रा. स्व. संघ नाबाद ९७ : उज्ज्वल राष्ट्रभक्तीचा निरंतर प्रवास!

    दिनांक : 06-Oct-2022
Total Views |
राष्ट्रीय स्वयं सेवक संघ
 
आजच्या विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेच्या स्थापनेला ९७ वर्षे पूर्ण होत आहेत. एखाद्या स्वयंसेवी संघटनेने त्याच्या मुळ ध्येयापासून विचलित न होता, संघटनेत कुठल्याही प्रकारची शकले न होता शताब्दीकडे वाटचाल करणे हाच मुळात एक विक्रम आहे. पण, यानिमित्ताने संघाच्या वर्धिष्णू कार्याचा आढावा घेणे हे एक मोठे आव्हानच आहे!
 
 

rss1 
 
 
काळात संघाची ‘शताब्दी’ ही गोष्ट संघाचे संस्थापक सरसंघचालक पूजनीय डॉ. हेडगेवार यांच्या कल्पनेपेक्षा, अपेक्षेपेक्षा विपरित आहे. त्यांनी कायम संघ ही समाजातील कृत्रिम व्यवस्था आहे आणि संघ, समाज हे जर एकरूप झाले, तर या व्यवस्थेची गरज उरणार नाही, अशी मांडणी केली. आपल्या उण्यापुर्या १५ वर्षांच्या कार्यकाळात अविरत कष्ट करताना ‘याचि देही याचि डोळा’ कार्य पूर्णत्वाकडे नेण्याची त्यांची आकांक्षा होती. म्हणूनच ते म्हणत ’संघाला ज्युबिली साजरी करायची नाही!’ अर्थात, आपल्या शेवटच्या सार्वजनिक प्रगट कार्यक्रमात ’मी हिंदू राष्ट्राचे छोटे स्वरूप येथे बघत आहे’ असे समाधान व्यक्त करत १९४० साली त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आणि संघाच्या या प्रदीर्घ वाटचालीतील दुसर्या टप्प्यात संघाने प्रवेश केला.
 
त्यापूर्वी ही १५ वर्षे संघाची वाटचाल कशी होती, हे बघणे महत्त्वाचे ठरेल. मुळात काँग्रेसची स्वातंत्र्य चळवळ, क्रांतिकारकांची स्वातंत्र्यासाठी चाललेली धडपड याच्याशी जवळून संबंध असणारे डॉ. हेडगेवार यांना संघ ही संघटना निर्माण करण्याची गरज का वाटली, हे समजल्याशिवाय संघाची ९७ वर्षांची वाटचाल समजणे शक्य नाही.
 
आपला देश स्वातंत्र्यासाठी लढत असताना या देशाला समृद्धी, शौर्य, भौगोलिक अनुकूलता असे सर्व असताना देश पारतंत्र्यात का गेला? जर पारतंत्र्यात गेला तर नेमके कधीपासून या देशाच्या पारतंत्र्याची सुरुवात झाली? केवळ इंग्रज हेच आक्रमक होते का? मग खैबर खिंडीतून येणारी निरंतर टोळधाड कोण होती? या देशाचा राष्ट्र म्हणून आधार काय? हे राष्ट्र सनातन राष्ट्र असेल, तर भविष्यातील स्वतंत्र भारतात या राष्ट्राची उभारणी कुठल्या आधारावर करावी लागेल? या प्रश्नांचे योग्य चिंतन न करता केवळ ‘इंग्रज हटाव’ या एकाच मुद्द्यावर आम्ही विचार करत राहिलो, तर उद्या पुन्हा कुणीतरी आक्रमक येईल आणि पुन्हा आमच्यावर राज्य करेल. त्यामुळे स्वातंत्र्याची चळवळ चालवताना दुसरीकडे ‘समाज संघटन’ हा पण महत्त्वाचा बिंदू लक्षात घेऊन त्यासाठी कुणीतरी पुढे यावे लागेल, असे डॉ हेडगेवार यांचे चिंतन होते.
 
