डॉ. सुवर्णा वाजे जळीत कांड; संदीप वांजेच्या 3 मित्रांची चौकशी, पण शेवटचा मोहरा बाकी!

    दिनांक : 09-Feb-2022
Total Views |
नाशिकः नाशिकमधील बहुचर्चित अशा डॉ. सुवर्णा वाजे खून प्रकरणाचा तपास शेवटच्या टप्प्यात आला असून, डॉ. सुवर्णा वाजेंना पती संदीप वाजेने संपवल्याचे समोर आले आहे.पोलिसांनी तीन जणांची चौकशी केल्याचे समजते. त्यांनी पोलिसांना बरीच माहिती दिली असून, दोघांच्या जबाबात भिन्नता आहे. यामुळे याप्रकरणाचा लवकर पर्दाफाश करू, असा दावा पोलीस करत आहेत . मात्र, खुनाच्या कटात सहभागी असणारे पती संदीप वाजेचे साथीदार अजूनही पोलिसांना सापडलेले नाहीत. त्यांच्या मागावर पोलीस पथक आहेत. डॉ. सुवर्णा वाजे-जाधव या बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबाने पोलिसांत नोंदवली होती. त्यानंतर 25 जानेवारी रोजी, मंगळवारी रात्री मिल्ट्री गेटसमोर त्यांची गाडी जळालेल्या अवस्थेत सापडली. त्यात जळून कोळसा झालेली हाडे होती. ही हाडे सुद्धा त्यांची असल्याचे ‘डीएनए’ अहवालातून समोर आले आहे. सध्या डॉ. सुवर्णा वाजे खुनप्रकरणाचा मास्टर माइंड पती संदीप वाजेचीही पोलीस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे. संदीपने खून कसा आणि का केला हे लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.
 

suvarna 
कौटुंबिक कलहातून खून
डॉ. सुवर्णा वाजे आणि पती संदीप वाजे यांचे पटत नव्हते. त्यामुळेच संदीपने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यांच्यात वारंवार कौटुंबिक कलह सुरू होता. पती आणि पत्नींमध्ये नेहमी खटके उडायचे. दोघांमध्ये नेहमीच विकोपाला जाणारे वाद विवाद व्हायचे. या कारणामुळेच पती संदीपने पत्नी डॉ. सुवर्णा वाजेंचा खून करायचा प्लॅन आखला आणि इतर पाच जणांना सोबत घेत पत्नीला जाळल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या बहीण आणि रुग्णालयातील सहकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. माहेरच्या नातेवाईकांनीही त्यांना काही महत्त्वाची माहिती दिली. त्यावरूनच पोलिसांनी मुख्य आरोपी डॉ. सुवर्णा वाजे यांचा पती संदीपला बेड्या ठोकल्या आहेत. दुसरीकडे संदीपने मोबाईलमधील डेटा डिलीट केला आहे. त्यामुळे गूढ वाढले आहे. हा डेटा मिळाला, तर याप्रकरणाची अधिक माहिती समोर येऊ शकते.

शेवटचा फोन पतीला
डॉ. सुवर्णा वाजे या महापालिकेच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. कोविडच्या काळात त्यांनी अतिशय चांगली कामगिरी बजावली. महापालिकेत स्वतःच्या कार्याची वेगळी छाप पाडली. त्यामुळे पालिकेमध्ये त्यांचा आदरयुक्त दबदबा होता. विशेष म्हणजे 25 जानेवारी रोजीही त्यांनी ‘ओपीडी’मध्ये काम केले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कसलेही टेन्शन नव्हते. यादिवशी बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी शेवटचा फोन पती संदीपलाच केल्याचे समोर आले आहेत. त्यावरून पोलिसांनी तपासाला गती दिली आणि मास्टरमाईंड असलेल्या संदीप वाजेलाच बेड्या ठोकल्या. आता त्याचे पाच साथीदारही पोलिसांच्या रडारवर आहेत.