बांग्लादेश मेडिकल कॉलेजमध्ये हिंदू विद्यार्थिनींनाही घालावा लागणार हिजाब

    दिनांक : 01-Mar-2022
Total Views |
ढाका : बांग्लादेशातील जेसोर येथील अद-दिन सकिना मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलने आता येथे शिकणाऱ्या विद्यार्थिनींना हिजाब घालणे अनिवार्य केले आहे. म्हणजेच इथे शिकण्यासाठी येणाऱ्या बिगर मुस्लिम विद्यार्थिनींनाही हिजाबशिवाय कॉलेज कॅम्पसमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने ४ ऑक्टोबर, २०१० रोजी कोणालाही त्यांच्या इच्छेविरुद्ध धार्मिक कपडे घालण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, असा निर्णय दिला होता. अशा परिस्थतीतही हा सर्व प्रकार घडत आहे.

Ad-Din-Medical-College-Bangladesh
 
अद-दिन सकिना मेडिकल कॉलेजच्या प्रशासकीय अधिकारी सुब्रत बसाक यांनी दावा केला आहे की, हिजाबसंदर्भातील हा नियम २०११ पासून सुरू आहे. या महाविद्यालयाची स्थापनाही याच वर्षी झाली आहे. मात्र, सुब्रता बसाक यांनी आपल्या महाविद्यालयाचा आदेश बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध नाही का, या प्रश्नावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. एका पत्रकार परिषदेत 'बांगलादेश जातिया हिंदू महाजोत' या हिंदू अधिकार संघटनेने सांगितले की, देशातील कोणत्याही शैक्षणिक संस्थेने मुस्लिम नसलेल्या विद्यार्थ्यांना इस्लामिक कपडे घालण्याची सक्ती करू नये. बांगलादेश हिंदू नॅशनल ग्रँड अलायन्सचे प्रवक्ते पलाश कांती डे म्हणाले की, हा बांगलादेशच्या न्यायव्यवस्थेच्या निर्णयाच्या विरोधात आहे.
 
पलाश डे म्हणाले की, शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना इस्लामिक टोपी, बुरखा किंवा हिजाब घालण्याची सक्ती करू शकत नाहीत. याप्रकरणी महाविद्यालय प्रवेशापूर्वीच विद्यार्थ्यांची लेखी संमती घेत असल्याचा आरोप होत आहे. संमती न देणाऱ्यांना प्रवेश दिला जात नाही. अकीज ग्रुप्स लिमिटेडद्वारे चालवल्या जाणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये हिजाब अनिवार्य करण्यात आला आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी हिंदू संघटनांनी केली.