असंघटित हिंदू समाज, आक्रमण आणि पारतंत्र्यातून निर्माण झालेल्या कुप्रथा, दोष; जी विविधता म्हणजेच आमचे वैशिष्ट्य होते, त्याच्याच आधारावर निर्माण झालेले भेद आणि यातून आलेली आत्मविस्मृती यावर जोपर्यंत उपाय शोधला जात नाही, तोपर्यंत स्वातंत्र्याची चळवळ स्वातंत्र्यप्राप्तीचे लक्ष प्राप्त करेल, पण निर्दोष समाजनिर्मितीपासून दूरच राहील, या भावनेने स्वातंत्र्याची आकांक्षा आणि निर्दोष समाज उभारणी या दोन उद्देशाने त्यांनी स्वतःच संघटन उभे करण्याचा निश्चय केला. नागपूरमध्ये काही शाळकरी मुले आणि त्यांचे स्वातंत्र्य चळवळीत असणारे काही सहकारी यांना घेऊन १९२५ साली या अभूतपूर्व संघटनेचा श्रीगणेशा डॉ. हेडगेवार यांनी केला.
 
“संघाच्या कामाची सुरुवात अशी चाकोरी सोडून झाली. एखादा मोठा ग्रंथ, घटना, पदाधिकार्यांची घोषणा अशा कुठल्याही साचेबद्ध पद्धत्तीने संघ सुरू झाला नाही आणि संघ समाजगतीने एकरूप करत संघ विसर्जित झाला पाहिजे,” असे डॉ. हेडगेवार यांचे प्रारंभापासून प्रतिपादन होते. संघटन एके संघटन ही भूमिका घेत अन्य कुठल्याही राजकीय, सामाजिक चळवळीत व्यक्तिगत स्वरूपात सहभागी होण्यास स्वयंसेवकांना मुभा होती. स्वतः डॉ. हेडगेवार जंगलतोड सत्याग्रहात सामील होताना सरसंघचालक जबाबदारीतून मुक्त झाले होते, हे येथे लक्षात घ्यावे लागेल.
 
याचाच अर्थ समाजजीवनातील हालचालीपासून संघ अलिप्त होता का? तर तसे बिलकुल नव्हते. याउलट रामनवमीमधील यात्रेच्या प्रबंधापासून नागपूरमधील दंगलीत शांतता प्रस्थापित करण्यात संघ स्वयंसेवक अग्रेसर होते. समाजातील ‘कॉन्ट्रॅक्ट’ घेणारी संघटना असे स्वरूप न येऊ देता, प्रत्येक क्षेत्रात काही आदर्श प्रस्थापित करण्याची ही कल्पना प्रत्यक्षात आणणे खूप अवघड होते. पण, डॉ. हेडगेवार यांनी कौशल्याने तो आदर्श प्रस्थापित केला.
 
१९४० साली डॉक्टर निवर्तले आणि जाताना संघाची धुरा त्यांनी पूजनीय गुरुजींवर सोपवली. वरकरणी दोघांच्या व्यक्तिमत्त्वात फरक होता. कारण, पूजनीय गुरुजी हे आध्यात्मिक साधनेतून संघाकडे आले होते, तर डॉक्टर हे सार्वजनिक, सामाजिक चळवळीत क्रियाशील असताना संघस्थापनेकडे वळले होते. त्यामुळे अनेकांना उत्सुकता, चिंता आणि भीती अशा संमिश्र भावना गुरुजींच्या नेतृत्वाबद्दल होती. पण, पूजनीय गुरुजींनी अतिशय धैर्याने संघाची नौका पुढे नेली.
 
गुरुजींनी नेतृत्व स्वीकारले तेव्हा देशभर स्वातंत्र्याचे आंदोलन गतिमान होत होते. अशा वेळेस स्वयंसेवकांना त्यात सहभागी होण्यास त्यांनी मुभा तर दिली होतीच, पण दुसर्या बाजूने फाळणीची शक्यता वाढत असताना हिंदू समाजाला सावध करणे आणि संघकार्य अधिक गतिमान करणे, असे दुहेरी काम ते आपल्या भारत भ्रमणात करत होते. पूजनीय डॉ. हेडगेवार यांच्या काळात निर्माण झालेली ‘पूर्णकालिक कार्यकर्ता’ या संकल्पनेला प्रचारक व्यवस्थेचे नेटके स्वरूप त्यांनी दिले. देशभर त्यांच्या प्रगट कार्यक्रमात होणारी गर्दी आणि संघशिक्षा वर्ग, शिबीर, शाखेवरील वाढत जाणारी संख्या यावरून संघाची लोकप्रियता वाढलेली लक्षात येत होती.
 
