‘वीर बुधु आ रहा हैं, घोडे पे चमक रहा हैं।’

    दिनांक : 13-Feb-2022
Total Views |
वंदन स्वातंत्र्य योध्यांना !
 
बुधु भगत हे वनवासी स्वातंत्र्यसेनानी. दि. १३ फेब्रुवारी हा त्यांचा स्मृतिदिन. तेव्हा बुधु भगत यांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा परिचय करुन देणारा हा लेख...


Budhu Bhagat1 
 
बंदूक, पिस्तुल, तोफ, अणुबॉम्ब, हवाई हल्ले अशी आपण पाहिलेली, ऐकलेली युद्ध, त्यातील सहभागी सैन्य दल हे सगळे आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते व आपण त्यांच्यापुढे नतमस्तकही होतो. असे जरी असले तरी पण आपल्याला त्वरेने आठवण येत नाही ती धनुष्यबाण आणि कुर्‍हाडींचा वापर करुन लढलेली युद्ध व त्यातील सैनिक. अशा या वीरांना उत्साह यावा म्हणून वनवासींच्या आपापल्या भाषेतील समरगीते, इसवी सन १७०० पासूनच्या काळातली ती गीते, तेव्हा गायली जात. बुधु भगत व बिरसा मुंडा यांच्यासाठीची ही समरगीते उपलब्ध झाली आहेत. बुधु भगत यांच्या विद्रोहात गायले जाणारे त्यांचे एक प्रेरणादायी गीत पुढीलप्रमाणे -
 
बुधु बिरस बरआ लगदस,
घोड़ो मइंआं बिलिचा लगदस
टिको टोंका नू लड़ाई नना,
चियारी धनु लेले भइया
घोड़ो मइंआं बिलिचा लगदस।
 
अर्थात, ‘वीर बुधु आ रहा हैं, घोडे पे चमक रहा हैं। टिको टांग में लडाई करने तीर धनुष लेकर घोडे पर चमक रहा हैं’।
 

Budhu Bhagat 
 
आपल्या सगळ्यांना भगवान बिरसा मुंडा यांच्या आंदोलनाची बरीच माहिती आहे. परंतु, इसवी सन १७७१ पासून वनवासींनी बरीच आंदोलने केली आहेत. बिरसा मुंडांच्या उलगुलानच्या आधीपासून झालेल्या दोन आंदोलनांचा उल्लेख येथे करणे आवश्यक आहे. तसे आपण केले नाही, तर त्या योद्ध्यांचा आपण अपमान केल्यासारखे होईल. त्यात एक आंदोलन होते. १८३१-३२चा ‘कोल विद्रोह’ आणि दुसरे ‘लरका विद्रोह.’ या आंदोलनांचा नेता होता बुधु भगत!
 
झारखंड येथील पहिले सुसंघटित असलेले असे हे ‘कोल आंदोलन.’ याच्या आधी देखील जनजातीयांची अनेक आंदोलने झाल्याचा तपशील आढळतो, जसे ‘चेरो विद्रोह’, ‘पहाडिया विद्रोह’, ‘हो विद्रोह’ वगैरे. परंतु, ही सगळी आंदोलनं सुसंघटित स्वरुपात, व्यापक प्रमाणात, दूरवर पसरलेली अशी नव्हती. ‘कोल आंदोलन’ हे त्यात वेगळेच ठरते. सर्वदूर पसरलेल्या ‘कोल आंदोलना’चे विभागवार असे वेगवेगळे सेनापती होते. जसे, सिंगराई मानकी, बिंदराय मानकी, सुरगा मुंडा आणि बुधु भगत. या ‘कोल आंदोलना’त कोणती एक विशिष्ट अशी वनवासी जमात नव्हती, तर विविध जमातींचा तो एक मोठा समूहच होता. असे जरी असले तरी ‘कोल’ या वनवासी जमातीचा पगडा त्या आंदोलनावर खूप होता आणि ते संख्येनेदेखील अधिक होते. यास्तव त्या आंदोलनाला ‘कोल विद्रोह’ असे ओळखले जाऊ लागले. असे हे आंदोलन झारखंडमधील सगळ्या प्रदेशात पसरलेले होते. या ‘कोल विद्रोहा’तील मोलाचा असलेला असा हा एक सेनापती बुधु भगत. बुधु भगत यांनी रांचीच्या परिसरात ‘वीर बहादुर’ असे सेनापतीपद भूषविले होते. बुधु भगत यांचा जन्म चान्हो नावाच्या जिल्ह्यातील सिल्ली नावाच्या खेडेगावात दि. १७ फेब्रुवारी, १७९२ला झाला. ओराँव शेतकरी कुटुंबात जन्मलेले बुधु भगत हे आपले जीवनकार्य संपवून गेले. दि. १३ फेब्रुवारी, १८३२ रोजी रांचीच्याच रणांगणात!
 
