व्यास

- 9881903765