दुर्दैवाने फाळणीची आशंका खरी ठरली! पूजनीय गुरुजींनी ‘पंजाब, सिंध प्रांतातील स्वयंसेवकांना शेवटचा हिंदू परत येईपर्यंत आपले स्थान सोडू नका,’ अशी आज्ञा दिली होती. फाळणीच्या व्यथा या जिव्हारी लागणार्या होत्या. अनेक स्वयंसेवकांनी हिंदू समाजाच्या संरक्षणार्थ केलेले बलिदान अतुलनीय होते. स्वातंत्र्य चळवळीची व्याख्या ज्यांनी स्वतःच ठरवली होती, त्यांनी स्वयंसेवकांच्या या त्यागाची दखल तर घेतलीच नाही, पण राजकीय स्वार्थाने संघाला ‘स्वातंत्र्य चळवळीत तुम्ही कुठे होता?’ असा जाब विचारण्याची एकही संधी सोडली नाही.
 
फाळणी पाठोपाठ महात्मा गांधी यांची दुर्दैवी हत्या हा भारतीय जनमानसावर मोठा आघात होता. पण, काहींना ती वेगळ्या कारणाने संधी वाटली आणि संघाची लोकप्रियता ज्यांना खुपत होती, त्यांनी कुठलातरी संबंध जोडत संघावर बंदी आणत थेट गुरुजींवरच आरोप ठेवले आणि त्यांना अटक करण्यात आली. संघबंदीसाठी एकीकडून कोर्ट, दुसरीकडून सरकारशी पत्रव्यवहार आणि अन्यायाविरुद्ध स्वयंसेवकांना सत्याग्रहाचा आदेश देत पूजनीय गुरुजींनी या चक्रव्यूहातून यशस्वीपणे सुटका केली.
 
पण, या सगळ्या घटनाक्रमांचा संघकार्यावर, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि विचारांवर विपरित परिणाम झाला. ‘गोबल्स’ पद्धत्तीने विखारी प्रचारामुळे संघ बदनाम करण्याचा यशस्वी प्रयत्न झाला. परिणामी उपेक्षा, अवहेलना, टिंगल संघाच्या पदरी आली. त्यावेळी संघ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत त्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवत पूजनीय गुरुजींनी अखंड प्रवासाचा, भारत भ्रमणाचा विक्रमच केला. वर्षातून दोनदा असे ३४ वर्षांत ६८ वेळा भारत भ्रमण केलेला हा महापुरुष होता.
 
या संपूर्ण कारकिर्दीत संघ मूळ उद्देशापासून भरकटला नाही आणि टिकून राहिला, याचे श्रेय निश्चितच पूजनीय गुरुजी यांच्या नेतृत्वाला द्यावे लागेल. याच काळात संघ विचारांची वाटचाल विविध क्षेत्रात सुरू झाली. विद्यार्थी, कामगार, शिक्षण, वनवासी, राजकीय, धार्मिक अशा सर्व क्षेत्रांत संघाची दमदार वाटचाल सुरू झाली. आज सर्व समाजजीवनात संघाचा विचार प्रभावी ठरतो आहे. यामागे पूजनीय गुरुजी यांची दूरदृष्टी कारणीभूत आहे, असे म्हणावे लागेल .
 
चीनपासून असणारा धोका, भाषावार प्रांत रचना, सीमेकडे दुर्लक्ष, घुसखोरांचा धोका या बाबतीतले त्याकाळी त्यांनी केलेले मूलभूत चिंतन दुर्दैवाने राज्यकर्ते म्हणवणार्यांनी दुर्लक्षित केले. त्याचे परिणाम आम्ही आज दीर्घकाळ बघत आलो आहोत.
 
