सेवाव्रती डॉ. विजयकुमार डोंगरे

    दिनांक : 12-Feb-2022
Total Views |
यंदाच्या प्रजासत्ताकदिनी ज्या दहा सेवाव्रती डॉक्टरांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला, त्यांपैकीच एक आहेत डॉ. विजयकुमार विनायक डोंगरे. त्यांच्या जीवनकार्याचा परिचय करुन देणारा हा लेख...


Dr. Vijaykumar Dongre 
 
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा आहे, असे मानून त्यांनी आपल्या आयुष्याची तब्बल ५९ अनमोल वर्षे केवळ आणि केवळ कुष्ठरोगाच्या व्याधीने त्रस्त असलेल्या लाखो रुग्णांवर औषधोपचार करण्यासाठी, त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधत त्यांचे मनोबल वाढवून त्यांच्यात सर्वसामान्यांप्रमाणेच जीवन जगण्याची उमेद निर्माण करण्यासाठी, तसेच या रोगाबद्दल समाजात अगदी खोलवर रुजलेले गैरसमज आपल्या वाणीने आणि लेखणीने दूर करण्यासाठी समर्पित केली आहेत. त्यांच्या या असाधारण कार्याची बूज राखून भारताचे राष्ट्रपती त्यांना ‘पद्मश्री’ प्रदान करून गौरवान्वित करणार आहेत. अशा या कर्मयोगी, सेवाव्रती, वयोवृद्ध , तपोवृद्ध डॉक्टरांशी मी थेट संवाद साधला आणि त्यांच्याबद्दल थोडेफार जाणून घेतले.
 
 
डॉ. डोंगरे हे गेल्या १०-१२ वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यांनी नुकतीच आपल्या वयाची ८२ वर्षे पूर्ण केली. ते तसे मूळचे मुंबईकर. दि. २९ सप्टेंबर, १९३९ रोजी मुंबईतच जन्मलेले. त्यांचे वडील विनायकराव हे सुरुवातीस मुंबईतल्या टाकसाळीत ‘लेबर ऑफिसर’ होते, त्यानंतर काही वर्षे त्यांनी पुलगाव येथील दारुगोळा कारखान्यात आणि काही वर्षे देहूच्या आयुध निर्माण कारखान्यात काम केले. पुढे मुंबईच्या टाकसाळीत काम करूनच ते निवृत्त झाले. डॉ. विजयकुमार हे दादरच्या बालमोहन विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी. रुईया महाविद्यालयामधून ‘इंटर सायन्स’ केल्यावर त्यांनी वरळीच्या आर.ए.पोद्दार आयुर्वेदमेडिकल महाविद्यालयामध्ये वैद्यकशास्त्राचा अभ्यास करून ‘जी.एफ.ए.एम.’ अर्थात (ग्रॅज्युएट ऑफ द फॅकल्टी ऑफ आयुर्वेदिक मेडिसीन) ही पदवी मिळवली. त्या सुमारास आपल्या देशाच्या उत्तर सीमेवर चिनी आक्रमणामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.
 
भारतीय लष्कराने शारीरिक पात्रता असलेल्या तरुण पदवीधरांना अल्पकाळाच्या सेवाकरारावर लष्करात अधिकारी म्हणून सेवा बजावण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. डॉ. विजयकुमार हेही लष्करात मेडिकल ऑफिसर म्हणून काम करायला उत्सुक होते. तसा प्रयत्नही त्यांनी करून पाहिला. तथापि त्याकाळात आयुर्वेदशास्त्रातलीत्यांची पदवी ही अशा नियुक्तीसाठी मान्यताप्राप्त पदवी नव्हती. साहजिकच त्यांचा हा प्रयत्न विफल ठरला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतल्या, वडाळा येथील ‘अ‍ॅक्वर्थ लेप्रसी हॉस्पिटल’ या निमशासकीय रूग्णालयासाठी वैद्यकीय अधिकारी हवे असल्याची जाहिरात वर्तमानपत्रांत वाचली आणि ते मुलाखतीसाठी तिथे गेले. तिथेही आयुर्वेदातली त्यांची पदवीच त्यांच्या निवडीत अडसर होऊ लागली. तेव्हा मात्र डॉ. डोंगरे क्षणभर अगतिक झाले. मात्र, तरीही धाडस करून ते रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना भेटले. “मला आपल्या रुग्णालयात किमान तीन महिने काम करायची संधी द्या.
 