बुधु भगत जेव्हा युवा झाला, तेव्हाचा काळ त्याला अस्वस्थ करु लागला. आपण काही तरी करावे आणि हे अराजक थोपवावे, असे त्यांनी मनोमन ठरवले आणि तो आपल्या समाजातील लोकांना संघटित करु लागला. बुधु भगत यांच्या मनात जे होते, ते ज्या हालअपेष्टांमधून जात होते, त्याच हालअपेष्टा सहन करणारा मोठा समुदाय एकत्रित होऊ लागला. वनवासींच्या जमिनीसंबंधित छळवणूक सहन होत नव्हती. सावकार, जमीनदार वर्ग या वनवासींचे शोषण करत होता. त्यांच्यावर अतोनात अत्याचार होत असत. वनवासी संस्कृतीशी छेडछाड केली जाऊ लागली होती. सरकार दरबारी त्यांना न्याय मिळत नसे. वनवासी समाज हा मुळातच प्रकृती/निसर्गप्रेमी. जंगलांची राखण करणे, शेती करणे, शिकार करणे हे त्यांचे प्राधान्यक्रम होते. परंतु, १७५७ पासून ‘ईस्ट इंडिया’ कंपनी भारतात सगळीकडे आपले साम्राज्य पसरवत झारखंडमध्ये आली, तसे वनवासी समाजाच्या ’जल-जंगल-जमीन’ यावरचे त्यांचे हात अशक्त होऊ लागले आणि ब्रिटिशांचे सशक्त. त्यामुळे वनवासींमध्ये असंतोष वाढू लागला. वनवासींचे रोजचे जगणे कठीण होऊ लागले. अन्न, पाणी याच्यासाठी ते झगडायला लागले. या ब्रिटिशांच्या बरोबर संगनमताने सावकार, जमीनदार वगैरे वनवासींची पिळवणूक करु लागले. त्या सगळ्यांनी वनवासींना अक्षरशः रस्त्यावर आणले. झारखंडच्या तमाडच्या लंका गावात हे वर सांगितलेले सेनापती एकत्र आले. त्यांनी सभा घेतली आणि त्यात हे ‘कोल आंंदोलन’ सुरु करायचे ठरवले गेले.
 
बुधु भगत यांनी त्यांच्या जन्मगावी हे आंदोलन सुरु केले. ही जनजातींची आंदोलनं ब्रिटिशांच्या नाकी नऊ आणत होती. ब्रिटिशांचे म्होरके हे आंदोलन कसे चिरडून टाकता येईल, ते ठरवू लागले. ‘साऊथवेस्ट फ्रंटियर एजन्सी’ची स्थापना करुन ब्रिटिशांनी पण दंड थोपटले. झारखंड व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून आजुबाजूच्या ब्रिटिश सैन्याला एकत्र करायला लागले. ‘एजंट टू गव्हर्नर जनरल’ अशी पदं निर्माण केली गेली. हे आंदोलन जरी क्षेत्रीय होते असे मानले तरी ते सगळ्या भारतातील आंदोलनांचे एक मार्गदर्शक असे ठरले होते. बुधु भगत यांनी जाणले की, आपल्या स्वतंत्र सुशासन व्यवस्थेसाठी आणि संस्कृती रक्षणासाठी कोणत्याही परीस्थितीत या ब्रिटिशांना येथून हाकललेच पाहिजे. त्यासाठी बुधु भगत यांनी संघटनशक्ती उभी केली. ‘धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी’ या गीतात म्हटल्याप्रमाणे आपल्या स्वतःच्या कुटुंबालादेखील या आंदोलनात सहभागी होण्याची परवानगी त्यांनी दिली. बुधु भगतचे तीन पुत्र हलधर, गिरधर व उदयकरण आणि दोन कन्या रुनियां व झुनियां यांनी आपल्या वडिलांच्या सैन्यदलात उडी घेतली. ‘लरका विद्रोह’ हे बुधु भगत यांचेच एक आंदोलन उग्र रुप धारण करु लागले. युद्ध पेटले, जनजाती योद्धे पेटून उठले. इंग्रजांच्या कानावर आले की, बुधु भगत व त्याचे सैन्यदल टिको या गावात आहेत. दि. १३ फेब्रुवारी, १८३२ रोजी ब्रिटिशांची चक्र जोरात फिरु लागली फिरंग्यांच्या सेनापतीने इंग्रज सैन्याच्या तब्बल पाच फलटणींना आदेश दिला आणि त्या गावाला ब्रिटिश सैन्यदलाने वेढा दिला. त्या वेढ्यात जवळपास ३०० ते ४०० जनजातींची सेना लढू लागली. ब्रिटिश हरायला लागलेले इंग्रजांना कसे चालले असते!
 