पूजनीय गुरुजी गेले आणि त्यांनी माननीय बाळासाहेब देवरस यांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केली. पूजनीय बाळासाहेब यांना पण लगेचच बंदीला तोंड द्यावे लागले. यावेळी निमित्त होते इंदिराजींना स्वतःची सत्ता टिकवण्याचे. पुन्हा एकदा सत्याग्रह करत आणि भूमिगत होऊन समाज जागृती करत संघाच्या स्वयंसेवकांनी या अन्यायाविरुद्ध दाद मागितली. सुमारे 19 महिने चाललेला लढा यशस्वी पार पडल्यावर त्यातील संघाची प्रमुख भूमिका लक्षात घेता अनेकांनी संघाने थेट राजकीय कार्यात उतरावे , विसर्जित व्हावे असे आग्रह केला. पण, संघाचे नेतृत्व विचलित झाले नाही आणि संघाने पुन्हा आपल्या व्यक्तिनिर्माणाचे कार्य जोमाने सुरू केले.
 
याच दरम्यान पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत पूजनीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे जे भाषण झाले, त्याने संघ स्वयंसेवकांना एक नवी दिशा मिळाली. अस्पृश्यतेची प्रथा जर वाईट नसेल, तर जगात कुठलीच गोष्ट वाईट नाही आणि म्हणून अशा कुप्रथा समाजाने झिडकारून टाकल्या पाहिजेत, असे वक्तव्य त्या ठिकाणी त्यांनी केले.
 
संघाला जातिव्यवस्थेचे आणि चातुर्वर्ण्य सिद्धांताचे पुरस्कर्ते मानणारे, तसा प्रचार जाणीवपूर्वक करणारे आणि त्यामुळे दलितबंधू, वनवासी आणि बहुजन समाज याला हिंदुत्वाच्या विचारापासून दूर ठेवणार्या मंडळींना जबरदस्त चपराक मिळाली. अर्थात, ही भूमिका प्रगट करण्याची संधी जाहीरपणे सरसंघचालकांना जरी आता मिळाली होती, तरी संघाची अंगभूत भूमिकाच ती होती. फक्त ती भूमिका प्रत्यक्षात आणण्याची कार्यपद्धती लोकांच्या लक्षात येत नव्हती.
 
पुढील १४ वर्षे संघाच्या एकूण प्रवासातील सर्वात गतिमान वर्षे होती. पूजनीय गुरुजींच्या काळात संवर्धित झालेली शक्ती पूजनीय बाळासाहेब देवरस यांनी जनजागरणासाठी अत्यंत कौशल्याने उपयोगात आणली. पूजनीय बाळासाहेब हे डॉ. हेडगेवार यांच्या पहिल्या फळीतील स्वयंसेवक! त्यांच्या वागण्या, बोलण्यावर डॉ. हेडगेवार यांचा प्रभाव असायचा. पूजनीय गुरुजी तर त्यांना ‘खरे सरसंघचालक’ असे म्हणायचे!
 
१९८०चे जनजागरण अभियान, त्यानंतर गंगाजल यात्रा यामुळे हिंदू समाजातील वातावरण ढवळून निघाले. पूजनीय बाळासाहेबांनी वसंत व्याख्यानमालेत केलेल्या वक्तव्याला गतिशील कृतीची जोड दिली. याबरोबर १९८९ साली पूजनीय डॉ. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने सेवाकार्याचे एक मोठे जाळे विणण्यासाठी त्यांनी प्रेरणा दिली. त्यातून जनजाती आणि उपेक्षित वस्तीतील बंधू वेगाने संघाच्या जवळ येऊ लागले.
 
हिंदू जागरणाच्या या प्रयत्नांना १९८४ साली सुरू झालेल्या रामजन्मभूमी आंदोलनाने निर्णायक भूमिका बजावली. रामशीला पूजन, रामज्योत यात्रा आणि शेवटची कारसेवा याने भारतातील हिंदू जनमानस बदलण्यास सुरुवात झाली. माध्यमे, विचारवंत आणि राजकीय नेतृत्वात हिंदुत्वाकडे बघण्याचा दृष्टिकोनात मोठा फरक झाला. १९४७ सालानंतर हिंदुत्वाच्या भूमिकेचे राजकीय क्षेत्रात यशस्वीपणे प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली. हिंदुत्वाचा सामाजिक आणि राजकीय आशय समाजात पोहोचण्यास या सर्व घटनांच्या मुळे मदत झाली.
 