त्यादरम्यान मी माझी पात्रता माझ्या कामातून सिद्ध करीन आणि तसे न झाल्यास आपण मला बेलाशक कार्यमुक्त करा,” अशी त्यांनी अधिष्ठात्यांना कळकळीची विनंती केली. त्यांचा तो दुर्दम्य आत्मविश्वास पाहून आणि त्याचबरोबर त्या रुग्णालयाची आत्यंतिक निकड लक्षात घेऊन,अधिष्ठात्यांनी डॉ. डोंगरे यांना दि. १ ऑक्टोबर, १९६३ पासून प्रायोगिक तत्त्वावर आणि केवळ तीन महिन्यांच्या अवधीसाठी रुग्णालयाच्या सेवेत रुजू होण्यास मंजुरी दिली; प्रत्यक्षात मात्र झाले असे की, डॉ. डोंगरे हे पुढे सलग तब्बल ३४ वर्षे त्याच रुग्णालयात आपली सेवा देत राहिले. त्या सेवेत असतानाच त्यांनी रीतसर ‘एम.बी.बीएस’ केले. ‘डिप्लोमा इन सोशल वेल्फेअर’ ही पदविका मिळवली. ‘ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थकेअर’ या संस्थेचा पदव्युत्तर अभ्यासक्रम नेटाने पूर्ण करून त्यांनी ‘पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिको -लीगल सिस्टिम्स’ ही आणखी एक महत्त्वपूर्ण पदविका मिळवली. ‘आरोग्य शिक्षण’ या विषयाच्या विविध परीक्षाही ते विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. एकंदरीत त्यांनी कुष्ठरोग्यांवरच्या उपचारपद्धती संदर्भात अत्यावश्यक असे सर्वंकष ज्ञान थोड्याच अवधीत प्राप्त केले. त्यामुळे लवकरच त्यांची याच रुग्णालयात ‘डेप्युटी सुप्रिटेन्डेन्ट’ म्हणून पदोन्नती झाली.
 
कुष्ठरोग या विषयावर जनजागृती करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात डहाणू-तलासरी, वाडा - मोखाडा, धुळे-नंदुरबार, गोंदिया-गडचिरोली अशा अनेक ठिकाणी व्याख्याने आणि चर्चासत्रे आयोजित केली. रोग्यांसाठी विनामूल्य तपासणी आणि औषधोपचार केंद्रे स्थापन केली. पेणजवळच्या तारा गावातल्या ‘युसुफ मेहेरअली सेंटर’साठीही त्यांनी भरपूर काम केले. डहाणू-कोसबाडच्या वनवासी भागात दौरे करत असताना ते श्यामराव आणि गोदुताई परुळेकर यांच्या संपर्कात आले. त्यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभल्याने ते अधिक उत्साहित झाले.
 
कुष्ठरोग्यांशी संबंधित प्रचंड कार्य केलेले एक दिग्गज असामी, ‘पद्मश्री’ डॉ. रामचंद्र विश्वनाथ वारदेकर, एम.डी. (पॅथॉलॉजी) आणि त्यांच्या पत्नी डॉ. प्रमिला वारदेकर. एम.डी. (गायनॅकॉलॉजी) या दाम्पत्याच्याही संपर्कात डॉ. विजयकुमार डोंगरे होते. या दाम्पत्याच्या सांगण्यावरूनच डॉ. डोंगरे हे आपल्या नोकरीतून सेवानिवृत्त होताच, एकही क्षण वाया न घालवता, रातोरात वर्ध्याला निघून गेले आणि सेवाग्राममधल्या गांधी ‘मेमोरियल लेप्रसी फाऊंडेशन’च्यावतीने चालणार्‍या कुष्ठरोग रुग्णालयाची जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. हे सर्व करणे त्यांना शक्य झाले. कारण, डॉ. वारदेकर हेच त्या गांधी ‘मेमोरियल लेप्रसी फाऊंडेशन’चे संस्थापक आणि पूर्वाध्यक्ष होते. अर्थात डॉ. डोंगरे यांनी ज्यावेळी कुष्ठरोग रुग्णालयाची सूत्रे आपल्या हाती घेतली, त्यावेळी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी हे त्या फाऊंडेशनचे अध्यक्ष होते.
 
