३० वर्षांनी तळोद्यात माजी विद्यार्थ्यांनी भरविला दहावीचा वर्ग

    दिनांक : 05-Feb-2022
Total Views |
तळोदा : तीस वर्षानंतर शहरातील के.डी.हायस्कूल येथील शैक्षणिक वर्ष १९८८-८९ चा इयत्ता १० वीचे विद्यार्थी एकत्र जमले. यावेळी तत्कालीन १० वीचा वर्ग प्रत्यक्ष भरवण्यात आला. जुन्या मित्रांचा गोतावळा जमल्याने विविध उपक्रम राबवून जुन्या आठवणींना उजळा देण्यात आला. 
 
photo
 
आजच्या डिजिटल युगात व्हॉटस् ऍपसारख्या सोशल मिडियाने नोकरी, व्यवसायनाने दूर असणार्‍या मित्रांना जवळ आणले आहे. तळोदा येथील शेठ के.डी.हायस्कूलमध्ये सन १९८८-८९ च्या इयत्ता १० वीच्या बॅचच्या मित्रांना देखिल व्हॉट्सएप ग्रुपने एकत्रित आणले. या मित्रांनी प्रत्यक्ष भेटण्याचा निर्णय घेतला व त्यातून या माजी विद्यार्थ्यांचा दोन दिवसीय स्नेह मेळावा तळोद्यात घडून आला. सुरुवातीला दिवगंत गुरूवर्य, वर्गमित्र यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ज्या शाळेने आयुष्याला दिशा दिली, सुसंस्कृत नागरिक बनविण्याचे धडे दिले त्या पवित्र शाळेला ३० वर्षानंतर भेटीचा योग हा जुळून आला. विद्यार्थ्यांनी शाळेचा प्रांगणात येथील जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर प्रत्यक्ष १० वीचा वर्ग भरवण्यात आला. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थी बालपणातील आठवणीत रमले. वर्गात त्यांनी हुल्लडबाजीदेखील केली. यावेळी सामूहिक हजेरी घेण्यात आली. आपल्या आयुष्यास शिस्त लावणारे, शिक्षा करणार्‍या शिक्षकांप्रती कृतज्ञतेच्या भावनेने प्रतिकात्मक स्वरूपात काहींनी वर्गात शिक्षा भोगून घेतली. वर्गात आपआपल्या बेंचवर बसून शिकण्याचा अनुभव घेतला.
 
१९८८-८९ वर्षीचे माजी विद्यार्थी व तळोदा शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले. के.डी.हायस्कूलमधील सर्व गुरुजन त्यांची शिस्त संस्कार, जडणघडणीतून आज मी या पदावर पोहचू शकलो असे ते म्हणाले. या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून आलेले ठाणे येथे वास्तव्यास असणारे आर.पी.आय ( एकतावादी) चे राष्ट्रीय प्रवक्ते जितेंद्रकुमार इंदिसे यांनी तत्कालीन मुख्याध्यापक व्ही.एन.तिवारी यांनी व्यासपीठावर प्रथम भाषणास संधी दिल्याच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी आलेल्या सर्व माजी विद्यार्थांचे शेठ के.डी.हायस्कूलचे मुख्याध्यापक जे.एन.सूर्यवंशी व उपमुख्याध्यापक ए.वाय.बोरदे यांनी स्वागत केले. आपल्या मूळ गावी आलेल्या स्थलांतरीत विद्यार्थ्यानी आपले जुने घर, गल्ली, मित्र शेजारी, बारगळ गढी, कनकेश्वर मंदीर येथे भेटी दिल्या. या पारिवारिक स्नेहमिलन सोहळ्याचे नियोजन या बँचचे माजी विद्यार्थी लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या फार्महाऊसवर करण्यात आले होते. या सर्व स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन तळोदा के.डी हायस्कूल चे १९८८-८९ बँच मधील विद्यार्थी तळोदा नगराध्यक्ष अजय परदेशी, नगरपालिकेचे कॉंग्रेसचे प्रतोद तथा नगरसेवक संजय माळी, वर्गनायक मुकेश कलाल, डॉ.गणेश सोनवणे, योगेश वाणी, संतोष वानखेडे, राजेंद्र माळी, सुधाकर माळी, प्रफुल हिवरे, पदमेश माळी, सचिन सुगंधी, मनोज जावरे आदिंनी केले.