आझाद हिंद फौजेतील महान वीरांगना सरस्वती राजमणि

    दिनांक : 11-Jan-2022
Total Views |
राजमणिचा असीम त्याग पाहून नेताजींनीच तिला ‘सरस्वती’ हे नाव दिले. नेताजींनी तिला आझाद हिंद सेनेतील ‘झाशी राणी रेजिमेंट’मध्ये सहभागी करून घेतले. ‘झाशी रेजिमेंट’मधील सर्वात कमी वयाची गुप्तहेर म्हणजे सरस्वती राजमणि! आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शौर्यगाथेचे केलेले हे स्मरण...

Saraswati-Rajmani
 
इतिहासाची पाने उलटल्यावर अशा प्रकारचा भास होतो की, पराक्रमाचा इतिहास केवळ पुरुषांनीच घडविला आहे. शौर्यगाथेवर हक्क केवळ पुरुषांचाच... पण, असे का? इतिहास लेखणीसुद्धा पुरुषप्रधान संस्कृतीची गुलाम झाली आहे का?हीच अनुभूती इतिहासवाचनातून येत असेल, तर इतिहासकारांना महिला उपेक्षा मान्य आहे, असेच म्हणावे लागेल. आपल्या कानावर आणि डोळ्यावर विश्वास बसणार नाही, असे अभूतपूर्व पराक्रम महिलांनी गाजविले आहेत.दि. ११ जानेवारी, १९२७ रोजी रंगूनमध्ये एका अत्यंत गर्भश्रीमंत तामिळी कुटुंबात सरस्वती राजमणि या कन्येचा जन्म झाला. हे कुटुंब मूळचे तामिळनाडूमधील त्रिचीचे. रंगूनला स्थायिक झाल्यावर ते आर्थिकदृष्ट्या खूप संपन्न झाले. त्यांच्या मालकीची एक सोन्याची खाण होती.सर्व प्रकारची सुखसमृद्धी, ऐश्वर्य पायावर लोळण घेत असताना भारतमाता मुक्तीचे स्वप्न पाहणारे हे कुटुंब होते. महात्मा गांधी जेव्हा राजमणि कुटुंबाला भेट देण्यासाठी एकदा त्यांच्या घरी गेले, तेव्हा ही दहा वर्षांची कन्या बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण घेत होती. तेव्हा महात्मा गांधींनी प्रश्न विचारला, “तुला बंदूक प्रशिक्षणाची आवश्यकता का वाटते?” त्यावर जराही विचलित न होता ही शूर कन्या म्हणाली, “इंग्रजांना मारण्यासाठी, आणखी कशासाठी?” हे उत्तर ऐकून गांधीजी क्षणभर स्तंभित झाले. परंतु, त्यांनी तिला समज देण्याचा प्रयत्न केला. “मुली, हिंसा हे पाप आहे. हा अमानवी विचार तू डोक्यातून काढून टाक!” तेव्हा तिचे उत्तर होते, “इंग्रज हे आमच्या घरात घुसलेले दरोडेखोर आहेत. त्यांना अहिंसेने उत्तर आम्ही का द्यावे? अहिंसेने उत्तर दिल्यामुळे ते जातील हा आमचा भ्रम आहे.”
एका दहा वर्षांच्या मुलीने स्वातंत्र्यलढ्यातील एका महात्म्याला दिलेलं उत्तर इतिहासात सुवर्ण अक्षरांनीलिहून ठेवावं आणि प्रत्येक भारतीयाने चिरकाल स्मरणात ठेवावं, असचं आहे. ही कन्या असं बाणेदार उत्तर देऊ शकली याचं महत्त्वाचं कारण तेव्हाच्या परिस्थितीत हे कुटुंब अत्यंत प्रगत विचारांचे आणि प्रचंड देशप्रेमी होते. स्त्री स्वातंत्र्याचा विचार करून ते स्वातंत्र्य देणारे कुटुंब होते. वयाच्या १६व्या वर्षी नेताजींची ओजस्वी वाणी, देशप्रेम, संघटनकौशल्य, आत्मसमर्पण आणि ब्रिटिशांविरुद्ध ठाम भूमिका या सर्व अष्टपैलू गुणांनी प्रभावित होऊन तिने आपले सर्व दागिने आझाद हिंद सेनेला दान केले. ही मुलगी खूप लहान असल्यामुळे तिने कदाचित हा निर्णय भावनेच्या भरात घेतला असेल, असे नेताजींना वाटले. खात्री करून घेण्यासाठी त्यांनी राजमणि परिवाराला भेट दिली. त्यावेळेस तिने तो निर्णय अतिशय विचारपूर्वक घेतला होता, हे नेताजींच्या निदर्शनास आले. तिच्या वडिलांनी तिचा उत्साह वाढविला. राजमणिचा असीम त्याग पाहून नेताजींनीच तिला ‘सरस्वती’ हे नाव दिले. नेताजींनी तिला आझाद हिंद सेनेतील ‘झाशी राणी रेजिमेंट’मध्ये सहभागी करून घेतले. ‘झाशी रेजिमेंट’मधील सर्वात कमी वयाची गुप्तहेर म्हणजे सरस्वती राजमणि!
 
