ब्रिटनमधील शिखांचा मोदींना पाठिंबा

    दिनांक : 18-Jan-2022
Total Views |
लंडन : खलिस्तान्यांनी गेल्या काही दिवसांपासून मोदींविरोधातील हालचाली वाढविल्या असून, काही दिवसांपूर्वीच पंजाबमध्ये मोदींच्या जिवाला धोका निर्माण करण्यात आला होता.

Modi 
 
या कुरापती करणार्‍या खालिस्तान्यांना लंडनमधील शीख बांधवांनी विरोध दर्शविला असून, पंतप्रधान मोदींविषयी खुलेआम समर्थनाची भावना जाहीर केली आहे.
 
लंडन हे समृद्ध शिखांचे ठिकाण मानले जाते. शीख फॉर जस्टिस या खालिस्तान्यांच्या संघटनेला आजवर लंडनमधून बळ मिळाले आहे. मात्र, यावेळी खालिस्तान्यांच्या भारतविरोधी आणि विशेषत: मोदीविरोधी हालचालींमुळे ब्रिटनमधील शिखांनी खालिस्तान्यांपासून फारकत घेतल्याचे चित्र आहे. येथील गुरुद्वारांमध्ये शीख समुदायाच्या नेत्यांनी खालिस्तानी अपप्रचार आणि त्यांच्या कुरापतींचा जोरदार निषेध केला. एवढेच नाही तर, या समुदायाने मोदींनी शिखांसाठी राबविलेल्या योजनांसाठी त्यांचे आभारही मानले आहेत. मोदींनी 26 डिसेंबर रोजी वीर बाल दिवस साजरा करण्याचा निर्णयही प्रशंसनीय असल्याचे या शीख बांधवांनी म्हटले आहे.
 
आता खालिस्तान्यांच्या विघातक मनसुब्यांनाही शीख बांधवांनी नीट ओळखले असून, वेळोवेळी लंडनमध्ये पोलिस कारवाईदरम्यान हे सिद्धही झाले आहे. वेगळे शीख राष्ट्र व्हावे, या उद्देशाने खालिस्तान्यांनी आयोजित केलेल्या स्थानिक कार्यक्रमांनाही अन्य शीख बांधवांनी अजिबात प्रतिसाद दिलेला नाही.