१९९२ नंतर संघाच्या कामात संपर्क, प्रचार आणि सेवा या कार्यविभागाची वाढ झाली आणि संघ व समाज यातील अंतर कमी होण्यास सुरुवात झाली. संघाला समजून घेण्यास उत्सुक असणार्या सर्वांना यातूंन एक माध्यम मिळाले आणि संघ अधिक लोकप्रिय होऊ लागला. पूजनीय रज्जूभैय्या आणि पूजनीय सुदर्शनजी यांच्या रूपाने संघाला प्रथमच महाराष्ट्राबाहेरचे नेतृत्व मिळाले होते आणि काही प्रमाणात संघाचे अखिल भारतीय स्वरूप हे सिद्ध होत होते.
 
या २००९ पर्यंतच्या काळात संघाने अधिक गतीने आपल्या कार्यवाढीसाठी प्रयत्न केले. यात दोन महत्त्वाचे टप्पे आले. एक म्हणजे संघाला पूर्ण झालेली ७५ वर्षे आणि दुसरे म्हणजे पूजनीय गुरुजी यांची जन्मशताब्दी!
 
२००० साली संघाने राष्ट्रजागरण अभियान राबवताना घरोघरी पोहोचण्यासाठी योजना आखली आणि पुन्हा एकदा हिंदू जनमानस ढवळून निघाले. २००६ची गुरुजी जन्मशताब्दी संघकार्याला गतिमान करण्यासाठी पर्वणी ठरली. सर्व मंडलस्थानी पोहोचणे, बौद्धिक परिसंवाद, सद्भावना मेळावे अशा विविध कार्यक्रमांतून संघाने हिंदुत्व, समरसता आणि सद्भावना याचे जागरण केले.
या काळात दोन राजकीय स्थित्यंतरे अनुभवायला मिळाली. देशाच्या सर्वोच्च स्थानी एका स्वयंसेवकाचे स्थापित होणे, हा जुन्या पिढीतील अनेक कार्यकर्त्यांना समाधान देणारा क्षण होता! जरी संघाचे कार्य राजकीय परिवर्तनासाठी नव्हते, तरी हिंदुत्वाच्या विचाराचा माणूस राजकीय क्षेत्रात यशस्वी होणे, ही गोष्ट या विचारधारा मानणार्या मंडळींना सुखावणारी होती. पुढे मात्र २००४ साली झालेले राजकीय परिवर्तन हे अनेक आव्हाने निर्माण करणारे ठरले.
 
संघविचार आणि हिंदुत्वाचा विचार चिरडून टाकण्याच्या उद्देशाने पेटलेल्या डाव्या विचाराने पाठिंबा दिलेल्या आणि काँग्रेसप्रणित संपुआ सरकारने पद्धतशीरपणे अनेक कटकारस्थाने रचत हिंदू नेत्यांना वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवण्यास सुरुवात केली. हिंदू नेते, संत, महंत यांची समाजातील प्रतिमा बिघडवायची आणि मुस्लीम/ख्रिश्चन यांचे लांगूनचालन करायचे, ‘हिंदू दहशतवाद’ किंवा ‘भगवा आतंकवाद’ असे शब्द रूढ करत हिंदुत्वाची चळवळ संपवण्याचे कटकारस्थान रचले गेले होते. या परिस्थितीमध्ये संघाचे सरसंघचालक म्हणून पूजनीय डॉ. मोहनजी भागवत यांची नियुक्ती सुदर्शनजी यांनी केली आणि ते निवृत्त झाले.
 
२००९च्या निवडणुकीनंतर हिंदू श्रद्धा आणि हिंदू संघटना यांच्यावर अधिक गतीने आघात सुरू झाले. असीमानंद आणि इंद्रेशकुमार यांच्यावर थेट आरोप झाले आणि पुन्हा एकदा हिंदुत्वाची चळवळ बचावाच्या भूमिकेत जाते की काय, अशी स्थिती होती. गोध्रा जळीतकांड त्यापाठोपाठ झालेली गुजरात दंगल हा हिंदू विचारधारेला एक प्रकारे धडा शिकवणारी गोष्ट होती. पण, याच पार्श्वभूमीवर एक राजकीय नेतृत्व उदयास येत होते आणि ‘हिंदुत्व’ व ‘विकास’ या दोन आधारावर यशस्वी राजकारण, समाजकारण होऊ शकते, हे यातून हिंदू समाजाला दिसत होते.
 
