भाद्रपदाचा महिना आला... आम्हा मुलींना आनंद झाला...

    दिनांक : 21-Sep-2021
Total Views |
कालच बाप्पाचं विसर्जन झालं आणि मनातलं दुःख कमी व्हायला भुलाबाईचं आगमन झालं... भुलाबाई म्हणजे पार्वती, जगन्माता अदीपराशक्ति. भूमीसारखी सर्जनशील म्हणून ती माता भुवनेश्वरी.या भूमीच्या सृजनशीलतेचा खेळोत्सव म्हणजे भुलाबाई. भूमी आणि परम प्रकृतिस्वरूपा पार्वती मातेचा सर्जनोत्सव.असं मानल्या जातं की, पार्वती भिल्लीनीच्या रूपामध्ये पती शिवशंकर महादेवासोबत माहेरी येते.माहेरच्या लोकांसोबत भेट घेते आणि सम्पूर्ण वातावरण आपल्या आगमनाने उल्हसित करते.मुलीच्या आगमनाने आई -वडील आणि सगळे माहेरचे आनंदाने भारावून जातात आणि याला उत्सवाप्रमाणे साजरा करतात.तिच्यासाठी विविध पक्वान्न आणि खेळ खेळल्या जातात, मुली, बायका गाणी म्हणतात.
 
Bhulabai_1  H x 
 
एका माहेरवाशिणीच्या आगमनासाठी म्हणून शिवशक्तीची ही पूजा. एकप्रकारचा सुफलन विधी. भूलोबा हे सदाशिवाचे प्रतीक .या पूजेत खेळोत्सवात शिवशंकराची फक्त हजेरी असते. एखाद्या जावयाप्रमाणे.
 
भुलाबाईची गाणी ही लोकगीतांचा अमूल्य असा ठेवाच आहे. भुलाबाईच्या गाण्यातून लोकजीवन रेखाटलेलं जाणवतं. भाषेचाही अभ्यास होतो. यमक, मुक्तछंद आणि भाव - भावना गीतातून मांडल्या जातात. पूर्वीचं सासरपण आणि माहेरपण या गाण्यातून व्यक्त होतं. भुलाबाईची गाणी मनोरंजन म्हणून नव्हे तर ती अर्थपूर्ण लोकशिक्षण देणारं साहित्य आहे. एकत्र कुटुंबपद्धतीचा गोडवा गाण्यांमधून जाणवतो. पूर्वीच्या काळी जबाबदार्‍या सांभाळताना सुनेची होणारी दमछाक या गाण्यातून व्यक्त होते. त्यामुळेच ती माहेरी एक महिन्याकरिता येते. माहेरच्या माणसांची आपुलकी, प्रेम,स्नेह,ओलावा तिला सासरी मिळत नसल्याने माहेरपणासाठी भुलाबाई महिनाभर घरोघरी येते. सासरी गेलेली किंवा जाणारी आपली मुलगी जणू भुलाबाईच आहे या भावनेतून सासरपण भुलाबाईच्या गाण्यांतून कळतं तसं भुलाबाई आपली सखी आहे हेसुद्धा.त्यामुळे तिची आवड, बालपण, नातेवाईक, साजशृंगार, दागिने यावरही विविध गाणी गायली जातात. भुलोजींनाही मान मिळतो. आज काळानुरूप सासरवास आणि ह्या गाण्यांमध्येही खूप बदल झाले आहे.
 
तशी बंधनेही नाहीत. आज त्या सक्षम असल्या तरी बर्‍याच जणींना अशा मानसिकतेला तोंड द्यावे लागते. सासर - माहेर जोडणारी ती एक भक्कम दुवा असते. सासरी कितीही सुखात असली तरी,माहेरची ओढ कधीच कमी होत नाही. सासू - सुनेच्या नात्यातील काही कुरबुरी आणि तितकंच प्रेम, आपुलकी गाण्यातून दाखवली जाते. शिवाय नणंद - भावजय, वहिनी - दीर, सून - सासरे या सर्व नव्या नात्यांची ओळख साध्या सोप्या शब्दातून दिली जाते. हेतू एकच की, महिलांनी काही वेळासाठी तरी एकत्र येऊन विचारांची देवाण - घेवाण करावी, आपापले सुख- दुःख वातुन घ्यावे. पूर्वी भुलाबाई, मंगळागौर, हळदीकुंकू यासारखे कार्यक्रम जाणीवपूर्वक आयोजित केले जात ते यासाठीच. परंतु आता स्त्री सक्षम आहे, नोकरी किंवा इतर कुठल्याही निमित्ताने सहज एकत्र येऊ शकतात. त्यासाठी त्यांना कारणच हवं असंही नाही. म्हणूनही असेल कदाचित पण आता भुलाबाई,भोंडला, यासारखे उत्सव कमी होतात. विचारांची देवाण - घेवाणच नाही तर शारीरिक व्यायाम होऊन मन आणि शरीरावरची मरगळ दूर करणे हासुद्धा यामागे उद्देश असतो. भुलाबाईचे गाणे म्हणतांना फेर धरले जातात, टिपरीचे खेळ होतात.
 
महिनाभर हा उत्सव असतो. कोजागिरी पौर्णिमेला अंगण सजवून, रांगोळ्या काढून सर्वांच्या भुलाबाई अंगणात येतात. मुली छान नटूनथटून तयार होतात. रात्री उशिरापर्यंत खेळ चालतात.
अशीच आठवणीतली काही गाणी..
 
