स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यावर शूट होणारा पहिला मराठी चित्रपट २५ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस

सचिन कुंडलकर यांचा अनोखा प्रयोग

    दिनांक : 12-Feb-2022
Total Views |
दहा वर्षांत आठ चित्रपट या संयत वेगाने नवनवीन प्रयोग करण्यात दिग्दर्शक आणि लेखक सचिन कुंडलकर यांचा हातखंडा राहिला आहे. प्रत्येक प्रयोगात त्यांना यश मिळालेच आहे असे नाही. त्यांच्या चित्रपटांचं वैशिष्ट्य सांगायचे तर त्यांचे विषय नेहमीच्या पठडीतील स्टोरी मटेरियलपेक्षा वेगळा ट्रॅक पकडणारे असते. ‘पाँडिचेरी’ या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून ते असाच आणखी एक चौकटीबाहेरचा प्रयोग करत आहेत.
 
mobile-camera
 
चित्रपट म्हटल्यास, लाइट्स..कॅमेरा आणि अॅक्शन हे आपल्या डोक्यात अगदी सहजच येतं. यापैकी कॅमेरा हा चित्रपटाचा सर्वांत अविभाज्य भाग. कॅमेरा जितका महागडा आणि प्रगत तितकीच चित्रपटाची प्रत उत्तम असं म्हणतात. पण याउलट आता कुंडलकर एक संपूर्ण चित्रपटच स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यावर शूट करणार आहेत. या चित्रपटाच्या प्राथमिक तयारीला सुरुवात झाल्याचं त्यांनी स्वत:च्या फेसबुकच्या माध्यमातून सांगितलं आहे.
नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटात सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुळकर्णी, गौरव घाटणेकर, तन्मय कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 

Pondicherry 
पाँडीचेरी सारख्या सुंदर निसर्गरम्य शहरात घडणारी मराठी माणसाची गोष्ट आहे. नवीन पिढीच्या नात्याचे प्रतिनिधित्व करणारा हा सिनेमा असून विस्थापित झालेले लोक कोणत्या पध्दतीची नाती निर्माण करतात, यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. एकंदरच नात्याची आणि कुटुंबाची नवीन व्याख्या या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यात सई, वैभव आणि अमृता यांच्या नात्याचा नवीन प्रवास आपल्यासमोर उलगडणार आहे. या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा भारतातील पहिला चित्रपट आहे, जो संपूर्ण स्मार्ट फोनवर चित्रित करण्यात आला आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी आणि क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत या चित्रपटासाठी सचिन कुंडलकर यांनी तिहेरी भूमिका साकारली आहे, दिग्दर्शनासोबतच त्यांनी लेखनाची आणि निर्मात्याची धुराही सांभाळली आहे. याव्यतिरिक्त नील पटेलही या चित्रपटाचे निर्माता आहेत. मोह माया फिल्म्स आणि इंक टॅंक निर्मित हा चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.