देशात कमी प्रतिसादाच्या राज्यात महिलांमध्ये ‘सहकार’अधिक सशक्त करणार - रेवती शेंदुर्णीकर

‘सहकार भारती’च्या अखिल भारतीय महिला प्रमुख रेवती शेंदुर्णीकर यांचे ‘तरूण भारत’ भेटीत प्रतिपादन

    दिनांक : 05-Jan-2022
Total Views |
जळगाव : जिल्ह्यात तसेच राज्यात गेल्या १५ ते २० वर्षांपासून सहकार क्षेत्र अनेक कारणांनी माघारले आहे. सहकार क्षेत्रात उद्योग असोत किंवा पतसंस्था वा सहकार क्षेत्राची होत असलेली पिछेहाट पाहता या क्षेत्राला उभारी देण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राप्रमाणेच देशातील अनेक राज्यात सहकार क्षेत्रात विशेषतः महिलांच्या आर्थिक संस्थांची संख्या अत्यंत मोजकी आहे. स्थानिक पातळीवर त्या राज्यांचे कायदे आहेत. सहकार क्षेत्रात जेथे महिलांची संख्या कमी आहे, तेथे ती वाढवून सहकाराचे जाळे अधिक सशक्त करण्याचा आणि त्यासाठी सर्वदूर प्रवास करण्याचाही संकल्प असल्याची भावना उद्यमी महिला पतपेढीच्या माजी अध्यक्षा आणि ‘सहकार भारती’च्या ‘अखिल भारतीय महिला प्रमुख’ रेवती शेंदुर्णीकर यांनी ‘तरूण भारत’ भेटीत व्यक्त केली.
 
 
Revati Shendurnikar
 
मंगळवार ४ जानेवारी रोजी त्यांनी ‘तरूण भारत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी सहकार्‍यांशी त्यांनी संवाद साधला. निवासी संपादक दिनेश दगडकर आणि व्यवस्थापक मनोज महाजन यांनी त्यांचे स्वागत केले.
 
अर्थपुरवठ्यातून चालते कामकाज
 
अनेक कारखाने, लघुउद्योग वा गृहउद्योगांसह सर्वसामान्यांना अर्थपुरवठा लघु, मध्यम वा दीर्घ मुदत परतफेडीच्या तत्वानुसार केला जातो. लघुउद्योजक वा सर्वसामान्यांनी घेतलेले कर्ज थकविल्याने अर्थव्यवस्थेची चक्रं डळमळीत होतात. काही वर्षांपूर्वी जळगावकरांनी याचा अनुभव घेतला आहे. यातून सावरण्यासह सहकार क्षेत्र मजबूत होणे आवश्यक आहे. यातून सावरण्यासाठी आता केंद्र सरकारच्या पातळीवरून ठोस नियंत्रण आणले गेले असून त्यादृष्टिने सहकार विभाग स्वतंत्र करण्यात आला आहे. या सहकार मंत्रालयाची जबाबदारी अमित शहा यांच्याकडे देण्यात आली असून ‘सहकार भारती’ने या निर्णयाचे उत्स्फूर्तपणे स्वागतही केले आहे. असे रेवती शेंदुर्णीकर यांनी सांगितले.
 
विद्यार्थी दशेपासून प्रारंभ
 
मी संगमनेर, जि.अहमदनगर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना विद्यार्थी परिषदेचे कार्य करीत होते, असे सांगून त्या म्हणाल्या की, नगर येथील विजय मोघे, विलास पाटील आणि मुंबई येथील दत्ता गोखले असे सहकारी मित्र होते. 1990 मध्ये विवाहानंतर जळगावला आले. त्यानंतर 1993-94 दरम्यान महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा एक प्रयत्न म्हणून ‘उद्यमी’ महिला नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. यात परिषदेच्या पूर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येवून पतसंस्थेची स्थापना केली. यात हेमाताई अमळकर, स्नेहा भुसारी, स्मिताताई वाघ, डॉ.तिलोत्तमा गाजरे, माधवी जहागिरदार, सावित्रीताई सोळुंखे यांच्या माध्यमातून उद्यमी महिला पतसंस्थेचा व्यवहार आणि विस्तारही वाढविण्यात आला. पहिल्या वर्षी व्यवस्थापकीय संचालक तर नंतरच्या काळात उपाध्यक्षा आणि १४ वर्षे अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळल्याचे त्यांनी सांगितले.
 
डॉ.अविनाश आचार्य सहकार क्षेत्रातील आदर्श नेतृत्व
 
सहकार क्षेत्रातील कामकाज आणि सर्वसामान्यांना येणार्‍या अडचणींविषयी बोलतांना त्या म्हणाल्या की, गेल्या 15-20 वर्षात जिल्ह्यासह राज्यात बर्‍याच पतसंस्था डबघाईला येत अखेर बुडाल्या. अनेक पतसंस्थांमधील ठेवीदारांनी ठेवी परत घेतल्या. त्याचा परिणाम पतसंस्थांवर झाला. परंतु जळगावातील विशेषतः महिलांसाठी व बचत गटांच्या माध्यमातून गृहोद्योग वा लहान व्यावसायिकांना पतपुरवठा करणार्‍या उद्यमी महिला पतसंस्थेला मात्र कोणतीही अडचण आली नाही. एकाही ठेवीदाराने आपली रक्कम परत मागितली नाही. यातून पतसंस्थेवरील त्यांचा विश्वासच दिसून आला. कारण या पतसंस्थेला ‘सहकार भारती’चे पूर्व अध्यक्ष डॉ.अविनाश आचार्य (दादा) तसेच सहकार क्षेत्रातील आदर्श नेतृत्व असलेल्या संजय बिर्ला यांचे पाठबळ होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली उद्यमी महिला पतसंस्थेने आपला कार्यविस्तार करीत व्यवसायही वाढविला, असेही त्यांनी सांगितले.
 
