काय असते डिजिटल लोन ? जाणून घ्या सविस्तर माहिती व प्रक्रिया

    दिनांक : 24-Feb-2022
Total Views |
Digital Loan : गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे (Corona) संकट आहे. कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown)अनेकांचे उद्योगधंदे ठप्प झाले. रोजगार गेल्यामुळे अनेक जण आर्थिक संकटात सापडले. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी  यातील अनेकांनी कर्जासाठी बँकांकडे अर्ज केला.परंतु रोजगार गमावल्यामुळे बँकांनी देखील कर्ज देणे टाळले. तसेच बँकांकडून कर्ज घेण्यासाठी मोठ्याप्रमाणात कागदपत्रांची पुर्तता करावी लागते. त्यामुळे अनेकांचा कल डिजिटल लोनकडे आहे. . डिजिटल प्लॅटफॉर्मवर अगदी काही तासांमध्ये कर्ज उपलब्ध होते, तसेच त्यासाठी कागदपत्रांची देखील आवश्यकता नसते. म्हणून कोरोना काळात जे संकटात सापडले त्यातील अनेकांनी डिजिटल पद्धतीने लोन पुरवणाऱ्या विविध संस्थाकडू कर्ज घेतले. डिजिटल पद्धतीने लोन घेण्याची प्रक्रिया काय आहे? अशा पद्धतीने लोन घेण्याचे फायदे, तोटे याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
 

digital loan 
 
 
डिजिटल लोनसाठी असा करा अर्ज
 
भारतामध्ये सध्या डिजिटल लोन देणाऱ्या अनेक संस्था कार्यरत आहेत. प्ले स्टोअरवर त्यांचे अ‍ॅपदेखील उपलब्ध आहेत. तुम्ही यातीलच एखादे अ‍ॅप डाऊनलोड करून, त्यानंतर तुम्ही या अ‍ॅपच्या माध्यमातून कंपनीकडे अर्ज करू शकता. तुम्ही जर संबंधित कंपनीने ठरवून दिलेल्या नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला कुठल्याही कागदपत्रांची पुर्तता न करता तात्काळ कर्ज मिळते. अशा पद्धतीने लोन देणाऱ्या कंपन्याचे नियम देखील जास्त गुंतागुतींचे आणि क्लिष्ट नसतात. तसेच याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला दहा हजारांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंतचे लोन सहज उपलब्ध होते. मात्र तुम्ही जर बँकेत लोनसाठी गेलात तर तुम्हाला शक्यतो लोन म्हणून पन्नास हजारांच्या आतील रक्कम मिळत नाही. मात्र डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्ही तुमच्या गरजेनुसार कर्ज घेऊ शकता.
डिजिटल लोन घेण्याचे फायदे, तोटे
 
डिजिटल लोनच्या फयद्यांपेक्षा तोटेच अधिक आहेत. तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने लोन घेण्यासाठी अ‍ॅप डाऊनलोड करता तेव्हा हे अ‍ॅप सुरू होण्यापूर्वी तुमच्या मोबाईलच्या अ‍ॅक्सेसचा ताबा मागते. तुम्हाला त्यासाठी परवानगी द्यावीच लागते. तुम्ही परवानगी दिल्यानंतर अशा अ‍ॅपच्या माध्यमातून तुमचा सर्व मोबाईल डाटा संबंधित कंपनीकडे जातो. त्याचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक असते. ऑनलाईन कर्ज देणाऱ्या संस्थांचे व्याजदर प्रचंड असतात. जवळपास बँकांच्या तुलनेत तुम्हाला इथे दुप्पट व्याजदराने कर्ज मिळते. ठरलेल्या मुदतीमध्ये कर्जाची परतफेड न केल्यास तुमच्याकडून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जातो. तसेच पैसे भरण्यासाठी प्रचंड मानसिक छळ होण्याची शक्यता देखील अधिक असते. फायद्याबाबत बोलायचे झाल्यास अशा प्लॅटफॉर्मवरून तुम्ही तुमच्या गरजेनुसार कर्ज घेऊ शकता. तुम्हाला लगेच कर्ज उपलब्ध होते, तसेच तुम्हाला मोठ्याप्रमाणात कागदपत्रांची आवश्यकता नसते.