भारतरत्न लता मंगेशकर- कोकिळेविण वसंत...

    दिनांक : 11-Feb-2022
Total Views |

ज्ञानेश्वरीत 'मृत्यू कसा असावा' याचे जसे वर्णन केले आहे, अगदी त्याचंप्रमाणे गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर ह्यांचे माघ महिन्यातील उत्तरायणात वसंत पंचमीच्या दुसऱ्या दिवशी निधन झाले.

 


Lata Mangeshkar 
 

 

 
मृत्यूलाही आपलेसे करण्याची प्रगल्भता त्यांच्यात होती. त्यांच्या जाण्याने सरगम तुटली, रागांचे मोती विखुरले, ताल रुसलेत व अलाप देखील आज विलाप करत आहेत. ईश्वरभक्ती, देशभक्ती, प्रेम, विषाद, आनंद अशा अनेक भावांमध्ये व रसांमध्ये; छत्तीसहून अधिक भाषांमध्ये; त्यांनी पाच पिढ्यांना मंत्रमुग्ध केलं. 'ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं, ए जाने वफ़ा हम क्या करें,' हे त्यांचे गीत आज त्यांच्याचं करिता म्हणावं लागतयं. पुढील पिढ्यांचे देखील त्यांच्या गीतांनी भान हरपल्या खेरीज राहणार नाही. लता मंगेशकर यांनी संगीताला त्यांचं सर्वस्व अर्पण केलं होतं. गायनाची कला जरी त्यांच्यात उपजत असली तरी त्या कलेला पैलू पाडले ते त्यांचे वडील, दीनानाथ मंगेशकर ह्यांनी. त्यांनी दीदींच्या कंठातील 'गंधार' ओळखला. पुढं लता मंगेशकर दीदींनी त्या गंधाराला सांभाळलं. आळंदीच्या विठ्ठलपंताची लेकरे जशी दुधाचे दात पडण्यापूर्वीच विश्वात्मक देवाच्या वाग्यज्ञाची सामग्री गोळा करायला लागली, तशी मंगेशीच्या दीनानाथाची मुले हातभर उंचीची असल्यापासून स्वरयज्ञाच्या तयारीला लागली.
 

संगीताला आपलं आराध्य मानून लतादीदींनी आजीवन ह्या कलेची साधना केली. वडिलांना दिलेलं वचन त्यांनी अगदी अखेरच्या श्वासापर्यंत निभावलं. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांच्यावार कुटुंबाची जबाबदारी आली व त्यांनी ती यशस्वीरित्या पार पाडली. शंकर जयकिशन, मदन मोहन, जयदेव, लक्ष्मीकांत प्यारेलाल, एस डी बर्मन, नौशाद, आर डी बर्मन पासून तरी ए आर रहमान पर्यंत अशा प्रत्येक पिढीच्या संगीतकारांसोबत त्यांनी काम केलंय. त्यांचा आवाज प्रत्येक मैफिलीचा शृंगार व घराचा अलंकार आहे. जीवनाचे सर्व रस त्यांच्या सुरांच्या बागेत चाखायला मिळतात. ऑकलंड मध्ये झालेल्या त्यांच्या एका गीतानंतर तेथील रसिक वर्गाने चक्क दीदींच्या चरणी डॉलर्स ठेवलेत. ह्या प्रसंगी सरस्वतीला साक्षात लक्ष्मीने अभिवादन केले! त्यांच्या गीतांनी सिनेसृष्टीला सालंकृत केलं. सुरांच्या वर्तुकळातला मध्यबिंदू पकडणारा आणि लयकारीत वाहत्या काळातला निमिषा-निमिषातला लक्षांश पकडणारा असा हा दीदींचा कंठ आहे. 'गुण गाईन मी आवडी' ह्या लेखसंग्रहात पुलंनी, 'मुली औक्षवंत हो' ह्या लेखात दीदींच्या सुरांना सलाम केला!

 

लता मंगेशकर यांनी गायलेले प्रत्येक गाणे स्वतःच वेगळे आहे. १९७४ मध्ये त्यांनी जगातील सर्वाधिक गाणी गाण्याचा 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' केला. भारत सरकारने लता मंगेशकर यांना 'भारतरत्न' हा किताब दिला, तेव्हा मनात आले की, या उपाधीने त्यांचा गौरव झाला की त्यांच्यामुळे प्रत्यक्ष या उपाधीची झळाळी वाढली? अत्युच्च पदावर पोहोचूनही या थोर कलावतीने विनम्रपणा सोडला नाही. आपली सामाजिक जबाबदारीही त्या विसरल्या नाहीतं. पुण्यातील 'दीनानाथ मंगेशकर रुग्णालय' हे त्याचेच द्योतक आहे. ताल हा मानवी जीवनाचा अविभाज्य अंग आहे. श्वासाला लय असते, तर हृदयाला ताल असतो. आयुष्यात सूर आणि तालांच कोंबिनेशन जरी कधी चुकलं तरी दीदींच्या गाण्यांनी आयुष्याला बरोबर समेवर आणता येतं. लतादीदींचं जाणं हे केवळ त्यांच्या देहाचं प्रस्थान किंवा त्यांच्या आत्म्याचा विश्राम म्हणता येईल. अवघ्या संसारला सुरांच्या मैफिलीत ज्यांनी रममाण केलं त्या लतादीदींना ङ्कतुम मुझे भुला ना पावोगेङ्क ह्या त्यांच्या गीताप्रमाणेचं विसरता येणं शक्य नाही. ऐन वसंत ऋतूत हि गानकोकिळा शांत झाली. साक्षात सरस्वती माता तिला न्यायला आली. ह्या कोकिळेनं देहाने जरी आपली रजा घेतली असेल तरी 'रहे न रहे हम, महका करेंगे बाग-ए-वफ़ा में' ह्या गीतांप्रमाणेच ह्या कोकिळेचा सालस स्वभाव व देशभक्तीचे गुंजन शतकोत्तर सदाबहार राहील!

 
समिधा पाठक
 
७२७६५८३०५४