फिरंग्यांनी जाणले की यांना ठार करणे किंवा त्यांना पकडून डांबणे याच्याशिवाय अन्य कारणाने हा उद्रेक शमण्यातला नाही. मग त्यांनी साम, दाम, दंड, भेद अमलात आणले. बुधु भगत यांना पकडून देणार्‍याला इंग्रज सरकारने बक्षीस जाहीर केले. त्या काळातले एक हजार रुपयांचे इनाम! पण, सारे व्यर्थ, त्याचा काडीमात्र उपयोग झाला नाही. ते पैसे देखील नाकारणारे जनजाती योद्धे शेवटपर्यंत इंग्रजांविरुद्ध व तानाशाहीविरुद्ध झगडतच होते. ’प्राणांची आहुती देऊ, पण गद्दारी नाही करणार’ असे सहकारी असलेले ते जनजाती देशभक्त. इंग्रज चवताळले व बंदुकीच्या गोळ्या वनवासी योद्ध्यांचे जीव घेऊ लागले. बुधु भगत द्विधा मन:स्थितीत सापडले. आपण स्वतः शरणागती पत्करुन इंग्रजांच्या ताब्यात गेलो, तर आपल्या कुटुंबाचे व जनजाती योद्ध्यांचे प्राण वाचतील, नंतर आपल्याला इंग्रज काय शिक्षा करतील ती करु देत, ते नंतर पाहू. बुधु भगत यांनी आपल्या सेनेला आपला हा विचार सांगितलादेखील. पण, जनजाती सैन्यही काही ऐकण्यातले नव्हते. सगळ्यांनी ’जियेंगे या मरेंगे’ हे पक्के ठरवले. बुधु भगत यांच्या केसालाही धक्का पोहोचू द्यायचा नाही, हा चंग बांधला. सगळ्या सैन्याने आपल्या या सेनापतीला मध्यात घेतले आणि व्युहरचना करुन सर्व बाजूंनी कडे उभारले, असे ते युद्ध. पण, शेवटी इंग्रजी बंदुका आणि पिस्तुली यांच्यापुढे धनुष्यबाण, कुर्‍हाडी टिकू शकणे अवघडच होते ना! सर्व फिरंग्यांनी क्रूरतेचा जणू कळसच गाठला. वनवासी योद्धे धारातीर्थी पडू लागले. आपल्या मुलाबाळांबरोबर बुधु भगत हे वीर मरण स्वीकारत देशाला आपल्या प्राणांची आहूती देऊन जाताना सगळ्यांसमोर एक अद्वितीय विलक्षण असे उदाहरण सोडून गेले.
 
जरी न गातिल भाट डफावर तुझे यशोगान
सफल जाहले तुझेच हे रे, तुझे बलिदान
 
बुधु भगत यांचे समर्पण हे वरील गीताप्रमाणे पटणारे आहे, असे हे बलिदान आपण कधीही न विसरण्याजोगेच!
 
गनिमीकाव्याचे निष्णात बुधु भगत. ’स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ हा उत्सव आपण साजरा करत असताना त्यांचा बलिदान दिवस तोच हा १३ फेब्रुवारीचा दिवस.
 
काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा!
 
लता मंगेशकरांनी गायलेल्या गीताच्या शेवटच्या ओळी कानात साठवून ठेवत बुधु भगतांबरोबरच लतादीदींनाही आपण सारे या निमित्ताने नमन करु.
 
- श्रीपाद पेंडसे
 
वनवासी कल्याण आश्रम, पश्चिम महाराष्ट्र प्रांत खेलकूद आयाम प्रमुख
(साभार : ’आदिवासी साहित्य यात्रा’ नावाचे एक पुस्तक आहे. त्यात आदिवासींची काही गीते शोधून संग्रहित केलेली आढळतात.)