संघाचे नेतृत्व या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून होते आणि त्याचवेळेस संघाच्या कार्याला नवीन आयामांची जोड देण्याचे प्रयत्नही सुरु होते. संघटन आणि जागरण श्रेणीबरोबर संघात गतिविधी आयाम जोडले गेले. समाजपरिवर्तनाच्या कामात संघ आता या माध्यमातून थेट उतरला होता. ग्रामविकास, धर्मजागरण, सद्भावना आणि समरसता हे विषय या माध्यमातून स्वयंसेवकांनी पुढे नेण्यास सुरुवात केली. अनेक स्वयंसेवकांना आणि समाजातील सहभागी होऊ इच्छिणार्या घटकांना यामुळे काम करण्याची संधी मिळत होती.
 
तरीसुद्धा समाजातील अनुकुलतेला राजकीय परिवर्तनाची आवश्यकता होती. कारण, काही गोष्टी खूप टोकाला जाण्यास सुरुवात झाली होती. काश्मीरचा भूभाग भारतापासून स्वतंत्र करण्याचा मनसुबाच तत्कालीन सरकारने घेतला होता. रामजन्मभूमीचालढा जाणीवपूर्वक न्यायालयीन प्रक्रियेत अडकवला गेला होता. व्यापारासाठी रामसेतू उद्ध्वस्त करण्याची तयारी चालवली जात होती. अतिरेक्यांचे उदात्तीकरण होत होते आणि त्यातून अतिरेकी कारवाया वाढत होत्या. अंतर्गत आणि बाह्यसुरक्षा अशा दोन्ही दृष्टीने देश संकटात होता.
 
संघाचा राजकीय परिवर्तनापेक्षा समाज परिवर्तनावर विश्वास आहे, पण प्रसंगी देशहितासाठी संघाची भूमिका लवचिक बनू शकते, हे एकदा १९७७ साली संघाने दाखवून दिले होते आणि आपल्या शक्तीचा प्रभाव दाखवून दिला होता. वरील सर्व पार्श्वभूमीवर जेव्हा २०१३ची निवडणूक आल्यावर पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सर्वांनी मतदान करावे आणि १०० टक्के मतदानासाठी स्वयंसेवकांना प्रबोधन करण्याचा मंत्र दिला. कुठल्याही नेत्यांचे किंवा पक्षाचे नाव न घेता केलेले आवाहन आणि त्यासाठी आखलेली योजना अभूतपूर्व ठरली. मतदानाची टक्केवारी प्रचंड वाढली आणि देशाच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण बहुमताने काँग्रेसतर सरकार सत्तेत आले. हेच नाही तर २०१९ला अधिक बहुमताने मोदी सरकार निवडून आले.
 
बर्याच वेळा संघाच्या अनुकूल काळाची सांगड राजकीय परिवर्तनाच्या घटनेशी जोडली जाते, पण वस्तुस्थिती तितकी योग्य नाही. कारण, मुळात संघाने अथक प्रयत्नांतून आपल्या कार्यपद्धतीत बदल करताना दाखवलेला लवचिकपणा त्यातून समाजमानसात झालेला बदल आणि संघाच्या विचारविश्वातून प्राणवायू घेत संघ स्वयंसेवकांनी उभी केलेल्या विविध क्षेत्रांचा पडलेला प्रभाव, याचा स्वाभाविक परिणाम राजकीय परिवर्तनात झाला आहे.
 
