राष्ट्र प्रेमाचा उत्कट अविष्कार – दैशिकशास्त्र !

    दिनांक : 12-Jan-2022
Total Views |
स्वामी रामकृष्णांच्या मृत्युनंतर, वर्षा – दोन वर्षातच, स्वामी विवेकानंद, परिव्राजक म्हणून भारत भ्रमणासाठी निघाले. प्रयाग, वाराणसी करत ते आजच्या उत्तराखंडात असलेल्या ‘अल्मोडा’ ह्या गावी आले. स्वामीजी तेंव्हा विवेकानंद झालेले नव्हते. अर्थात प्रसिध्द ही झालेले नव्हते. तोपर्यंत ‘रामकृष्ण मठाची’ स्थापनाही झालेली नव्हती. त्यामुळे स्वामीजींचा मित्र परिवारही अर्थातच नव्हता.
 
svami
 
 
अल्मोडाला स्वामीजी लाला बद्री सहा ‘टुलघारी’ या गृहस्थांच्या घरी उतरले. हे तरुण गृहस्थ शासकीय सेवेत चांगल्या हुड्द्यावर होते. आणि त्यांना आध्यात्माची आवड होती. स्वामीजी त्यांच्या घरी पाच – सहा दिवस होते. त्या घरी बद्री सहांची पूजा – अर्चा बघून स्वामीजी त्यांना म्हणाले की ‘आजच्या काळात ईश्वराच्या पूजेचं हे आडंबर माजवणं योग्य नाही. आज गरज आहे देश सेवेची. हा ईश पूजेचा वेळ आपल्या मातृभूमीसाठी दिला पाहिजे.
 
यावर बद्री सहा त्यांना म्हणाले, “स्वामीजी, तुमच्या बाकी सर्व गोष्टी मला पटतात. पण ही देवपूजेची गोष्ट मला पटत नाही. ही राष्ट्रभक्ती वगैरे सर्व ठीक आहे. पण देवाची पूजा म्हणजे देवाचीच पूजा. आपल्या ऋषी मुनींनी तसं आपल्याला सांगुनच ठेवलंय.” यावर स्वामीजी म्हणाले, “आपल्या ऋषी मुनींनी आपल्याला सांगितलंय की आपल्या मातृभूमीची पूजा ही सर्वश्रेष्ठ पूजा.” सहांनी विचारलं, “असं कुठं लिहिलंय..?”
 
यावर स्वामीजींनी त्यांना धडाधड वेदांतील ऋचा म्हणून दाखवल्या, ज्यात मातृभूमीच्या प्रेमाची सूक्तं होती. वेद, उपनिषद, पुराणं ह्या सर्वात देश प्रेमाची अनेक सूक्तं आहेत. लाला बद्री सहांनी ही सारी माहिती टिपून ठेवली. पुढे अनेक वर्षांनी, अर्थात स्वामीजींच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी (सन १९१० च्या आसपास) बद्री सहा जी प्रयाग आणि वाराणसीला जाऊन राहिले. तेथील विद्वानांना त्यांनी, त्यांच्या जवळ ची सर्व टिपणं दाखविली, आणि त्या आधाराने आपल्या वेद, उपनिषद, पुराणांतील संदर्भ काढले. आणि लाला बद्री सहा टुलघारी जी अक्षरशः थक्क झाले, हे सर्व बघून..! त्यांना दोन गोष्टींचं प्रचंड आश्चर्य वाटलं. पाहिलं म्हणजे, स्वामी विवेकानंदांना ही सूक्तं, ह्या ऋचा, हे श्लोक, इतक्या लहान वयात (१८९० मध्ये, अल्मोड्याच्या पहिल्या भेटीत, स्वामींचं वय २७ वर्ष होतं) कसे काय मुखोद्गत होते..? आणि दुसरं म्हणजे, आपल्या पूर्वजांनी, ऋषी – मुनींनी देशप्रेमाचा केवढा मोठा वारसा आपल्यासाठी ठेवलाय..!
 
