काळरूपी दरड कोसळली अन् ‘प्रतीक्षा' संपली

    दिनांक : 28-Jul-2021
Total Views |
- स्पेनच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण
- आई म्हणाली, प्रतीक्षा जाऊ नकोस, पाऊस आहे
 
जळगाव : आयुष्याच्या प्रवासात कधी कधी प्रवास आवश्यक असतो. ती सुद्धा प्रवासाला निघाली होती. पण तिचा तो प्रवास अखेरचा ठरला. निसर्गाचे सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करत होती. विहंगम दृश्य मोबाईलद्वारे आईला दाखवत होती. ती अतिशय आनंदात होती. तिचा आनंद फार काळ नव्हता. दबा धरून बसलेली काळरूपी दरड अचानक कोसळली. धड धड असा आवाज झाला अन् भ्रमणध्वनी खाली पडला. इकडे आई प्रणिता ओरडली. तिकडे मुलीचा श्वास थांबला. जीवाचा थरकाप उडविणारी आणि हृदयाचा ठोका चुकविणारी ही दुर्दैवी घटना जळगावपासून हजारो किमी. अंतरावर सांगळा, चितकुल रोड, हिमाचल प्रदेश येथे घडली.
 
 
Pratiksha_1  H
 
प्रतीक्षा पाटील (२७), रा. रामनाथ सिटी, कोराडी रोड, असे त्या युवतीचे नाव आहे. खडकपूर येथून आयआयटी केल्यानंतर प्रतीक्षा मुंबई आणि पुण्यातील कंपनीत प्रोडक्शन अभियंता म्हणून कार्यरत होती. तिला आई प्रणिता, वडील सुनील आणि एक भाऊ आहे. वडील वेकोलित व्यवस्थापक आहेत.
प्रतीक्षाला उच्च शिक्षणासाठी स्पेनला जायचे होते. त्यामुळे तिने अलिकडेच नोकरी सोडली. मात्र, कोरोनामूळे प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. प्रवेशाला वेळ असल्याने ती घरी आली होती. पुढच्या महिन्यात प्रवेश प्रक्रिया होणार असल्याने मधल्या वेळात तिने फिरायला जाण्याची योजना आखली. वडिलांनी परवानगी दिली. मात्र, आईचे मन मानत नव्हते. आई म्हणाली प्रतीक्षा, जाऊ नकोस. पाऊस आहे. मात्र, प्रतीक्षाला निसर्ग सौंदर्य बघण्याचा छंद असल्याने यापूर्वी सुद्धा ती ठिकठिकाणी फिरायला गेली होती. तिच्या हट्टामुळे नाही म्हणता म्हणता आईकडून तिने होकार मिळवला.
 
२२ जुलै रोजी ती निघाली. तिच्या मिनी बसमध्ये एकूण ११ लोक होते. दुपारी सांगळा, चितकुल रोड येथे बस पोहोचली. ती निसर्गसौंदर्य बघत होती. मोबाईलद्वारे नागपूरमध्ये असलेल्या आईलाही दाखवत होती. अचानक काळाने झडप घेतली अन् क्षणात प्रतीक्षाची ज्योत विझली. आईने हंबरडा फोडला. दरड कोसळल्यामुळे जागीच ९ लोकांचा मृत्यू झाला. आधार कार्डवरून ओळख पटली. दुर्दैवी घटनेची बातमी वडिलांना देण्यात आली. सोमवारी तिचे वडील दिल्लीला पोहोचले. हिमाचल प्रदेशहून प्रतीक्षाचे पार्थिव दिल्लीला आणण्यात आले. नंतर विमानाने मंगळवारी नागपुरात आणले. मंगळवारी तिच्या पार्थिवावर नारा घाट येथे अन्त्यसंस्कार करण्यात येईल.
 
वाढदिवसाची आठवण
 
८ जुलै रोजी प्रतीक्षाचा वाढदिवस होता. कुटुंबीयांनी नेहमीप्रमाणे वाढदिवस साजरा केला. फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटून तर सर्व जण आंनदी होतात. पण न भेटता इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे हेच खरे जीवन असल्याचे ती म्हणायची.