"Live History India' या वृत्तपत्राच्या एका लेखानुसार जेव्हा आझाद हिंद सेना इंफाळ कोहिमाच्या उत्तर पूर्व भागाकडे कूच करीत होती, तेव्हा ‘झाशी राणी रेजिमेंट’ उत्तर बर्मातील म्यामो भागात पाठविली होती. त्या तुकडीत सरस्वती राजमणि आणि त्यांच्या एक महिला सहकारी होत्या. त्यांचे नाव दुर्गा. त्यांना ब्रिटिश मिल्ट्री कॅम्पमध्ये गुप्त जासुसी मिशनवर जायचे होते. मिशन सफलतेसाठी त्यांनी आपले केस कापले. ब्रिटिश कॅम्पमध्ये पोहोचून ब्रिटिश स्त्रियांचे कपडे धुणे, बूट पॉलिश करणे, याशिवाय पडेल ते काम करून सर्व इत्थंभूत माहिती गोळा केली. एक वेळ अशी आली की, सरस्वती पकडले जाण्याची शक्यता होती. त्यामुळे दुर्गाला तिथेच सोडून त्यांना तिथून निघावं लागलं. याचा अर्थ त्यांनी हार मानली होती किंवा आपल्या सहकारी मैत्रिणीला वार्‍यावर सोडून त्यांनी फक्त स्वतःला वाचविण्यासाठी तिथून पळ काढला होता, असा भाग मुळीच नव्हता. त्यानंतर त्यांनी एका नृत्यांगनेचा वेष परिधान करून कॅम्पमध्ये प्रवेश मिळविला. बेमालूम नृत्य सादर करून सैनिकांना नशिले पदार्थ खाऊ घालून बेशुद्ध केले आणि आपल्या मैत्रिणीला सोडवून आणले. पकडल्या गेलेल्या अवस्थेत दुर्गाला तिथेच ठेवणे हे अत्यंत धोक्याचे होते. कारण, तिला शारीरिक-मानसिक त्रास देऊन आझाद हिंद सेनेची गुप्त माहिती ब्रिटिश सैनिकांनी काढून घेऊ नये, हाच त्यांचा हेतू होता.आझाद हिंद सेनेचा एकूणच लढा धोक्यात येता कामा नये, हा त्यांचा उदात्त हेतू त्यामागे होता.त्यासाठी या वीरांगनेने केलेले साहस भावी पिढ्यांनी आपल्या काळजात कोरून ठेवावे, असेच आहे.
 
