सुखी परिवार मंत्र

    दिनांक : 01-Oct-2022
Total Views |
सुखी परिवार मंत्र
 
आपल्या कुटुंबव्यवस्थेची पायाभरणी वेदकाळापासून झालेली आहे. तिची सांस्कृतिक मुळे फार खोलवर गेलेली आहेत. सुदृढ कुटुंब कसे असते, कसे निर्माण होते, याची अनेक आख्याने महाभारतात आहेत. भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनचरित्रातही अशी अनेक उदाहरणे आहेत. या लेखात भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील एका प्रसंगाचा आपल्याला विचार करायचा आहे.
 
 
 
 

kutumb vyavastha 
 
 
 
राजकीय बातम्या वाचून वाचून वाचकांना कंटाळा येतो, म्हणून अधूनमधून माध्यमे काही कौटुंबिक बातम्यादेखील पेरीत असतात. त्यांची शीर्षकेदेखील सनसनाटी असतात. ‘पत्नीने प्रियकराच्या मदतीने नवर्याचा काटा काढला, आरोपी अटकेत’, ‘विवाहिता प्रियकरासोबत पळून गेली, तिचा शोध चालू आहे’, ‘नवरा बायकोने कट करून सासू-सासर्यांना विहिरीत ढकलून दिले, तपास चालू आहे’, ‘चहा वेळेवर दिला नाही म्हणून नवर्याने बायकोच्या डोक्यात वरवंटा मारला’ अशी ही या बातम्यांची शीर्षके असतात. अशा बातम्या सनसनाटी बातम्या ठरतात.
 
माध्यमांचा स्वभावदेखील सनसनाटी बातम्या शोधण्याचाच असतो. ‘पत्नीने काटकसर करून नवर्याबरोबर संसार केला. मुलांना चांगले वळण लावले - पत्नी वियोगाने पतीचे निधन-सासू सासरे आणि वडिलधार्यांची मनोभावे सेवा करणारी सून’ अशा बातम्या जवळजवळ नसतात. समाजात जे अभावाने घडते, त्याची बातमी होते आणि जे नित्य घडते आणि ज्याचा प्रभाव असतो, त्याची बातमी कुणी करीत नाही. म्हणूनच एकतर माध्यमांनी सुधारले पाहिजे किंवा आपण त्यांना सुधरवले पाहिजे.
 
आपली समाजव्यवस्था कुटुंबप्रधान आहे. सर्वांनी एकत्रित राहणे, सुख-दु:खं वाटून घेणे, परस्परांविषयी विश्वासाच्या वातावरणाचे जतन करणे, ही आपल्या कुटुंबव्यवस्थेची वैशिष्ट्ये. युरोपियन देशांमध्ये आपल्यासारखी कुटुंबव्यवस्था नाही. व्यक्तिस्वातंत्र्याच्या अफाट कल्पनांमुळे घटस्फोटांचे प्रमाण भीतिदायक असते. घटस्फोट, कुटुंबाचे विच्छेदन करते आणि मुलांवर फार वाईट संस्कार करते. हे घटस्फोटाचे वारे आपल्या देशातही मागील दाराने शिरलेले आहे. त्याने धोकादायक पातळी जरी गाठली नसली, तरीही काळजी करावी, असे त्याचे प्रमाण आहे.
 
आपल्या कुटुंबव्यवस्थेची पायाभरणी वेदकाळापासून झालेली आहे. तिची सांस्कृतिक मुळे फार खोलवर गेलेली आहेत. सुदृढ कुटुंब कसे असते, कसे निर्माण होते, याची अनेक आख्याने महाभारतात आहेत. भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनचरित्रातही अशी अनेक उदाहरणे आहेत. दुर्दैवाने आपल्याकडे भगवान गौतम बुद्धांचे वाचन फार कमी लोक करतात. जे बौद्ध झाले ते काहीतरी वाचन करीत असतील, पण अन्य लोक भगवान गौतम बुद्ध हा आपला विषय नाही, असे समजून त्याकडे पाठ फिरवतात. म्हणून या लेखात भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील एका प्रसंगाचा आपल्याला विचार करायचा आहे.
 
