माहितीचा अधिकार हे सजग नागरिकांचे शस्त्र!

    दिनांक : 20-Aug-2021
Total Views |
- जाणीवपूर्वक समजून घ्याव्यात तरतुदी
 
नागपूर : माहितीचा अधिकार हा प्रत्येक सजग नागरिकाच्या हातातील शस्त्र आहे. मात्र, त्याचा उपयोग समाजाच्या चांगल्यासाठी कसा करायचा, हे समजून घेणं ही प्रत्येक सजग नागरिकाची जबाबदारी आहे. नागरिकांच्या अशा पुढाकारातून अनेक समस्या सोडविणे शक्य आहे. मात्र, हे शस्त्र नेमकेपणाने आणि अचूक कसे वापरायचे, हे समजून घेण्यासाठी त्यातील तरतुदी समजून घेणे आवश्यक असल्याचे मत, उपराजधानीतील प्रख्यात आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी व्यक्त केले.
 
mahiti adhikar_1 &nb
 
डिजीटल तरुण भारतसोबत माहितीचा अधिकार : समज व गैरसमज या विषयावर संवाद साधताना ते बोलत होते. आजवर आपण दीड ते दोन हजार अर्ज माहिती अधिकारात दाखल केले असून, त्यातून सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनातील अचडणी सोडविण्यास मदतच झाली असल्याचे अनुभव त्यांनी सांगितले. स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर्सचा प्रश्न असो की पिण्याच्या पाण्याची टाकी स्वच्छ करण्याचा मुद्दा, विद्यापीठात प्लेसमेंट सेल सुरू करण्याचा विषय असो किंवा शहरात लागलेल्या जाहिरातींच्या महसूलाविषयीची माहिती, अशा सगळ्याच मुद्यांवर माहितीच्या अधिकाराअंतर्गत, प्रत्येक सजग नागरिक आवश्यक ती माहिती संबंधित खात्याकडून मागू शकतो.
 
या अधिकाराच्या अंतर्गत नेमके प्रश्न विचारल्यास योग्य ती माहिती मिळत असल्याचे सांगून कोलारकर म्हणाले की, माहिती विचारण्यास १५० शब्दांची मर्यादा असून दारिद्र्यरेषेखालील लोकांना त्यासाठी दहा रुपयेदेखील खर्च करावे लागत नाहीत. माहिती अधिकारात अर्ज करण्याची पद्धत अगदी सोपी असल्याचे सांगून ते म्हणाले की, ज्या संस्था-विभागांना सरकारकडून निधी मिळतो, त्यांच्याकडे आपण माहिती मागू शकतो. मात्र, खासगी संस्था, सहकार क्षेत्र आणि लष्कराचे विविध विभाग यांना माहितीच्या अधिकारातून वगळण्यात आले आहे.आपल्याला हवी असलेली माहिती शक्यतो संख्येत मागावी, कल्पकतेच्या qकवा भविष्यात होऊ घातलेल्या मुद्यांविषयी प्रश्न नसावेत, सामाजिक मुद्दे हाताळावेत, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. आपली सामाजिक व्यवस्था अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख व्हावी, यासाठी नागरिकांनी माहितीचा अधिकार प्रभावीपणे वापरायला हवा, असेही ते म्हणाले. यादरम्यानच्या काळात आलेले अनुभव आणि माहिती त्यांनी शब्दबद्ध केली आहे.सामान्य प्रशासनावर नागरिकांचा वचक निर्माण होणे सुशासनासाठी आवश्यक असून त्यासाठी माहितीच्या अधिकाराचा योग्य वापर केला जावा, असेही ते म्हणाले.