सा बाई सु बेलाच्या झाडाखाली महादेवा तू,
हार गुंफिला मोती गुंफला, गुलाबाचं फुल माझ्या भुलाबाईला 
या गाण्यातून सगळ्याच फुलांची ओळख होते. त्याप्रमाणेच रंगांची ओळख करण्यासाठी... 
आडवरच्या पाडवर धोबी धून धूतो बाई धोबी धून धुतो,
आमच्या भुलाबाईच्या चोळीला जांभळा रंग देतो बाई जांभळा रंग देतो... 
या गाण्यातून वेगवेगळे रंग सांगितले जातात. 
तसेच, शिंक्यातलं लोणी खाल्लं कुणी खाल्लं कुणी, तेच खाल्लं वहिनीने या गाण्यात नणंद-भावजयीच्या नात्याची ओळख आणि एकमेकांबद्दल असलेले प्रेम आणि भावना व्यक्त होतात.
 
शिवाय,
 एक लिंब झेलू बाई दोन लिंब झेलू
यासारख्या गाण्यातून संख्या ओळख होते.
अक्कण माती चिक्कण माती,
अशी माती सुरेख बाई खड्डा तो खणावा
असा खड्डा सुरेख बाई जातं ते रोवावं,
असं जात सुरेख बाई सपीटी दळावी
अशी सपीटी सुरेख बाई करंज्या कराव्या,
अशा करंज्या सुरेख बाई तबकी ठेवाव्या.
 
याप्रकारची शब्दसाठा वाढवणारी अनेक गाणी म्हटली जातात.
सासुरवाशीण सून रुसून बैसली कैसी,
यादवराया राणी घरासी येईना कैसी
या गाण्यातून नवरा-बायकोच्या नात्यातील लडिवाळ रुसव्याचं दर्शन होतं.
शिवाय, बायकांची माहेरी जाण्याची तगमग व्यक्त होणारं गाणं म्हणजे...
सासू आत्याबाई एकाव जी,
जाऊ द्या मला माहेरा माहेरा..
त्यावर सासू बाईचंही गमतीशीर आणि सुनेची उत्कटता वाढवणारं उत्तर असंच एका गाण्यातून बघायला मिळतं,
 
कारल्याची बी पेर ग सूनबाई,
मग जा आपल्या माहेरा माहेरा
मग सूनही सासूची आज्ञा पाळून बी पेरते आणि पुन्हा माहेरी जायचं म्हणते. पण खट्याळ सासू पुढे म्हणते, त्या बी ला कोंब येऊ दे, मग पान येऊ दे, फुल येऊ दे, कारलं येऊ दे, मग कारल्याची भाजी, जेवणं, अगदी भांडी घासून होईस्तोवर सुनेची उत्कटता वाढविली जाते.
 
पण, एवढं करूनही सुनेला माहेरी पाठवायला काचकूच करणारी सासू नवीन पवित्रा घेत सुनेला म्हणते,
अगं अगं सूनबाई मला काय पुसते, पूस आपल्या सासर्‍याला.. सासर्‍याला.. असं म्हणत ती सगळ्या घरातल्या लोकांना विचारते.
 
या गाण्यातून भाषेच्या व्याकरणातील यमक ह्या अलंकाराचा नकळत अभ्यास होतो.
 
खारीक खोबर्‍याचं आलं जीर्‍या मिर्‍याचं काही नाही आलं, आपडमं तापडमं चंद्राची मागे पडली बेलाची
बाळ लेकरू राजाच सीताबाई रामाची,
पार्वती शंकराची पाळणा हाले झुईझुई,
तामण बाई तामण असं कसं तामण
भुलोजीला लेक झाला नाव ठेवा वामन,
अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता
भुलोजीला लेक झाला नाव ठेवा दत्ता,
अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती वांगी
भुलोजीला लेक झाली नाव ठेवा हेमांगी,
अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती दोरी
भुलोजीला मुलगी झाली नाव ठेवा गौरी,
अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती पणती
भुलोजीला मुलगी झाली नाव ठेवा मालती.
अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत होती घागर, भुलोजीला मुलगा झाला नाव ठेवा सागर, अडकित जाऊ खिडकीत जाऊ खिडकीतून पाय घसरला, भुलोजीला लेक झाला साखरपाना विसरला, आणा आणा परीस उगळा उगळा काथ
आज आमच्या भुलाबाईचा शेवटचा दिवस,
शेवटच्या दिवशी बाळाला टोपी मोत्यांनी गुंफली जोजोरे
बाणा बाई बाणा सुरेख बाणा, गाणे संपले खिरापत आणा, आणा आणा लवकर, वेळ होतो आम्हाला
जाऊ द्या आम्हाला, भुलाबाईचे गाणे म्हणायला ॥
 
आणि शेवटी, कोजागिरीच्या रात्री माडी पौर्णिमेच्या मुहूर्तावर ही भुलाबाई सासरी जायला निघते. आरती, हारफुल आणि शिदोरी देऊन विहीर, तलाव, नदी इथे तिचं विसर्जन केलं जातं. जातानाही तिला गाणं गावूनच निरोप दिला जातो..
 
भुलाबाई जाते सासरी, जाते तशी जाऊ द्या, ताम्हणभर पाण्यात न्हाऊ द्या, बोटभर कुंकू लावू द्या, भरजरी चोळी लेऊ द्या, खीर पोळी खाऊ द्या... असे हे सर्व सण, उत्सव अगदी अभ्यासपूर्वक आपल्या पूर्वजांनी सिद्ध केले आहेत. शारीरिक व मानसिक परिपक्वतेसाठीच. आपण फक्त समजून घेऊन त्याचा उपयोग करायचा आणि त्यातून सर्वांना आनंद वाटत आपणही आनंद घ्यायचा... चला तर, आजपासून सुरू होणार्‍या भुलाबाई उत्सवाचा आनंद घेऊया...
 
- अनघा अजय डोहोळे, जळगाव