भगवंतांच्या चरित्रात ‘विशाखा’ या उपासिकेचा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख येतो. तिची कथा दीर्घ आहे. ही विशाखा कोशल जनपदात राहत होती. ती दिसायला अतिशय सुंदर होती. तेवढीच अतिशय बुद्धिमान होती. वयाच्या सातव्या वर्षीच तिने भगवंतांचे दर्शन घेतले. त्यांचा उपदेश ऐकला आणि ती त्यांची उपासिका बनली. ती विवाहयोग्य झाली. श्रावस्ती नगरीत मिगार नावाचा एक धनिक राहत होता. त्याला एक मुलगा होता. तोही आपल्या मुलासाठी योग्य वधूच्या शोधात होता. आजच्या काळात जसे विवाह जमविणारे असतात, तसे त्याही काळात होते. त्यांनी विशाखाला पाहिले आणि तिची परीक्षा घेण्याचे ठरविले.
 
विशाखा एका सरोवरात स्नानासाठी चालली होती. ती श्रीमंत घराण्यातील असल्यामुळे अनेक दासी तिच्या बरोबर होत्या. अचानक जोराचा पाऊस आला, वारा सुरू झाला. आडोसा शोधण्यासाठी सर्व दासी पळाल्या. विशाखा मात्र पावसाचा मारा झेलत, ताठपणे सरोवराकडे चालत निघाली. मिगारचे दूत जवळच उभे होते. त्यांनी विशाखाला विचारले, “दासींबरोबर तू का नाही पळालीस, कपडे ओले झाले नसते.” विशाखा म्हणते, “मी एवढ्यासाठी पळाले नाही की, पावसामुळे जमीन निसरडी होते, पाय घसरून पडायला होते. हात-पाय मोडण्याची, डोकं फुटण्याची शक्यता असते, अविवाहित मुली विक्रीसाठी ठेवलेल्या सामानासारख्या असतात. त्यांचा अंगभंग होऊन चालत नाही आणि चेहर्यावर जखमा होऊन चालत नाही.”
 
मिगार सेठला हा सर्व वृत्तांत समजतो. तो आपल्या मुलासाठी तिला मागणी घालतो. रितीप्रमाणे लग्न होते. विशाखाचे पिता तिला धनाने भरलेल्या 500 बैलगाड्या आणि पशुधनाच्या 500 बैलगाड्या भेट देतात. वाजगाजत तिची मिरवणूक जाते. लोकही तिला अनेक वस्तू भेट देतात. ती त्या सर्व वस्तू दान करून टाकते. सासरी जात असताना विशाखाचे पिता तिला उपदेश देतात.
या उपदेशाची दहा कलमे आहेत, ती अशी -
 
1. घरातली आग बाहेर घेऊन जाऊ नये.
2. बाहेरील आग घरात आणता कामा नये.
3. घेतलेली वस्तू जो परत करील त्यालाच वस्तू द्यावी.
4. घेतलेली वस्तू जो परत करीत नाही, त्याला वस्तू देऊ नये.
5. जो काही भेटवस्तू देतो, त्याला परतफेड करावी.
6. जो काही देणार नाही, त्यालाही द्यावे.
7. प्रसन्नतापूर्वक घरात बसावे.
8. प्रसन्नतापूर्वक खावे-प्यावे.
9. अग्नीचे रक्षण करावे.
10. गृहदेवतांचा सन्मान करावा.
 
विशाखाने हा उपदेश संसारी जीवनात तंतोतंत अमलात आणला. घरातली आग बाहेर घेऊन जाऊ नये, म्हणजे घरातील वादविवाद बाहेरच्या लोकांना सांगू नयेत. असे केले तर आपलीच बदनामी होते. तसेच बाहेरची आग घरात आणू नये, याचा अर्थ शेजार्यापाजार्यांची भांडणे आपल्या घरात आणू नयेत. संसारी माणसाकडे काही वस्तू मागायला शेजारी येतात. काहीजणांचा स्वभाव ते परत न करण्याचा असतो. अशा माणसांना अजिबात देऊ नये. जो काही भेटवस्तू देतो, त्याची परतफेड करावी.
 
परंतु, काहीजणांची ऐपत भेटवस्तू देण्याइतकी नसते, अशांनाही आपण काहीतरी द्यावे. ज्या आसनावर घरातील ज्येष्ठ मंडळी बसतात. म्हणजे सासू-सासरे, ज्येष्ठ मंडळी वगैरे त्यांच्या आसनावर बसू नये. का बसू नये, तर ते आले की आसन सोडावे लागते. म्हणून जिथून आपल्याला कुणी उठवणार नाही, अशा ठिकाणी प्रसन्नतापूर्वक बसावे.
 
