भारतीय संस्कृतीनिष्ठ विचारवंत - पं.दीनदयाळ उपाध्याय

    दिनांक : 24-Sep-2021
Total Views |
सनातन भारतीय परंपरेला तत्त्वज्ञान, अर्थ आणि संस्कृतीशी जोडणारे थोर मानववादी विचारवंत म्हणजे पं. दीनदयाळ उपाध्याय. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर, १९१६ रोजी उत्तरप्रदेशच्या मथुराजवळील नगला चंद्रबन येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भगवतीप्रसाद उपाध्याय आणि आईचे नाव रामप्यारीदेवी होते. वडील भगवतीप्रसाद हे रेल्वेत स्टेशन मास्तर होते तर आई एक धर्मपारायण गृहिणी होती. त्यांना एक लहान भाऊ होता-ज्याचे नाव शिवदयाळ होते. त्याला प्रेमाने ‘शिबु’ म्हणायचे.
 
वडिल नोकरीनिमित्त नेहमी बाहेरच राहायचे म्हणून त्यांनी दीनदयाळ आणि शिवदयाळ या भावंडांना त्यांच्या आगरा जिल्ह्यातील ‘गुड की मढई ’ येथील आजोळी पाठवून दिले. दोन-अडीच वर्षाचे असतांना त्यांची पैतृक गावाशी जी नाळ तुटली ती नंतर कधीच जुळली नाही. आजोळी मात्र त्यांचे कष्टाचे आयुष्य सुरु झाले. त्यांच्या जागी अन्य कुणी असता तर जगलाच नसता, पण ते मात्र ठाम होते. अशा कठीण परिस्थितीत त्यांचे व्यक्तिमत्व तापून-सुलाखून सोन्यासारखे उज्ज्वल आणि चारित्र्यसंपन्न बनले. त्यांनी कष्ट आणि मृत्यू अगदी जवळून बघितले. तीन वर्षांचे असतांना त्यांचे वडील भगवती प्रसाद निवर्तले. आपल्या आईचे वैधव्य आणि आपल्या तरुण मुलाच्या जाण्याने हतबल झालेल्या आजोबांचे दुःख त्यांनी अगदी जवळून पाहिले. आई हे दुःख सहन करू शकली नाही आणि तिला क्षय रोगाने ग्रासले. सात वर्षाचे असतांना त्यांचे मातृ छत्रही हरवले. जणु ईश्वर त्यांच्या दुःखाची परीक्षाच घेत होता, पण अजून परीक्षा संपली नव्हती, काही वर्षांनी त्यांचे आजोबाही (आईचे वडिल) गेले.
 
dinadayal_1  H
 
अशा स्थितीत त्यांच्या मामीने त्यांचा आईसारखा सांभाळ केला. एके दिवशी काही दरोडेखोर त्यांच्या घरी आले आणि लहानग्या दीनदयाळला खाली पाडून त्याच्या छातीवर पाय ठेवून घरातला दाग-दागिना मागू लागले. त्यावर खाली पडलेल्या दीनदयाळने हिमतीने त्यांना म्हटले की ‘मी तर ऐकले होते की दरोडेखोर धनाढ्यांना लुटतात आणि गरिबांना मदत करतात, पण तुम्ही तर आम्हा गरिबांनाच लुटत आहात’ हे ऐकून ते दरोडेखोर तसेच माघारी परतले होते. ते पंधरा वर्षांचे असताना त्यांचा शेवटचा आधार म्हणजे त्यांच्या मामींचेही निधन झाले. एवढ्यावरही नियतीचा शेवटचा डाव बाकी होता-अठरा वर्षाचे होता होता लहान भाऊ शिवदयाळचेही निधन झाले. आता मात्र यमाकडेही हिसकावण्यासारखे काही उरले नव्हते.
 
दीनदयाळजींचे प्राथमिक शिक्षण राजस्थानमध्ये सीकर येथे झाले, ते लहानपणापासूनच अतिशय हुशार विद्यार्थी होते. मॅट्रिकमध्ये ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले तेव्हा सीकर संस्थानचे राजे कल्याण सिंह यांनी त्यांना सुवर्ण पदक प्रदान केले होते. १९३७ मध्ये त्यांनी पिलानी येथून बोर्डाची परीक्षा सर्व विषयांमध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण केली. ते बोर्डातही प्रथम आले होते. पुढे त्यांनी बी.ए. करण्याकरिता कानपूरच्या सनातन धर्म कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि नंतर सेंट जोन्स कॉलेज आग्रा येथून इंग्रजी विषयात एम.ए. ची पदवी संपादन केली.
 
