मेळघाटातील राख्या पोहचल्या सातासमुद्रापार

    दिनांक : 20-Aug-2021
Total Views |
 - पर्यावरणपूरक बांबूनिर्मीत राख्यांना मागणी
 
पथ्रोट : मेळघाटातील लवादा बांबू केंद्राच्या माध्यमातून बांबूचे महत्त्व देश - विदेशात पोहोचविणार्‍या सुनील देशपांडे यांच्या स्मृती आजही कायम आहेत. त्यांच्या या बांबू केंद्रात तयार करण्यात आलेल्या राख्या यावर्षीही देशातील विविध राज्यासह 50 देशामध्ये पोहोचल्या आहेत. राख्या सातासमुद्रापार पोहचल्याने मेळघाटवासीयासह जिल्हावासीयांची मान उंचावली आहे.
 
rakhe foto_1  H
 
लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्रात अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक वस्तू बनविल्या जातात. या केंद्रात यंदाही बांबूपासून सुमारे 30 प्रकारच्या राख्या तयार करण्यात आल्या आहेत. पर्यावरणपूरक राख्यांमुळे आदिवासी महिला व दिव्याग युवकांना रोजगार मिळाला आहे. आदिवासी महिलांनी बनवलेल्या राख्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन वर्षां अगोदर बांधण्यात आल्या होत्या. येथील राख्यांना आदिवासी महिलांची नावे देण्यात आली आहेत. सात गावातील शेकडो महिलांना राख्या बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यंदाही बांबूच्या राख्या 50 देशांमध्ये पाठविण्यात आले आहेत. पावसाळ्यात मेळघाटातून मोठ्या प्रमाणात लोकांचे रोजगारासाठी स्थलांतर होत असते. राखी निर्मितीमुळे 50 महिलांच्या हाताला सलग तीन महिने काम मिळाले आहे. संपूर्ण नैसर्गिक असलेली राखी पर्यावरण प्रेमींच्याही पसंतीस पडली आहे.
 
शहरी भागातून प्रतिसाद मिळावा
 
विशेषकरून यंदा नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, यवतमाळ, नाशिक, पुणे, अमरावतीसह मोठ्या शहरांमध्ये राख्याचे स्टॉल लावण्यात आले आहे. यंदा तब्बल एक लाख बांबू राख्या बनविण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या भारतीय संस्कृती परिषदेच्या मदतीने जगातील 50 देशांमध्ये ही बांबू राखी पोहोचली आहे. एक हजार शाळांमध्ये राखी बनविण्याच्या साहित्याच्या संचाचे वाटप सुध्दा करण्यात आले आहे. या संचामध्ये बांबू बियाणेही असल्याने त्याचा वृक्षारोपणासाठी उपयोग होणार आहे. शहरी भागातून बांबू राखीला उत्तम प्रतिसाद मिळाल्यास त्याचा लाभ मेळघाटातील आदिवासींना रोजगार मिळण्यासाठी होणार आहे, असे संपूर्ण बांबू केंद्राच्या प्रमुख निरुपमा देशपांडे यांनी तभाशी बोलताना सांगितले.