कुपोषण व आरोग्याच्या प्रश्नाबाबत राज्याच्या आरोग्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे

    दिनांक : 19-Aug-2021
Total Views |
नंदुरबार येथे 'जन आशीर्वाद यात्रा' निमित्त डॉ. भारती पवार यांचे पत्रपरिषदेत आवाहन
 
 नंदुरबार प्रतिनिधी : केंद्र शासनाला दोष देण्याऐवजी नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण आणि आरोग्याच्या प्रश्नाबाबत राज्याचे आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी लक्ष घालणे गरजेचे आहे, असे आवाहन 'जन आशीर्वाद यात्रे' निमित्त नंदुरबार येथे आयोजित पत्रपरिषदेत डॉ. भारती पवार यांनी केले. आदिवासी जिल्हा असलेल्या नंदुरबार दुर्गम भागात मोठ्या प्रमाणावर निधी केंद्र शासनाकडून उपलब्ध होत असतो. मात्र अनेक वेळा निधी पडून राहत असल्याने याकडे लक्ष देणे गरजेच असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
  
BJP_Nandurbar_1 &nbs
 
लसीकरणाबाबत बोलताना डॉ. भारती पवार म्हणाल्या की, केंद्र शासनातर्फे कोविड प्रतिबंधक लसीकरणावर भर देण्यात येत असून राज्याचे नियोजन कोलमडल्यामुळे महाराष्ट्रात काहीअंशी लसीकरणाचा तुटवडा भासत आहे. नंदुरबार जिल्ह्यात पाच लाख लसीकरण झाल्याचे कळते. ऑक्सीजन प्लांट देखील प्रगतीपथावर आहे. केंद्राकडून वेळोवेळी मदत येत असल्यामुळे 68 कोटीचा औषध साठा उपलब्ध करून देण्यात आला असून 56 मेट्रिक टन प्रति दिवस ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे.
 
मोदी सरकारने देशातील आदिवासी नेतुत्वाला प्राधान्य देत प्रत्येक आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेत संसदेत संधी दिल्याने मंत्रिपद मिळाल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या विविध आरोग्यदायी योजना अंतर्गत महाराष्ट्रासह नंदुरबार सारख्या दुर्गम जिल्ह्यातील कुपोषणासारख्या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष घातले आहे. नंदुरबार जिल्ह्यात सेम श्रेणीतील बालकांची संख्या तीन हजार 439 असून मॅम श्रेणीतील 18 हजार 658 एवढी आहे. गरोदर मातांचे समुपदेशन करून येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य केंद्राच्या सहकार्याने कुपोषण निर्मूलनाचा प्रश्न निकाली काढण्यात येणार आहे. कुठल्याही परिस्थितीत औषधांचा तुटवडा भासू नये यासाठी केंद्रातर्फे सर्व राज्यातील आरोग्य सुविधांवर प्राधान्यक्रम देण्यात येत आहे. त्यामुळेच नंदुरबार सारख्या दुर्गम जिल्ह्यात आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी केंद्र शासनाच्या वतीने मी स्वतः आरोग्य राज्यमंत्री या नात्याने विशेष लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस खा. डॉ. हिना गावित, ऍड. किशोर काळकर, प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी, माजी आ. शिरीष चौधरी, अशोक उईके, भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी आदी उपस्थित होते.