दीनदयाळजींचा पिंड पत्रकारितेचा होता आणि ती पत्रकारिता व्यावसायिक नसून सामाजिक अधिक होती. त्यांनी १९४० मध्ये ‘राष्ट्रधर्म’हे मासिक, त्यानंतर ‘पाञ्चजन्य’ हे साप्ताहिक आणि पुढे ‘स्वदेश’ नामक दैनिकाचा प्रारंभ केला. ’पाञ्चजन्य’ मध्ये ते ‘पॉलिटिकल डायरी’ नावाचे सदर लिहायचे. त्यात नेहरूंच्या काळातल्या काही धोरणांवर कडाडून टीका करायचे, पण त्यांच्या भाषेचा दर्जा मात्र कधी खालावला नाही. पत्रकारितेत त्यांचा एकच नियम होता-‘बातमीला कधीही विकृत करु नका’ आणि हा नियम त्यांनी आयुष्यभर पाळला.
 
१९५१ मध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली आणि दीनदयाळजी जनसंघाचे पहिले महासचिव झाले. १९६७ पर्यंत ते या पदावर होते. त्यांच्या कामाचा आवाका खूप मोठा होता. ते सतत प्रवास करायचे. लोकांना भेटायचे, ते कार्यकर्त्यांना सहज उपलब्ध असायचे. पक्षाच्या प्रत्येक बैठकीत त्यांनी सादर केलेले रिपोर्ट अतिशय अभ्यासपूर्ण आणि वास्तववादी असायचे. इतकेच नव्हे तर ते पक्षाला पुढे नेण्यासाठी मार्गदर्शक असायचे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी अभिमानाने सांगायचे की-जर माझ्यासोबत फक्त दोन दीनदयाळ राहिले तर मी भारतीय राजकारणाचा चेहरा-मोहरा बदलू शकतो. पण दुर्दैवाने १९५३ मध्ये डॉ.मुखर्जी यांचे अकाली निधन झाले आणि संघटनेची संपूर्ण जबाबदारी दीनदयाळजींच्या खांद्यावर आली. ती त्यांनी समर्थपणे पेललीही. कारण डॉ.मुखर्जींच्या निधनानंतर राजकारणात अशी चर्चा होऊ लागली होती की, आता जनसंघ संपला. पण झाले उलटेच. त्यानंतरही जनसंघाने उत्तरोत्तर प्रगतीच केली.
 
त्या काळात त्यांचा नेहरूंच्या काही योजनांना विरोध होता तरी त्यांनी कधीही अपमानास्पद टीका केली नाही, पत्रकारांनी विचारल्यावर म्हणायचे ‘आम्ही जरी विरोधक असलो तरी ते कुठल्या पक्षाचे नसून आम्हा सर्वांचे पंतप्रधान आहेत. आम्ही टीका करुच पण मर्यादा ओलांडणार नाही.’ ते खर्‍या अर्थाने भारतीय लोकशाहीला स्वच्छ आणि पारदर्शक ठेवण्याचे समर्थक होते. त्यांच्या मते, भारतीय राष्ट्रवाद प्राकृतिकरित्या लोकशाहीवादीच आहे. वैदिक सभा आणि समित्यांचा आधार लोकशाहीवादी होता, मध्य युगातील बरीच राज्ये लोकाशाहीवादीच होती. लोकशाही जरी बहुमताच्या आधारे चालते तरी अल्पमताला बाजुला ठेवून कुठलेही काम होत नाही .
 
ब्रिटीश गेल्यानंतर भारत आपल्या परंपरेनुसार आपले शैक्षणिक धोरण आखण्यात अपयशी ठरला. त्यांचे मत होते की, युवकांना मतदानाचा अधिकार देणे एक मोठे पाऊल आहे आणि आपण लोकशाहीच्या प्रगतीसाठी हे लोकांना व्यवस्थित समजावले पाहिजे. जातीभेद आणि अस्पृश्यतेने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. इंग्रजी शिक्षणाने चुकीचे नितीमुल्य शिकवले आहे. समाजात शिस्त आणि आत्मसंयमाचा अभाव झाला आहे. आम्ही भारतीयांना योग्य नितीमूल्य शिकविले पाहिजे तसेच त्यांना काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या देशाच्या एकतेबद्दल जागृत करायला हवे.
 