डॉ. डोंगरे यांनी अनेक सेवाभावी संस्थांचे अध्यक्ष अथवा सचिव या नात्याने काम केले. दिल्लीच्या ‘व्हॉलंटरी हेल्थ असोसिएशन’चे ते चार वर्षे अध्यक्ष होते. याच संस्थेतर्फे प्रसिद्ध होणार्‍या ’हेल्थ फॉर मिलियन्स’ या पत्रिकेच्या कुष्ठरोग विशेषांकाचे त्यांनी संपादन केले होते. कुष्ठरोग्यांना समाजाकडून नेहमीच मिळणारी हेटाळणीची आणि अपमानजनक वागणूक आणि त्यापासून मानवी हक्क संरक्षण कायद्यान्वये कुष्ठरोग्यांना मिळू शकणारे संरक्षण यावर प्रकाश टाकणारी एक पुस्तिका ‘युनिसेफ’ने प्रसिद्ध केली होती.तिचा मराठीत अनुवाद करून ती प्रसिद्ध करण्याचे काम डॉ. डोंगरे यांनी केले होते. कुष्ठरोगाच्या गेल्या अडीच हजार वर्षांच्या इतिहासावर दृष्टिक्षेप टाकणारी एक संशोधनपर पुस्तिकाही त्यांनी लिहून प्रसिद्ध केली होती. कुष्ठरोग्यांच्या समस्यांवर शासनाला उपाययोजना सुचवण्यासाठी रा.सु. गवई यांच्या अध्यक्षतेखाली १९८१ साली स्थापन झालेल्या अभ्यास समितीचे ते एक सन्माननीय सदस्य होते.
 
त्यांनी केलेल्या विविधांगी कार्याची यादी जशी खूपच मोठी आहे, तशीच त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची आणि सन्मानांची यादीही लांबलचक आहे. सेवाग्रामच्या गांधी ‘मेमोरियल लेप्रसी फाऊंडेशन’तर्फे दर दोन वर्षांनी दिले जाणारे ‘इंटरनॅशनल गांधी अवॉर्ड’ डॉ. विजयकुमार विनायक डोंगरे यांना २०१३ या वर्षासाठी जाहीर झाले होते आणि प्रत्यक्षात ते दि. १४ फेब्रुवारी, २०१४ रोजी महामहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले होते. त्यावेळी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि वर्ध्याच्या महात्मा गांधी मेडिकल महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. धीरूभाई मेहता हे उपस्थित होते. डॉ. विजयकुमार डोंगरे यांना ‘इंडियन असोसिएशन ऑफ लेप्रॉलॉजिस्ट’, ‘रोटरी क्लब नागपूर’, ‘लायन्स क्लब मुंबई’ अशा अनेक संस्थांनी जीवनगौरव पुरस्कार दिला आहे .
 
डॉ. डोंगरे यांचा एक जिवलग मित्र जेव्हा त्यांच्या तरुण वयात अकाली निधन पावला, तेव्हा निराधार झालेल्या त्यांच्या पत्नीशी डॉ. डोंगरे यांनी दि. ३१ मार्च, १९७६ रोजी रीतसर विवाह करून तिला आधार दिला आणि त्याचबरोबर तिच्या दोन्ही मुलांचे पालकत्वही स्वीकारले. त्यावेळी ते ३७ वर्षांचे होते. त्यांच्या या कुटुंब वत्सल आणि गृहकृत्यदक्ष धर्मपत्नी, सीमन्तिनी डोंगरे (माहेरच्या प्रतिभा अनंत कारखानीस) यांनी त्यांना उत्तम साथ दिल्यामुळेच ते डोंगराएवढे मोठे समाजकार्य करू शकले. त्यांचे स्वतःचे सुपुत्र डॉ. हिमांशु डोंगरे हे ‘एम.डी.’ (अ‍ॅनेस्थेशिया) असून, पुण्यात भूलतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत,तर स्नुषा डॉ. अदिती डोंगरे या ‘क्ष किरणतज्ज्ञ ’अर्थात ‘रेडिऑलॉजिस्ट’ आहेत. अशा या सेवाव्रती डॉ. विजयकुमार विनायक डोंगरे यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन आणि त्यांना विनम्र अभिवादन!
 
प्रवीण कारखानीस