वंदन स्वातंत्र्य योध्यांना!

    दिनांक : 01-Feb-2022
Total Views |

खंडेराव विष्णू साठे

 

Khanderao Sathe 
 
भारताचा स्वातंत्र्यलढा अनेकदृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सशस्त्र क्रांतिकारकांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. त्यामध्येही महाराष्ट्राचा सहभाग अभिमानास्पद असा आहे. १८९७ मध्ये पुण्यात पसरलेल्या प्लेगच्या साथीमध्ये तपासणीच्या नावाखाली महिलांवर झालेले अन्याय - अत्याचार, निकृष्ट दर्जाचे प्लेग निवारण कार्य करणारा प्लेग कमिश्नर कॅप्टन रँड आणि त्याचा सहकारी आयर्स्ट यांच्यावर २२ जून, १८९७ रोजी बंदुकीने गोळ्या झाडूनचाफेकर बंधूंनी केलेला वध - या घटनांना यावर्षी १२४ वर्षे पूर्ण होऊन त्या १२५ व्या वर्षात पदार्पणकरतील. मराठी मनांमध्ये अस्मिता जागृत करणारी आणि स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी चळवळीला चालना देणारी ही घटना इतिहासातील पानांवर कायमची कोरली गेली आहे. मात्र या घटनेत सहभागी असलेले स्वातंत्र्यप्रेमी खंडेराव विष्णू साठे यांची माहिती मात्र सर्वश्रुत होऊ शकली नाही.
 
पूना हायस्कूलचा हा सतरा वर्षांचा विद्यार्थी आणि तेजस्वी तरुण म्हणजे खंडेराव विष्णू साठे. या खंडेराव साठेंवर वासुदेव चाफेकरांचा विशेष स्नेह होता. देशद्रोही द्रविड बंधूंना धडा शिकवण्यासाठी वासुदेव चाफेकरांनी एक योजना आखली होती. या कार्यात खंडेराव साठे यांनी अनमोल सहकार्य केले. त्यात द्रविड बंधू मारले गेले. रँड मारला गेला तेव्हा ते तेथे उपस्थित नव्हते,परंतु दुसर्‍या दिवशी दामोदर चाफेकरांनी टिळकांना निरोप पाठवायला सांगितले. रॅण्डचा खून केल्यानंतर खंडेराव साठे यांनी पुण्यातील विंचणकर यांच्या घरात टिळकांची भेट घेत ‘गणेशखिंडीतला गणपती पावला’ असा सूचक संदेश टिळकांना सांगितला. त्यावर ‘आता नीट हुशारीने वागा,’ असे टिळक त्यांना म्हणाले होते.
द्रविड बंधूंच्या हत्येच्या प्रकरणात ११ फेब्रुवारी, १८९९ रोजी खंडेराव साठे यांना अटक करण्यात आली. त्यांनीसुद्धा अत्यंत निर्भय वृत्तीने हा गुन्हा केल्याचे स्वीकारले. पुढे द्रविड बंधूंच्या हत्येच्या खटल्यात न्यायालयाद्वारे वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तर खंडेराव साठे यांना दहा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. साठेंना ठाणे, येरवडा, सिंध, हैदराबाद, कर्णावती तुरुंगातही शिक्षा झाली.
या शिक्षेच्या काळात त्यांना दररोज ३५ पौंड पीठ दळण्याचे काम देण्यात आले होते. तुरुंगात त्यांना इतर तर दूरच - नातेवाईकांनाही भेटू दिले जात नसे. १२ मे १८९९ रोजी वासुदेव आणि महादेव रानडे यांना येरवडा तुरुंगात फासावर लटकवण्यात आले.
कालांतराने १९६० मध्ये खंडेराव विष्णू साठे यांचेही निधन झाले. मात्र त्यांचे देशकार्य आणि देशासाठी त्यांनी सहन केलेल्या यातना काळाच्या ओघात विस्मरणात गेल्या. खंडेराव विष्णू साठे यांचा अतुलनीय त्याग आणि शौर्याबद्दल त्यांना विनम्र अभिवादन!
 
 एक आवाहन वाचकांसाठी... 
यावर्षी आपण स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापनदिन - म्हणजेच अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करतोय... त्या पार्श्वभूमीवर असंख्य देशभक्तांनी धैर्य दाखवत देशासाठी केलेल्या त्यागाचे पुन्हा स्मरण करून देण्याची गरज निर्माण झाली आहे.अशा विस्मृतीत गेलेल्या देशभक्तांची माहिती देणारे ‘वंदन स्वातंत्र्य योध्यांना’ हे सदर ‘तरुण भारत’ने गणराज्य दिनापासून सुरू केले आहे. आज नव्या पिढीला स्वातंत्र्य संग्रामातील या योध्यांविषयी, त्यांच्या कामगिरीविषयी आणि स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित घटनांविषयी माहिती मिळावी आणि या सुपुत्रांना अभिवादन करावे हाच यामागे हेतू आहे. यासाठी सर्व वाचकांना आवाहन आहे की, आपल्या भागातील स्वातंत्र्य संग्रामातील अनाम वीर, स्वातंत्र्य सेनानी, राष्ट्रीय चळवळीत योगदान देणारी आणि काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेली ठिकाणे, व्यक्ती आणि अन्य संबंधित माहिती असल्यास ती संबंधित छायाचित्रांसह ‘तरुण भारत’कडे पाठवावी. वास्तव मांडणारे आणि प्रसिद्धीयोग्य माहिती आपल्या उल्लेखासह ‘तरुण भारत’ तसेच न्यूजपोर्टलवरही प्रसिध्द करण्यात येईल.
- संपादक