ह्या सर्वांवरून प्रेरणा घेऊन, बद्री सहांनी ह्या सुक्तांना, ऋचांना, श्लोकांना संकलित करून, एक पुस्तक तयार केलं – ‘दैशिक शास्त्र’. अर्थात देश प्रेमाचं शास्त्र. ह्या पुस्तकाला लोकमान्य टिळकांचे आशीर्वचन ही मिळाले. मात्र टिळकांच्या महानिर्वाणाच्या वर्षातच, अर्थात १९२० मधे हे पुस्तक प्रकाशित झाले.
 
पुढे अनेक वर्षांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे’ द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजी ह्यांच्या माध्यमातून हे पुस्तक जनसंघाच्या दीनदयाळ उपाध्याय यांच्या जवळ पोहोचले. दीनदयाळजींनी ‘एकात्म मानव दर्शन’ ह्या सिद्धांताची रचना करताना ह्या ‘दैशिक शास्त्र’ ग्रंथाच्या सहाय्याने ‘चिती’ आणि ‘विराट’ ह्या कल्पना मांडल्या. त्यांच्या मते प्रत्येक राष्ट्राची एक ‘चिती’ (स्वत्व, अस्मिता) असते. हि चिती जर प्रज्वलित केली तर त्या राष्ट्राचे ‘विराट’ स्वरूप प्रकट होते.
 
अर्थात मातृभूमी संबंधी, आपल्या देशा संबंधी विचार, आपल्या ऋषी मुनींनी फार आधीच करून ठेवला होता. ‘राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती म्हणजेच परमपिता परमेश्वराची पूजा, हे समीकरण त्यांनी हजारो वर्षांपूर्वीच मांडलं होतं.
 
आणि गंमत म्हणजे, जगाच्या इतिहासात कुठेही, अगदी कुठेही हे असं ‘उत्कट राष्ट्रभक्तीला ईश पूजेशी जोडणं’ आढळत नाही. आपल्या देशाचं हे वैशिष्ठ्य आहे. आणि म्हणूनच मातृभूमीची स्तवनं आपल्याला आपल्या धर्मग्रंथांमध्ये, वेदांमध्ये, उपनिषदं – पुराणांमध्ये जागो जागी सापडतात.
 
अथर्व वेदाच्या पृथ्वी सूक्ता मधे मातृभूमी संबंधी उत्कट अविष्कार दिसतो –
 
 
यत् ते भूमे विखनामि क्षिप्रं तदपि रोह तु I
मा ते मर्म विमृग्वरि मा ते हृदयर्पिपम II
 
अर्थ – हे मातृभूमी, ज्या जागेवर मी (माझ्या फायद्या साठी), खनिज शोधण्यासाठी, खोदतोय, ती लवकरच प्राण तत्वाने भरून जाईल. माझ्या ह्या कृतीमुळे, हे माते, तुझ्या मनाला, तुझ्या हृदयाला कुठलीही जखम झाली तर मला फार जास्त वाईट वाटेल.
 
याच सूक्तातला दुसरा मंत्र आहे –
 
इन्द्रो यां चक्र आत्मने 'नमित्रां शचीपतिः ।
सा नो भूमिर् वि सृजतां माता पुत्राय मे पयः ॥१०॥
 
अर्थ – शचीपती इंद्राने ज्या मातृभूमीला शत्रुंपासून मुक्त केलेले आहे, ती माझी मातृभूमी मला (तिच्यातील खनिज, द्रव्य देऊन) जणू काही लहान मुलाप्रमाणे तिचा पान्हा मला देईल.
 