ब्रिटिश कॅम्पमधील पहारेकर्‍यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी गोळी चालविली. राजमणिचा पाय रक्तबंबाळ झाला. ब्रिटिश सैन्याच्या तावडीत आपण सापडू नये, यासाठी या वीरांगनेने एका वृक्षावर लपून बसण्याचा निर्णय घेतला. तीन दिवस ब्रिटिश सैन्याचे ‘सर्च ऑपरेशन’ चालले त्या जखमी अवस्थेत राजमणि आपल्या मैत्रिणीला घेऊन वृक्षावर होत्या.वृक्षाश्रयाने दोघीही ब्रिटिश सैन्याला हुलकावणी देण्यात यशस्वी झाल्या. पण, तीन दिवस गोळी पायात होती. जखमेवर कोणताच इलाज होऊ शकला नाही. त्यानंतर त्या आझाद हिंद सेनेच्या कॅम्पवर पोहोचल्या. वेळेवर शुश्रूषा होऊ शकली नाही, त्यामुळे त्यांना कायमचे अपंगत्व आले. या वीरांगनेचा पराक्रम आणि देशप्रेम पाहून नेताजींना गहिवरून आले. त्यांच्या साहसाचे मूल्य लक्षात घेऊन नेताजींनी त्यांना ‘चीफ ऑफ स्टाफ’ या पदावर नियुक्त केले.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी त्यांचा त्याग, समर्पण खूप मोलाचे आहे. १९५७ साली रंगूनमधून त्या भारतात त्रिचीला आल्या. भारत सरकारकडून त्यांची प्रचंड उपेक्षा झाली. त्यांना निवृत्ती वेतन मिळवून घेण्यासाठी खूप त्रास झाला. चेन्नईला स्थायिक झाल्यावर १९७१ मध्ये त्यांना व आझाद हिंद सेनेतील सैनिकांना निवृत्ती वेतन मिळणे सुरू झाले. स्वतंत्र भारतामध्ये आझाद हिंद सेनेच्या सैनिकांच्या त्यागाचे मूल्य समजण्यासाठी भारत सरकारला तब्बल २५ वर्षं लागावी? तोपर्यंत किती ढोंगी स्वातंत्र्यसैनिक कागदी घोडे नाचवून सर्व सोयी सवलती लाटण्यात यशस्वी झाले होते? भ्रष्ट, स्वार्थी व द्वेषी शासनयंत्रणेने धन्याला धतुरा आणि चोरांना हा मलिदा वाटला!
 
२००५ पर्यंत सरस्वती राजमणि यांना फक्त एका खोलीच्या छोट्या घरात वास्तव्य करावे लागते, याची लोकप्रतिनिधींना खेद किंवा खंत वाटली नाही. हा बेशरमशाहीचा कळस आहे.आपल्या जीवाचे रान करून, गोर्‍यांशी झुंज देणार्‍या या विरांगनेने दि. १३ जानेवारी, २०१८ लाशेवटचा श्वास घेतला. ९१ वर्षांचे दीर्घ आयुष्य या विरांगनेला मिळाले. पण, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांचीझालेली उपेक्षा लक्षात घेतल्यावर ज्या क्रांतिकारकांनाअल्पवयात वीरमरण आले, त्यांचा त्यांना हेवा वाटत असावा. स्वातंत्र्य व प्रजासत्ताक दिनीही फक्त चार आघाडीच्या नेत्यांचाच जयजयकार केला जातो, असे किती तरी अंधारात असलेले क्रांतिकारक आहेत, ज्यांचा नामोल्लेख ही होत नाही. समर्पित जीवन जगणार्‍या किती तरी वज्रसमिधा आहेत, त्या आमच्यासाठी अनभिज्ञ आहेत. अशाच अज्ञात क्रांतिकारकांच्या यादीत सरस्वती राजमणि आहेत. ज्यांनी स्वकर्तृत्वाने सुभाषबाबूंसारख्या नेत्यांना आणि सर्व आझाद हिंद सेनेला थक्क करून सोडले होते. एक स्त्री एवढे अचाट शौर्य गाजवू शकते? या प्रश्नांनी कितीतरी महाभाग अस्वस्थ होत होते. पुरुषी सामर्थ्याचा त्यांचा अहंकार गळून पडत होता.
 
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सरस्वती राजमणिसारख्या अनभिज्ञ वीरांगनेचे स्मरण करून त्यांच्या ऋणात राहणे आम्हाला शक्य व्हावे?
 
- प्रा. वसंत गिरी