महिला सदस्यांकडेच कर्ज परतफेडीची जबाबदारी
 
बचत गटातील सदस्यांनी केलेली बचत व त्यातूनच इतरांना गृहोद्योग वा अन्य व्यवसायासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. बचत गटातील प्रत्येक सदस्याला घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याच्या जबाबदारीसह कायदेशीर बाबींची जाणीव करून दिली जात असल्याने उद्यमी महिला पतसंस्था आज नावारूपाला आलेली आहे, असे सांगून शहरातील अनेक महिला बचत गटांना कर्जपुरवठा केल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः खंडेराव नगर परिसरात 60 ते 70 बचत गट आहेत. यातील महिला बचत गट प्रमुख शारदाबाई आणि लताबाई असो वा अन्य प्रमुख महिला असो, या सर्व महिलांनी त्यांच्या बचत गटातील महिलांच्या कर्जाची वेळेत परतफेडीची जबाबदारी घेतली आहे. महिला बचत गट वा अन्य बचत गट यात किरकोळ भाजी विक्रेते, पानटपरीचालक, रिक्षाचालक तसेच अन्य लहान व्यावसायिकांना अर्थसहाय्य केले जाते. तसेच वेळेत कर्जफेड करणार्‍या सदस्यांना कर्जमर्यादा वाढवून दिल्याचेही त्यांनी सांगितले.
 
असा वाढला विस्तार
 
शहरातील विशाल प्लास्टिक परिसरातील इमारतीत उद्यमी महिला पतसंस्थेचे कार्यालय सुरु झाले. तेव्हा एकच कर्मचारी होता. आज कार्यालयात ५ जण कार्यरत आहेत. पतसंस्थेचे २० जण संचालक, तर १८०० च्यावर सभासद असून उद्यमी महिला पतसंस्थेचा कारभार शहर परिसरापर्यंतच मर्यादित ठेवण्यात आला आहे. बचत गटाच्या सदस्यांना सुरूवातीला नियमांची जाणीव करून देत १० ते २० हजार मर्यादेपर्यंत कर्जपुरवठा व्हायचा. आता ही मर्यादा वाढल्याचे त्या म्हणाल्या.
 
दोन वर्षापूर्वी कोरोना संसर्गकाळात कर्ज परतफेडीसह व्यवहाराला काहीसा अडथळा निर्माण झाला होता. प्रसंगी जवळच्या संबंधित तसेच ओळखीच्या एक-दोन घटना वगळता कर्जवसुलीस त्रास झाला होता. परंतु बहुतांश ठिकाणी ओळखीच्या माध्यमातून तसेच सामजिक समन्वयातून संपर्क साधत व्यवहार सुरळीत करता आले. लहान कर्जदारांच्या कर्जवसुलीत मात्र कुठलाही अडथळा आला नसल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. सुरूवातीला कर्जवसुलीसाठी ५ ते ६ जणांचा गट जात असे. परंतुु कालांतराने कर्मचारीवर्ग सक्षम झाल्याने आता कर्जवसुलीस जाण्याची वेळ येत नाही, असेही त्यांनी सांगितले.
 
‘सहकार भारती’च्या अखिल भारतीय महिला प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळणार्‍या रेवती शेंदुर्णीकर या शहरातील उद्यमी महिला पतसंस्थेच्या संचालिका असून गेल्या 25 वर्षांपासून सहकार क्षेत्रातील विविध सहकारी बँका, बचत गट, महिला बचत गटांच्या माध्यमातून कामकाज वा गृहोद्योग करणार्‍या महिलांना येणार्‍या अडचणींबाबत त्या मार्गदर्शन व प्रशिक्षण देतात. ‘सहकार भारती’शी गेल्या १० ते १२ वर्षांपासून त्या संलग्न असून सहकार क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. यापूर्वी त्या बचतगट राष्ट्रीय सहप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत होत्या. यासोबतच शहरातील शिक्षण प्रसारक मंडळाच्या समन्वयिका तसेच सुरभि महिला मंडळाच्या उपाध्यक्षा आणि उद्यमी पतसंस्थेच्या संचालिकाही त्या आहेत.
 
कुटुंबातील सदस्यांचेही संपूर्ण सहकार्य
 
देशपातळीवर बहुतांश ठिकाणी ‘सहकार भारती’चे कार्य असून २६ राज्यात ते प्रगतीपथावर आहे. लखनौ येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनप्रसंगी या सर्व राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ‘सहकार भारती’चे कार्य विस्तार, संवाद आणि संपर्क वाढविणार असून महिलांचे प्रबोधन केले जाईल. ‘सहकार भारती’ परिवारात पदाची जबाबदारी सांगून नव्हे, तर सोपवली जाते. अखिल भारतीय स्तरावर ही माझी पहिलीच मोठी जबाबदारी आहे. देशपातळीवर वा अन्य ठिकाणचे दौरे पाहता घरातील सर्व सदस्यांचे सहकार्य मिळत असल्यानेच मी हे कार्य करु शकले, याची जाणीव आहे. मी आवश्यकतेनुसार कामांचा प्राधान्यक्रम ठरविते. कौटुंबिक जबाबदारी सांभाळूनच हे कार्य करणार आहे. आता दुर्लक्षित असलेल्या महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे स्वप्न असल्याचेही ‘सहकार भारती’च्या अखिल भारतीय महिला प्रमुख रेवती शेंदुर्णीकर यांनी शेवटी नम्रपणे नमूद केले.