आपल्या पूर्वजांनी पृथ्वीला ‘भूमाता’ म्हटले आहे. या सर्वव्यापी पृथ्वीवर तो जिथे राहतो, तिथे ‘मातृभूमी’ म्हटले आहे.
एक आणखी मंत्र आहे -
 
अहमस्मि सहमान उत्तरो नाम भूम्याम्‌।
अभीषाडस्मि विश्वाषाडाशामाशां विषासहिः।।
 
अर्थ – मी माझ्या मातृभूमी साठी सर्व प्रकारचा त्रास सहन करायला, कष्ट भोगायला तयार आहे. मी (तिच्या आशिर्वादाने) सर्व दिशांना विजय प्राप्त करेन.
 
अथर्ववेदात पुढे लिहिलंय –
 
यद् वदामि मधुमत तद वदामि यदिक्षे तद वनन्ति मा ।
त्विषीमानस्मि जूतिमानवान्यान हन्मि दो धत : ।।
 
अर्थ – मी माझ्या मातृभूमीच्या हिताचंच बोलेन. जे काही करायचं आहे, ते मातृभूमीला वैभव प्राप्त करून देण्यासाठीच करेन.
या ‘पृथ्वी सूक्ताच्या’ शेवटच्या भागात म्हटले आहे -
 
दीर्घं न आयु: प्रतिबुध्यमाना
वयं तुभ्यं बलिहृत: स्याम II ६२ II
 
अर्थ – आम्हाला दीर्घायुष्य मिळो. आम्हाला श्रेष्ठ ज्ञान मिळो आणि मातृभूमीसाठी आवश्यकता पडल्यास देह अर्पण हो.
ऋग्वेदात ही मातृभूमीच्या सेवे संबंधी लिहिले आहे -
 
उप सर्प मातरं भूमिमेताम् । (ऋग्वेद : १०/१८/१०)
 
अर्थ - हे माणसा, तू ह्या मातृभूमीची सेवा कर.
 
यजुर्वेदात उल्लेख आहे –
 
नमो मात्रे पृथिव्यै नमो मात्रे पृथिव्यै । (यजुर्वेद : ९/२२)
 
अर्थ - मातृभूमि ला आमचा नमस्कार असो. वारंवार नमस्कार असो.
वयं राष्ट्रे जागृताम पुरोहिताः । (यजुर्वेद : ९/२३)
 
अर्थ – आम्ही आमच्या राष्ट्राचे बुद्धिमान नागरिक, आपल्या राष्ट्राच्या हितासाठी सदैव जागृत राहू.
 
आमच्या पुराणांमध्ये ही राष्ट्र भावना जागृत करणारे अनेक उल्लेख आढळतात. ‘विष्णु पुराणात’ लिहिले आहे – “सहस्त्रावधी जन्मानंतर भारतवर्षात जन्म मिळतो. येथे जन्मलेल्या लोकांनाच स्वर्ग आणि मोक्ष मिळतो.” ब्रम्हपुराणाचा २७ वा अध्याय तर ‘भारतवर्षानुकीर्तनम’ याच नावाने प्रसिध्द आहे. यात लिहिले आहे, “जे नरश्रेष्ठ भारतात जन्म घेतात, ते धन्य होत. देवांची सुध्दा या भूमीवर जन्म घेण्याची तीव्र इच्छा असते. या भारत भूमीचे संपूर्ण वर्णन करणे कोणाला तरी शक्य आहे का..? ‘वायु पुराणात’ ही अश्याच आशयाचे वर्णन येते.
 
एकुणात काय, तर जगातल्या अद्वितीय अश्या हिंदू धर्माने आम्हाला ‘राष्ट्र सर्वप्रथम’ ह्या सिद्धांतानुसार जगायला शिकवले. जेंव्हा, जेंव्हा आम्ही हा मंत्र विसरलो, तेंव्हा तेंव्हा आमची मातृभूमी पराधीन झाली, आम्ही गुलाम झालो.
 
अर्थात, आमच्या राष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग आहे – ‘राष्ट्र सर्वप्रथम’ हा मंत्र..!
 
- प्रशांत पोळ