एक सरकार, दोन नेते आणि दोन तऱ्हा

    दिनांक : 25-Aug-2021
Total Views |
ताजा कलम
 
महाराष्ट्रात सरकार एकच आहे. ते म्हणजे उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र विकास आघाडीचे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे. ‘आम्ही एकदिलाने कारभार करीत आहोत’, हे सांगताना या तिन्ही पक्षांचे नेते थकत नाहीत. पण परस्परांच्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीचा त्यांचा कार्यक्रम अधूनमधून सुरुच असतो. वास्तविक तीन पक्ष म्हटले म्हणजे तीन तऱ्हा आल्याच पण ते मान्य करायला हे पक्ष तयार नसतात. वेळ पडली तर पवारसाहेबांकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवायला मात्र विसरत नाहीत.
 
Maha vikas Aghadi_1 
 
कालची ताजीच घटना. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेची. हा मजकूर लिहितांना त्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. मजकूर प्रसिध्द होईल तेव्हा ती पूर्झलीही असेल व तिचा जो काही निर्णय व्हायचा तो झालाही असेल. पण तो प्रश्न अर्थातच नाही. एकाच विषयाकडे आघाडीतील दोन शीर्षस्थ नेते कसे पाहतात, हा मात्र निश्चितच आहे. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असल्याने ते सरकारचे शीर्षस्थ नेते तर आघाडी सरकारचे शिल्पकार म्हणून शरद पवार हेही त्याच दर्जाचे नेते. पण नारायण राणे यांच्या अटकेच्या संदर्भात त्यांची परस्परविरोधी मते पुढे आली आहेत. या अटकेबद्दल मुख्यमंत्री जाहीरपणे फारसे बोलले नसले तरी ते कृतीने भरपूर काही बोलले आहेत. वास्तविक पोलिसदल हाताळण्याची जबाबदारी गृहमंत्री या नात्याने दिलीप वळसे पाटील यांची. पण ते याप्रकरणी काही बोलल्याचे माझ्या तरी ऐकण्यात वा पाहण्यात आले नाही. तसे मुख्यमंत्रीही बोलले नाहीत.
 
पण एखाद्या केंद्रीय मंत्र्याला अटक करण्याची मोहिम मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाशिवाय राबविली जाऊ शकते यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. शिवाय विवादाचा विषयही मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेशी जोडलेला. त्यातही केंद्रीय मंत्री म्हणजे अन्य कुणी नाही तर एकेकाळचा झुंजार शिवसैनिक स्व. बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेला आणि आता भाजपाच्या खेम्यात जाऊन संघर्ष करणारा. त्याला धडा शिकविण्यासाठी जर मुख्यमंत्री सरसावले असतील तर ते स्वाभाविकच आहे. असे म्हणतात की, राणेंना अटक करण्याचा निर्णय सोमवारी रात्रीच झाला आणि ज्या निर्धाराने त्याची मंगळवारी रात्री अकरापर्यंत अंमलबजावणी झाली, त्यावरुन त्यावर शिक्कामोर्तबच होते. या संदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांचा व्हिडिओ बरेच काही सांगून जातो. अन्यथा राणेंच्या विरोधात नाशिक, महाड, संगमेश्वर आदी ठिकाणी गुन्हे नोंदविले गेलेच नसते आणि जेवत असतांना त्यांना अटक करुन पोलिसांच्या गाडीत कोंबले गेलेही नसते.
 
मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे उच्चारलेल्या वाक्यासारखेच वाक्य राणेंनी उच्चारल्यावरही त्यांना क्षमा करणे शक्यच नव्हते. अर्थात राणेच्या आणि त्याच न्यायाने मुख्यमंत्र्यांच्याही वाक्याचे समर्थन करणे शक्यच नाही. पण एकाच घटनेची आघाडी सरकारमधील दोन सर्वोच्च नेते कशी दखल घेतात हे यानिमित्ताने स्पष्ट झाले. मुख्यमंत्र्यांनी कशी दखल घेतली हे आपण काल दिवसभर पाहतच होतो. दरम्यान शरद पवारांचीही प्रतिक्रिया आली. त्यांनी राणेंचे समर्थन करणे शक्यच नव्हते आणि अपेक्षितही नव्हते.पण तरीही त्यांची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांपेक्षा वेगळी होती हे निश्चित. त्यांनी राणेंवरील संस्कारालाच दोष देण्याचा प्रयत्न केला. अर्थात ते संस्कार कुणाचे याचा खुलासा करण्याची शरदरावांना गरज वाटली नाही. त्याबाबत ज्यानेत्याने आपल्यानुसार अर्थ काढावा, अशीच त्यांची अपेक्ष असणार. पण ‘आपण अशा गोष्टींकडे फार लक्ष देत नाही’ असे सांगून त्यांनी कालच्या दिवसभरातील घटना किती अनावश्यक होत्या हे जरुर सूचित केले. उगाच नाही शरद पवारांना लोक ‘जाणता राजा’ म्हणत.
 
ल.त्र्यं.जोशी
ज्येष्ठ पत्रकार नागपूर