रशियाने उचलले 'हे' मोठे पाऊल, जगभरातील वाहन उद्योगावर होणार वाईट परिणाम!

    दिनांक : 12-Mar-2022
Total Views |
रशिया : रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिका आणि युरोपीय देश सातत्याने रशियावर निर्बंध वाढवत आहेत. अशा परिस्थितीत आता रशियानेही पाश्चात्य देशांच्या या निर्बंधांवर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. रशियाने 200 हून अधिक कार आणि ऑटो पार्ट्सच्या (Auto Parts) निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याचा गंभीर परिणाम फक्त रशियातीलच नव्हे तर जगभरातील वाहन उद्योगावर होणार आहे. रशियाच्या या निर्णयामुळे भविष्यात वाहन उत्पादकांसमोर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
 
 

vahan 
 
 
आपल्या या निर्णयाबाबत माहिती देताना रशियाने म्हटले आहे की, "रशियाविरूद्ध कारवाई करणाऱ्या देशांना विविध प्रकारचे लाकूड आणि लाकूड उत्पादनांची निर्यात थांबण्यात आली आहे." कार आणि ऑटो पार्ट्सच्या निर्यातीवर रशियाची बंदी या वर्षाच्या अखेरीपर्यंत कायम राहणार आहे. रशियाने आपल्या निर्यातीच्या यादीतून काढून टाकलेल्या वस्तूंमध्ये वाहने, दूरसंचार, औषध, शेती उपयुक्त वस्तू, इलेक्ट्रिक उपकरणे आणि लाकूड यांचा समावेश केला आहे. रशियाच्या अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, हे उपाय रशियावर लादलेल्या निर्बंधांना तार्किक प्रतिसाद आहेत. अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्रांचे सुरळीत कामकाज सुनिश्चित करणे हे याचे उद्दिष्ट आहे.
 
रशियात या वाहन कंपन्यांनी थांबवलं काम
 
रशिया आणि युक्रेनमधील संघर्षामुळे अनेक कार उत्पादकांनी रशियामधील त्यांचे कामकाज थांबवले आहे. यामध्ये फोक्सवॅगन (Volkswagen), होंडा (Honda), टोयोटा (Toyota), जनरल मोटर्स (General Motors) , मर्सिडीज-बेंझ (Mercedes-Benz) आणि जग्वार लँड रोव्हर (Jaguar Land Rover) या कार निर्मात्या कंपन्यांचा समावेश आहे. याशिवाय जीप (Jeep), फियाट (Fiat ) आणि प्यूजिओ ( Peugeot ) या ब्रँडचाही या यादीत समावेश आहे. दरम्यान, कार आणि ऑटो पार्ट्सच्या निर्यातीवर रशियाची बंदी अशीच सुरू राहिली, तर जगभरातील कार निर्मात्यांसाठी ही अडचणीची बाब ठरेल.