संघाने राजकीय परिवर्तनात महत्त्वाची भूमिका बजावली, असे सकृतदर्शनी दिसत असले तरी आणि ते काही प्रमाणात सत्य असले, तरी संघ त्यातच गुंतून राहिलेला नाही. संघाचे ध्येय देशाला परम वैभवाला नेण्याचे आहे आणि ते सत्तेच्या बळावर नव्हे तर समाज शक्तीच्या बळावर होय. म्हणूनच गेल्या दहा वर्षांत संघाने अधिक गतिमान होत संघकार्य पुढे नेले आहे. समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रांतील अनेक मान्यवर लोकांना भेटण्याचा नित्यक्रम संघाने सुरू केला आहे. प्रचार विभागाच्या पुढाकारातून सर्व प्रकारचे माध्यमे हाताळली जात आहेत. विविध सेवाकार्ये आणि प्रकल्प समाज परिवर्तनाचे काम करत आहेत. गतिविधीमध्ये उल्लेख केलेल्यांव्यतिरिक्त कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, जलसंधारण, गोविज्ञान असे विविध विषय हाताळले जात आहेत. या सर्व कामांतून संघ आता ग्रामीण, शहरी अशा सर्व भागात अराष्ट्रीय वृत्तींना आव्हान देत उभा ठाकला आहे. गेल्या ९७ वर्षांत अनेक चेहरे, नाव नसलेल्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमातून उभा राहिलेला संघ हा खर्या अर्थाने देशाच्या केंद्रस्थानी आला आहे.
 
पण, या सर्व परिस्थितीमध्ये संघाला केवळ स्वतःचा उदो उदो करण्यात बिलकुल स्वारस्य नाही. काश्मीरचा सुटलेला काही अंशी प्रश्न, राममंदिर निर्मितीचे, दृष्टिपथात आलेले स्वप्न, देशात ‘आत्मनिर्भर भारता’च्या दृष्टीने चाललेली वाटचाल हे सर्व स्वयंसेवकांना आणि नेतृत्वाला समाधान देणारे असले, तरी अजून बराच पल्ला गाठायचा आहे, याची संघ नेतृत्वाला जाणीव आहे. ‘ब्रेकिंग इंडिया’वर काम करणार्यांनी अजून हार मानलेली नाही, हे अलीकडील ‘पीएफआय’वरील करवाईतून उघडकीस येणार्या गोष्टीतून सिद्ध होत आहे. राष्ट्रविरोधी शक्ती या देशात अजून अस्तित्वात आहेत आणि त्यांना तर काही आंतरराष्ट्रीय समुदयाकडून पण आता पुरस्कृत केले जात आहे. शहरी माओवाद देशात पसरत आहे. काही ‘विद्रोही’ म्हणवणार्या आणि वैचारिक आव आणणार्या चळवळी समाजातील अनुसूचित जाती, जनजाती यांच्यात चुकीची कथन प्रस्तुत करून त्यांना राष्ट्रीय प्रवाहापासून तोडण्याचे काम करत आहेत. देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा बिघडवण्यात धन्यता मानणारे राजकीय पक्ष दुर्दैवाने देशहितापेक्षा तात्कालिक राजकीय फायद्याचा विचार करत आहेत.
 
यादृष्टीने येणारे संघाचे शताब्दी वर्ष आणि देशाच्या स्वातंत्र्याची शतकपूर्ती या दोन्ही गोष्टी देशाला, समाजाला आणि संघाला अत्यंत महत्त्वाच्या आहेत. क्रिकेटच्या भाषेत १९वे षटक सुरू झाले आहे. संघाला पुढील काळात सर्व समाजाला बरोबर घेऊन ही वाटचाल करायची आहे. त्यामुळे एकांगी टीका करणारे किंवा ज्यांची राजकीय गरज म्हणून संघाला शिव्या-शाप देणारे सर्व मंडळींनी प्रामाणिकपणे संघकार्य समजून घेण्याची गरज आहे. ९७ वर्षांची वाटचाल हा काही केवळ योगायोग नाही, तर राष्ट्र आराधनेचा अखंड धगधगणारा यज्ञ आहे, ज्या यज्ञाच्या ज्वाळातून संपूर्ण आसमंत हे भारून गेले आहे. त्यात राष्ट्रविरोधी विषारी कीटकांचे नष्ट होणे अपरिहार्य आहे. आपण आपल्या परीने या यज्ञात समिधा वाहण्यास सिद्ध होऊया!
रवींद्र मुळे