पं. दीनदयाळजी भारतीय स्वातंत्र्याचा आधार त्याच्या संस्कृतीला करण्याचे इच्छुक होते त्यांनी पाश्चात्य देशांच्या राष्ट्र, लोकशाही व धर्मनिरपेक्षता सारख्या संकल्पनांचे भारतीयकरण केले. त्यांची मान्यता होती की लोकशाही पाश्चात्यांनी दिलेली भेट नसून भारतीय राष्ट्रीयतेची प्रकृती लोकशाहीवादीच आहे. दीनदयाळजी म्हणायचे की ‘सामाजिक मूल्यांची निर्मिती शिक्षण आणि चांगल्या वागण्यामुळे होते. लोकशाहीने आपल्या मर्यादा ओळखल्या तर ती कधीही लोकमताच्या विरोधात जाणार नाही.’
 
दीनदयाळजींनी भारतीय सनातन विचारधारेला युगानुरूप ‘एकात्म मानववाद’ सारखी पुरोगामी विचारसरणी दिली. त्यांच्या मते, आर्थिक प्रगतीचे मुख्य उद्दिष्ट सामान्य माणसाचे सुख आहे, ते म्हणतात ‘भारतात राहणारा आणि भारताबद्दल आपुलकीची भावना ठेवणारा मानवी समूह एक व्यक्ती आहे आणि त्यांची जगण्याची पद्धत, कला, साहित्य, तत्त्वज्ञान हे सगळं मिळुन भारतीय संस्कृती होय. म्हणून भारतीय राष्ट्रवादाचा आधार संस्कृती आहे. या संस्कृतीवर निष्ठा राहील तेंव्हाच भारत एकात्म राहील.’
 
त्यांच्या चिंतनाचा कळस म्हणजे ‘एकात्म मानववाद’ (खपींशसीरश्र र्कीारपळीा) यातील काही ठळक मुद्दे -
 
१) आपल्या ’राष्ट्रीय ओळख’ (छरींळेपरश्र खवशपींळींू) बद्दल आपण विचार केला पाहिजे, त्याच्याशिवाय स्वातंत्र्याला काहीही अर्थ नाही.
२) राजकारणातील संधिसाधूपणा लोकांचा राजकारणावरील विश्वास कमी करतो.
३) पाश्चात्य विज्ञान आणि पाश्चात्य जीवन पद्धती या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत, पाश्चात्य विज्ञान हे वैश्विक असुन आपल्याला प्रगती साधायची आहे तर त्याला आपण जीवनात आत्मसात केले पाहिजे. पण हीच बाब पाश्चात्य जीवनपद्धती आणि नितीमूल्यांबद्दल लागू होत नाही .
४) मानवी ज्ञान हे सामाईक संपत्ती आहे.
५) राष्ट्रीय आणि मानवी दृष्टिकोनातून आपण भारतीय संस्कृतीच्या सिद्धांतांचा विचार केला पाहिजे.
६) रिलिजन आणि धर्म या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. भारतीय संस्कृतीत रिलिजन आणि धर्म समानार्थी होऊ शकत नाही.
त्यांनी बरीच पुस्तके लिहिलीत जी आजही लोकशाहीला मार्गदर्शक ठरतात -
१) अखंड भारत क्यों. २) जगद्गुरू शंकराचार्य. ३) सम्राट चंद्रगुप्त. ४) भारतीय अर्थनीती : विकास की दिशा.
५) राष्ट्र जीवन की समस्याएँ. ६) एकात्म मानववाद. ७) पॉलिटिकल डायरी.
८) राष्ट्र चिंतन. ९) राष्ट्र जीवन की दिशा.
 
११ फेब्रुवारी १९६८ रोजी रेल्वेने प्रवास करतांना त्यांचा मृतदेह मुगलसराय रेल्वे स्टेशनजवळ आढळून आला आणि देशात एकच खळबळ उडाली होती. भारतीय लोकशाहीचा खंदा पुरस्कर्ता, भारतीय राष्ट्रवादाचा अभ्यासक आणि भारताच्या एका संस्कृतीनिष्ठ विचारवंताने या जगाचा निरोप घेतला होता.
                                                                                                                         
डॉ. पुरुषोत्तम पाटील
 
पं. दीनदयाळ उपाध्याय अध्यासन,
कवयित्री बहिणाबाई चौधरी
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ , जळगाव
मो. ९३२६२०३२७७