प्रसन्नतापूर्वक खावे-प्यावे, म्हणजे कुलवधूने घरातील सगळ्यांचे भोजन झाल्यावर शांतचित्ताने भोजन करावे. छोट्या-मोठ्या कारणावरून घरात भांडणे होतात. भांडणाच्या ठिणगीची आग होणार नाही, याची काळजी कुलवधूने घ्यायची असते. गृहदेवता म्हणजे सासू-सासरे, अतिथी, अशा सर्व मंडळींचा सन्मान करावा. या नियमांचे पालन केले असता, घर उत्तम चालते आणि कुलवधू सर्वांना जोडणारी आणि सर्वांची प्रिय होते. भगवंतांच्या चरित्रात ‘हे माझे व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, हा माझा अधिकार आहे,’ अशा प्रकारची भाषा नाही, ही आपल्या संस्कृतीची भाषा नाही.
 
या नियमांची कसोटी घेणारा एक प्रसंग विशाखाच्या जीवनात येतो. तिचे सासरे मिगार हे नग्न जैन साधूंचे उपासक होते. ते घरी आले असता, त्यांचा सत्कार सुनेने करावा, असे त्यांनी सांगितले. विशाखाने ते नाकारले. ही तिची स्वतंत्र बुद्धी आहे. ती म्हणाली की, “नग्न साधूंकडे मी पाहणारदेखील नाही. मला त्यांची घृणा येते.” एके दिवशी मिगार सेठजी भोजन करीत होते आणि भिक्षापात्र घेऊन एक बौद्ध भिक्खू दारात आला. त्याकडे मिगार सेठने पाहिलेदेखील नाही. विशाखा सासर्यांना जेवण वाढत होती, ती भिक्खूला म्हणाली, “तू दुसरीकडे जा, माझे सासरे शिळे अन्न खात आहेत.”
 
विशाखाचे हे बोल ऐकून मिगार संतापले. ही सून उद्धट आहे आणि तिला तिच्या माहेरी पाठवून दिले पाहिजे, असा त्यांनी आदेश दिला. विशाखा म्हणाली, “जोपर्यंत माझा अपराध सिद्ध होत नाही, तोपर्यंत मी जाणार नाही.” विशाखा अशी तेजस्वी होती. पंचासमोर तिची सुनावणी होते. विशाखा म्हणते की, “माझे सासरे शिळे अन्न खात आहे, असे मी म्हणाले हे खरे आहे. पण त्याचा अर्थ असा होतो की, माझे सासरे जुने पुण्य खात आहेत, नवीन पुण्य जोडत नाहीत. दानधर्म करीत नाहीत.” पंच म्हणाले, “विशाखाचे हे बोलणेे शहाणपणाचे आहे.”
 
नंतर विशाखाने पित्याने सांगितलेल्या दहा नियमांचे विवरण केले आणि हे नियम मी कसे पालन करते हे सांगितले. त्यावर पंच म्हणाले, “मिगार सेठ अशी सून भाग्यानेच मिळते.” मिगारचा राग शांत झाला. नंतर विशाखा म्हणाली की, “माझ्या काही अटी आहेत.” (सासर्यांना अटी घालण्याइतकी धीट होती.) ती म्हणाली की, “मी नग्न साधूंना नमस्कार करणार नाही. मी बौद्ध उपासिका आहे. भगवान गौतम बुद्धांना मला घरी भोजनास बोलावयाचे आहे.”
 
मिगार सेठने तिच्या अटी मान्य केल्या. भगवंत तिच्या घरी भोजनास आले. कुणाच्याही घरी भगवंत फुकट जेवत नसत. भोजनानंतर त्यांनी धर्मोपदेश केला. तो ऐकून मिगार सेठ यांच्यात आमूलाग्र परिवर्तन झाले. त्यांना असे वाटले की, आपला पुनर्जन्म झाला. विशाखाला ते म्हणाले, “तू माझी सून नसून, तू माझी माता आहेस, तुझ्यामुळे मला सद्धर्माची प्राप्ती झाली. आजपासून मी तुला माता म्हणणार.” अशी ही विशाखा ‘मिगार माता विशाखा’ म्हणून अमर झालेली आहे. भिक्षु संघासाठी वस्त्रदान, अन्नदान, औषधीदान तिने मरेपर्यंत केले. कुटुंबाची अभिवृद्धी करणारे तिचे दहा नियम आणि त्यांचे काटेकोर पालन ही सुखी कुटुंबाची आधारशीला आहे.