पुलवामामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश ; पाक नागरिकासह तीन दहशतवादी ठार

    दिनांक : 05-Jan-2022
Total Views |
जम्मू-: काश्मीरमधील पुलवामामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. बुधवारी सकाळी सुरू झालेल्या शोध मोहिमेनंतर चकमक सुरू झाली आणि आतापर्यंत जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना terrorists कंठस्नान घालण्यात आले आहे.
 
chakmak
 
 
 
त्यापैकी एक पाकिस्तानी नागरिक आहे. काश्मीर पोलिस महानिरीक्षकांनी सांगितले की, या दहशतवाद्यांकडून दोन एम-४ कार्बाइन आणि एक एके सीरीज रायफलसह गुन्हेगारी साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या पाचव्या दिवसांतील ही चौथी चकमक आहे. अलीकडेच दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमध्ये लष्कराने नऊ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे सदस्यही सामील होते.
दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल गुप्तचर माहितीच्या आधारे, पोलीस आणि सुरक्षा दलाच्या पथकाने बुधवारी सकाळी जिल्ह्यातील चंदगाम गावात शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनीही गोळीबार केला. दोन्ही बाजूंच्या चकमकीत एका पाकिस्तानीसह जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी मारले गेले. पोलीस महानिरीक्षक (काश्मीर रेंज) विजय कुमार यांनी जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा हे मोठे यश असल्याचे म्हटले आहे. आयजी काश्मीर यांनी ट्विट करत, "एका पाकिस्तानीसह जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी मारले गेले आहेत. दोन एम-४ कार्बाइन आणि एक एके सीरीज रायफलसह आक्षेपार्ह साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. आमच्यासाठी मोठे यश आहे," असे म्हटले आहे. दक्षिण काश्मीरमध्ये सोमवारपासूनची ही दुसरी चकमक आहे. कुलगाम जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या चकमकीत दोन स्थानिक दहशतवादी ठार झाले.