आई-वडिलांचा आशीर्वाद, मेहुण्यांचे सहकार्य आणि भाईजींची साथ ठरली व्यवसायवाढीसाठी पूरक

अमळनेर येथील सुरेश इलेक्ट्रिकलचे संचालक सुरेश हिरालाल झाबक यांनी उलगडले आपल्या यशाचे रहस्य

    दिनांक : 31-Jan-2022
Total Views |
मंत्र  यशाचा
 
 
आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही ही खूणगाठ मनाशी बांधून मी सुरू केलेला छोटासा व्यवसाय कसा वटवृक्षात रूपांतर झाला याची कहाणी आणि संघर्षशील प्रवासाचा अनुभव सांगताना सुरेश झाबक भूतकाळात हरवले होते.
 
 
zhabak 
 
एका सर्वसाधारण परिवारात जन्म घेतलेल्या सुरेश हिरालाल झाबक यांनी मोठ्या मेहुण्यांच्या मदतीने प्रारंभी शेतीपयोगी साहित्याचे दुकान सुरू केले. आईकडून मिळालेली छोटीशी रक्कम घेऊन त्यांनी व्यवसायात उडी घेतली. सकाळी पाच वाजता उठणे, जळगावला जाणे,तेथून उधारीवर सामान आणणे आणि ते एका रिक्षात टाकून खेडोपाडी जाऊन त्याची विक्री करणे असा तेव्हा त्यांचा दिनक्रम होता.
 
मेहुण्यांची मदत
 
आपला आजवरचा व्यवसायाचा प्रवास सांगताना सुरेश म्हणाले की, मला पाईप-कपलिंग याचं काहीच म्हणजे काहीही ज्ञान नव्हतं. परंतु मोठे मेहुणे आणि मुंदडा भाईजी यांनी मुलासारखं प्रेम करून व्यवसायात आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या अशी दोन्हीप्रकारे सदैव साथ दिली,मदत केली. पुढे काही वर्षातच मोठ्या मेहुण्यांचे निधन झाले आणि माझ्या आयुष्यात जणू अंधःकार पसरला. कारण त्यांच्या मृत्यूने मला प्रत्येक गोष्टीसाठी समर्थन आणि मार्गदर्शन करणारं छत्र हरपलं होतं. 
 
भाईजींनी दिली साथ
 
मेहुण्यांच्या निधनानंतर आता पुढे कसे होणार?असा विचार करीत असतांना मुंदडा भाईजी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. तसे त्यांच्याशी आधीपासून व्यावहारिक संबंध होतेच. त्या संबंधांसोबतच त्यांच्याशी सामाजिक आणि परिवारिक संबंधही जुळले आणि मला जणू पाठबळ मिळाले असे सांगून सुरेश म्हणाले की, तेव्हापासून अडचण कुठलीही असो - भाईजी माझ्यासाठी मार्गदर्शक बनले ते कायमचे.
 
कौटुंबिक साथ महत्वाची
 
आपल्या कुटुंबातील सदस्यांची साथ मिळाली तर आपण कुठल्याही अडचणींवर मात करू शकतो असा माझा अनुभव असल्याचे सांगून सुरेश म्हणाले की,आमच्या परिवारात पत्नी हेमलता हिचा नेहमीच मोठा आधार राहिला आहे. आजवर जीवनाच्या लहान - मोठ्या कुठल्याही यश -अपयशांमध्ये नेहमी साथ देणारा चेहरा म्हणजे ती. मोठा मुलगा केतन आणि सून संजना पुण्याला राहतात. लहान मुलगा श्रीपाल आणि लवकरच आमच्या परिवारात सामील होणार असलेली भावी सून चैताली माझा व्यवसाय सांभाळतात. श्रीपालसाठी नेहमीच आर्थिक आणि मानसिक आधार असतो तो केतनचाच असे त्यांनी अभिमानाने सांगितले.
 
व्यवसायात माणसांची साथ मोठी असते. काही अपवाद वगळता संपूर्ण स्टाफ सोळा-सतरा वर्षांपासून तोच आहे, असेही ते म्हणाले.
 
टी पार्टीत सुटायचे प्रश्न
 
मी व्यवसाय सुरू केला तेव्हा दुकान उघडण्यापूर्वी आम्ही सर्व दुकानदार एकत्र चहा घेत चर्चा करायचो.त्यातून आमचे बरेचसे प्रश्न मार्गी लागायचे असे सांगून सुरेश म्हणाले की, ती टी- पार्टी फारच मजेशीर असायची.सर्व प्रश्न, समस्या, अडचणींवर मार्ग तिथेच निघायचा. त्यातून अनेकांना सावरता येण्यासाठी बळ मिळायचे अशा शब्दात सुरेश झाबक आपल्या त्या काळातील प्रवासाचे वर्णन करतात.
 
 
 प्रामाणिकपणाचे फळ मिळतेच 
कुठलेही काम किंवा कुठलाही व्यवसाय प्रामाणिकपणे केला तर त्यात हमखास यश मिळतेच असे सांगून सुरेश झाबक म्हणाले की, व्यवसाय चक्र दिवसेंदिवस गती धरत होतं. आयुष्य आणि व्यवसायही नवनवीन वळणं घेत होतं. हीच बाब डोळ्यापुढे ठेवून व्यवहार करीत होतो. सचोटी आणि प्रामाणिकपणा जोपासत होतो. त्यातून गुणाधारित शेती आणि शेती सामुग्रीसाठी ’ सुरेश इलेक्ट्रिकल’ हे शेतकर्‍यांसाठी भरवशाचे ठिकाण आणि दुकान ठरले. ग्राहकांची संख्या वाढली. कारण आपल्या दुकानातून कुणी रिकाम्या हाताने जाऊ नये असाच प्रयत्न होता. त्यासाठी सर्व मोठमोठ्या एजन्सी घेतल्या. आज सर्व नामांकित कंपन्यांसाठी सुरेश इलेक्ट्रिकल हे एक भरवशाचे ठिकाण झाले असून जैन, सुप्रीम, टेक्समो ,फालकन, ईगल, आशीर्वाद अशा सर्व नामवंत कंपन्यांचा अधिकृत वितरक झालो आहे असे त्यांनी अभिमानाने सांगितले. यामुळे कोरडवाहू शेतकरी आम्ही बागायतदार बनवू लागलो. शासनाच्या सर्व योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहचवू लागलो. ग्राहकांचा एवढा विश्वास वाढला की, संपूर्ण व्यवसाय तालुक्यापर्यंतच मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्यात पोहोचला असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.